अटलांटातले "पटेल" स्पॉट्स

बरेच जण एखाद्या सप्ताहांतापुरते अटलांटाला चक्कर टाकतात आणि हातात असलेल्या पाऊण, एक किंवा दिड दिवसात इथलं काय बघता येईल असा त्यांना प्रश्न पडतो. जर अटलांटा शहराबाहेर जायचं नसेल आणि हातात दिड-दोन दिवस असतील तर शहरातले सगळे "पटेल पॉईंट्स" बघणे (आणि तिथे फोटो काढून ते फेसबूकवर डकवणे!) सहज शक्य आहे. अटलांटामध्ये अनेक कंपन्यांची मुख्यालयं आहेत. उदाहरणं द्यायची झाली तर कोकाकोला, सिएनएन, डेल्टा / एअरट्रॅन एअरलाईन्स / कॉक्स कम्युनिकेशन, अर्थलिंक, युनायटेड पार्सल सव्हिसेस (UPS), वॉफल हाऊस आणि चिकफिले ह्या रेस्तराँ चेन्स. ह्यातल्या काही मुख्यालयांमध्ये म्युझियम्स, टूर्स आहेत आणि ती डाऊनटाऊन परिसरात आहेत. १. वर्ल्ड ऑफ कोकाकोला : जगप्रसिद्ध कोकाकोला उत्पादनं तयार करणार्‍या कंपनीचं मुख्यालय अटलांटा डाऊनटाऊनमध्ये आहे. तसचं "वर्ल्ड ऑफ कोकाकोला" नावाचं त्यांचं म्युझियमसुद्धा ह्याच परिसरात आहे. सुरूवातीला कोक जेव्हा पहिल्यांदा विकायला सुरूवात झाली तेव्हापासूनची सगळी मोठमोठी बॅनर्स इथे लावलेली आहेत. तसेच अगदी सुरूवातीपासूनच्या कोकच्या बाटल्या बघायला मिळतात. जुन्या बाटल्यांचे आकार आत्ताच्या काचेच्या बाटल्यांपेक्षा बरेच वेगळे होते. कोकाकोलाच्या सिक्रेट फॉर्म्युलाबद्दल माहिती देणारी (?) फिल्म तिथे सुरुवातीलाच दाखवतात. इथे एक ४-डी शो आहे. कोक म्हणजे नक्की काय हे सांगणारा हा शो मनोरंजक आहे. पुढच्या एका विभागात जगभरात कोकाकोलासाठी बनवल्या गेलेल्या जाहिराती इथल्या थिएटरमध्ये सतत सुरू असतात. आपल्या इथली अमिर खान आणि ऐश्वर्या रायची जाहिरात इथे बघायला मिळते. इथे कोकच्या बाटल्यांचं उत्पादनसुध्दा थोड्याप्रमाणात होतं आणि त्याची असेंब्ली लाईन बघायला मिळते. मोठमोठ्या बॉयलरमध्ये भरलेल्या डिस्टील्ड वॉटर पासून कोकच्या सिलबंद बाटली पर्यंतचे मधले सगळे टप्पे इथे बघता येतात. आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे विविध देशांमधल्या कोकाकोला पेयांची चव ह्या टूरच्या शेवटच्या टप्प्यात चाखता येते. क्लासिक कोक पण हवं तेव्हढं पिता येतं. प्रत्येक खंडाचा वेगवेगळा भाग करून त्यात देशानुसार डिस्पेंसर आहेत. भारतामधून 'माझा' असेल असं वाटलं होतं, पण तिथे भारतातर्फे स्प्राईट आहे. दक्षिण अमेरिकन देशांमधली सगळी पेयं छान आहेत. बाहेर पडताना प्रत्येकाला तिथेच तयार झालेल्या (पहिल्या धारेच्या) कोकची एक बाटली भेट म्हणून देतात. पुढे एक मोठं गिफ्ट शॉप आहे. तिथे बर्‍याच प्रकारची सुव्हिनीयर्स मिळतात. जरा वेगळ्या प्रकारचं म्युझियम म्हणून वर्ल्ड ऑफ कोकाकोलाला नक्की भेट द्यावी. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी कोक कधी ना कधी प्यायलेलं असल्याने प्रत्येकाला थोडीफार उत्सुकता असतेच आणि प्रत्येक वयोगटातल्या लोकांचे मनोरंजन होईल ह्याची पुरेपुर काळजी इथे घेतलेली आहे. हल्लीच्या काळातल्या ख्रिसमसचं महत्त्वाचं आकर्षण असलेला "भेटवस्तू वाटणारा सांताक्लॉज" ही कल्पना पुढे रेटण्यात कोकाकोला कंपनीच्या जाहिरात विभागाचाही बराच हात आहे ही माहीती इथे मिळते. २. सिएनएन सेंटर : अमेरिकेतली २४ तास वृत्तसेवा पुरवणारी पहिली वाहिनी असलेल्या CNN चं मुख्यालय अटलांटा डाऊनटाऊन परिसरात आहे. ह्या वाहिनीवर प्रसारीत होणार्‍या दिवसभरातल्या राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय बातमीपत्रांमधली बरीच बातमीपत्र ह्या इमारतीतल्या स्टुडीयोंमधून प्रसारीत होतात. कोकाकोलाप्रमाणेच सिएनएन सेंटरमध्येही टुर्स असतात. इथे इमारतीच्या मध्यभागी भलेमोठे फूडकोर्ट आहे. डाऊनटाऊनमध्ये काम करणारी बरीच मंडळी लंचसाठी ह्या फूडकोर्टमध्ये येतात. ह्या फूडकोर्टच्या एका बाजूला गिफ्टशॉप तसेच माहिती केंद्र आहे. फूडकोर्टमध्ये भल्यामोठ्या स्क्रीनवर सिएनएन वाहिनीवरची वृत्तपत्रे प्रसारित होत असतात. सिएनएन सेंटरच्या टुरवर जाणार्‍या लोकांसाठी फूडकोर्टच्या मध्यातून एक भलामोठा सरकता जीना थेट पाचव्या मजल्यापर्यंत जातो. ह्या जीन्याची नोंद गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झालेली आहे. टुरदरम्यान CNN आणि CNN international, HLN (Head line news) तसेच CNN en Español ह्यांचे स्टुडीयो पहायला मिळतात. काही ठिकाणी सुरू असलेलं बातमीपत्र सादरीकरणही पहायला मिळतं. ह्या टुरदरम्यान ते बातमीपत्र प्रसारीत होणार्‍या स्टुडियोची संपूर्ण माहिती देतात. निवेदकाला बातम्या कुठे दिसतात, बातमीपत्र वाचन करत असताना त्याला सूचना कशा दिल्या जातात, हवामानाचा अंदाज दाखवणारे नकाशे कुठे आणि कसे असतात ह्या सगळ्या गोष्टी तिथे समजतात. टुरमधल्या एकाला बोलावून ते मॉक बातम्या द्यायला सांगतात. तो भाग मनोरंजक असतो! २००८ साली मार्च महिन्यात झालेल्या वादळात सिएनएन सेंटरच्या ह्या इमारतीचे खूप नुकसान झाले होते. त्याची माहिती तसेच फोटो टुर संपता संपता असलेल्या फोटो गॅलरीत मिळतात. अनेक महत्त्वाच्या घटनांचे सिएनएनवर दाखवले गेलेले फोटोही इथे पहायला मिळतात. ३. जॉर्जिया अक्वेरियम : अमेरीकेतलं प्रत्येक ठिकाणं हे कुठल्या का होईना क्रायटेरियाने "जगातलं सगळ्यांत मोठं" असतं! तश्याच प्रकारचं "इनडोर वॉटर कंटेट" ह्या क्रायटेरियानुसार जगातलं सगळ्यांत मोठं असलेलं बोटीच्या आकाराच्या इमारतीत वसलेलं जॉर्जिया अक्वेरियम अटलांटा डाऊन टाऊनमध्ये वर्ल्ड ऑफ कोकाकोलाच्या अगदी शेजारी आहे. लहान मुलं बरोबर असतील तर ह्या अक्वेरियम मध्ये जरूर जावं अन्यथा ते बर्‍यापैकी कंटाळवाणं आहे. बाकी ठिकाणी नसलेलं असं वेगळं काहीही इथे नाहीये. त्यामुळे सी-वर्ल्ड, शिकागोचं शेड अक्वेरियम वगैरे पाहिलेलं असल्यास इथे नाही गेलात तर फार काही फरक पडणार नाही. आत मधल्या बर्‍याच शोज ना वेगळे पैसे पडतात. बर्‍याच ठिकाणी भल्यामोठ्या काचेच्या भिंतीमागे बहुरंगी मासे दिसतात. ह्या भिंतींवर असलेल्या दिव्यांची रंगसंगती छान आहे. लहान मुलं हे पाहून खुष होतात. वर्ल्ड ऑफ कोकाकोला, सिएनएन सेंटर आणि अक्वेरियम ह्यांचा मिळून काँबो पास मिळतो. आणि सकाळी लवकर सुरुवात केली तर ह्या तीनही गोष्टी एका दिवसात बघणे शक्य आहे. ४. सेंटेनीयल ऑलिंपीक पार्क : अटलांटा शहराने १९९६च्या ऑलिंपीक स्पर्धेचं यजमानपद भूषवलं होतं. ह्या स्पर्धेनिमित्ताने अटलांटा डाऊनटाऊनमध्ये ही बाग उभारली गेली. ह्या बागेच्या मध्यभागी ऑलिंपीक रिंगच्या आकारात कारंजी आहेत आणि इथे लाईट अँड साऊंड शो होतो. चारही कोपर्‍यांत ऑलिंपीक टॉर्चच्या आकारातल्या मशाली आहेत. इथल्या पदपथांच्या विटांवर ऑलिंपीकसाठी देणगी देणार्‍यांची नावे आणि त्यांनी दिलेले संदेश कोरलेले आहेत. ह्या बागेत एका बाजूला कार्यक्रमांसाठी मंच आहे. तिथे दर शनिवारी वेगवेगळे कार्यक्रम सुरू असतात. इथे विश्व हिंदू परिषदेतर्फे दिवाळीच्या दरम्यान कार्यक्रम असतो. हिवाळ्यात एखाद्या दिवशी चांगली हवा असेल तर अनेक लोक इथल्या लॉनवर उन्हं खात बसलेली असतात किंवा चक्कर मारत असतात. ५. स्टोन माऊंटन : अटलांटा शहरापासून सुमारे २० मैल अंतरावर स्टोन माऊंटन नावाचा ग्रॅनाईटचा डोंगर आहे. ह्या डोंगराचे वैशिष्ट्य म्हणजे हा जमिनीवर ठेवलेल्या लंबगोलाकृती दगडासारखा दिसतो. म्हणजे आधीचे चढाव, डोंगराच्या सोंडा अशी नेहमीची रचना इथे दिसत नाही. एकदम डोंगर सुरू होतो. ह्या डोंगराची उंची साधारण १७०० फूट आहे. डोंगरमाथ्यावर जायला केबल कार घेता येते किंवा चालतही जाता येते. चालत साधारण २०-२५ मिनीटांत वरपर्यंत पोचता येतं. डोंगरावरून अटलांटा परिसराचं सुंदर दृष्य दिसतं. अटलांटा शहरात खूप झाडी आहे. त्यामुळे फॉलमध्ये गेलं की डोंगरमाथ्यावरून एकदम रंगीबेरंगी दिसतं. डोंगरावर तयार झालेल्या नैसर्गिक भिंतीवर सिव्हील वॉरमध्ये लढलेल्या तीन प्रमुख नेत्यांचं शिल्प कोरलेलं आहे. ह्याच भिंतीवर उन्हाळ्यात प्रत्येक सप्ताहांताला संध्याकाळी अंधार पडल्यानंतर अमेरिकेच्या आणि जॉर्जियाच्या इतिहासावर आधारीत लेझर शो केला जातो आणि फटाक्यांची रोषणाई केली जाते. तसंच ह्या डोंगराच्या परिसरात स्टोन माऊंटन अम्युझमेंट पार्क आहे. सगळीकडे असतात तशी साधारण ट्रेन राईड, बोट राईड, ग्लास ब्लोईंग, थ्रीडी सिनेमा, लहान मुलांना खेळण्यासाठी खेळ, टॅटूवाला, बुढ्ढी के बाल, फूडकोर्ट वगैरे गोष्टी इथे आहे. इथे एक वैशिष्ट्यपूर्ण डक राईड आहे. बस सारख्या वाहनात सगळ्यांना बसवतात ज्याला ते "डक" म्हणतात आणि पुढे हे डक पाण्यात शिरून होडीप्रमाणे तरंगायला लागतं! उन्हाळ्यात साधारण दुपारी इथे येऊन सगळ्या राईड करून, नंतर खादाडी करून आणि लेझर शो बघून परतणे असा एक दिवसाचा कार्यक्रम बरेच जण करतात. लेझर शो खूपच उंचावर होत असल्याने लॉनवर कुठेही बसून दिसू शकतो. त्यामुळे लोकं आपल्याबरोबर घडीच्या खूर्च्या, चटया, चादरी वगैर घेऊन निवांत बसलेले असतात. वेळ असेल आणि हवा चांगली असेल तर इथल्या एखाद्या पिकनीक एरियामध्ये निवांत ग्रील करत दिवसभराचं आऊटींग करता येतं. हिवाळ्यात लेझर शो जिथे बसून बघतात त्या लॉनवर कृत्रिम बर्फ आणून टाकतात आणि त्यावर स्नो-ट्युबिंग करता येतं. साधारण जानेवारी फेब्रुवारी महिन्यांत हे स्नो-माऊंटन उघडतं. ६. स्वामी नारायण मंदीर : आता ह्याला पटेल स्पॉट म्हंटलेलं चालेल की नाही ते माहित नाही पण हे मंदिर सुद्धा अटलांटामधला मोठा टुरिस्ट स्पॉट आहे! बसच्या बस भरून देशी तसेच विदेशी लोकं मंदिर पहायला येत असतात. अमेरिकेतल्या सगळ्या स्वामी नारायण मंदिरांमधलं सगळ्यांत मोठं हे आहे असं म्हणतात. मंदिराच्या बाहेरच्या बाजूचं आणि आतलं कोरीवकाम अतिशय सुंदर आहे. मंदिराच्या आतली दिव्यांची रचना आणि आरासही सुरेख असते. दिवाळीला ह्या मंदिरावर वेगवेगळ्या रंगाचे प्रकाशझोत सोडून रोषणाई करतात तसच फटाक्यांची आतिषबाजी होते. मंदिराच्या आत दिवाळीच्या दिवसांमध्ये पणत्या आणि साध्या, फुलांच्या आणि धान्यांच्या रांगोळ्यांची फार सुरेख आरास केलेली असते. हि सगळी ठिकाणं अटलांटा शहराच्या जवळपास आहेत. शहराबाहेरच्या, एक दिवसात, जाऊन येता येण्याजोग्या अजून काही ठिकाणांबद्दल पुढल्या भागात...

