एव्हरग्रिन सिअ‍ॅटल

 

 
 
 
अमेरिकेतल्या वास्तव्यादरम्यान मी तीन शहरांमध्ये राहिलो. अगदी पहिल्यांदा 'मिडवेस्ट' भागातल्या सेंट लुइसला, नंतर बरीच वर्षे 'साऊथ इस्ट' मधल्या अटलांटाला आणि सध्या 'पॅसिफिक नॉर्थवेस्ट' मधल्या सिअ‍ॅटलला. तिनही शहरं वेगवेगळ्या भागांमधली असल्याने प्रत्येक ठिकाणचे हवामान, भौगोलिक परिस्थिती, खाद्यसंस्कृती वेगवेगळी. अटलांटा किंवा सेंटलुईसला असताना असं कधी जाणवलं नव्हतं पण सिअ‍ॅटलला आल्यापासून ह्या शहरातली आणि पुण्यातली साम्यस्थळ दिसायला लागली.

त्यामुळे आम्ही अटलांहून सिअ‍ॅटलला जायचं ठरवल्यावर पहिली प्रतिक्रिया यायची ती म्हणजे "सनी साऊथ टू रेनी पॅसिफिक नॉर्थवेस्ट? ओह माय गॉड, ऑल द बेस्ट!"  ह्याचं कारण म्हणजे सिअ‍ॅटलला पडणारा पाऊस! सिअ‍ॅटलला वर्षातले सरसरी १५० दिवस पाऊस पडतो. हा पाऊसही अगदी धो-धो नसतो तर नुसतं थोडसं ओलं करण्यापुरता.  मुंबईचा पाऊस अनुभवलेल्यांना पुण्याचा पाऊस कसा वाटतो अगदी तसा. टोपी असलेलं रेनशिटर घातलं की काम भागतं. छत्री बाळगण्याचीही गरज पडत नाही. पावसाचं प्रमाण हे नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यांमध्ये सगळ्यात जास्त असते. नंतर हळूहळू उघडायला लागतं. त्यामुळे पुण्यातला मान्सुन सिझन थोडा पुढे नेला, त्यात थंडी मिसळली आणि दिवसाचा कालावधी लहान केला की सिअ‍ॅटलचं हवामान तयार होईल. हा सगळा प्रत्यक्षात एका वाक्यात लिहिण्याइतका सोपा नसला तरी अटलांटाला पडणार्‍या मुसळधार पावसाच्या तुलनेत सिअ‍ॅटलचा पाऊस पुण्याची आठवण करून देतो हे नक्की.

इथे सिअ‍ॅटलमध्ये पॅसिफीक महासागराच्या सानिध्यामुळे मासे आणि इतर जलचर खूप ताजे मिळतात. अगदी भर थंडीतही आसपासच्या समुद्रात मासेमारी सुरूच असते. डाऊनटाऊनच्या जवळ पाईकप्लेस मार्केट आहे. तिथली एकंदरीत निटनेटकेपणा पाहून ह्या मार्केटला 'मासळी बाजार' म्हणवणार नाही. पण अगदी डीपार्टमेंटल स्टोअर इतकेही चकाचक नसल्याने मध्य काढायचा तर 'मंडई' म्हणू शकतो. तर ह्या मंडईत ताजे मासे, आसपासच्या शेतांमध्ये पिकवली जाणारी फळं, भाज्या, मध, इतर हाताने बनवलेल्या वस्तू अश्या बर्‍याच गोष्टी मिळतात. पुण्यात अनेक जणं शनिवार, रविवारी सकाळी मंडई, मार्केटयार्डात जाऊन ताज्या भाज्या, फळं वगैरे खरेदी करतात तसच इथेही अनेक जुने सिअ‍ॅटलकर शनिवार किंवा रविवारी सकाळी लवकर उठून पाईकप्लेस मार्केटला जाऊन मासे, फळं, भाज्या घेऊन येतात. ह्या मार्केटमध्ये पिढीजात सुरू असलेली माश्यांची दुकाने आहेत. पूर्वी अशी पद्धत होती की मांडून ठेवलेल्या माश्यांच्या ढिगातून आपल्याला हवा तो मासा निवडून काऊंटरवर बसलेल्या माणसाकडे फेकायचा मग तो साफ करून पिशवीत बांधून ती पिशवी परत आपल्याकडे  फेकत असे. आता शितपेट्यांमुळे ही पद्धत वापरावी लागत नाही पण तरिही काही दुकानांमध्ये परंपरा जपण्यासाठी अजूनही माश्यांची फेकाफेकी केली जाते आणि ही फेकाफेकी बघण्यासाठी लोकांची गर्दी होते.
सिअ‍ॅटल शहरांत तसच आसपासच्या उपनगरांमध्ये खाण्यापिण्याचे बरेच प्रकार दिसून येतात. मधे फक्त पॅसिफीक महासागराचच अंतर असल्याने का काय माहित नाही पण इथे जपानी, कोरियन, चिनी, थाई म्हणजे एकंदरीतच 'एशियन' जनता खूप आहे. त्यांनी अर्थातच आपल्याबरोबर आपले खाद्यप्रकार इथे आणले. पाईक्समार्केटच्या जवळच 'पिरॉश्की' नावाची एक रशियन बेकरी आहे. इथे स्थाईक झालेल्या लोकांनी सुरू केलेली इटालियन, फ्रेंच रेस्टॉरंटही खूप आहेत. 'चेन रेस्टॉरंट्स' नसलेल्या ह्या खाद्यगृहांमधून उत्तम चवीचं, दर्जेदार खाणं मिळतं पण ह्या रेस्टॉरंटच्या एकंदरी कारभारामुळेही हटकून पुण्याची आठवण होते. बर्‍याचश्या 'एशियन' रेस्टॉरंट्सची 'इतरत्र कुठेही शाखा' नसते. आम्ही फक्त इथेच बनवतो आणि इथेच विकतो, तुम्हांला हवं तर इथे या असा प्रकार. वर उल्लेख केलेल्या पिरॉश्कीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची गोड किंवा तिखट सारण भरलेला पॅटिस सारखा प्रकार मिळतो. तिथेच तयार होत असल्याने ह्याची दरवळ त्या परिसरात पसरते. डाऊनटाऊन आणि पाईक्सप्लेस परिसरात पायपिट करून दमल्यावर त्या दरवळीमुळे पिरॉश्कीत जाऊन आपल्या आवडत्या पॅटीसची ऑर्डर द्यायला जावं आणि 'वी आर आऊट ऑफ...' ची पाटी दिसावी; म्हणजे पुण्यातल्या सुप्रसिद्ध बेकरीबाहेरच्या 'पॅटीस संपले.' पाटीची आठवण येते! 

