Showing posts with label USA. Show all posts
Showing posts with label USA. Show all posts

Where the dreams come true..!

साधारण दुसर्‍या महायुद्धाच्या आसपासची गोष्ट असावी. अमेरिकेत एक गृहस्थ आपल्या दोन छोट्या मुलींना बागेत खेळायला घेऊन जात असत. मुली खेळत असताना ते स्वतः बागेत इकडे तिकडे फिरून बागेचं निरिक्षण करत. बागेतली  घाण, कचरा, अव्यवस्था, लाकडी खेळण्यांचे उडलेले रंग, वैतागलेले उद्धट कर्मचारी आणि कंटाळलेले पालक ह्या सगळ्यांचा त्यांना फार त्रास होत असे. ते नेहमी विचार करत असतं की एखादं असं पार्क असावं ज्याचं स्वरूप एखाद्या परिकथेतल्या नगरीसारखं असेल, जिथे मुलांना खेळायला भरपूर जागा असेल, मोठ्यांना बसायला बाक असतील, भरपूर झाडं झुडपं असतील, रेल्वे स्टेशन, गाडी, नदी आणि त्यातून जाणारी बोट असेल, पार्कमध्ये आरामदायी, आपुलकीचं वातावरण असेल, संपूर्ण कुटूंब तिथे सहलीला येऊ शकतील. अमेरिकेतल्या हॉलिवूडला (किंवा अगदी आपल्याकडे मुंबईला) अनेक लोकं चित्रपटातल्या सारखा झगमगाट, तारेतारका वगैरे पहायला मिळतील म्हणून मोठ्या आशेने येतात पण त्यांच्या पदरी निराशाच पडते. पण ह्या पार्कात येणार्‍या मुलांची सगळी स्वप्न अगदी खरी होतील! हे  गृहस्थ होते सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि कलाकार वॉल्ट डिस्ने आणि त्यांच्या स्वप्रातलं पार्क होतं जगप्रसिद्द डिस्नेलँड. सुमारे पंधरा ते वीस वर्षांच्या अथक मेहेनतीतून आपल्या मनातल्या कल्पनेला आकार देऊन, तिला प्रत्यक्षात उतरवून, अमेरिकेतल्या लॉस एंजल्स जवळ १९६५ साली डिस्नेलँड हे 'थीम पार्क' सुरू झालं आणि पुढे सुमारे दहावर्षांनंतर अमेरिकेतल्या फ्लोरिडा राज्यात वेगवेगळ्या प्रकारची चार थीम पार्क्स असलेलं "डिस्नेवर्ल्ड" सुरू झालं.


माझ्या अमेरिकेतल्या वास्तव्यादरम्यान डिस्नेवर्ल्डमधल्या "मॅजिक किंगडम"ला अनेक भेटी झाल्या. "Where the dreams come true.." अशी बिरुदावली मिरवणार्‍या ह्या मॅजिक किंगडममध्ये खरच स्वप्न प्रत्यक्षात उतरतात! मी लग्नाआधी मित्रांबरोबर, नंतर बायकोबरोबर आणि पुढे मुलीबरोबर मॅजिक किंगडमला भेटी दिल्या. आयुष्यातली हा  प्रत्येक कालखंड वेगळा आणि प्रत्येक वेळी मॅजिक किंगडममध्ये काहितरी वेगळं, नवीन सापडलं.
मॅजिक किंगडमसारख्या प्रंचड मोठ्या आणि गर्दीच्या ठिकाणाला एकच प्रवेशद्वार आहे. वॉल्ट डिस्ने ह्यांच्यामते पार्कमध्ये येणार्‍या प्रत्येकाला सारखा अनुभव मिळायला हवा. जर एकापेक्षा जास्त प्रवेशद्वार ठेवली तर अनुभवात फरक पडेल आणि लोकं गोधंळून जातील. मॅजिक किंगडमचं 'कार्टुनिकरण' अगदी वाहनतळापासूनच सुरू होतं. इथल्या वाहनतळाचे 'हिरो' आणि 'व्हिलन' असे दोन भाग आहेत. डिस्नेपटांमधल्या वेगवेगळ्या चांगल्या आणि वाईट व्यक्तिरेंखांची नावं वेगवेगळ्या रांगांना दिलेली आहेत. त्यामुळे गाडी लावल्यापासूनच आपण डिस्नेमय होऊन जातो. फ्लोरीडा ही पाणथळ जागा असल्याने उपल्ब्ध भौगोलिक रचनेचा योग्य पद्धतीने वापर करून एक मोठं तळं बनवण्यात आलं. वाहनतळापासून मुख्य प्रवेशद्वारापाशी जाण्यासाठी हे तळ बोटीने किंवा मेट्रोट्रेनने ओलांडून जावं लागतं.
चक्राकार रचना असलेल्या पार्कचे मेनस्ट्रीट, टुमोरोलँड, फँट्सीलँड, फ्रंटीयरलँड, लिबर्टी स्क्वेअर आणि अ‍ॅडव्हेन्चरलँड असे सहा मुख्य विभाग आहेत. ह्या चक्राच्या मध्यभागी देखणं सिंडरेला कॅसल आहे. (लॉसएन्ज्ल्सच्या डिस्नेलँडमध्ये बरेच विभाग समान आहेत फक्त सिंडरेला कॅसलच्या जागी स्लिपिंग ब्युटीचं कॅसल आहे.) ह्या सिंडरेला कॅसलचं सगळ्यात वरचं टोक संपूर्ण पार्कमधून कुठूनही दिसतं आणि त्यामुळे दिशा शोधायला मदत होते.


बोटीने किंवा मेट्रोट्रेनने मुखप्रवेशद्वारपाशी येतायेताच सिंडरेला कॅसलचं दर्शन होतं आणि कॅमेर्‍यांची क्लिक-क्लिक सुरू होते. हा पार्क म्हणजे काही अनेक वर्षांपूर्वी बांधलेलं ऐतिहासिक ठिकाण नाही, त्यामुळे प्रत्येक गोष्ट बांधताना ती कुठून कशी दिसेल, फोटो कुठून काढता येतील वगैरे व्यावसायिक बाबींचा पूर्ण विचार करून बांधलेल्या आहेत. पार्कमध्ये प्रवेश केल्यावर पहिला विभाग लागतो तो 'मेन स्ट्रीट, युएसए'. इथे अमेरिकन शहराच्या डाऊनटाऊनमध्ये असते तशी रचना आहे. एक चौक, मुख्य रस्ता आणि वेगवेगळ्या कचेर्‍या, दुकानं, दवाखाना, सिनेमा थिएटर, ग्रंथालय वगैरेंच्या इमारती आहेत. त्यांच्यावर अगदी खर्‍यासारख्या नावांच्या पाट्या, घरक्रमांक  आहेत. ह्यातल्या काही इमारती वापरात आहेत, काही नुसते देखावे आहेत. ह्या इमारती किंवा मॅजिक किंगडममधली प्रत्येक गोष्ट मोठ्या माणसांनाच नाही तर लहानमुलांच्या नजरेलाही व्यवस्थित दिसावी म्हणून वॉल्ट डिस्ने बांधकाम चालू असताना गुडघ्यांवर बसून गोष्टींचं निरिक्षण करीत आणि त्या उंचीवरून ती गोष्ट 'सुंदर' दिसत नसेल तर त्यात सुधारणा केल्या जात! ह्याच एका इमारतीच्या खिडकीवर आपल्या वडींलाचं नाव लिहून वॉल्ट डिस्ने ह्यांनी आपल्या वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. मेन स्ट्रीट जवळ पार्कमधल्या रेल्वेचं पहिलं स्टेशन आहे. ही रेल्वे पार्कच्या भोवती फिरते. त्यामुळे बरीच तंगडतोड झाल्यावर एखादं स्टेशन गाठून ह्या ट्रेनमधून निवांत चक्कर मारायला छान वाटतं. पूर्वी मेन स्ट्रीट वरून सिंडरेला कॅसलपर्यंत घोडागाडीने जाता येत असे. आता घोडागाडीची जागा ट्रामने घेतली आहे. वॉल्ट डिस्नेचं आद्य कार्टून कॅरॅक्टर मिकी माऊस आणि त्याची मैत्रिण मिनी माऊस ह्यांची परेड दिवसातून तीनचार वेळा मेनस्ट्रीटवरून जाते. ही परेड गाठली की टीव्हीवरची कार्टून्स प्रत्यक्षात भेटायची सुरूवात तिथेच होते.
मॅजिक किंगडममधला आमचा सर्वात आवडता विभाग म्हणजे फँटसीलँड. त्यामुळे मेनस्ट्रीटवरून आम्ही लगेच सिंडरेला कॅसलच्या डाव्या बाजूने फँटसीलँडकडे चालायला लागतो. त्यातही आमची सगळ्यांत आवडती 'राईड' म्हणजे 'ईट्स अ स्मॉल वर्ल्ड'. कयाक सारखी लहान बोट आपल्याला एक रंगीबेरंगी दुनियेत घेऊन जाते. जगभरातली वेगवेगळी शहरं आणि तिथली लोककला दाखवणार्‍या शेकडो बाहुल्यांचे अतिशय सुंदर रंगसंगतीतले देखावे दोन्ही बाजूंना दिसतात. "though the mountains divide and the oceans are wide, its a small world afterall! ", असा विश्वबंधुतेचा संदेश देणारं सुश्राव्य सुरावटीतलं गाणं नंतर दिवसभर कानात वाजत रहातं. ह्या राईडमध्ये एकदा बसून सगळं बघुन होत नाही आणि समाधानही होत नाही. त्यामुळे बर्‍याचदा बाहेर येऊन पुन्हा रांगेत उभं राहिलं जातं.