पश्चिमेतला स्वर्ग - योसेमिटी, क्रेटर लेक

अमेरीकेत आल्यापासून प्रत्येक लाँग विकेंडला भटकंती सुरुच असते. सेंट लुईस तसच अटलांटा ह्या दोन्ही ठिकाणांपासून एखाद-दोन दिवसांत बघता येतील अशी ठिकाणं पहाणं साध्या विकेंडना चालू असतं आणि लाँग विकेंडना मोठ्या ट्रिप. बरेच मित्र-मैत्रिणी अमेरीकेतल्या वेगवेगळ्या भागांमध्ये विखुरलेले असल्याने त्यांच्या भागातल्या नविन नविन ठिकांणाबद्दल कळत असतं आणि मग तिथे जायचे प्लॅन्स ठरतात. अमेरीकेत यायच्या आधी नायगारा आणि ग्रँड कॅनियन सोडून बाकी काही नैसर्गिक गोष्टी बघण्यासारख्या आहेत हे माहित नव्हतं. योसेमिटी आणि क्रेटर लेक ही नावं मी साधारण दिड-एक वर्षांनंतर एका मित्राचे फोटो बघताना ऐकली होती. दोन्ही ठिकाणांचे फोटो खूप मस्त होते आणि त्यामुळे ह्या दोन्ही ठिकाणी जायचच ! असं नक्की ठरवून टाकलं होतं. पण बाकीची यशस्वी ठिकाणं बघण्यात आणि योसेमिटी /क्रेटर लेकचं हवामान, विमानाच्या तिकीटांच्या किंमती आणि सुट्ट्या ह्या सगळ्यांचा ताळमेळ घालण्यात सुमारे ३ वर्ष गेली. यंदाच्या वर्षी मेमोरीयल डे विकेंडला जोडून दोन दिवसांची सुट्टी मिळाल्याने योसेमिटी आणि क्रेटर लेकची "मच अवेटेड" ट्रीप पार पडली. स्वस्त डील मिळाल्यावर विमानाची तिकीटं काढून टाकली. बॉसला सुट्टीसाठी पटवणं आणि तिथलं प्लॅनिंग हे नंतर करायला ठेवलं. प्लॅन आखायला घेतल्यावर मात्र "रात्र थोडी आणि सोंग फार" अशी स्थिती झाली ! ज्याला विचारू तो " हे नक्क्कोच अजिबात.. तेच्च्च पहा" टाईप मतं सांगत होता. शिवाय आमच्या बरोबर अजून एक मित्र आणि मैत्रिण येणार होते त्यांना त्यांचे मित्र-मैत्रिणी असेच सल्ले देत होते. त्यामुळे रोज रात्री आमचा फोन झाला की प्लॅन बदललेला असे !! शेवटी निघायच्या आदल्या रविवारी दोन दिवस योसेमिटी, दीड दिवस क्रेटर लेक आणि शेवटचा दीड दिवस सॅन फ्रँन्सिस्को असा प्लॅन नक्की केला आणि हॉटेल्स बूक करून टाकली. हवामानाचा अंदाज रोज पहात होतो. एकडून तिकडे किंवा तिकडून इकडे येणार्‍या हवेच्या झोतांमूळे कधी स्वच्छ सूर्यप्रकाश, कधी पाऊस तर कधी बर्फ असा रोज बदलता "अंदाज" दाखवला जात होता. पण आता विमानाची तिकिटं काढली आहेत त्यामुळे काय वाट्टेल ते झालं तरी जाऊच असं ठरवून हवामानाचे अंदाज बघणं बंद करून टाकलं. एकूण ट्रीपचा प्लॅन बघता धबधबे, लेक, समुद्र, खाडी ह्या सगळ्यांचं बर्‍याचदा दर्शन होणार होतं. :) बे-एरीया मधून योसेमिटीला जायला निघाल्यावर रस्त्यावर जवळच्या बागांमधून तोडून आणलेल्या ताज्या आणि अतिशय चविष्ठ चेरी आणि स्ट्रॉबेरीचे स्टॉल लागले. आम्ही लगेच गाडी तिकडे वळवून ताज्या फळांवर ताव मारला ! * <फोटो १>
* नंतर हे स्टॉल बर्‍याचदा दिसले. रस्त्यांवर दुतर्फा फळांच्या बागा दिसत होत्या. शाळेतल्या भूगोलाच्या पुस्तकात वाचलेला फळफळावळ पिकवणारा कॅलीफोर्निया पहायला मिळाला. एकदा तर आम्ही लंच न करता किलो-दोन किलो चेर्‍या आणि स्ट्रॉबेर्‍याच फस्त केल्या ! * <फोटो २ > * हायवे १२० वर घाट सुरु होण्याच्या आधी एक सुंदर लेक लागला. खूप मोठा होता आणि अधेमधे गाड्या थांबवून फोटो काढण्याकरता जागा पण होती. ह्या लेकचं नाव मात्र कळू शकलं नाही. * <फोटो ३> * योसेमिटी नॅशनल पार्क हे अमेरिकेतल्या जुन्या नॅशनल पार्क्सपैकी एक आहे. हे दरीत वसलेलं आहे. त्यामुळे सगळ्या बाजूंनी डोंगररांगा, दाट झाडी, डोंगरावरच्या बर्फाचे पाणी वितळल्यामुळे खळाळणारे धबधबे असं नयनरम्य दृष्य वसंतात आणि उन्हाळ्यात दिसतं. दरीत असल्यामुळे थंडीतही तिथे जाता येतं पण आजुबाजूला डोंगरांवर चढाई करण्याचे रस्ते तसचं उंचावरची प्रेक्षणीय स्थळं पहाता येतं नाहीत. * <फोटो ४> * पार्कमध्ये शिरता शिरता ब्रायडलवेल धबधबा लक्ष वेधून घेतो. ह्या धबधब्याच्या अगदी जवळ जाता येतं. पाणी बर्फाचं असल्याने भयंकर गार होतं तरीही कुडकूडत आम्ही तिथे जाऊन आलोच ! जवळजवळ पूर्ण भिजलो आणि एखादी चहाची टपरी जवळपास हवी होती अशी तीव्र जाणिव झाली. * <फोटो ५ > * पार्कमध्ये पुढे गेल्यावर एक झुलता पूल लागतो. त्याच्या आसपास खूप मोठं हिरवळ असलेलं मैदान आहे. अनेक लोक तिथे खेळत, वाचत, चित्र/फोटो काढत, ग्रील वरच्या गरमागरम पदार्थांवर ताव मारत किंवा नुसतेच उन्हं खात बसले होते. इथूनच योसेमिटी धबधब्याच्या वरच्या भागाचे दर्शन झाले. * <फोटो ६ > * आम्हीही जरावेळ टाईमपास करून मग पुढे निघालो. हा रस्ता पुढे पार्कच्या मुख्य भागात म्हणजे योसेमिटी वॅलीत जाऊन पोहोचतो. या पार्कमध्ये आत फिरण्यासाठी बस आहेत, जेणेकरून प्रत्येक ठिकाणी वाहनांची गर्दी होत नाही. मध्यभागी असलेल्या वाहनतळावर गाडी ठेऊन बसने आरामात फिरता येतं. आम्हीही गाडी तिथे ठेऊन योसेमिटी धबधब्यापाशी जाणारी बस पकडली. ह्या धबधब्याच्या वरच्या भागात जाता येतं किंवा खालचा अर्धाभाग पाहून परतता येतं. वरचा अर्धा भाग पार करणं खूप अवघड आहे असं तिथे लिहिलेलं होतं तसच सूर्यास्त होईपर्यंत आम्ही तिथून परतू शकलो नसतो त्यामुळे आम्ही खालच्याच सुमारे ३ मैलांच्या ट्रेलवर गेलो. * <फोटो ७> * तिथून परतेपर्यंत थंडी चांगलीच वाढली होती आणि अंधारही पडायला लागला होता. त्यामुळे मग गाडी घेऊन करी व्हिलेजमध्ये जिथे आम्ही एक तंबू भाड्याने घेतला होता, तिथे जायला निघालो. हा तंबू फारच सोईचा होता. आतमध्ये हिटर होता. तसच झोपायला पलंगही होते. बाहेर अस्वलांपासून अन्नपदार्थ लपवून ठेवण्यासाठी पेट्या पण होत्या. इथली अस्वलं खाण्याचा वास आला तर गाड्यांची दारंही तोडतात. त्यामुळे खाद्यपदार्थ तसेच वास येणार्‍या कुठल्याही गोष्टी ह्या पेटीच ठेवणं बंधनकारक आहे.
* <फोटो ८ >
* इथल्या बर्‍याच नॅशनल पार्क्समध्ये सरकारच्या नॅशनल पार्क सर्व्हिसेस तर्फेच खाण्यापिण्याची तसेच रहाण्याची सोय केलेली असते. त्यामुळे अतिशय चांगली सोय वाजवी दरात उपलब्ध असते. अश्याच रेस्टॉरंटमध्ये पोटपूजा करून आम्ही मिरर लेकच्या दिशेने प्रयाण केले. जाता जाता सहज तिथल्या ऑफिसमध्ये चौकशी केल्यावर कळले की गेले काही महिने बर्फामुळे बंद असलेला ग्लेशियर पॉईंटचा रस्ता त्या दिवशी दुपारी बारा वाजता उघडणार होता ! आम्ही आमच्या पुढच्या प्लॅनमध्ये लगेच बदल केले कारण ग्लेशियर पॉईंट अजिबात चुकवायचा नव्हता. मिरर लेक नावाप्रमाणेच आरसा आहे. नितळ पाण्यात आजुबाजूच्या दृष्याचे सुंदर प्रतिबिंब पडतं.
