अटलांटातले "पटेल" स्पॉट्स

बरेच जण एखाद्या सप्ताहांतापुरते अटलांटाला चक्कर टाकतात आणि हातात असलेल्या पाऊण, एक किंवा दिड दिवसात इथलं काय बघता येईल असा त्यांना प्रश्न पडतो. जर अटलांटा शहराबाहेर जायचं नसेल आणि हातात दिड-दोन दिवस असतील तर शहरातले सगळे "पटेल पॉईंट्स" बघणे (आणि तिथे फोटो काढून ते फेसबूकवर डकवणे!) सहज शक्य आहे. अटलांटामध्ये अनेक कंपन्यांची मुख्यालयं आहेत. उदाहरणं द्यायची झाली तर कोकाकोला, सिएनएन, डेल्टा / एअरट्रॅन एअरलाईन्स / कॉक्स कम्युनिकेशन, अर्थलिंक, युनायटेड पार्सल सव्हिसेस (UPS), वॉफल हाऊस आणि चिकफिले ह्या रेस्तराँ चेन्स. ह्यातल्या काही मुख्यालयांमध्ये म्युझियम्स, टूर्स आहेत आणि ती डाऊनटाऊन परिसरात आहेत. १. वर्ल्ड ऑफ कोकाकोला : जगप्रसिद्ध कोकाकोला उत्पादनं तयार करणार्‍या कंपनीचं मुख्यालय अटलांटा डाऊनटाऊनमध्ये आहे. तसचं "वर्ल्ड ऑफ कोकाकोला" नावाचं त्यांचं म्युझियमसुद्धा ह्याच परिसरात आहे. सुरूवातीला कोक जेव्हा पहिल्यांदा विकायला सुरूवात झाली तेव्हापासूनची सगळी मोठमोठी बॅनर्स इथे लावलेली आहेत. तसेच अगदी सुरूवातीपासूनच्या कोकच्या बाटल्या बघायला मिळतात. जुन्या बाटल्यांचे आकार आत्ताच्या काचेच्या बाटल्यांपेक्षा बरेच वेगळे होते. कोकाकोलाच्या सिक्रेट फॉर्म्युलाबद्दल माहिती देणारी (?) फिल्म तिथे सुरुवातीलाच दाखवतात. इथे एक ४-डी शो आहे. कोक म्हणजे नक्की काय हे सांगणारा हा शो मनोरंजक आहे. पुढच्या एका विभागात जगभरात कोकाकोलासाठी बनवल्या गेलेल्या जाहिराती इथल्या थिएटरमध्ये सतत सुरू असतात. आपल्या इथली अमिर खान आणि ऐश्वर्या रायची जाहिरात इथे बघायला मिळते. इथे कोकच्या बाटल्यांचं उत्पादनसुध्दा थोड्याप्रमाणात होतं आणि त्याची असेंब्ली लाईन बघायला मिळते. मोठमोठ्या बॉयलरमध्ये भरलेल्या डिस्टील्ड वॉटर पासून कोकच्या सिलबंद बाटली पर्यंतचे मधले सगळे टप्पे इथे बघता येतात. आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे विविध देशांमधल्या कोकाकोला पेयांची चव ह्या टूरच्या शेवटच्या टप्प्यात चाखता येते. क्लासिक कोक पण हवं तेव्हढं पिता येतं. प्रत्येक खंडाचा वेगवेगळा भाग करून त्यात देशानुसार डिस्पेंसर आहेत. भारतामधून 'माझा' असेल असं वाटलं होतं, पण तिथे भारतातर्फे स्प्राईट आहे. दक्षिण अमेरिकन देशांमधली सगळी पेयं छान आहेत. बाहेर पडताना प्रत्येकाला तिथेच तयार झालेल्या (पहिल्या धारेच्या) कोकची एक बाटली भेट म्हणून देतात. पुढे एक मोठं गिफ्ट शॉप आहे. तिथे बर्‍याच प्रकारची सुव्हिनीयर्स मिळतात. जरा वेगळ्या प्रकारचं म्युझियम म्हणून वर्ल्ड ऑफ कोकाकोलाला नक्की भेट द्यावी. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी कोक कधी ना कधी प्यायलेलं असल्याने प्रत्येकाला थोडीफार उत्सुकता असतेच आणि प्रत्येक वयोगटातल्या लोकांचे मनोरंजन होईल ह्याची पुरेपुर काळजी इथे घेतलेली आहे. हल्लीच्या काळातल्या ख्रिसमसचं महत्त्वाचं आकर्षण असलेला "भेटवस्तू वाटणारा सांताक्लॉज" ही कल्पना पुढे रेटण्यात कोकाकोला कंपनीच्या जाहिरात विभागाचाही बराच हात आहे ही माहीती इथे मिळते. २. सिएनएन सेंटर : अमेरिकेतली २४ तास वृत्तसेवा पुरवणारी पहिली वाहिनी असलेल्या CNN चं मुख्यालय अटलांटा डाऊनटाऊन परिसरात आहे. ह्या वाहिनीवर प्रसारीत होणार्‍या दिवसभरातल्या राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय बातमीपत्रांमधली बरीच बातमीपत्र ह्या इमारतीतल्या स्टुडीयोंमधून प्रसारीत होतात. कोकाकोलाप्रमाणेच सिएनएन सेंटरमध्येही टुर्स असतात. इथे इमारतीच्या मध्यभागी भलेमोठे फूडकोर्ट आहे. डाऊनटाऊनमध्ये काम करणारी बरीच मंडळी लंचसाठी ह्या फूडकोर्टमध्ये येतात. ह्या फूडकोर्टच्या एका बाजूला गिफ्टशॉप तसेच माहिती केंद्र आहे. फूडकोर्टमध्ये भल्यामोठ्या स्क्रीनवर सिएनएन वाहिनीवरची वृत्तपत्रे प्रसारित होत असतात. सिएनएन सेंटरच्या टुरवर जाणार्‍या लोकांसाठी फूडकोर्टच्या मध्यातून एक भलामोठा सरकता जीना थेट पाचव्या मजल्यापर्यंत जातो. ह्या जीन्याची नोंद गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झालेली आहे. टुरदरम्यान CNN आणि CNN international, HLN (Head line news) तसेच CNN en Español ह्यांचे स्टुडीयो पहायला मिळतात. काही ठिकाणी सुरू असलेलं बातमीपत्र सादरीकरणही पहायला मिळतं. ह्या टुरदरम्यान ते बातमीपत्र प्रसारीत होणार्‍या स्टुडियोची संपूर्ण माहिती देतात. निवेदकाला बातम्या कुठे दिसतात, बातमीपत्र वाचन करत असताना त्याला सूचना कशा दिल्या जातात, हवामानाचा अंदाज दाखवणारे नकाशे कुठे आणि कसे असतात ह्या सगळ्या गोष्टी तिथे समजतात. टुरमधल्या एकाला बोलावून ते मॉक बातम्या द्यायला सांगतात. तो भाग मनोरंजक असतो! २००८ साली मार्च महिन्यात झालेल्या वादळात सिएनएन सेंटरच्या ह्या इमारतीचे खूप नुकसान झाले होते. त्याची माहिती तसेच फोटो टुर संपता संपता असलेल्या फोटो गॅलरीत मिळतात. अनेक महत्त्वाच्या घटनांचे सिएनएनवर दाखवले गेलेले फोटोही इथे पहायला मिळतात. ३. जॉर्जिया अक्वेरियम : अमेरीकेतलं प्रत्येक ठिकाणं हे कुठल्या का होईना क्रायटेरियाने "जगातलं सगळ्यांत मोठं" असतं! तश्याच प्रकारचं "इनडोर वॉटर कंटेट" ह्या क्रायटेरियानुसार जगातलं सगळ्यांत मोठं असलेलं बोटीच्या आकाराच्या इमारतीत वसलेलं जॉर्जिया अक्वेरियम अटलांटा डाऊन टाऊनमध्ये वर्ल्ड ऑफ कोकाकोलाच्या अगदी शेजारी आहे. लहान मुलं बरोबर असतील तर ह्या अक्वेरियम मध्ये जरूर जावं अन्यथा ते बर्‍यापैकी कंटाळवाणं आहे. बाकी ठिकाणी नसलेलं असं वेगळं काहीही इथे नाहीये. त्यामुळे सी-वर्ल्ड, शिकागोचं शेड अक्वेरियम वगैरे पाहिलेलं असल्यास इथे नाही गेलात तर फार काही फरक पडणार नाही. आत मधल्या बर्‍याच शोज ना वेगळे पैसे पडतात. बर्‍याच ठिकाणी भल्यामोठ्या काचेच्या भिंतीमागे बहुरंगी मासे दिसतात. ह्या भिंतींवर असलेल्या दिव्यांची रंगसंगती छान आहे. लहान मुलं हे पाहून खुष होतात. वर्ल्ड ऑफ कोकाकोला, सिएनएन सेंटर आणि अक्वेरियम ह्यांचा मिळून काँबो पास मिळतो. आणि सकाळी लवकर सुरुवात केली तर ह्या तीनही गोष्टी एका दिवसात बघणे शक्य आहे. ४. सेंटेनीयल ऑलिंपीक पार्क : अटलांटा शहराने १९९६च्या ऑलिंपीक स्पर्धेचं यजमानपद भूषवलं होतं. ह्या स्पर्धेनिमित्ताने अटलांटा डाऊनटाऊनमध्ये ही बाग उभारली गेली. ह्या बागेच्या मध्यभागी ऑलिंपीक रिंगच्या आकारात कारंजी आहेत आणि इथे लाईट अँड साऊंड शो होतो. चारही कोपर्‍यांत ऑलिंपीक टॉर्चच्या आकारातल्या मशाली आहेत. इथल्या पदपथांच्या विटांवर ऑलिंपीकसाठी देणगी देणार्‍यांची नावे आणि त्यांनी दिलेले संदेश कोरलेले आहेत. ह्या बागेत एका बाजूला कार्यक्रमांसाठी मंच आहे. तिथे