फँटसीलँडमध्ये बाकीच्या परिकथांमधल्या राईड्स आहेत. हिमगौरीची गोष्ट आणि सातबुटक्यांच्या गंमती, लंडन शहराच्या देखाव्यावरून जाणारी पिटर पॅनची फ्लाईट, मस्त्यकन्येची पाण्याखालची अद्भुतकथा आणि विनी नावच्या अस्वलाच्या पिल्लाची फजिती पहाताना लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही गंमत वाटते. ह्या शिवाय अगदी लहान मुलांनाही बसता येतील असे डंबो हत्ती, मॅड टी पार्टी आणि राजकुमाराचे रहाटपाळणेही ह्या परिसरात आहेत.  मिकी, मिनी, गुफी वगैरे मंडळींबरोबर फोटो काढणे तसेच सिंडरेला, रॅपुंझल, स्नो व्हाईट वगैरे डिस्नेच्या राजकन्यांना भेटणे किंवा त्यांच्या बरोबर नाश्ता, जेवण इत्यादी कार्यक्रमांकरीता 'प्रिंसेस फेअरीटेल' हॉलही ह्याच विभागात आहे.
मुलं थोडी मोठी असतील आणि योग्य उंचीची असतील तर फ्रंटीयरलँड आणि अ‍ॅडव्हेंचर लँडकडे मोर्चा वळवावा.
ह्या दोन्ही विभागांमध्ये खूप झाडी आहे आणि साधारण अमेरीकेच्या मध्य आणि पश्चिम भागांमधल्या सारखी भौगिलिक रचना केली आहे. खूप उंचावर घेऊन एकदम पाण्यात पडणारी 'स्प्लॅश माऊंटन'ची गाडी आणि डोंगराळ भागातल्या चढ उतारांवरून वेगाने जाणारी रेल्वेगाडी आपल्या पोटात गोळा आणतात. फँटसीलँडमधल्या पर्‍यांच्या जगातून एकदम स्प्लॅश माऊंटनमध्ये बसणं हे एकदम दुसरं टोक होऊन जातं! ह्याच विभागात आपल्याला 'टॉम सॉयर आयलंड' ह्या कृत्रिम बेटावर जाता येतं. ह्या बेटावर खाण्यापिण्याची सोय आहे तसेच थोडीफार खरेदीही करता येते. दुपारच्या वेळी टॉम सॉयर आयलंडच्य झाडीत निवांतपणे जेवण करून पुढच्या भटकंतीची तयारी करता येते. पुढे अ‍ॅडव्हेंचरलँडमध्ये जंगल, वाळवंट, ओअ‍ॅसिस अश्या सगळ्या गोष्टी एकत्र बघायला मिळतात. अ‍ॅडव्हेंचरलँडच्या सुरुवातीलाच 'स्विस ट्री हाऊस' आहे. अनेक कार्टून्समध्ये ट्री हाऊस किंवा मचाण असल्याने हे ट्री हाऊस बघायला मुलांची झुंबड उडते. 'पायरेट्स ऑफ करेबियन' ह्या चित्रपटावर आधारीत राईडमध्ये पायरेट्सचं जग बघायला मिळतं. ह्यातले आवाज आणि प्रकाशयोजना जरा भितीदायक वातावरण तयार करतात आणि मग काही काही ल्हानमुलांची समुद्री चाच्यांचे अवतार बघुन घाबरगुंडी उडते.
अ‍ॅडव्हेंचर लँडमध्ली साहसं करून झाली की मोर्चा वळवावा तो टुमोरो लँडकडे. ह्या विभागात गेलं की परिकथेच्या चित्रपटात एकदम "साय-फाय" दृष्य आल्यासारखं वाटतं. ह्या विभागातली सगळी आकर्षणं ही उद्याच्या जगाबद्दलचा कल्पनाविलास करणारी आहेत. ह्यातलं आमचं सगळ्यात आवडतं आकर्षण म्हणजे करॉसल ऑफ प्रोगेस. हे करॉसल ऑफ प्रोगेस म्हणजे फिरत्या प्रेक्षागृहात घडणारं बाहुल्यांच नाटक. १९६४ साली न्यूयीर्क येथे जीई ह्या कंपनीतर्फे भरवलेल्या जागतिक परिषदेसाठी वॉल्ट डिस्नेने हे नाटक बसवलं. पुढे परिषद संपल्यावरही ह्या नाटकाची लोकप्रियता इतकी होती की डिस्नेने हे नाटक डिस्नेवर्ल्डमध्ये आणायचं ठरवलं. १९४० पासून ते आत्तापर्यंत एका कुटूंबाच्या दैनंदिन जीवनात कसे विज्ञान / तंत्रज्ञानाने कसे बदल होत गेले हे ह्या नाटकात दाखवलं आहे. साधारण १०-१५ वर्षांचा कालावधी दाखवणारं ५ मिनीटांचं एक दृष्य आहे. हे दृष्य संपल की प्रेक्षगृह फिरतो आणि आपण दुसर्‍या दृष्याच्या सेट समोर येतो. ह्या मुळे एकंदरीत नाटक २० मिनिटांचं असलं तरी दर पाच मिनिटांनी नविन प्रेक्षक आत येतात. त्यामुळे इथली रांग कायमच मोठी असली तरी भराभर पुढे सरकते. ह्या खेरीज वेगाने गाड्या चालवण्याची हौस भागवण्यासाठी हायस्पीड गो-कार्टींग, व्हिडीयो गेममध्ये दाखवतात तसा शत्रूला मारण्याचा थरार अनुभवण्यासाठी ग्रेट एस्केप आणि प्रत्यक्ष आकाशगंगेतून वेगाने प्रवास करण्यासाठी स्पेस माऊंटन अशी काही आकर्षणं आहेत. मॉन्स्टर लाफ्टर फ्लोअर नावाच्या एका शोमध्ये पडद्यावरचा राक्षस प्रेक्षकांशी विनोदी संवाद साधतो, कधी त्याची स्वतःची फजिती होते तर कधी प्रेक्षकांची. आजच्या आर्टीफिशल इंटलिजन्सच्या काळात "टुमॉरो लँड"मधली ही गोष्ट आजच शक्य होऊ लागली आहे.
दिवसभर फिरतात पोटपूजा करण्यासाठी पार्कमध्ये विविध ठिकाणी खाण्याची सोय आहे. बर्‍याच ठिकाणी उपहारगृहांची सजावटही अत्यंत आकर्षक आहे. मोठे हवेशीर हॉल, त्यात रंगीबेरंगी दिव्यांची प्रकाशयोजना, मोठमोठी झुंबरं, तुम्ही ज्या भागात आहत त्याला साजेशी सजावट ह्या सगळ्यामुळे दोन घास जास्तच खाल्ले जातात. बसून जेवायचं नसेल तर पटकन घेऊन खाता येणारे अनेक पदार्थ उदा. प्रेटझेल्स, पॉपकॉर्न, आईस्क्रीम, कॉफी वगैरेचे चिकार ठेले ठिकठिकाणी आहे. टॉमसॉयर आयलंड जवळ मिळणार नटेला चॉकोलेट आणि स्ट्रोबेरी घातलेला क्रेपे म्हणजे डोश्यासारखा प्रकार आम्हांला फार आवडतो. दर ट्रीपमध्ये हे क्रेपे खाल्ले जातातच. दिवसभर फिरून फिरून इतकी दमणूक झालेली असते की हे खाताना कॅलरींचा विचारही मनात येत नाही.
दिवेलागणीची वेळ व्हायला लागली की सगळ्यांची पावलं पुन्हा मेन स्ट्रीट आणि सिंडरेला कॅसलकडे वळतात. कारण आता वेळ असते ती इलेक्ट्रिक परेड आणि त्यानंतरच्या फटाक्यांच्या आतिषबाजीची. अंधार पडल्यानंतर पार्कमधले सगळे दिवे घालवले जातात आणि आगगाडीच्या शिट्टीने परेडची वर्दी दिली जाते. वेगवेगळे प्राणी, पक्षी, फुलं, डिस्नेपटांमधली पात्र, राजपुत्र, राजकन्या वगैरे असलेले अनेक रथ दिव्यांच्या रोषणाईसह एकामागोमाग एक मेन स्ट्रीटवर येत रहातात. सोबत तालबद्ध नृत्य करणार्‍या कलाकारांचे संच आणि सुश्राव्य संगिताची सुरावट. हे सगळं पहाताना फक्त लहान मुलच नाही तर मोठी माणसंही अगदी रंगून जातात. परेड दरम्यान वाजवली जाणारी सुरावट फक्त त्या दिवशीच नाही तर दुसर्‍या दिवशीही कानात गुंजत रहाते. एकावर्षी परेडच्या वेळी जोरदार पाऊस आला. आमच्याकडे चौघांत मिळून एक  छत्री होती. तरीही आम्ही कॅमेरे वाचवत आणि स्वत: भिजत पूर्ण परेड पाहिली. सगळ्या कलाकारांनीही पावसाची पर्वा न करता पूर्ण परेड सादर केली!
परेड आवरली की सिंडरेला कॅसलवर फटाक्यांची आतिषबाजी होते. कॅसलच्या पार्श्वभुमीवर विविधरंगी आणि विविधढंगी फटाक्यांची रोषणाई बघणंही अत्यंत नेत्रसुखद असतं. फटाके संपले की कॅसलवर दिव्यांची रोषणाई करतात. गेली दोन वर्ष कॅसलवर 'फ्रोजन' हया चित्रपटाची संकल्पना घेऊन बर्फवृष्टीची रोषणाई केली होती. फ्लोरीडा राज्यात बर्फ पडत नाही, त्यामुळे बर्फाने झाकलेलं सिंडरेला कॅसल बघणं हे ही एकप्रकारचं 'ड्रिम कम ट्रू' म्हणायला हवं!