*<फोटो ९ > * मिरर लेक हून परत येईपर्यंत ग्लेशियर पॉईंट उघडायची वेळ झाली. लगोलग आम्ही गाडी तिकडे वळवली. ग्लेशियर पॉईंट हा डोंगरमाथ्यावर आहे आणि त्यामुळे तिथून योसेमिटी व्हॅलीचं सुंदर दृष्य दिसतं. जसजसे वर जात होतो तसा आजुबाजूला साठलेला बर्फ दिसायला लागला. रस्त्यावरून गाड्या जाता याव्या म्हणून रस्ता तेव्ह्डा साफ केलेला होता. मध्ये एकेठिकाणी खूप मोठा बोगदा आहे आणि ह्या बोगद्याच्या सुरुवातीला गाड्या थांबवून फोटो काढता येतात. आपण साधारण डोंगराच्या मध्यापर्यंत आलेलो असतो. ग्लेशियर पाँईटहून दिरणारं दृष्य हे योसेमिटीमधल्या सौंदर्याची परमावधी म्हणायला हरकत नाही ! आजुबाजूचे राकट पहाड, मुळात भली मोठी असलेल्या पण वरून नाजूक दिसणार्‍या झाडांनी भरलेली दरी, खळाळते धबधबे आणि अजिंक्य दिसणारा हाफ डोम असं हे सगळच फार सुंदर दिसतं ! आम्ही तर १० मिनीटे काही न बोलता नुसते बघतच बसलो.
* <फोटो १० > * वरून दिसणारा पार्कचा परिसर
* <फोटो ११> * ग्लेशियर पॉईंटहून हाफ-डोम ही सुरेख दिसतो. हा डोंगर एकाबाजूने सरळसोट उभा आहे तर दुसर्‍याबाजूने डोमच्या आकाराचा आहे. ह्यावर चढाईपण करता येते.
* <फोटो १२ > * हा एक पॅनोरमाचा प्रयत्न
* <फोटो १३> * हे सगळं दृष्य डोळ्यांत आणि कॅमेर्‍यात साठवून आम्ही मॉरीपोसाला जायला निघालो. मॉरीपोसाला पृथ्वीवरचे सगळ्यात मोठे सजिव अर्थात जायंट सेक्वा ट्री आहेत. तिथे उन्मळून पडलेल्या झाडाच्या मुळावरूनच आकाराची कल्पना येईल.
* <फोटो १४ > * हे ग्रिझली जायंट. ह्याची उंची सुमारे ६३ मिटर आणि घेर ८ मिटर आहे. ह्याच्या अतिभव्यतेपुढे काय बोलावं सुचतच नाही !
* <फोटो १५ >
* पुढे कॅलिफोर्निया जायंट लागतो. ह्याचं चित्रही भूगोलाच्या पुस्तकात पाहिलं असेल. ह्या झाडाच्या बुंध्याला भलं मोठं भोक पाडून पूर्वी ह्यातून गाड्या जात असत. आता हे भोक हळूहळू (म्हणजे फारच हळू) बुजतय. अश्याप्रकारचा प्रयत्न केलेलं हे एकमेव झाड आता जिवंत आहे.
* <फोटो १६ >
*
मागे यलोस्टोन नॅशनल पार्कला जाऊन आलेलो असल्याने योसेमिटी आणि येलोस्टोनची सारखी तुलना होतं होती. योसेमिटी नक्कीच जास्त सुंदर आहे पण मानवी वस्तीपासून जवळ असल्याने तसेच पर्यंटकांची खूप गर्दी असल्याने हे सौंदर्य हरवणार नाही ना अशी कुठेतरी भिती वाटून गेली ! योसेमिटी बघून झाल्यावर आम्ही बे-एरीयात परतून क्रेटर लेकच्या दिशेने प्रयाण केलं. क्रेटर लेक हा कॅलिफोर्नियाच्या उत्तरेला असलेया ऑरेगन राज्यात येतो. गेल्यावेळच्या ट्रीपमध्ये ऑरेगन कोस्ट मला फार म्हणजे फारच आवडला होता ! बे-एरीयाच्या हाईपपुढे ऑरेगन हे एखाद्या फेमस हिरॉईनच्या सुंदर पण दुर्लक्षित बहीणीसारखं वाटतं (ट्युलिपच्या ब्लॉगमधून साभार ! :) ) ऑरेगनच्या प्रेमामुळे आम्ही खरतर पोर्टलँडपर्यंत ड्राइव्ह मारायचा विचार करत होतो पण वेळेआभावी ते रद्द करावं लागलं. क्रेटर लेक हा भुकंपामुळे तयार झालेल्या प्रचंड मोठ्या खळग्यात साठलेल्या बर्फाच्या तसेच पावसाच्या पाण्याच्या साठ्यापासून तयार झाला आहे. ह्या लेकमध्ये ना कुठले झरे, नद्या येऊन मिळतात ना लेकमधून उगम पावतात. पाण्याचा स्त्रोत फक्त पाऊस किंवा बर्फ असल्याने पाणी अतिशय शुद्ध आणि स्वच्छ आहे. बे-एरीयातून जसजसे उत्तरेला जात होतो तसं आजूबाजूचं दृष्य बदलतं होतं. आधी फळांच्या बागा, मग वाळलेलं गवत असलेली जमीन, मधेच उजाड डोंगर. माऊंट शास्ता जवळ आल्यावर झाडांची उंची वाढायला लागली आणि जरा वेळानी पाऊसही आला. दरम्यान आम्ही ऑरेगनमध्ये प्रवेश केला होता. तिथे तर थंडीही जोरदार वाढली पण ऊन मात्र होतं. आत एका विजीटर सेंटरवर विचारलं तर तिथल्या काकूंनी अगदीच उसासे सोडले. म्हणे बघा जाऊन लेक पर्यंत नशिब असेल तर मिळेल बघायला. म्हंटलं बाई बर्‍या आहेत ना ! इथे ऊन पडलय आणि बर्फाचं काय घेऊन बसल्यात. मुख्य रस्ता सोडून आत वेळल्यावर आजुबाजूला साठलेला बर्फ दिसायला लागला.
* <फोटो १७> * हळूह्ळू तो वाढायला लागला. रस्ता अगदी बर्फातून कोरून काढला होता ! विजिटर सेंटरचं वळणं आलं. मात्र तिथे काही असेल असं वाटतं नव्हतं.
*
<फोटो १८>
* ते व्हिजिटर सेंटर पाहिल्यावर मात्र आम्ही अवाक झालो ! ह्या भागात इतका बर्फ पडतो की ती पूर्ण इमारत बर्फात गाडली जाते. ती वापरता यावी म्हणून अधेमधे त्याच्या खिडक्या आणि दारं खणून काढतात !
*
<फोटो 1९>
*
ह्या सेंटरपासून लेक पुढे साधारण ३ मैलांवर आहे. इथे फक्त २ महिने बर्फ नसतो. तेव्हड्यावेळात लेकच्या कडेने गाडी नेता येते तसच पाण्यापर्यंत जाता येतं. आम्ही व्ह्यू पॉईंटपाशी पोचलो तर तिथेही रस्त्याच्या बाजूला सुमारे १५ फुट उंचीचे बर्फाचे ढिगारे होते. त्यावर चढून गेल्यावर पाण्याचं पहिलं दर्शन झालं.
* <फोटो २०>
*
हळूहळू त्याच्या प्रचंड आकाराचा अंदाज येत गेला. लेकच्या एका कोपर्‍यात एक बेट आहे.
* <फोटो २१>
*
मध्येच एकदम ढगबाजूला झाले आणि प्रखर सुर्यप्रकाश पडला. पाणी गडद निळ्या रंगाचं दिसायला लागलं, जसं काही तिथे शाईची दौतच उपडी केली आहे !
* <फोटो २२>
* सगळ्या बाजूंनी बर्फाच्छादीत डोंगर आणि झाडं, शार निळं पाणी आणि चकाकणारा सूर्यप्रकाश अश्या त्या दृष्याचं वर्णन करणच शक्य नाही ! ते आम्ही अक्षरशः डोळे भरभरून बघितलं. जरा वेळाने फोटो काढले. हा एक पॅनोरमाचा प्रयत्न :
* <फोटो २३> * परत हळूहळू ढगांची छाया पडायला लागली. एका बाजूला थोडा सूर्यप्रकाश होता.
* <फोटो २४>
* तर दुसर्‍या बाजूने अचानक बर्फवृष्टी सुरु झाली. बर्फ हळूहळू सरकत होता आणि लेकचा तो तो भाग दिसेनासा होत होता.
* < फोटो २५ > * बर्फात उभं रहाणं अशक्य झाल्यावर आम्ही अखेर गाडीत बसलो आणि परतीच्या प्रवासाला निघालो ! ह्या दोन्ही ठिकाणी निसर्गाची अनेक रुपं आणि वर्णनातीत सौंदर्य पाहिलं. बर्‍याच दिवसांपासूनची योसेमिटी आणि क्रेटर लेक पहायची इच्छा पूर्ण झाली. आता अजून एक इछा होते आहे ती म्हणजे रिटायरमेंट घेतल्यानंतर यलोस्टोन, योसेमिटी किंवा क्रेटरलेक च्या विजिटर सेंटरवर "हाऊ मे आय हेल्प यू?" वाल्यांचं काम करायचं म्हणजे सगळ्या ऋतूंमध्ये ह्या गोष्टी पहाता येतील. बघूया हे पूर्ण होतय का... :) ---------------------------------------------------------------------------------------------------------------- माहितीसाठी काही लिंक्स : नॅशनल पार्क सर्व्हिसेसच्या वेबसाईट वर सगळी माहिती व्यवस्थित दिलेली आहे. रस्त्यांची सध्याची स्थिती, हवामान तसच सद्यस्थिती दाखवणारे कॅमेरे ह्याचा खूप उपयोग होतो.
१. योसेमिटी : http://www.nps.gov/yose/index.htm
२. क्रेटर लेक : http://www.nps.gov/crla/index.htm
ह्या शिवाय योसेमिटीचं प्लॅनिंग करण्यासाठी मला खालचा ब्लॉग खूप उपयोगी पडला. http://www.yosemitefun.com/images/yosemite_park.htm

