बर्नबी माउंटन (Burnaby Mountain Trail)

गेल्या आठवड्यात ह्या वर्षीच्या हायकिंग सिझनचा श्रीगणेशा करून झाल्यावर लगेच पुढचा शनिवार रविवारही बिनपावसाचा, स्वच्छ सूर्यप्रकाशाचा आणि इथल्या मानाने जरा गरम (म्हणजे २४ डि.से.) हवा असलेला येणार होता. शुक्रवारी शिल्पा एकटीच लाँग सायकलींग राईडला जाऊन आली होती त्यामुळे पुन्हा लगेच हाईक करण्यापेक्षा कुठल्यातरी वॉटरफ्रंटला जावं का असं वाटत होतं. पण हा पहिला गरम सप्ताहांत असल्याने सगळीकडे गर्दी होईल असं वाटून तो बेत रद्द केला आणि ते बरच झालं! नंतर पेपरमध्ये सगळ्या समुद्र किनार्‍यांवर प्रचंड गर्दी झाली होती असं वाचलं! कोविडच्या बातम्या आणि आकडेवारी वाचून फार लांब जावसं वाटेना, मग अगदी आमच्या 'बॅकयार्डा'तच असलेल्या बर्नबी माउंटनवर चढाई करायचं ठरवलं. आम्ही वँकुअरला आल्याआल्या आमची कस्तुरी, शशी आणि काव्याशी ओळख झाली होती. त्यांच्याबरोबर आम्ही गेल्यावर्षी दोन हाईक केले. शशी तर एकदम एक्सपर्ट हाईकर आहे आणि दर आठवड्याला हाईक करतो. त्यांचा काही प्लॅन नसेल तर त्यांना विचारू म्हणून शिल्पाने त्यांना फोन केला. शशीचा प्लॅन ठरला नाही त्यामुळे ते यायला तयार झाले.

गेल्या आठवड्यातल्या हाईकला आम्ही ज्योईला घेऊन गेलो होतो पण आज दहा किलोमिटरपेक्षा जास्त अंतर असल्याने त्याला न्यायचं नाही असं ठरलं. त्यामुळे त्याचं डे-केअर उघडल्यावर त्याला तिकडे सोडलं आणि मग आम्ही साडेदहा वाजता बर्नबी माउंटन पार्कमध्ये पोहोचलो. ज्योई डेकेअरमध्ये मजेत रहातो. तिकडे त्याला बाकी कुत्र्यांबरोबर दंगा करता येतो! आम्ही बर्नबी माउंटनच्या पार्किंग लॉटमध्ये पोहोचलो तेव्हा बरीच जागा रिकामी होती. मागच्या वर्षी फॉलमध्ये आलो होतो तेव्हा पार्किंग शोधायला खूप त्रास झाला होता. त्या वेळी झाडांची पानगळ नुकतीच सुरू झाली होती पण आत्ता मात्र वसंताचा सुंदर फुलोरा फुलला होता.

 हे पार्क जवळजवळ शहरातच आहे. ह्या डोंगरावर एका बाजूला हे पार्क आहे, तर दुसर्‍या बाजूला सायमन फ्रेजर युनिव्हर्सिटीचा परिसर आहे. ह्या डोंगराची उंची ३६६ मिटर असून ह्यावर जवळजवळ २८ किलोमिटर लांबीचे ट्रेल आहेत. ह्या हाईकचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपण डोंगराच्या वरून चालायला सुरूवात करतो, मग खाली उतरतो आणि मग पुन्हा वर चढून सुरुवात केली तिथे पोहोचतो. आधी उतरणे आणि मग चढणे हा प्रकार जरा वेगळा वाटतो.

आम्ही पार्कींगमध्ये आलो आणि मागोमाग शशी, कस्तुरी आणि काव्याही आलेच. कोव्हिडमुळे त्यांना आम्ही सुमारे दहा महिन्यांनी भेटलो. पार्कींग जवळाच्या हॉरयझॉन रेस्टॉरंटच्या मागून जाणार्‍या पॅंडोरा ट्रेलने वर जाऊन पुढे ट्रान्स कॅनडा ट्रेलला लागलो. इथून थोडं पुढे गेल्यावर ऑक्टोपस म्युरल लागलं. ते म्युरल म्हणजे पाण्याच्या टाकीवर स्थानिक चित्रकारांनी चितारलेलं छान चित्र आहे. इथे 'सिटी ऑफ बर्नबी' स्थानिक चित्रकारांना अशी चित्र, शिल्प तयार करायला उत्तेजन देते. त्यानिमित्ताने शहर सुशोभिकरणही होतं. 

ट्रान्स कॅनडा ट्रेलला डावीकडे वळल्यावर एक दहा-बारा मिनिटे चालले असू नसू तर झाडीमधून 'बुरार्ड इनलेट' ( म्हणजे पॅसिफिक समुद्राचा व्हँकुअर परिसरात जमिनीत घुसलेला पट्टा. ह्याला खाडीच म्हणता येईल बहुतेक!) ची सुंदर दृष्य दिसायला लागली. खाली व्हँकुअर बंदराचा परिसर, जाणा-येणार्‍या मोठ्या बोटी तसच आज स्वच्छ सुर्यप्रकाश असल्याने स्थानिकांच्या लहान बोटी असं छान दिसत होतं. 