वॉल्ट डिस्नेंनी स्वप्न बघितल्याप्रमाणे खरच ह्या पार्कमध्ये खेळायला भरपूर जागा आहे, भरपूर झाडी आहे, रेल्वे स्टेशन, आगगाडी, बोट आहे.  अतिशय आपुलकीने वागणारे हसतमुख कर्मचारी आहेत. संपूर्ण कुटूंबाची  सहल होईल असं हे ठिकाण आहे. लहानमुलांसाठी  त्यांची आवडती कार्टुन कॅरेक्टर आणि राजकन्या / राजपूत्र प्रत्यक्ष भेटल्याने खरोखरच 'ड्रिम कम ट्रू' अनुभव देणारं ठिकाण आहे. सुरू झाल्यापासून आज पंचावन्न साठ वर्षांनीही सगळ्या गोष्ट ताज्या टवटवीत वाटतात ह्याचं श्रेय वॉल्ट डिस्नेंच्या कलादृष्टीला आणि दुरदृष्टीला आहे.

एव्हरग्रिन सिअ‍ॅटल

 

 
 
 
अमेरिकेतल्या वास्तव्यादरम्यान मी तीन शहरांमध्ये राहिलो. अगदी पहिल्यांदा 'मिडवेस्ट' भागातल्या सेंट लुइसला, नंतर बरीच वर्षे 'साऊथ इस्ट' मधल्या अटलांटाला आणि सध्या 'पॅसिफिक नॉर्थवेस्ट' मधल्या सिअ‍ॅटलला. तिनही शहरं वेगवेगळ्या भागांमधली असल्याने प्रत्येक ठिकाणचे हवामान, भौगोलिक परिस्थिती, खाद्यसंस्कृती वेगवेगळी. अटलांटा किंवा सेंटलुईसला असताना असं कधी जाणवलं नव्हतं पण सिअ‍ॅटलला आल्यापासून ह्या शहरातली आणि पुण्यातली साम्यस्थळ दिसायला लागली.

त्यामुळे आम्ही अटलांहून सिअ‍ॅटलला जायचं ठरवल्यावर पहिली प्रतिक्रिया यायची ती म्हणजे "सनी साऊथ टू रेनी पॅसिफिक नॉर्थवेस्ट? ओह माय गॉड, ऑल द बेस्ट!"  ह्याचं कारण म्हणजे सिअ‍ॅटलला पडणारा पाऊस! सिअ‍ॅटलला वर्षातले सरसरी १५० दिवस पाऊस पडतो. हा पाऊसही अगदी धो-धो नसतो तर नुसतं थोडसं ओलं करण्यापुरता.  मुंबईचा पाऊस अनुभवलेल्यांना पुण्याचा पाऊस कसा वाटतो अगदी तसा. टोपी असलेलं रेनशिटर घातलं की काम भागतं. छत्री बाळगण्याचीही गरज पडत नाही. पावसाचं प्रमाण हे नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यांमध्ये सगळ्यात जास्त असते. नंतर हळूहळू उघडायला लागतं. त्यामुळे पुण्यातला मान्सुन सिझन थोडा पुढे नेला, त्यात थंडी मिसळली आणि दिवसाचा कालावधी लहान केला की सिअ‍ॅटलचं हवामान तयार होईल. हा सगळा प्रत्यक्षात एका वाक्यात लिहिण्याइतका सोपा नसला तरी अटलांटाला पडणार्‍या मुसळधार पावसाच्या तुलनेत सिअ‍ॅटलचा पाऊस पुण्याची आठवण करून देतो हे नक्की.