हेलन, जॉर्जिया

स्प्रिंग किंवा फॉलमधल्या एखाद्या शनिवारी जेव्हा मस्त हवा असेल, म्हणजे फार ऊन नाही, थंडी नाही, पाऊस नाही, कधी स्वच्छ सूर्यप्रकाश, मध्येच ढगांची सावली, तेव्हा हेलन बाईंची भेट घ्यायला जरूर जावं. हेलन, जॉर्जिया, हे अटलांटाच्या उत्तरेला साधारण ८० मैलांवर वसलेलं टुमदार गाव आहे. ब्लू रिज पर्वतरांगांनी वेढलेल्या ह्या गावाच्या मध्यातून चॅटॅहुची नदी वाहते. आसपास चॅटॅहुची नॅशनल फॉरेस्टची दाट झाडी आहे.
हायवे ४०० सोडून आत वळलं की साधारण वीस-पंचवीस मिनिटांनी आपण हेलनमध्ये शिरतो आणि शिरल्याशिरल्या जर्मन धाटणीची उतरत्या छपरांची घरं दिसायला लागतात. हे गाव जर्मन किंवा बव्हेरीयन पद्धतीने वसवलेलं आहे. पर्यटन हाच मुख्य व्यवसाय असल्याने आता तशा पध्दतीची घर बांधणं बंधनकारक आहे.



गावात शिरल्यानंतर मुख्य रस्ता वळून चॅटॅहुचीवर बांधलेल्या पुलावरून जातो. हेच ह्या गावाचं डाऊनटाऊन. नदीच्या दोन्ही बाजूला खाण्याच्या तसेच पिण्याच्या मुबलक जागा आहेत. नदीचे दोन्ही काठ व्यवस्थित बांधून त्यावर ही उपहारगृहे तसेच पब्स वसवले आहेत. हाच रस्ता पुढे वळून चॅटॅहुची नॅशनल फॉरेस्टच्या दिशेने जातो.

जरूर पहाव्या/कराव्या अशा गोष्टी :
१. ह्या परिसरात चॅटॅहुची नदीचा प्रवाह खूप संथ आणि उथळ आहे. त्यामुळे इथे वॉटर ट्यूबिंग करता येतं. वॉटर ट्यूबिंगमध्ये आपल्याला रबराच्या मोठ्या टायरसारख्या ट्यूबमध्ये बसवून नदीच्या प्रवाहात सोडून देतात.
प्रवाहाबरोबर तरंगत तरंगत आपण खाली येतो. एका ट्यूबमध्ये आपण एकटे किंवा आणखी एका कोणाबरोबर बसू शकतो. उपलब्ध वेळेनुसार एक किंवा दोन तासांच्या टूर्स घेता येतात. मध्येमध्ये दगडांवर पाणी जरा खळाळतं असतं, त्यामुळे ह्या ट्यूबमध्ये बसून तरंगायला मजा येते. पाण्याच्या खळाळाचा अंदाज न आल्यास मध्येच छान डुबकीही मारली जाते. उन्हाळ्यात हवा गरम असते आणि नदीचं छान पाणी थंडगार असतं त्यामुळे हे वॉटर ट्यूबिंग करताकरता नदीत मस्त डुंबता येतं. फॉल किंवा स्प्रिंगमध्ये पाणी फारच थंड असतं त्यामुळे एकदा मी थंडी वाजून जोरदार कुडकुडलो होतो !
पाणी खोल नसल्याने पोहता येत नसेल तरी चालू शकतं आणि लहान मुलांनाही बरोबर घेऊन जाता येऊ शकतं.
एकंदरीत नक्की करावा असा प्रकार आहे.



२. अ‍ॅनारूबी धबधबा : चॅटॅहुची नॅशनल फॉरेस्टमध्ये हा धबधबा आहे. मुख्य रस्त्यापासून व्यवस्थित दिशादर्शक पाट्या आहेत. पार्किंगपासून साधारण अर्धा मैल वर चढून जावे लागते. बाकी कुठले मोठे धबधबे पाहिले असतील तर हा फार काही भारी वाटत नाही. पण ्ग्रूप बरोबर असेल तर चढून जायला मजा येते.