 

पहिले तीन-साडे तीन किलोमिटर एकसलग उतार होता. पुढे पॉवर लाईन ट्रेलचा फाटा गेल्यावर मात्र उतार एकदम वाढला. पुढच्या फक्त एका किलोमिटरमध्ये आम्ही सुमारे दिडशे मिटर खाली आलो. इथे ट्रेलवर वाळू-मुरूम असल्याने चालायलाही त्रास होत होता. खाली पाण्याजवळ पोहोचल्यावर 'सनकोर रिफायनरी' लागली आणि तिकडे ट्रेल सपाट झाला.  इथून पुढे अडीच किलोमिटर ट्रेल अगदी टळटळीत होता. जराही झाडांची सावली नाही आणि शेजारून हायवे! एकीकडे रिया आणि काव्याच्या 'हॅरी पॉटर' बद्दल गप्पा सुरू होत्या. थोडं पुढे रस्त्यात 'बाईक पार्क' लागलं. माऊंटन बाईकवरून कसतरी करायची हौस असणार्‍यांसाठी चांगली सोय केली आहे. 

 

बाईक पार्क गेल्यावर आता हळूहळू चढ सुरू झाला. जरा झाडांची सावली आल्यावर आम्ही जरा ब्रेक घेतला. तशी फार दमणूक होणार नाही हे माहित असल्याने फार खाणं आणलं नव्हतं. बरोबरची बिस्कीटं, सुकामेवा खाऊन पाणी प्यायलं. आता इथून पुढच्या ट्रेलचं नाव 'वेलोड्रोम ट्रेल' होतं. मी रिया आणि काव्याला 'वॉल्डमॉट ट्रेल' सांगून चिडवून घेतलं! थोडं पुढे गेल्यावर एकदम खडा चढ सुरू झाला. आधी उतरलेलं सगळं आता भरून काढायचं होतं. आता आम्ही वळून दुसर्‍या बाजूला आलेलो असल्याने बुरार्ड इनलेटच्या अजून आतला परीसर म्हणजे 'इंडीयन आर्म'चा परिसर दिसायला लागला.

 

ट्रेल वळून पुढे गेला आणि आता डोंगरमाथ्यावर पोहोचण्यासाठी पाचशे पायर्‍या चढायच्या होत्या. कस्तुरी सध्या छंद म्हणून फ्लाईट ट्रेनिंग घेते आहे. हा चढ चढताना तिने तिचे विमान उड्डाणाचे अनुभव सांगितले. एकंदरीत ते सगळे अनुभव ऐकायला भारी वाटलं! 

सगळ्या पायर्‍या आणि उरलेला थोडा चढ चढून आम्ही तीन-सव्वातीन तासांनी पार्किंगच्या जवळच्या 'प्लेग्राऊंड ऑफ गॉड्स'च्या परिसरात पोहोचलो. इथे खूप उंच उंच लाकडी शिल्पं आहेत. ही सगळी शिल्पं 'सिटी ऑफ बर्नबी' ला जपान मधल्या 'कुशिरो' ह्या शहराने भेट म्हणून दिली आहेत. ही दोन शहरं 'सिस्टर सिटीज' आहेत. (तिथली ही माहिती वाचून मला एकदम 'ब्रेमेन सर्कल' आठवलं!)  अमेरिकेतल्या मूळ रहिवाशांना जसं 'नेटीव्ह अमेरिकन' म्हणतात तसं कॅनडातल्या मूळ स्थानिकांना 'इंडिजिनियस' म्हणतात. काही इंडिजिनियस लोकं पुढे जपानातल्या बेटांवरही स्थलांतरीत झाली. त्यांच्या सन्मान करण्याच्या हेतूने 'प्लेग्राऊंड ऑफ गॉड्स' तयार केलं आहे. 


इथे मस्त मोठी हिरव़ळ आहे. आज एकदम स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने आणि हवाही त्यामानाने गरम असल्याने खूप लोकं उन्हं खातं, वाचत, गप्पा मारत तसच मुलं आणि कुत्र्यांबरोबर खेळत बसली होती. काही जणं बरोबर खाणं पिणं आणून छान पथार्‍या पसरून बसले होते. आम्हीही थोडावेळ सावलीत बसून गप्पा छाटल्या आणि मुलींनीही खेळून घेतलं.

एकंदरीत साडेदहा किलोमिटर चालणं आणि ३९१ मिटरची चढाई (elevation gain) असलेला हा हाईक एकदम छान आणि सुटसुटीत झाला. नंतर असं वाटलं की ज्योईला आणलं असतं तरी चाललं असतं. घराच्या एकदम जवळ असल्याने त्याला घेऊन पुन्हा एकदा करता येईल!