इथे सिअ‍ॅटलमध्ये पॅसिफीक महासागराच्या सानिध्यामुळे मासे आणि इतर जलचर खूप ताजे मिळतात. अगदी भर थंडीतही आसपासच्या समुद्रात मासेमारी सुरूच असते. डाऊनटाऊनच्या जवळ पाईकप्लेस मार्केट आहे. तिथली एकंदरीत निटनेटकेपणा पाहून ह्या मार्केटला 'मासळी बाजार' म्हणवणार नाही. पण अगदी डीपार्टमेंटल स्टोअर इतकेही चकाचक नसल्याने मध्य काढायचा तर 'मंडई' म्हणू शकतो. तर ह्या मंडईत ताजे मासे, आसपासच्या शेतांमध्ये पिकवली जाणारी फळं, भाज्या, मध, इतर हाताने बनवलेल्या वस्तू अश्या बर्‍याच गोष्टी मिळतात. पुण्यात अनेक जणं शनिवार, रविवारी सकाळी मंडई, मार्केटयार्डात जाऊन ताज्या भाज्या, फळं वगैरे खरेदी करतात तसच इथेही अनेक जुने सिअ‍ॅटलकर शनिवार किंवा रविवारी सकाळी लवकर उठून पाईकप्लेस मार्केटला जाऊन मासे, फळं, भाज्या घेऊन येतात. ह्या मार्केटमध्ये पिढीजात सुरू असलेली माश्यांची दुकाने आहेत. पूर्वी अशी पद्धत होती की मांडून ठेवलेल्या माश्यांच्या ढिगातून आपल्याला हवा तो मासा निवडून काऊंटरवर बसलेल्या माणसाकडे फेकायचा मग तो साफ करून पिशवीत बांधून ती पिशवी परत आपल्याकडे  फेकत असे. आता शितपेट्यांमुळे ही पद्धत वापरावी लागत नाही पण तरिही काही दुकानांमध्ये परंपरा जपण्यासाठी अजूनही माश्यांची फेकाफेकी केली जाते आणि ही फेकाफेकी बघण्यासाठी लोकांची गर्दी होते.
सिअ‍ॅटल शहरांत तसच आसपासच्या उपनगरांमध्ये खाण्यापिण्याचे बरेच प्रकार दिसून येतात. मधे फक्त पॅसिफीक महासागराचच अंतर असल्याने का काय माहित नाही पण इथे जपानी, कोरियन, चिनी, थाई म्हणजे एकंदरीतच 'एशियन' जनता खूप आहे. त्यांनी अर्थातच आपल्याबरोबर आपले खाद्यप्रकार इथे आणले. पाईक्समार्केटच्या जवळच 'पिरॉश्की' नावाची एक रशियन बेकरी आहे. इथे स्थाईक झालेल्या लोकांनी सुरू केलेली इटालियन, फ्रेंच रेस्टॉरंटही खूप आहेत. 'चेन रेस्टॉरंट्स' नसलेल्या ह्या खाद्यगृहांमधून उत्तम चवीचं, दर्जेदार खाणं मिळतं पण ह्या रेस्टॉरंटच्या एकंदरी कारभारामुळेही हटकून पुण्याची आठवण होते. बर्‍याचश्या 'एशियन' रेस्टॉरंट्सची 'इतरत्र कुठेही शाखा' नसते. आम्ही फक्त इथेच बनवतो आणि इथेच विकतो, तुम्हांला हवं तर इथे या असा प्रकार. वर उल्लेख केलेल्या पिरॉश्कीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची गोड किंवा तिखट सारण भरलेला पॅटिस सारखा प्रकार मिळतो. तिथेच तयार होत असल्याने ह्याची दरवळ त्या परिसरात पसरते. डाऊनटाऊन आणि पाईक्सप्लेस परिसरात पायपिट करून दमल्यावर त्या दरवळीमुळे पिरॉश्कीत जाऊन आपल्या आवडत्या पॅटीसची ऑर्डर द्यायला जावं आणि 'वी आर आऊट ऑफ...' ची पाटी दिसावी; म्हणजे पुण्यातल्या सुप्रसिद्ध बेकरीबाहेरच्या 'पॅटीस संपले.' पाटीची आठवण येते! 

डाऊनटाऊनमध्ये एक इटालियन रेस्टॉरंट आहे. तिथे पास्त्याचं सामान ते खरोखरच इटलीहून मागवतात म्हणे. तिथल्या पास्त्याच्या चवीचं बरेच जण खूप कौतूक करतात. ते ऐकून एकदा आम्ही जायचं ठरवलं. वेळ बघितली तर सोमवार ते शुक्रवार सकाळी ११ ते ३ फक्त! म्हटलं ठिक आहे आठवड्यात कामातून सवड काढून जाऊ. बर्‍याच मिटींगांची हलवाहलवी करून १२:३० वाजता तिथे पोहोचलो तर बाहेर पन्नास जणांची रांग! आत डोकावून बघितलं तर अगदी आपल्या बेडेकर मिसळीसारखी रचना. सरळ टेबलांच्या रांगा. तुमच्या शेजारी समोर कोणीही येऊन बसू शकतं. तिथल्या माणसाला विचारलं किती वेळ लागेल, तर म्हणे साधारण दोन अडीच तास तरी लागतील आणि तोपर्यंत आमची बंद व्हायची वेळ होईल त्यामुळे रांगेत थांबायचं की नाही ते तुम्हीच ठरवा! हाही अगदी पुणेरी खाक्याच. शेवटी आम्ही निमुटपणे दुसरीकडे जाऊन जेवलो.

सिअ‍ॅटल शहराच्या पश्चिम बाजूला इलियट बे म्हणजे पॅसिफिक समुद्राचा आत आलेला भाग आहे तर पूर्वेला लेक वॉशिंग्टन आहे. उतरेला साधारण तासभर अंतरावर कॅनडा देश सुरू होतो. त्यामुळे शहराची जसजशी वाढ व्हायला लागली तसतसे लोक लेक वॉशिंग्टनच्या पलिकडे जाऊन वस्त्या करायला लागले आणि पूर्वेकडची उपनगरं वसली.  पुढे मायक्रोसॉफ्ट त्या बाजूला सुरू झाल्यावर ही उपनगरं अधिक जोमानी वाढायल लागली आणि पुलाच्या अलिकडचे की पलिकडचे अश्या चर्चा सुरू झाल्या. सगळ्या जुन्या लोकांना  पुलाच्या अलिकडेच राहायला आवडतं पण आमच्यासारखे बाहेरून आलेले मात्र पुलाच्या पलिकडे रहातात आणि कामासाठी ये-जा करतात. पुलाच्या अलिकडे पेठा नाहीयेत एव्हडाच फरक!

सिअ‍ॅटलच्या आसपासही पुण्यासारख्याच भरपूर टेकड्या आणि डोंगर आहेत. पुण्याला बर्फ नसतो पण इथल्या आसपासच्या सगळ्या डोंगरांनी आठ महिनेतरी बर्फाच्या टोप्या घातलेल्या असतात. 'आमच्या गच्चीतून पर्वती दिसते' च्या चालीवर 'आमच्या घरून माऊंट रेनियर दिसतो' म्हटलं जातं आणि खरोखरीच ह्या परिसरात ठिकठिकाणून माऊंट रेनियर दिसत रहातो. आसपासच्या डोंगरांमुळे हाईकिंग, ट्रेकिंग करणार्‍यांची चंगळ असते. दर सप्ताहांताला कुठे ना कुठे पदभ्रमंती करता येऊ शकते. शिवाय सायकलवरून फिरण्यासाठी आखिव रेखिव ट्रेल, व्यवस्थित दिशादर्शक पाट्या, नकाशे ह्यामुळे सायकलीवरूनही गाव भटकून येता येऊ शकतं. 
अनेक वर्ष पुण्यात राहूनही पुण्यातल्या किंवा आसपासच्या अनेक गोष्टी अजून बघायच्या राहिल्याच आहेत. इथेही बघण्यासारखं आणि भटकण्यासारखं इतकं आहे की ती यादीही वाढते आहे. दोन्ही याद्या कश्या पूर्ण कराव्यात हा एक प्रश्नच आहे!

---
हा लेख अनुभव प्रकाशनातर्फे प्रकाशित होणार्‍या  'पुण्यभुषण' ह्या २०१८ च्या दिवाळीअंकात प्रकाशित झाला. 

कलरफुल कोलोरॅडो..!

"कोलोरॅडो म्हणजे स्वर्ग.. कोलोरॅडो म्हणजे बर्फाळ सौंदर्याची परमावधी.. कोलोरॅडो म्हणजे स्किईंग.. कोलोरॅडो म्हणजे हिमवादळं.. आणि कोलोरॅडो म्हणजे निव्वळ शांतता !"