डाऊनटाऊनमध्ये एक इटालियन रेस्टॉरंट आहे. तिथे पास्त्याचं सामान ते खरोखरच इटलीहून मागवतात म्हणे. तिथल्या पास्त्याच्या चवीचं बरेच जण खूप कौतूक करतात. ते ऐकून एकदा आम्ही जायचं ठरवलं. वेळ बघितली तर सोमवार ते शुक्रवार सकाळी ११ ते ३ फक्त! म्हटलं ठिक आहे आठवड्यात कामातून सवड काढून जाऊ. बर्‍याच मिटींगांची हलवाहलवी करून १२:३० वाजता तिथे पोहोचलो तर बाहेर पन्नास जणांची रांग! आत डोकावून बघितलं तर अगदी आपल्या बेडेकर मिसळीसारखी रचना. सरळ टेबलांच्या रांगा. तुमच्या शेजारी समोर कोणीही येऊन बसू शकतं. तिथल्या माणसाला विचारलं किती वेळ लागेल, तर म्हणे साधारण दोन अडीच तास तरी लागतील आणि तोपर्यंत आमची बंद व्हायची वेळ होईल त्यामुळे रांगेत थांबायचं की नाही ते तुम्हीच ठरवा! हाही अगदी पुणेरी खाक्याच. शेवटी आम्ही निमुटपणे दुसरीकडे जाऊन जेवलो.

सिअ‍ॅटल शहराच्या पश्चिम बाजूला इलियट बे म्हणजे पॅसिफिक समुद्राचा आत आलेला भाग आहे तर पूर्वेला लेक वॉशिंग्टन आहे. उतरेला साधारण तासभर अंतरावर कॅनडा देश सुरू होतो. त्यामुळे शहराची जसजशी वाढ व्हायला लागली तसतसे लोक लेक वॉशिंग्टनच्या पलिकडे जाऊन वस्त्या करायला लागले आणि पूर्वेकडची उपनगरं वसली.  पुढे मायक्रोसॉफ्ट त्या बाजूला सुरू झाल्यावर ही उपनगरं अधिक जोमानी वाढायल लागली आणि पुलाच्या अलिकडचे की पलिकडचे अश्या चर्चा सुरू झाल्या. सगळ्या जुन्या लोकांना  पुलाच्या अलिकडेच राहायला आवडतं पण आमच्यासारखे बाहेरून आलेले मात्र पुलाच्या पलिकडे रहातात आणि कामासाठी ये-जा करतात. पुलाच्या अलिकडे पेठा नाहीयेत एव्हडाच फरक!

सिअ‍ॅटलच्या आसपासही पुण्यासारख्याच भरपूर टेकड्या आणि डोंगर आहेत. पुण्याला बर्फ नसतो पण इथल्या आसपासच्या सगळ्या डोंगरांनी आठ महिनेतरी बर्फाच्या टोप्या घातलेल्या असतात. 'आमच्या गच्चीतून पर्वती दिसते' च्या चालीवर 'आमच्या घरून माऊंट रेनियर दिसतो' म्हटलं जातं आणि खरोखरीच ह्या परिसरात ठिकठिकाणून माऊंट रेनियर दिसत रहातो. आसपासच्या डोंगरांमुळे हाईकिंग, ट्रेकिंग करणार्‍यांची चंगळ असते. दर सप्ताहांताला कुठे ना कुठे पदभ्रमंती करता येऊ शकते. शिवाय सायकलवरून फिरण्यासाठी आखिव रेखिव ट्रेल, व्यवस्थित दिशादर्शक पाट्या, नकाशे ह्यामुळे सायकलीवरूनही गाव भटकून येता येऊ शकतं. 
अनेक वर्ष पुण्यात राहूनही पुण्यातल्या किंवा आसपासच्या अनेक गोष्टी अजून बघायच्या राहिल्याच आहेत. इथेही बघण्यासारखं आणि भटकण्यासारखं इतकं आहे की ती यादीही वाढते आहे. दोन्ही याद्या कश्या पूर्ण कराव्यात हा एक प्रश्नच आहे!

---
हा लेख अनुभव प्रकाशनातर्फे प्रकाशित होणार्‍या  'पुण्यभुषण' ह्या २०१८ च्या दिवाळीअंकात प्रकाशित झाला.