३. ऑक्टोबरफेस्ट (Oktoberfest) : जर्मनीमधल्या म्युनिखच्या धर्तीवर इथे सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर माहिन्यांमध्ये Oktoberfest असतो. बियर फॅन्सनी ह्यावेळी नक्की जावे. इथल्या पब्समध्ये ह्या दरम्यान एकदम उत्साही वातावरण असतं.
४. फॉल कलर्स : इथे आणि आसपास बरच जंगल असल्याने फॉल कलर्स छान दिसतात. इथूनच पुढे ब्लूरिज पार्क वेवर जाता येतं.
५. डाऊनटाऊनमध्ये भटकंती : मुख्य रस्त्यावर नदीच्या आसपास डाऊनटाऊन आहे. डाऊनटाऊन म्हंटल्यावर जे डोळ्यासमोर येतं तसं हे डाऊनटाऊन अजिबात नाहिये. हा भाग निवांतपणे वेळ घालवायला छान आहे. नदीवरच्या पुलाच्या थोडं पुढून खाली नदीपर्यंत उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. ट्यूबिंग करणार नसाल तर इथे उतरून नदीला नुसतं ’पायलागू’ करू शकता. स्मित टिपीकल अमेरिकन खेड्यांमध्ये असतात तशी आर्ट अँड क्राफ्ट, काचेच्या / क्रीस्टलच्या वस्तू मिळणारी दुकानं, टॅटू काढून देणारे, टीशर्ट, मॅगनेट, शॉट ग्लास, पोस्टकार्ड मिळणारी दुकानं, लोकल कॉफी शॉप्स, आईस्क्रीम पार्लर्स ह्या परिसरात खूप आहेत. मधल्या एका चौकात एक छोटसं पण छान कारंजं आहे. तिथे कधीकधी लोकल बॅंड गाणी म्हणत, गिटार वाजवत असतात. कधीकधी एक जण पक्ष्यांचे खेळ दाखवत असतो. तिथे बसायला बाकसुद्धा आहेत. ज्यांना खरेदी करायची हौस आहे त्यांना दुकानांमध्ये पाठवून आपण (आईस्क्रीम खात किंवा कॉफी घेत) निवांत बाकावर बसून राहावं !



खानपान सेवा :
१. डाऊनटाऊनमध्ये नदीच्या आसपास खूप खाण्याच्या जागा आणि पब्स आहेत. गावाच्या थोडं बाहेर नेहेमीच्या चेनसुद्धा आहेत. पण इथल्या लोकल रेस्टॉरंट्समध्ये नक्की जाऊन बघावं. आम्हांला इथलं इंटरनॅशनल कॅफे नावाचं रेस्टॉरंट खूप आवडतं. नदीच्या काठी बसून निवांत जेवता येतं. मात्र ह्या रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी लोकांचे जरा हाल होतात. हेच ते इंटरनॅशनल कॅफे.



२. फॉलमध्ये अ‍ॅनारूबी फॉल्सच्या रस्त्यावर छोट्याछोट्या ठेल्यांवर उकडलेल्या शेंगा, कणसं, लेमनेड वगैरे मिळतं. जरा थंड हवा असेल तर गरमगरम दाणे मस्त वाटतात ! त्यात केजन फ्लेवरचे म्हणजे जरासे तिखट मिळतात, ते भारी लागतात. पण मात्र लेमनेड खूप आंबट असतं !
३. डाऊनटाऊनमध्ये एक चॉकोलेट फज शॉप आहे. तिथे वेगवेगळ्या प्रकारची फज मिळतात. ती तयारही तिथेच केली जातात. ते पाहायला मिळालं तर मजा वाटते. तिथे कॅरॅमल तसेच चॉकोलेटमध्ये घोळवलेली सफरचंदंसुद्धा मिळतात. मला आधी पाहून खाविशी वाटली नाहीत पण जरासं आंबट सफरचंद आणि वरचं कॅरॅमल किंवा चॉकोलेट ह्यांची एकत्र चव मस्त लागते. फज तिथेच खावं, घरी आणायच्या भानगडीत पडू नये. ते एकतर पडून राहतं आणि थोडे दिवसांनी कडक होतं.



४. फनेल केक : ही हेलनची खासियत. साधारण आपल्या जिलबीसारखा प्रकार. पीठ फनेलमधून (म्हणून फनेल केक) गरम तेलात सोडतात. तळून झालं की वर पिठीसाखर पेरतात. गरम गरम खायला छान लागतो !
ह्यात फ्लेवर्सपण असतात, पण आम्हांला साधाच आवडला.



सकाळी आरामात ९.३० - १० ला निघालं तरी वरच्या सगळ्या गोष्टी करून संध्याकाळी ७-८पर्यंत घरी परतता येतं. दिवस हेलनबाईंबरोबर मजेत जातो.

अ टेल ऑफ फाईव्ह सिटीज !

आधी वडिलांची नोकरी, नंतर माझी नोकरी आणि मुळातच असलेली भटकायची आवड यामुळे आत्तापर्यंत जगप्रसिध्द अशा अनेक शहरांना भेट देण्याचा योग आला. ही कहाणी आहे मनात घर करून गेलेल्या ५ शहरांची. अ टेल ऑफ फाईव्ह सिटीज... माझ्या पर्यटकी नजरेतून.

अगदी लहान असताना म्हणजे नकळत्या वयात आणि नंतर पुन्हा नोकरी चालू झाल्यानंतर म्हणजे 'जाणत्या' (?) वयात साहेबाच्या देशात जायचा योग आला. सर्व जगावरच्या सत्तेची सूत्रे जिथे एकवटलेली होती अशी ही एकेकाळची जागतिक राजधानी, अर्थात लंडन पाहण्याची संधी मिळाली.
<img src="/vishesh_files/user/u19/london_bridge.jpg" width="700" height="467" alt=""  />

पहिल्या ट्रिपमधलं लंडन अगदी पुसट, काढलेल्या फोटोंमध्ये साधारणत: जेवढं दिसतं तेवढंच आठवतं. पण दुसर्‍या वेळचं मात्र अर्थातच अगदी स्पष्ट आहे. लंडन म्हणजे राजेशाही थाट, लंडन म्हणजे राणीचं शहर, लंडन म्हणजे परंपरा याबरोबरच लंडन म्हणजे शिष्टपणा, लंडन म्हणजे माज... हे असलेले समज-गैरसमज अगदी व्यवस्थित अनुभवायला मिळाले. सुमारे २००० वर्षांचा इतिहास असलेलं हे शहर टिपीकल अमेरिकन शहरांसारखं एकाच साच्यातून 'पाडलेलं' अजिबात नाहीये. अगदी खेडेगावातल्यासारखे गल्ली-बोळ इथे पहायला मिळतात. फक्त अंगभूत शिस्त आणि कडक नियमांचा बडगा यांच्यामुळे या गल्लीबोळांमधूनदेखील दुमजली बस आणि आलिशान मोटारी लीलया धावत असतात. शिवाय प्राणांपेक्षा परंपरा महत्त्वाच्या या अलिखित नियमामुळे असलेल्या गोष्टी न बदलता त्यांचा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने वापर कसा करता येईल यावर जास्त विचार केलेला दिसतो. भल्यामोठ्या इतिहासात लंडनने अनेक चढउतार बघितले. १६६५ मधली प्लेगची साथ, भीषण आग, दुसर्‍या महायुध्दात हिटलरने केलेला अव्याहत बाँबवर्षाव या सगळ्यामुळे अनेकदा लंडन अगदी उद्ध्वस्त झालं; पण प्रत्येकवेळी तितक्याच ताकदीने त्यातून उभं राहिलं. कदाचित ह्या जिद्दीमुळेच लंडनवासीयांनी एकेकाळी जगावर राज्य केलं. आग, दोन महायुद्धे यांतून पुन्हा उभं राहिलेलं हे शहर आज बकिंगहॅम पॅलेस, बिग बेन, १० डाउनिंग स्ट्रीट, ब्रिटीश संसद यांसारख्या ऐतिहासिक वास्तू, सुप्रसिद्ध लंडन ब्रिज, टॉवर ब्रिज ,मध्ययुगीन युरोपातल्या वैज्ञानिक व औद्योगिक क्रांतीची साक्ष असलेल्या अनेक इमारती यांबरोबरच अगदी आत्ताच्या सहस्रकाचं प्रतिनिधीत्व करणारे मादाम तुसॉचे प्रदर्शन, लंडन आय अशा विविध गोष्टी घेऊन थेम्स नदीच्या काठी दिमाखात उभं आहे. ही सगळी ठिकाणं म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच ठरते.

शहर जरी साच्यातून पाडलेलं नसलं तरी लंडनमध्ये दिसणारे ब्रिटीश लोक मात्र एकगठ्ठा सारखे. कडक इस्त्री केलेले चेहरे, चेहर्‍यावर असलेले स्थितप्रज्ञ भाव आणि 'आपण बरे, आपले काम बरे' अशा वृत्तीने चाललेला त्यांचा वावर. आजूबाजूचे लोक, घडामोडी यांबद्दल ते भारतीयांसारखं कुतूहल दाखवणार नाहीत, समोरून येणार्‍या अनोळखी व्यक्तीला अमेरिकनांसारखं 'हाय' करणार नाहीत किंवा ३/४ जणांच्या घोळक्यात राहून आशियाई लोकांसारखं कुजबुजणार किंवा खिदळणार नाहीत. पत्ता विचारला की आपण त्या गावचेच नाही अशा अर्थाचे (अगदी पुणेकरांसारखे) भाव चेहर्‍यावर दाखवणार. पण कामाला मात्र वाघ... दिलेल्या ८ तासांत काम म्हणजे कामच करतील, इकडे तिकडे बघणारसुद्धा नाहीत अन् ते ८ तास झाल्यावर मात्र त्या कामाकडे बघणारदेखील नाहीत. प्रत्येक बाबतीत अगदी काटेकोर शिस्त. बसमध्ये, ट्रेनमध्ये आपणहून कोणाशी बोलणार नाहीत. जर कोणी स्वत:हून संवाद साधायचा प्रयत्न केला तर बोलतील... पण तेही मोजून मापून आणि अगदी शिष्टाचार पाळून. आपला देश, आपला इतिहास, आपली राणी या सगळ्यांचा मात्र प्रचंड अभिमान. त्यामुळेच भावनेच्या भरात टिम हेन्मनची पीट सँप्रस, आंद्रे आगासी यांच्याबरोबर, ग्रॅमी हिकची थेट डॉन ब्रॅडमनबरोबर तर बेकहॅमची पेलेबरोबर नुसती तुलनाच नव्हे तर बरोबरीच करून मोकळे होतील.