* माझ्या अमेरिकेतल्या वास्तव्यादरम्यान दोन वेळा थँक्स गिव्हिंगची मोठी सुट्टी कोलोरॅडोत घालवल्याने, ह्या दरम्यान कोलोरॅडोची आठवण अगदी हमखास होते आणि अशी काही छापील वाक्य टाकत मी जुने फोटो बघत बसतो. कोलोरॅडो म्हणजे अमेरिकेतल्या रॉकी पर्वतरांगाच्या दक्षिण भागात आणि 'ग्रेट प्लेन'च्या पश्चिम टोकावर वसलेलं एक राज्य. पर्वत रांगांमध्ये असल्याने जोरदार थंडी, बर्फवृष्टी, लहरी हवामान हे ओघाने आलच. पण ह्या बर्फामुळे आणि पर्वतरांगांच्या नैसर्गिक उतारांमुळे इथे स्किईंग सारखे हिवाळी खेळ खेळण्यासाठी मुबलक सोई उपलब्ध आहेत. रॉकी माऊंटन नॅशनल पार्क बघायला उन्हाळ्यात तर स्किईंग, स्नो मोबिलींग करायला हिवाळ्यात पर्यटक इथे गर्दी करतात.

कोलोरॅडोला जर गाडीने गेलं तर 'Welcome to the colorful Colorado' अशी पाटी आपलं स्वागत करते. वसंतात, उन्हाळ्यात आणि शिशिरात इथे फुलांच्या आणि पानगळीच्या सुंदर रंगाची उधळण होत असते तर हिवाळ्यात पांढरा रंग आसमंत व्यापून टाकतो! अगदी नजर पोहोचेल तिथपर्यंत पसरलेला बर्फ, त्याच्यामधून जाणारे रस्ते आणि काही ठिकाणी बर्फात घरंगळणारे ठिपके म्हणजे स्किईंग करणारी लोकं हे अगदी हिवाळ्यातलं टिपिकल दृष्य.
हिवाळ्यात कोलोरॅडोला जायचं तर निदान चार दिवस तरी हातात पाहिजेत. स्किईंग आणि स्नो मोबिलिंग करायचं असेल तर त्यासाठी दोन दिवस आणि बाकी गोष्टींसाठी दोन दिवस. थँक्स गिव्हिंग किंवा नाताळची सुट्टी ह्या ट्रिप करता सोईची पडते. बर्फातले खेळ चांगलेच दमवणारे असतात त्यामुळे त्यानंतर काही करणं शक्य नसतं. शिवाय हिवाळ्यात अंधार खूप लवकर पडतो आणि अंधार पडल्यानंतर थंडीही चांगलीच असते. त्यामुळे सूर्यास्तानंतर फार काही करता येत नाही.

बर्फात अगदी शब्दशः भटकायचं असेल तर स्नोमोबिलिंगला पर्याय नाही. स्कुटरपेक्षा जरा फताडं, जड आणि चाकांना चेन लावलेलं वाहन घेऊन ते हाकत बर्फात मनमुराद फिरायचं! इथे अनेक संस्था डोंगरावर मार्ग आखून त्यावरून स्नोमोबिलच्या टुर्स करतात. ह्यात एक गाईड दहा ते बारा स्नोमोबिल घेऊन त्यांना बर्फात फिरवून आणतो.
साधारण ३-४ तासांची ही टुर असते. ह्यात स्नोमोबिल चालवायची आपल्यालाच असते. पण मार्गदर्शक आणि मदतनीस म्हणून गाईड बरोबर असतो. जंगलात किंवा समुद्रात जसा दिशांचा गोंधळ उडू शकतो तसाच इथे बर्फातही होऊ शकतो कारण सगळी कडचं दृष्य सारखच दिसतं ! स्किईंग इतकं अवघड नसलं तरी हे प्रकरण वाटतं तेव्हडं सोपं नाही. कारण ती स्नोमोबिल बरीच जड असते. दुसरं म्हणजे आखून दिलेला मार्ग न सोडता ठरविक रस्त्यावरूनच ती दामटवावी लागते. भुसभुशीत बर्फात ती गेली तर सवय नसल्याने नियंत्रित करता येत नाही. एकदा मी आणि मित्राने वेग वाढवायच्या नादात रस्त्यावरून बाजूला नेली होती. तिथे जवळजवळ गुडघाभर बर्फ होतं. शेवटी ती तशीच ठेऊन आम्ही रांगत रांगत बाहेर आलो आणि आमच्या गाईडला हाका मारल्या. त्याने ती बाहेर काढली आणि आम्हांला बर्‍या शब्दांत पण व्यवस्थित झापलं !
अजून एक म्हणजे एव्हढया बर्फात जायचं तर स्नो सुट, हेलमेट, बुट, डबल हातमोजे असा सगळा जामानिमा करावा लागतो. त्यामुळे इतकं उकडतं की अगदी 'धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतय' अशी अवस्था होते! पण तरीही डोंगर उतारावरून थंड गार वार्‍यात स्नोमोबिल पळवायला खूपच मजा येते.. अगदी हॉलिवूड हिरो किंवा गेलाबाजार 'फना'तला अमिर खान झाल्यासारखं वाटतं. जर आपण मागे बसलेले असू तर चालत्या स्नोमोबिलवर बसून फोटो काढायलाही धमाल येते.
बर्फातला दुसरा खेळ म्हणजे स्कीईंग. कोलोरॅडोत ब्रेकेनरीज, अ‍ॅस्पेन, वेल्स, विंटर पार्क वगैरे गावांमध्ये मोठमोठी स्कि रिसॉर्ट वसलेली आहेत. जवळपासच्या कॉटेजेस, लॉग केबिन्समध्ये रहायची खायची सोय असते, तिथेच स्किईंगचं सामान भाड्याने घ्यायचं आणि ह्या रिसॉर्टवर यायचं. हा खेळ नियमितपणे खेळणारे बरेच जण आठवडा आठवडा ह्याभागात येऊन सकाळपासून सूर्यास्तापर्यंत स्किईंग करतात! आमच्यासारख्या नवख्यांसाठी इथे स्किईंगची शिकवणी पण असते. तास - दोन तास तिथला अनुभवी माणून आपल्याला अगदी बेसिक गोष्टी शिकवतो आणि मग पुढे आपलं आपण करायचं. स्किईंगमध्ये सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे थांबणं. डोंगर उतारावर स्कि करायला सुरुवात करणं सोप्पं असतं पण वेगात असलं की थांबणं फारच अवघड आणि थांबलं नाही की 'घालीन लोटांगण...' नक्की ! आमच्या ट्रेनिंग सेशनमध्ये प्रत्येकाने एकदातरी तो अनुभव घेतलाच.

स्किईंग करतानाही बराच जामानिमा करावा लागतो. स्नोपँट, जॅकेट, हातमोजे, टोपी हे तर असतच, पण स्किईंगचे शूज हा एक अत्यंत बोजड प्रकार असतो.. पूर्ण धातूचे ते शूज घातले आणि ते स्किब्लेड्स पायात अडकवले की अगदी पायात बेड्याच घातल्यासारखं वाटतं! अर्थात पायाला तेव्हड्या आधाराची गरज असतेच. शिवाय जर आपण घसरून पडलो तर ते शूज काढल्या शिवाय उठताच येत नाही. जर ते न काढता उठायचं असेल तर दोन जणांनी दोन बाजूंनी बघोटं धरून उचलावं लागतं.

जितका बर्फ ताजा तितकी स्किईंगला मजा येते.. कारण फार दिवस झाले की बर्फाचा भुसभुशीतपणा जाऊन तो घट्ट होत जातो आणि घसरडा होत जातो ('स्नो' चा 'आईस' होतो). आम्ही ज्या रिसॉर्टवर स्किईंग केलं तिथली मुलगी अगदी काळजीने सांगत होती, 'गेले आठ दिवस बर्फ पडला नाही, असच राहिलं तर ह्या सिझनची वाट लागणार वगैरे वगैरे'.. मला अगदी आपल्याकडच्या पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकर्‍यांची आठवण झाली! हल्ली कृत्रिम बर्फ बनवण्याची मशिन आहेत. सगळ्या रिसॉर्टवर ती वापरली जातातच. आपण स्किईंग करून उतारावरून खाली आलो की पुन्हा वर जाण्यासाठी लिफ्ट असतात. एकदा जाऊन तरी बघू म्हणून आम्ही त्या लिफ्टने सगळ्यात वरच्या पॉईंटला गेलो पण तिथून खाली दिसणारा उतार बघून छातीच दडपली. मग चालत चालत अर्ध्या अंतरापर्यंत खाली आलो आणि तिथून स्किईंग केलं. स्किईंग करून दमल्यावर आणि गारठल्यावर रिसॉर्टच्या काऊंटरवर गरम गरम हॉट चॉकोलेट पिणं म्हणजे निव्वळ सुख! आणि त्यानंतर केबिन/कॉटेज मध्ये येऊन झॅकुझी किंवा टबबाथ घ्यावा. अशी सडकून भुक लागते की बस!