दर शनिवारी वेगवेगळे कार्यक्रम सुरू असतात. इथे विश्व हिंदू परिषदेतर्फे दिवाळीच्या दरम्यान कार्यक्रम असतो. हिवाळ्यात एखाद्या दिवशी चांगली हवा असेल तर अनेक लोक इथल्या लॉनवर उन्हं खात बसलेली असतात किंवा चक्कर मारत असतात. ५. स्टोन माऊंटन : अटलांटा शहरापासून सुमारे २० मैल अंतरावर स्टोन माऊंटन नावाचा ग्रॅनाईटचा डोंगर आहे. ह्या डोंगराचे वैशिष्ट्य म्हणजे हा जमिनीवर ठेवलेल्या लंबगोलाकृती दगडासारखा दिसतो. म्हणजे आधीचे चढाव, डोंगराच्या सोंडा अशी नेहमीची रचना इथे दिसत नाही. एकदम डोंगर सुरू होतो. ह्या डोंगराची उंची साधारण १७०० फूट आहे. डोंगरमाथ्यावर जायला केबल कार घेता येते किंवा चालतही जाता येते. चालत साधारण २०-२५ मिनीटांत वरपर्यंत पोचता येतं. डोंगरावरून अटलांटा परिसराचं सुंदर दृष्य दिसतं. अटलांटा शहरात खूप झाडी आहे. त्यामुळे फॉलमध्ये गेलं की डोंगरमाथ्यावरून एकदम रंगीबेरंगी दिसतं. डोंगरावर तयार झालेल्या नैसर्गिक भिंतीवर सिव्हील वॉरमध्ये लढलेल्या तीन प्रमुख नेत्यांचं शिल्प कोरलेलं आहे. ह्याच भिंतीवर उन्हाळ्यात प्रत्येक सप्ताहांताला संध्याकाळी अंधार पडल्यानंतर अमेरिकेच्या आणि जॉर्जियाच्या इतिहासावर आधारीत लेझर शो केला जातो आणि फटाक्यांची रोषणाई केली जाते. तसंच ह्या डोंगराच्या परिसरात स्टोन माऊंटन अम्युझमेंट पार्क आहे. सगळीकडे असतात तशी साधारण ट्रेन राईड, बोट राईड, ग्लास ब्लोईंग, थ्रीडी सिनेमा, लहान मुलांना खेळण्यासाठी खेळ, टॅटूवाला, बुढ्ढी के बाल, फूडकोर्ट वगैरे गोष्टी इथे आहे. इथे एक वैशिष्ट्यपूर्ण डक राईड आहे. बस सारख्या वाहनात सगळ्यांना बसवतात ज्याला ते "डक" म्हणतात आणि पुढे हे डक पाण्यात शिरून होडीप्रमाणे तरंगायला लागतं! उन्हाळ्यात साधारण दुपारी इथे येऊन सगळ्या राईड करून, नंतर खादाडी करून आणि लेझर शो बघून परतणे असा एक दिवसाचा कार्यक्रम बरेच जण करतात. लेझर शो खूपच उंचावर होत असल्याने लॉनवर कुठेही बसून दिसू शकतो. त्यामुळे लोकं आपल्याबरोबर घडीच्या खूर्च्या, चटया, चादरी वगैर घेऊन निवांत बसलेले असतात. वेळ असेल आणि हवा चांगली असेल तर इथल्या एखाद्या पिकनीक एरियामध्ये निवांत ग्रील करत दिवसभराचं आऊटींग करता येतं. हिवाळ्यात लेझर शो जिथे बसून बघतात त्या लॉनवर कृत्रिम बर्फ आणून टाकतात आणि त्यावर स्नो-ट्युबिंग करता येतं. साधारण जानेवारी फेब्रुवारी महिन्यांत हे स्नो-माऊंटन उघडतं. ६. स्वामी नारायण मंदीर : आता ह्याला पटेल स्पॉट म्हंटलेलं चालेल की नाही ते माहित नाही पण हे मंदिर सुद्धा अटलांटामधला मोठा टुरिस्ट स्पॉट आहे! बसच्या बस भरून देशी तसेच विदेशी लोकं मंदिर पहायला येत असतात. अमेरिकेतल्या सगळ्या स्वामी नारायण मंदिरांमधलं सगळ्यांत मोठं हे आहे असं म्हणतात. मंदिराच्या बाहेरच्या बाजूचं आणि आतलं कोरीवकाम अतिशय सुंदर आहे. मंदिराच्या आतली दिव्यांची रचना आणि आरासही सुरेख असते. दिवाळीला ह्या मंदिरावर वेगवेगळ्या रंगाचे प्रकाशझोत सोडून रोषणाई करतात तसच फटाक्यांची आतिषबाजी होते. मंदिराच्या आत दिवाळीच्या दिवसांमध्ये पणत्या आणि साध्या, फुलांच्या आणि धान्यांच्या रांगोळ्यांची फार सुरेख आरास केलेली असते. हि सगळी ठिकाणं अटलांटा शहराच्या जवळपास आहेत. शहराबाहेरच्या, एक दिवसात, जाऊन येता येण्याजोग्या अजून काही ठिकाणांबद्दल पुढल्या भागात...