क्रीडाजगतातली तीर्थक्षेत्रे मानली जाणारी दोन ठिकाणं - विंबल्डन आणि लॉर्डस् क्रिकेट मैदान हीदेखील लंडनमधली प्रमुख ठिकाणे. ही ठिकाणंही साहजिकच ब्रिटिशांच्या परंपरांमधून सुटलेली नाहीत. लॉर्ड्सवर सामना असताना कोणाला यजमानांचा दर्जा मिळणार, कोणाला पाहुण्यांचा, कुठल्या बाजूची ड्रेसिंग रूम यजमानांची, यजमानांचा कर्णधार कुठे बसणार इथपासून ते स्टेडियममधल्या आरक्षित जागा, क्लबमेंबर्सच्या बसण्याचे प्राधान्यक्रम, ड्रेसकोड हे सर्व लॉर्डस् बांधलं तेव्हापासून आजतागायत तसंच चालू आहे. अगदी आत्तापर्यंत लॉर्डस् येथील गॅलरीत महिलांना प्रवेश नव्हता, कारण ते परंपरेविरुद्ध होतं. विंबल्डनच्या स्टेडियममध्ये अगदी कालपर्यंत सर्व खेळाडूंना राजघराण्याच्या व्यक्तींसाठी असलेल्या विभागासमोर झुकून अभिवादन करावं लागत असे... मग भले तिथे कोणी उपस्थित असो अथवा नसो !
हिथ्रो विमानतळ आणि मेट्रो हे लंडनवासियांचे आणखी दोन वीक पॉईंट्स. त्यापैकी हिथ्रो विमानतळ म्हणजे आधुनिक एस.टी. स्टँड आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाला न साजेशी सुमार सजावट, भयंकर गर्दी, मोठ्यामोठ्या रांगा आणि एकूणात अनागोंदी कारभार यामुळे सिंगापोर, हाँगकाँग, दुबई इथल्या टुमदार विमानतळांच्या तुलनेत हिथ्रो जरा मागेच पडतं. महायुद्धाच्या काळात बाँबवर्षावाने बेचिराख होऊ नये म्हणून जमिनीखालून बांधलेली मेट्रो शहरभर उत्तम जाळं विणते. ही मेट्रो असल्याने लंडनमध्ये फिरणं फारच सोपं होतं. मेट्रो रेल्वे तसंच लांब पल्ल्याची रेल्वे यांपासूनच प्रेरणा घेऊन भारतातली रेल्वे उभारली गेली, पण आज भारत पाहिलेले ब्रिटीश लोकं कबूल करतात की तिथल्यापेक्षा भारतात रेल्वे अधिक व्यापक प्रमाणात वापरली जाते. लंडनमधलं ट्रॅफेल्गार स्क्वेअर, व्हिक्टोरीया टर्मिनस हे आपल्याला अगदी मुंबईची आठवण करून देतात. तिथे गेलं की थेट फोर्ट, सीएसटी परिसरात गेल्यासारखं वाटतं आणि अस्सल मुंबईकराला ब्रिटीशांचा शिष्टपणा आणि अतिरेकी परंपरा वगळता लंडन एकदम जवळचं वाटून जातं.

एकीकडे लंडन बाबा आदमच्या जमान्यातल्या परंपरा जपायचा अट्टाहास करत असतानाच मुंबईसारखंच फक्त 'आज' आणि 'उद्या'चा विचार करणारं, जगाची आर्थिक राजधानी असलेलं शहर म्हणजे न्यूयॉर्क. न्यूयॉर्कला ना इतिहास जपत बसायची आवड आहे ना वेळ. परवापर्यंत लोक सर्वात उंच इमारत म्हणून एंपायर स्टेटमध्ये जात होते, काल वर्ल्ड ट्रेड सेंटर बांधल्यावर तिथे जायला लागले अन् आज ते पडल्यावर पुन्हा त्याच उत्साहाने एंपायर स्टेटमध्ये जायला लागले. वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या पडण्याबद्दल दु:ख आणि चीड जरूर आहे, पण म्हणून गळे काढत रडत बसून थांबून रहायची वृत्ती मात्र नाही. उद्या कदाचित वर्ल्ड ट्रेड सेंटरपेक्षाही उंच इमारत बांधली जाईल आणि पूर्वीपेक्षा जास्त अभिमानाने हे लोक तिकडे जाऊ लागतील. न्यूयॉर्कसुद्धा मुंबईप्रमाणेच घड्याळाच्या काट्यावर सारखं पळत असतं. इतिहासात रमणार्‍या किंवा साहेबी राज्य बघितलेल्या कालच्या पिढीतल्या मुंबईकरांना लंडनशी जवळीक वाटते, तर वर्तमानात जगणार्‍या आणि आजच्या मुंबईकरांना न्यूयॉर्क आपलसं वाटतं. न्यूयॉर्कचं मुंबईशी अजून एक साम्य म्हणजे तिथली सामाजिक सरमिसळ. मुळात न्यूयॉर्क नव्हतंच. ते वसवलं बाहेरच्या लोकांनी. त्यामुळे इथे मूळचे लोक किंवा 'भूमिपुत्र' वगैरे प्रकार तसं बघायला गेलं तर नाहीतच. जे आले ते इथलेच झाले. आजही स्वातंत्र्यदेवता येणार्‍यांचं स्वागत करतेच आहे.
<img src="/vishesh_files/user/u19/NY.jpg" width="375" height="500" alt="" />

त्यामुळेच अमेरिकेतलं सगळ्यांत मोठं चायना टाऊन, सगळ्यांत मोठी भारतीय वस्ती, सगळ्यांत जास्त वेगवेगळ्या वंशाचे लोक हे न्यूयॉर्कमध्ये किंवा आसपास पहायला मिळतात. आतापर्यंतच्या तीनही भेटींमध्ये न्यूयॉर्कचं वेगवेगळं रूप पहायला मिळालं, पण कायम होता तो तिथला सळसळता उत्साह. एकदा पाहिलं ते थंडीत कुडकुडणारं, स्वेटर-मफलरमध्ये गुरफटलेलं न्यूयॉर्क, तर बाकी दोनदा उन्हातान्हात टॅन झालेलं न्यूयॉर्क. पण प्रत्येक वेळी तितकाच उत्साह, आनंद, धावपळ, सामावून घेणारं आश्वासक स्मित... एखादा उत्सव किंवा सण चालू असावा तसं.

पाच बेटांवर मिळून वसलेली ही नगरीसुद्धा मेट्रो तसंच बसने सहज पालथी घालता येते. फक्त इथली मेट्रो ही लंडनइतकी सुटसुटीत वाटत नाही. अर्थात इथल्या मेट्रोत मात्र गप्पा, हसणं-खिदळणं हे सगळं सर्रास दिसतं. कोणी नवखा नकाशा बघत असेल तर एखाद्या काकू किंवा एखादे आजोबा स्वतःहून 'मदत हवीये का?' म्हणून विचारतील, तिथल्या आसपासच्या ठिकाणांची माहिती देतील. प्रत्येकजणच बाहेरून आलेला त्यामुळे मदत करण्याची, सामावून घेण्याची वृत्ती बहुधा आपोआपच आली असावी. न्यूयॉर्कला जाणारा पर्यटक दिवसा स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा, मादाम तुसॉ, एनबीसी स्टुडीओ, वॉल स्ट्रीट अशा ठिकाणी रमतो; रॉकफेलर सेंटरपाशी बसून कॉफी घेऊन थोडा विसावा घेतो आणि एंपायर स्टेटवरून सूर्यास्त बघतो. नंतर रात्री टाईम स्केअरवर येऊन दिव्यांचा झगमगाट बघतो. एखादा रसिक ब्रॉडवेचा शो बघण्यात रमतो, तर एखादा विज्ञानप्रेमी सायन्स सेंटर/नासा सेंटर इथे रमतो. तसं बघायला गेलं तर सगळ्या गोष्टी गेल्या १०० वर्षांच्या आसपासच्या. पण हे आधुनिक सौंदर्यदेखील अतिशय आनंद देऊन जातं. याच शहरातल्या मनाला भावलेल्या आणखी दोन गोष्टी म्हणजे सेंट्रल पार्क आणि ब्रुकलिन ब्रिजचा परिसर. डाऊनटाऊनच्या सिमेंटच्या जंगलाच्या इतकं जवळ सेंट्रल पार्करुपी खरं जंगल असू शकेल यावर विश्वासच बसत नाही. इथली बिल्डर लॉबी तितकीशी बलवान दिसत नाही. :) भर शहरात हे सेंट्रल पार्क जपणार्‍यांना खरच सलाम ! ब्रुकलिन आणि मॅनहॅटन ह्या दोन बेटांना जोडणारा ब्रुकलिन ब्रिज ही पण अशीच सुंदर जागा आहे. एका बाजूला दिसणारं मॅनहॅटन, दूरवर दिसणारा स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा, खाडीचा रम्य परिसर आणि अखंड वाहत असलेला किंचित खारा वारा आणि खालून जाणार्‍या वाहनांच्या आवाजाने निर्माण होणारा एक प्रकारचा ट्रान्स आपल्याला गजबजाटातही शांतता आणि एकांत मिळवून देतो !

विंबल्डन सारखाच टेनिसचा एक उत्सव इथेही भरतो. सरत्या उन्हाळ्यातले दोन आठवडे मिळून अमेरिकन टेनिस स्पर्धा न्यूयॉर्कमध्ये भरवली जाते. विंबल्डनमधली कडक शिस्त, एक प्रकारचा दरारा तिथेच सोडून सर्व टेनिसजगत उत्साह, दंगामस्ती घेऊन इथल्या बिली जीन किंग स्टेडीयममध्ये दाखल होतं. या सोहळ्यालादेखील जगभरातले टेनिसप्रेमी हजेरी लावून जातात. टिपीकल अमेरिकन पद्धतीच्या मार्केटिंगचा उत्तम नमुना असेलेली ही स्पर्धा असते... मात्र एकदम थाटातली आणि बघण्यासारखी.