डेन्वर हे कोलोरॅडोतलं मोठं शहर, पण ते अगदी डोंगरात नाहीये त्यामुळे तिथे रहाण्यापेक्षा ब्रेकेनरीज, अ‍ॅस्पेन, वेल्स, विंटरपार्क वगैरे ठिकाणी रहाणं जास्त सोईचं पडतं. इथे सगळी कडे हॉटेल आहेतच पण मोठा ग्रुप असेल लॉग केबिन किंवा कॉटेजेस मध्ये रहाणं सोईचं पडतं. सगळ्या सोईंनी सुसज्ज, प्रशस्त केबिन अगदी मस्त असतात.
थँक्स गिव्हिंगच्या काळात अनेक रेस्टॉरंट पारंपारिक थँक्स गिव्हिंग डिनर देतात. आपल्या कडे कोकणात जशी घरगुती सोय असते तशी घरगुती रेस्टॉरंटही असतात. मोठ्या किंवा चेन रेस्टॉरंटपेक्षा  ही अशी रेस्टॉरंट छान वाटतात. ह्या थॅंक्स गिव्हिंग डीनरचा आमचा अनुभव फार छान होता.
ह्या डिनरचं आधी बुकिंग करावं लागतं. आम्ही आधी बुकिंग केलेलं ठिकाण आमच्या मुक्कामापासून २० मैल दुर होतं. पण सगळा घाट रस्ता असल्याने जायला यायला वेळ लागला असता. त्यामुळे मग आम्ही स्कि रीसॉर्टवरच विचारलं की जवळपास कुठे जेवण मिळेल का? हे लहान गाव असल्याने लोकं एकमेकांच्या ओळखीतलीच. लगेच तिथल्या काकूंनी त्या स्वतः जिथे जाणार होत्या त्या रेस्टॉरंटला फोन करून आमचं बुकींग करून टाकलं. अगदी स्वरूपातलं हे रेस्टॉरंट होतं. साधारण पन्नास पंचावन्न वयाचे काका काकू ते चालवतात. बोलून अतिशय गोड, खूप गप्पिष्ट! गेल्यावर आमची चौकशी केली, कुठून आलात, आत्तापर्यंत काय केलं वगैरे विचारलं, बर्‍याच इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. त्यांच घर तिथेच मागच्या बाजूला, पुढे बार, सिट आऊट आणि आतल्या बाजुला डायनिंगची जागा. हे पारंपारिक थँक्स गिव्हिंगचं जेवण असल्याने आमची सोय डायनिंग हॉल मधे होती. लाल भोपळ्याचं सुप आणि सलाड, आणि त्यानंतर टर्की किंवा फिश आणि फ्राई़ज, मॅश रताळी, उकडलेले बीन्स, क्रॅनबेरी सॉस, कॉर्न ब्रेड आणि भात असा मेन्यू. टर्की स्टफ्ड असते. पण हल्ली सगळ्यांना हे नुसतं स्टफिंग पण खायला हवं असतं त्यामुळे ते ही वेगळं दिलं होतं. आणि हे झाल्यावर पम्पकीन पाय. ह्या जेवणात जायफळाचा खूप वापर होता. आपल्याला पक्वान्नात जायफळाचा स्वाद असण्याची सवय असल्याने आपोआपच 'फेस्टीव' वाटायला लागलं! शिवाय आम्ही इतक्या दुरुन आलेलो बघून रेस्टॉरंटच्या मालकीणबाईंनी त्यांच्या खास ठेवणीतली व्हाईट वाईनही आम्हांला दिली.आमचं बुकींग जरा उशीराचं होतं, त्यामुळे आमचं जेवण संपता संपता रेस्टॉरंट कर्मचार्‍यांचीही जेवणं सुरु झाली. थँक्स गिव्हिंग असल्याने मालकीणबाईंनी सगळ्या कर्मचार्‍यांचे आभार मानले, त्यांचं पहिलं हवं नको ते बघितलं आणि मग ते दोघं जेवायला बसले. सण आपल्याकडचा असो वा तिकडचा, प्रसन्न वातावरण आपोआपच तयार होतं हे जाणवलं! फोटोत फार प्रॉमिसिंग दिसत नसलं तरी जेवण चवीला खूपच छान होतं.



अ‍ॅस्पेन आणि वेल्स ह्या दोन महागडी ठिकाणंही ह्या थँक्स गिव्हिंग, ख्रिसमस डीनर आणि रोषणाई साठी प्रसिद्ध आहेत. तिथले रहाण्या-खाण्याचे एकंदरीत दर बघता ह्या ठिकाणी नुसता फेरफटका मारून येणचं परवडतं!
बर्फातळे खेळ खेळायची हौस भागली की मग गाडी काढून इतर ठिकाणं बघायला निघावं. बर्फ आपली पाठ सोडत नाहीच पण तरीही! बर्फातल्या खेळांनंतर आम्हांला सगळ्यांत आवडलेलं ठिकाण म्हणजे रॉयल गॉर्ज. गॉर्ज म्हणजे घळ. अर्कान्सा नदीच्या प्रवाहामुळे ही घळ तयार झाली आहे. ग्रँड कॅनियनचे हे लघुरूप. ह्या घळीवर पुल बांधला आहे. अनेक वर्ष हा जगातला सर्वात उंचीवरचा पुल होता. तिथे कळलेली एक गंमतीची गोष्ट म्हणजे ह्या घळीवरचा पूल हा प्रवासी वाहतुकीसाठी न बांधता केवळ पर्यटनाच्या हेतूने बांधला गेला आहे! त्या पुलावर खाली बघताना जरा भितीच वाटते कारण नदी खूपच खोल दिसते.आम्ही सूर्यास्ताच्या वेळी तिथे पोचलो. तिन्हीसांजेंच्या रंगात घळ फार सुंदर दिसली. पण कमी उजेडामुळे नीट फोटो काढू शकलो नाही.
कोलोरॅडो स्प्रिंग्ज ह्या गावाजवळ 'गार्डन ऑफ गॉड्स' नावाची एक जागा आहे. इथे लाल रंगांचे डोंगर आहेत आणि ह्या लाल दगडांचे विविध आकार तयार झालेले आहेत. ह्या डोंगरांमध्ये रॉक क्लाईंबिंग, माऊंटन बायकिंग वगैरे खेळांसाठी बरेच लोक येतात. गार्डन ऑफ गॉड्स मधले बॅलन्स्ड रॉक, स्टीम बोट रॉक, सायामिज ट्विन्स वगैरे आकार छान आहेत. ह्या सगळ्या दगडांच्या आजुबाजूने रस्ता बांधलेला असल्याने अगदी थेट गाडीने त्यांच्यापर्यंत पोहोचता येतं आणि वर चढूनही जाता येतं. अर्थात जरा वेळाने इथे कंटाळा येतो!

कोलोरॅडो स्प्रिंग गावाजवळच 'पाईक्स पीक' नावाचं शिखर आहे. हे शिखर साधारण १४००० फुट उंच आहे. ह्यावर जाण्यासाठी 'कॉग रेल्वे' नावाची रेल्वेलाईन आहे. ही रेल्वे सुमारे दिड तासात आपल्याला वर घेऊन जाते. रेल्वेचा चालक एकीकडे माहिती सांगत असतो. एव्हड्या उंचीवर चढायचं म्हणजे रेल्वे चांगलीच तिरकी होते! ह्या पीकवर जाण्यासाठी रस्ताही आहे. गाडीने जातानाही खूपच जास्त चढ आहे आणि त्यामुळे ड्रायव्हरचा कस लागतो असं ऐकलं आहे. आम्ही रेल्वेने गेल्याने ते अनुभवता आलं नाही.
इतर बर्‍याच अमेरिकन गोष्टींप्रमाणे ही रेल्वेसुद्धा कशाच्यातरी आधारावर जगातली पहिली वगैरे आहे! आम्हांला तसं वाटलं की खरच तसं होतं हे माहित नाही पण ह्या शिखरावर उंचीमुळे विरळ हवा आहे की काय असं जाणवलं. एकतर खालच्यापेक्षा खूप जास्त थंडी होती आणि दुसरं म्हणजे अगदी दहा पावलं चालल्यावरही दम लागत होता. इथून डोंगरांची आणि दर्‍यांची अतिशय सुंदर दृष्य दिसतात.
तिथल्या व्हिजिटर सेंटरमध्ये कॉफी घेत आजुबाजूची दृष्य बघत वेळ कसा जातो कळत नाही. ही रेल्वेसुद्धा केवळ पर्यटनासाठी बांधली आहे. कारण ह्या शिखरवर वस्ती नसल्याने पर्यटक सोडून तिथले स्थानिक लोक वगैरे रेल्वेचा वापर करत नाहीत. ही रेल्वे ज्या गावातून सुटते ते गाव (Manitou) फार छान आहे. घरांचे रंग आणि रचना विशिष्ट पद्धतीची आहे. मुख्य रस्त्यावर खाण्यापिण्याची खूप ठिकाणं आहेत आणि मुखत्त्वे मॅक्सिकन जेवण चांगलं मिळतं.
केवळ पिक्स पाईकच्या रस्त्यावर नाही तर एकंदरीतच कोलोरॅडोच्या रॉकी माऊंटन्समध्ये बर्फात गाडी चालवणे हा ही एक रोमांचकारी वगैरे अनुभव असतो. त्यात बर्फ पडत असेल तर अजून थोडे रोमांच उभे रहातात! अंधार पडल्यानंतर सगळी कडे बर्फ, घाट रस्ता आणि शांतता ह्या गळ्यामुळे फारच गुढ आणि जरासं भितीदायक वातावरण तयार होतं. आम्हांला दोन्ही ट्रीपांमध्ये दोनवेळा अश्या बर्फातून गाडी चालवावी लागली. अर्थात बर्फ रोजचाच असल्याने रस्ते साफ करणं, मिठ टाकणं वगैरे कामं सरकारी कर्मचारी अगदी लगेच करतात.


बर्फातले खेळ किंवा भटकंती करून संध्याकाळी ताकद उरलीच तर जिथे केबिन आहे त्या गावात रात्री ख्रिसमसची रोषणाई बघायला, नुसता फेरफटका मारायला किंवा विंडो शॉपिंग करायला बाहेर पडावं! खूप रंगीबेरंगी, उत्साही आणि उत्सवी वातावरण असतं. हाड गोठवणार्‍या आणि दात वाजवणार्‍या थंडीत तिथल्या स्थानिक आईस्क्रीम पार्लरमधलं आईस्क्रीम खाण्याचा अनुभवही नक्की घ्यावा.


कोलोरॅडोला जायचां तर फक्त बर्फातच घसरायला हवं असं नाही. तुम्ही वाळूमध्येही घसराघसरी करू शकता. डेन्वरहून साधारण २५० मैल दक्षिणेला सँड्यून्स नॅशनल पार्क आहे. अर्थात आम्हांला तिथे वेळेअभावी जाता आलं नाही. त्यामुळे कलरफुल कोलोरॅडोच्या पुढच्या ट्रीपमध्ये एक नवीन कलर पहायचां आधीच ठरलेलं आहे!