प्रत्येक मोठ्या शहराला अगदी जवळच एखादा प्रतिस्पर्धी असतो आणि या दोन शहरवासीयांची आपापसांत सतत तुलना/स्पर्धा चालू असते. आपल्याकडे मुंबई-पुण्याची जशी जुगलबंदी चालते तशीच इथे अमेरिकेत न्यूयॉर्क आणि शिकागो यांच्यात चालते. वास्तविक दोन्हींमध्ये साम्य आणि फरकदेखील खूप... पण या दोन्ही शहरांचा आपापला एक थाट आहे.
<img src="/vishesh_files/user/u19/Chicago_Skyline_1_.jpg" width="667" height="500" alt="" />

सेंट लुईसला असताना शिकागो अगदी अंगण-ओसरी असल्याने शिकागोला अनेकदा भेटी दिल्या आणि नंतर नंतर तर कितव्यांदा हे मोजणंपण सोडून दिलं होतं. सुमारे २०० वर्षांपूर्वी शिकागो नदीच्या परिसरात वास्तव्यासाठी आलेल्या प्रवाशांनी तिथे येणार्‍या वासावरुन नदीला चिकागु (म्हणजे सडका कांदा किंवा लसूण) असं नाव दिलं. पुढे त्या नदीकाठी वसलेल्या शहराचं नावदेखील तेच पडलं. त्याचा अपभ्रंश होत शिकागो असं नाव प्रचलित झालं. भौगोलिकदृष्ट्या अतिशय सोयीचं स्थान आणि जवळच असलेल्या 'लेक मिशिगन'च्या पाण्याचा मुबलक साठा यांमुळे आसपास अनेक कारखाने/उद्योग सुरू झाले. या सगळ्या कारखान्यांमधून येणारं प्रदूषित पाणी पुन्हा लेक मिशिगनमध्येच सोडल्याने लेकचं आणि शिकागो नदीचं बेसुमार प्रदूषण झालं. दरम्यान, शिकागो नदीच्या आसपास हल्लीचा डाऊनटाऊन परिसर वसण्यास सुरुवात झाली. उंचच उंच इमारतींनी हा परिसर गजबजू लागला. मात्र १८७१मध्ये लागलेल्या आगीने हा परिसर जळून खाक झाला. 'द ग्रेट शिकागो फायर' या नावाने ओळखल्या जाणार्‍या या आगीची व्याप्ती एवढी मोठी होती की त्यात सुमारे ६ किमी लांबीचा आणि १.५ किमी रुंदीचा परिसर भस्मसात झाला. त्यावेळेला असलेल्या सोयींच्या अभावामुळे आगीची माहिती अग्निशामनदलाला सुमारे ४० मिनिटांनंतर समजली. प्रदूषणामुळे नदीच्या पाण्यावर तयार झालेल्या ग्रीजसारख्या जाड थरामुळे ही आग नदीमार्गेही पसरली. पण तिथल्या लोकांचं तेव्हा असं म्हणणं होतं की झालं ते चांगलंच झालं, शहर बांधताना आधी ज्या चुका झाल्या त्या सुधारण्याची संधी मिळाली आणि याच लोकांच्या अथक परिश्रमाने आज दिसतं, ते भव्यदिव्य शिकागो पुन्हा उभं राहिलं !

शिकागो म्हटलं की प्रत्येक भारतीयाला आठवतं ते स्वामी विवेकानंदांचं भाषण. हे भाषण ज्या सभागृहात झालं ते सभागृहदेखील या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं, पण पुढे स्वामी विवेकानंदांचं नाव त्याच परिसरातील एका रस्त्याला दिलं गेलं. तिथे जवळच असलेल्या भवनात स्वामी विवेकानंद सोसायटीतर्फे आजही उपक्रम चालवले जातात. पूर्वी डाऊनटाऊनजवळ लेक मिशिगनवर यूएस नेव्हीचं प्रशिक्षण केंद्र (नेव्ही पिअर) होतं. पण पुढे ते बंद करुन त्याचं पर्यटनस्थळ केलं गेलं. हा परिसर अतिशय रम्य आहे. इथून सुटणार्‍या क्रूझवरून सूर्यास्त आणि डाऊनटाऊनमधल्या उंच उंच इमारतीचं दृष्य पाहण्यासारखं असतं.

शिकागोमधले लोकपण न्यूयॉर्कसारखेच आनंदी, उत्साही, चटकन संवाद साधणारे. तिथल्या भयंकर थंडीला ते इतके वैतागलेले असतात की उन्हाळ्याचे ४ महिने म्हणजे त्यांना अगदी सणासुदीच्या काळासारखे असतात. शिकागो डाऊनटाऊनचं रूप प्रत्येक ऋतूमध्ये वेगळं भासतं. उन्हाळ्यात ते खूप उत्साही आणि खट्याळ असतं... पानगळीच्या सुमारास खेळून दमलेल्या पण तरीही अजून खेळायची हौस असलेल्या लहान मुलांसारखं आणि थंडीची चाहूल लागलेली असल्याने जरासं काळजीत असतं... भर हिवाळ्यात ते थंडीनी पिचून गेलेलं असतं, त्यामुळे जरा थकल्यासारखं वाटतं, नाताळाचा उत्साह, दिव्यांची रोषणाई जरी असली तरी वातावरण गूढ असतं, यावेळी अगदी शिष्ट लंडनची आठवण होते :)... तर वसंतात परत एकदा उन्हाळ्याच्या तयारीला लागलेलं असतं, त्यावेळेला अगदी एखाद्या कार्याच्या आधीचा तयारीचा काळ वाटतो. लंडन, न्यूयॉर्क यांच्यासारखी शिकागोची मुंबई किंवा भारतातल्या इतर शहरांशी जवळीक जरी वाटत नसली, न्यूयॉर्कसारखं ते आपल्याला चटकन सामावून घेईल की याबद्दल जरी खात्री वाटत नसली तरी ते चटकन आवडून जातं... कदाचित त्याच्या रुबाबामुळे आणि विविध रूपे दाखवणार्‍या निसर्गामुळे !
जाता जाता, लंडनसारखाच शिकागोचा ओ'हेर विमानतळ 'सामान्य' वर्गात मोडणारा आहे !

विमानतळाच्या बाबतीत जरी लंडन, न्यूयॉर्क, शिकागो ही बडी शहरं मागे पडली तरी ही उणीव भरून काढली आहे ती सिंगापोर आणि दुबई ह्या आशियाई शहरांनी. इंग्लंड-अमेरिकेच्या मानाने दोन्ही शहरं भारतापासून जवळ आणि साधारण सारख्याच सोयीसुविधा असलेली... त्यामुळेच हल्ली भारतातून या दोन शहरी जाणार्‍यांचा ओघदेखील वाढला आहे. सिंगापोरचा चँगी विमानतळ हाच तिथलं एक प्रेक्षणीय स्थळ वाटावा एवढा सुंदर आहे. जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ असा किताब दोन वेळा मिळवलेल्या या विमानतळावर तीन टर्मिनल्स असून याची धावपट्टी समुद्राच्या अगदी जवळ आहे. हल्ली जर योग्य वेळी पोहोचलं तर तिथे उभं असलेलं एअरबसचं दुमजली विमान पण पहायला मिळतं !

हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या मोजक्या एकशहरी देशांपैकी एक असलेला हा देश अस्तित्वात आला तो १९६५च्या आसपास. तेव्हापासून त्याची सर्वच बाबतीतली प्रगती विलक्षण आहे. पर्यटन हा तिथला एक प्रमुख उद्योग असून हल्ली बाकीच्या आशियाई शहरांशी याची चांगलीच स्पर्धा चालू असते. पर्यटकांना इथलं खुलं वातावरण आवडून जात असावं. मोठ्या संख्येने मुस्लिम समाज असूनही मध्यपूर्वेत जसं त्यांचं दडपण वाटतं तसं इथे वाटतं नाही. इथले लोक खूपच प्रेमळ आणि अगत्यशील आहेत. कदाचित पर्यटन हाच प्रमुख व्यवसाय असल्याने तसं वागणं भागच असावं. इंग्रजी ही प्रमुख भाषा असूनही काही काही ठिकाणी स्थानिकांशी बोलताना भाषेची अडचण जाणवते. आपण बोललेलं कळत नसेल तरी मदत करण्याचा आटोकाट प्रयत्न हे लोक करतात. एकूणच इथलं वातावरण खूपच 'होमली फीलिंग' देतं. भारतापासूनचं अंतर, राहणीमान, हवामान, कायदेकानून या सगळ्यांचा विचार करता नोकरी, उच्च शिक्षण यांसाठी बाहेर जाणार्‍यांना सिंगापोर हा उत्तम पर्याय आहे.

इथे दक्षिण भारतीय जनताही खूप आहे. त्यामुळे तामिळ भाषा ही प्रमुख भाषांपैकी एक आहे. सुरुवातीच्या एकदोन ट्रिपमध्ये इथलं पर्यटकी सिंगापोर म्हणजे लिटिल इंडिया, चायना टाऊन, सरंगून स्ट्रीट, त्यावरची महंमद मुस्तफासारखी शॉपिंग सेंटर्स पाहिली, तर शेवटच्या ट्रिपमध्ये ज्युराँग भागातलं आधुनिक सिंगापोर पाहिलं. जुराँग बर्ड पार्क, सेंटोसा आयलंड, झू ही पर्यटकांना हमखास आवडणारी ठिकाणं. सेंटोसा आयलंडवरची केबल कार, मोनोरेल, म्युझिकल फाऊंटन यांचं पूर्वी लोकांना खूपच आकर्षण असायचं. ज्युराँग परिसरात उच्च तसेच उच्च मध्यमवर्गीय सिंगापोरही पहायला मिळातं. याच परिसरातल्या चायनिज गार्डनमधला चिनी नववर्षाच्या वेळचा दिपोत्सवपण बघण्यासारखा असतो. अगदी अस्स्ल भारतीय जेवणापासून जगातल्या अनेक खाद्यपदार्थांचे नानाविध प्रकार शहरभर मिळतात. त्यामुळे खवैय्यांना मेजवानीच मिळते. ऑर्केड डिस्ट्रिक्ट परिसरात खरेदीप्रिय पर्यटकांची चंगळ होते.
<img src="/vishesh_files/user/u142/myph02.jpg" width="547" height="389" alt="" />
सिंगापोरचं आणखी एक आवर्जून उल्लेख करण्यासारखं वैशिष्ट्य म्हणजे सिंगापोर एअरलाईन्स... अतिशय आरामदायी आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव जरूर घेण्यासारखा असतो. या विमानकंपनीचं सगळंच काम अतिशय योजनाबद्ध रीतीने चालतं आणि 'ग्राहक देवो भव'चा पूर्ण अनुभव मिळतो.

खरेदी आणि खरेदीसाठीच बाहेर जाणार्‍यांच्या यादीतलं, सिंगापोरच्या बरोबरीचं, किंबहुना त्या यादीत सिंगापोरच्याही वरचं स्थान मिळवणारं आणखी एक आशियाई शहर म्हणजे दुबई. एकूण खरेदीसाठी फारसा नसलेला उत्साह आणि या सगळ्या शहरांपैकी कदाचित सगळ्यात कमी आवडल्याने दुबईचं फक्त एकदाच दर्शन झालं. संयुक्त अरब आमिरातींपैकी एक असलेलं हे शहर म्हणजे मध्यपूर्वेतील एक प्रमुख शहर आहे. इस्लामी राजवट असलेल्या या शहरातलं वातावरण तितकंसं खुलं वाटत नाही. सतत एक प्रकारचं दडपण जाणवत राहतं. साधारण सातव्या शतकाच्या सुमारास इथे इस्लामी राजवट आली. नंतर सापडलेल्या तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्यांमुळे आर्थिक स्थिती एकदम सुधारली. आज तर 'ऑईल मनी'च्या जोरावर इथे वाळवंटात हिरवळ फुलवलेली दिसते. पण एकूणच या समृद्धीचा एक प्रकारचा माज इथल्या लोकांच्या देहबोलीतून, वागण्यातून जाणवतो. लंडनमध्येही हे थोड्या प्रमाणात दिसतं, पण तिथला बडेजाव हा स्वत:ला अजूनही राजे समजण्यातून आलेला वाटतो; तर दुबईत मात्र पैशाचा माज जाणवतो.

<img src="/vishesh_files/user/u19/dubai-gold-souk.jpg" width="112" height="166" alt="" />

खाडीने दुबईची 'बर दुबई' आणि 'देरा दुबई' अशा दोन भागात विभागणी केली आहे. खाडीच्या किनार्‍याचा परिसर छान आहे. दिवसभर उन्हात भाजून निघाल्यावर इथल्या थंड वार्‍यात छान वाटतं. बर दुबई भागातल्या जुन्या इमारती जुन्या काळातल्या दुबईचं थोड्याफार प्रमाणात दर्शन घडवतात. पण इथे येणार्‍या पर्यटकांचं प्रमुख आकर्षण म्हणजे खरेदी. त्यामुळे जिकडे तिकडे मोठे मोठे शॉपिंग मॉल्स. या सर्व मॉल्स आणि मार्केट्समध्ये अगदी आवर्जून बघावं ते म्हणजे 'गोल्ड सुक' किंवा सोन्याचा बाजार. तिथला लखलखाट डोळ्याचं अगदी पारणं फेडतो. तिथे दागिन्यांपासून सोन्याची बिस्कीटं/विटांपर्यंत सगळं काही बघायला मिळतं. ज्या गोष्टी आपण नेहमी चित्रपटात बघतो, त्या प्रत्यक्ष बघायला वेगळंच वाटतं.

बाकीच्या इस्लामी देशांपेक्षा दुबई बरंच पुढारलेलं आहे आणि पर्यटनविकासाच्या बाबतीत त्यांनी आधुनिकतेची कास धरलेली आहे. त्यामुळेच दुबईमध्ये कामानिमित्ताने आलेले परदेशी लोकपण बरेच दिसतात. भारतीयांमध्ये दक्षिण भारतीय आणि त्यातही केरळी लोक खूप आहेत. पर्यटनाला दिल्या जाणार्‍या प्रोत्साहनामुळे आज दुबईमध्ये अरबी संस्कृती दाखवणार्‍या जहाजसफरी, वाळवंटातल्या सफरी, अरबी जेवणाचा तसेच नृत्याचा आविष्कार दाखवणारी 'इव्हिनींग पॅकेजेस' उपलब्ध आहेत. त्याशिवाय, जगातलं सर्वात उंच हॉटेल अन् समुद्राखालचं प्रस्तावित हॉटेल ही अत्याधुनिक आकर्षणेदेखील दुबईमध्येच आहेत. दुबईमधल्या शॉपिंग फेस्टीवलच्या दरम्यान लाखो पर्यटक इथे हजेरी लावून जातात. त्याचबरोबर शारजामधले क्रिकेट सामने, टेनिस, फुटबॉलच्या स्पर्धा यांमुळे क्रिडाप्रेमीही दुबईकडे आकर्षित होताना दिसतात.

इथे मिळणारा खजूर आणि खजुराचे पदार्थ, मांसाहारी पदार्थ यांच्यामुळे चवीने खाणार्‍यांची इथे चैन असते. पण एकंदरीत सोन्याचा चमचमाट, दिव्यांचा लखलखाट हा पायात बेडी असलेल्या कलावंताच्या आविष्कारासारखा वाटत राहतो. सिंगापोरला आलेल्याला आपलंसं वाटतं, तर दुबई ही आलेल्याला 'तुम्ही इथे पाहुणे आहात, पाहुण्यासारखेच रहा आणि वागा' अशी जाणीव करून देत राहते.

युरोप-अमेरिकेतल्या शहरांशी सिंगापोर, दुबईसारखी आशियाई शहरं सर्व बाबतीत आज जोरदार स्पर्धा करताना दिसतात. या स्पर्धेत मुंबई कधी दिसणार कोण जाणे?!

काही उणीवा असल्या तरी ही सगळी शहरं मनात घर करून, त्यांची आठवण ठेवून गेली हे मात्र नक्की. प्रत्येकाला आपापल्या समस्या आहेतच, पण या समस्यांवर मात करून जगाला आपली चांगली बाजू, हसरा चेहरा दाखवण्यात ही शहरं निश्चितच यशस्वी झाली आहेत. आलेल्या पाहुण्यासमोर रडगाणी गात न बसता त्याचं आतिथ्य करून त्याला आनंद देण्याची रीत ही शहरं व्यवस्थित पाळतात. या सगळ्या शहरांची संस्कृती, त्यांची जातकुळी संपूर्ण भिन्न, पण येईल त्या प्रत्येकाचं यथोचित स्वागत करण्याची, सामावून घेण्याची आणि आपल्यामधून जग दाखवण्याची वृत्ती थोड्याफार फरकाने सगळीकडेच अस्तित्वात आहे. कदाचित म्हणूनच ही शहरे खर्‍या अर्थाने 'जागतिक' बनली असावीत.

श्रीगणेशा..

हा ब्लॉग सुरू करून ठेवला पण पाहिला पोस्ट टाकायला काही मुहूर्त सापडेना! आत्तापर्यंत भारतात, परदेशात खूप भटकंती केली. प्रत्येक वेळी माहिती शोधत असताना लक्षात आलं की बरेच जणं आपले प्रवासातले अनुभव, आवडलेल्या तसेच न-आवडलेल्या गोष्टी, things to know आणि प्रवासातले इतर अनुभव आपापल्या ब्लॉग्जवर, संकेत स्थळांवर लिहून ठेवतात. जेणेकरून पुढे ट्रिपला जाणार्‍यांना माहिती शोधण्यासाठी त्याचा फायदा होईल. अगदी ह्याच साध्या हेतूने सुरू केलेला हा टिपीकल टुरिस्टी ब्लॉग. ह्यातली बरीचशी माहिती/अनुभव अगदी इतरांसारखे असू शकतील कदाचित थोडं फार काही वेगळंही असू शकेल.
लिहिन म्हणता म्हणता सहा महिने तरी गेले. ह्यावर्षीचा अटलांटातला हिवाळा फारच सौम्य पडला. हवा गेल्या दोन चार दिवसांपासून बरीच गरम झाली होती. काल घराबाहेर पडलो तर अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधल्या काही झाडांवरच्या कळ्या फुललेल्या दिसल्या. नंतर रस्त्यातही अनेक झाडांवर पांढरी गुलाबी फुलं दिसली. म्हणजे 'वसंता' आलाच की! आता निदान हा मुहूर्त साधून तरी ह्या ब्लॉगला पुढे सरकवण्यासाठी म्हणून ही पोस्ट. इथे वसंत ऋतूचं आगमन फारच सुंदर असतं. बघता बघता झाडांचे खराटे फुलांनी बहरून जातात आणि सगळं कसं रंगिबेरंगी होऊन जातं. स्प्रिंग ब्रेक दरम्यान किंवा थोडं नंतर चेरी ब्लॉसम फेस्टीवल, ट्युलिप फेस्टीवल, वेगवेगळ्या गावांची/काऊंटींची स्प्रिंग फेस्टीवल ह्यांची धामधुम सुरू होते. तर वसंत ऋतुतल्या ह्या फुलोर्‍याचे हे काही फोटो.
हीच ती पांढर्‍या फुलांनी बहरलेली झाडं.






ही गुलाबी फुलंही सुरेख दिसतात.





ही रस्त्यात दिसलेली ट्युलिप्स..


आणि हे आमच्या पॅटिओतली डॅफोडिल्स!


आज साधलेल्या मुहूर्तावरचा उत्साह किती दिवस टिकतोय पाहूया.. :)