अटलांटातले "पटेल" स्पॉट्स

बरेच जण एखाद्या सप्ताहांतापुरते अटलांटाला चक्कर टाकतात आणि हातात असलेल्या पाऊण, एक किंवा दिड दिवसात इथलं काय बघता येईल असा त्यांना प्रश्न पडतो. जर अटलांटा शहराबाहेर जायचं नसेल आणि हातात दिड-दोन दिवस असतील तर शहरातले सगळे "पटेल पॉईंट्स" बघणे (आणि तिथे फोटो काढून ते फेसबूकवर डकवणे!) सहज शक्य आहे. अटलांटामध्ये अनेक कंपन्यांची मुख्यालयं आहेत. उदाहरणं द्यायची झाली तर कोकाकोला, सिएनएन, डेल्टा / एअरट्रॅन एअरलाईन्स / कॉक्स कम्युनिकेशन, अर्थलिंक, युनायटेड पार्सल सव्हिसेस (UPS), वॉफल हाऊस आणि चिकफिले ह्या रेस्तराँ चेन्स. ह्यातल्या काही मुख्यालयांमध्ये म्युझियम्स, टूर्स आहेत आणि ती डाऊनटाऊन परिसरात आहेत. १. वर्ल्ड ऑफ कोकाकोला : जगप्रसिद्ध कोकाकोला उत्पादनं तयार करणार्‍या कंपनीचं मुख्यालय अटलांटा डाऊनटाऊनमध्ये आहे. तसचं "वर्ल्ड ऑफ कोकाकोला" नावाचं त्यांचं म्युझियमसुद्धा ह्याच परिसरात आहे. सुरूवातीला कोक जेव्हा पहिल्यांदा विकायला सुरूवात झाली तेव्हापासूनची सगळी मोठमोठी बॅनर्स इथे लावलेली आहेत. तसेच अगदी सुरूवातीपासूनच्या कोकच्या बाटल्या बघायला मिळतात. जुन्या बाटल्यांचे आकार आत्ताच्या काचेच्या बाटल्यांपेक्षा बरेच वेगळे होते. कोकाकोलाच्या सिक्रेट फॉर्म्युलाबद्दल माहिती देणारी (?) फिल्म तिथे सुरुवातीलाच दाखवतात. इथे एक ४-डी शो आहे. कोक म्हणजे नक्की काय हे सांगणारा हा शो मनोरंजक आहे. पुढच्या एका विभागात जगभरात कोकाकोलासाठी बनवल्या गेलेल्या जाहिराती इथल्या थिएटरमध्ये सतत सुरू असतात. आपल्या इथली अमिर खान आणि ऐश्वर्या रायची जाहिरात इथे बघायला मिळते. इथे कोकच्या बाटल्यांचं उत्पादनसुध्दा थोड्याप्रमाणात होतं आणि त्याची असेंब्ली लाईन बघायला मिळते. मोठमोठ्या बॉयलरमध्ये भरलेल्या डिस्टील्ड वॉटर पासून कोकच्या सिलबंद बाटली पर्यंतचे मधले सगळे टप्पे इथे बघता येतात. आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे विविध देशांमधल्या कोकाकोला पेयांची चव ह्या टूरच्या शेवटच्या टप्प्यात चाखता येते. क्लासिक कोक पण हवं तेव्हढं पिता येतं. प्रत्येक खंडाचा वेगवेगळा भाग करून त्यात देशानुसार डिस्पेंसर आहेत. भारतामधून 'माझा' असेल असं वाटलं होतं, पण तिथे भारतातर्फे स्प्राईट आहे. दक्षिण अमेरिकन देशांमधली सगळी पेयं छान आहेत. बाहेर पडताना प्रत्येकाला तिथेच तयार झालेल्या (पहिल्या धारेच्या) कोकची एक बाटली भेट म्हणून देतात. पुढे एक मोठं गिफ्ट शॉप आहे. तिथे बर्‍याच प्रकारची सुव्हिनीयर्स मिळतात. जरा वेगळ्या प्रकारचं म्युझियम म्हणून वर्ल्ड ऑफ कोकाकोलाला नक्की भेट द्यावी. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी कोक कधी ना कधी प्यायलेलं असल्याने प्रत्येकाला थोडीफार उत्सुकता असतेच आणि प्रत्येक वयोगटातल्या लोकांचे मनोरंजन होईल ह्याची पुरेपुर काळजी इथे घेतलेली आहे. हल्लीच्या काळातल्या ख्रिसमसचं महत्त्वाचं आकर्षण असलेला "भेटवस्तू वाटणारा सांताक्लॉज" ही कल्पना पुढे रेटण्यात कोकाकोला कंपनीच्या जाहिरात विभागाचाही बराच हात आहे ही माहीती इथे मिळते. २. सिएनएन सेंटर : अमेरिकेतली २४ तास वृत्तसेवा पुरवणारी पहिली वाहिनी असलेल्या CNN चं मुख्यालय अटलांटा डाऊनटाऊन परिसरात आहे. ह्या वाहिनीवर प्रसारीत होणार्‍या दिवसभरातल्या राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय बातमीपत्रांमधली बरीच बातमीपत्र ह्या इमारतीतल्या स्टुडीयोंमधून प्रसारीत होतात. कोकाकोलाप्रमाणेच सिएनएन सेंटरमध्येही टुर्स असतात. इथे इमारतीच्या मध्यभागी भलेमोठे फूडकोर्ट आहे. डाऊनटाऊनमध्ये काम करणारी बरीच मंडळी लंचसाठी ह्या फूडकोर्टमध्ये येतात. ह्या फूडकोर्टच्या एका बाजूला गिफ्टशॉप तसेच माहिती केंद्र आहे. फूडकोर्टमध्ये भल्यामोठ्या स्क्रीनवर सिएनएन वाहिनीवरची वृत्तपत्रे प्रसारित होत असतात. सिएनएन सेंटरच्या टुरवर जाणार्‍या लोकांसाठी फूडकोर्टच्या मध्यातून एक भलामोठा सरकता जीना थेट पाचव्या मजल्यापर्यंत जातो. ह्या जीन्याची नोंद गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झालेली आहे. टुरदरम्यान CNN आणि CNN international, HLN (Head line news) तसेच CNN en Español ह्यांचे स्टुडीयो पहायला मिळतात. काही ठिकाणी सुरू असलेलं बातमीपत्र सादरीकरणही पहायला मिळतं. ह्या टुरदरम्यान ते बातमीपत्र प्रसारीत होणार्‍या स्टुडियोची संपूर्ण माहिती देतात. निवेदकाला बातम्या कुठे दिसतात, बातमीपत्र वाचन करत असताना त्याला सूचना कशा दिल्या जातात, हवामानाचा अंदाज दाखवणारे नकाशे कुठे आणि कसे असतात ह्या सगळ्या गोष्टी तिथे समजतात. टुरमधल्या एकाला बोलावून ते मॉक बातम्या द्यायला सांगतात. तो भाग मनोरंजक असतो! २००८ साली मार्च महिन्यात झालेल्या वादळात सिएनएन सेंटरच्या ह्या इमारतीचे खूप नुकसान झाले होते. त्याची माहिती तसेच फोटो टुर संपता संपता असलेल्या फोटो गॅलरीत मिळतात. अनेक महत्त्वाच्या घटनांचे सिएनएनवर दाखवले गेलेले फोटोही इथे पहायला मिळतात. ३. जॉर्जिया अक्वेरियम : अमेरीकेतलं प्रत्येक ठिकाणं हे कुठल्या का होईना क्रायटेरियाने "जगातलं सगळ्यांत मोठं" असतं! तश्याच प्रकारचं "इनडोर वॉटर कंटेट" ह्या क्रायटेरियानुसार जगातलं सगळ्यांत मोठं असलेलं बोटीच्या आकाराच्या इमारतीत वसलेलं जॉर्जिया अक्वेरियम अटलांटा डाऊन टाऊनमध्ये वर्ल्ड ऑफ कोकाकोलाच्या अगदी शेजारी आहे. लहान मुलं बरोबर असतील तर ह्या अक्वेरियम मध्ये जरूर जावं अन्यथा ते बर्‍यापैकी कंटाळवाणं आहे. बाकी ठिकाणी नसलेलं असं वेगळं काहीही इथे नाहीये. त्यामुळे सी-वर्ल्ड, शिकागोचं शेड अक्वेरियम वगैरे पाहिलेलं असल्यास इथे नाही गेलात तर फार काही फरक पडणार नाही. आत मधल्या बर्‍याच शोज ना वेगळे पैसे पडतात. बर्‍याच ठिकाणी भल्यामोठ्या काचेच्या भिंतीमागे बहुरंगी मासे दिसतात. ह्या भिंतींवर असलेल्या दिव्यांची रंगसंगती छान आहे. लहान मुलं हे पाहून खुष होतात. वर्ल्ड ऑफ कोकाकोला, सिएनएन सेंटर आणि अक्वेरियम ह्यांचा मिळून काँबो पास मिळतो. आणि सकाळी लवकर सुरुवात केली तर ह्या तीनही गोष्टी एका दिवसात बघणे शक्य आहे. ४. सेंटेनीयल ऑलिंपीक पार्क : अटलांटा शहराने १९९६च्या ऑलिंपीक स्पर्धेचं यजमानपद भूषवलं होतं. ह्या स्पर्धेनिमित्ताने अटलांटा डाऊनटाऊनमध्ये ही बाग उभारली गेली. ह्या बागेच्या मध्यभागी ऑलिंपीक रिंगच्या आकारात कारंजी आहेत आणि इथे लाईट अँड साऊंड शो होतो. चारही कोपर्‍यांत ऑलिंपीक टॉर्चच्या आकारातल्या मशाली आहेत. इथल्या पदपथांच्या विटांवर ऑलिंपीकसाठी देणगी देणार्‍यांची नावे आणि त्यांनी दिलेले संदेश कोरलेले आहेत. ह्या बागेत एका बाजूला कार्यक्रमांसाठी मंच आहे. तिथे दर शनिवारी वेगवेगळे कार्यक्रम सुरू असतात. इथे विश्व हिंदू परिषदेतर्फे दिवाळीच्या दरम्यान कार्यक्रम असतो. हिवाळ्यात एखाद्या दिवशी चांगली हवा असेल तर अनेक लोक इथल्या लॉनवर उन्हं खात बसलेली असतात किंवा चक्कर मारत असतात. ५. स्टोन माऊंटन : अटलांटा शहरापासून सुमारे २० मैल अंतरावर स्टोन माऊंटन नावाचा ग्रॅनाईटचा डोंगर आहे. ह्या डोंगराचे वैशिष्ट्य म्हणजे हा जमिनीवर ठेवलेल्या लंबगोलाकृती दगडासारखा दिसतो. म्हणजे आधीचे चढाव, डोंगराच्या सोंडा अशी नेहमीची रचना इथे दिसत नाही. एकदम डोंगर सुरू होतो. ह्या डोंगराची उंची साधारण १७०० फूट आहे. डोंगरमाथ्यावर जायला केबल कार घेता येते किंवा चालतही जाता येते. चालत साधारण २०-२५ मिनीटांत वरपर्यंत पोचता येतं. डोंगरावरून अटलांटा परिसराचं सुंदर दृष्य दिसतं. अटलांटा शहरात खूप झाडी आहे. त्यामुळे फॉलमध्ये गेलं की डोंगरमाथ्यावरून एकदम रंगीबेरंगी दिसतं. डोंगरावर तयार झालेल्या नैसर्गिक भिंतीवर सिव्हील वॉरमध्ये लढलेल्या तीन प्रमुख नेत्यांचं शिल्प कोरलेलं आहे. ह्याच भिंतीवर उन्हाळ्यात प्रत्येक सप्ताहांताला संध्याकाळी अंधार पडल्यानंतर अमेरिकेच्या आणि जॉर्जियाच्या इतिहासावर आधारीत लेझर शो केला जातो आणि फटाक्यांची रोषणाई केली जाते. तसंच ह्या डोंगराच्या परिसरात स्टोन माऊंटन अम्युझमेंट पार्क आहे. सगळीकडे असतात तशी साधारण ट्रेन राईड, बोट राईड, ग्लास ब्लोईंग, थ्रीडी सिनेमा, लहान मुलांना खेळण्यासाठी खेळ, टॅटूवाला, बुढ्ढी के बाल, फूडकोर्ट वगैरे गोष्टी इथे आहे. इथे एक वैशिष्ट्यपूर्ण डक राईड आहे. बस सारख्या वाहनात सगळ्यांना बसवतात ज्याला ते "डक" म्हणतात आणि पुढे हे डक पाण्यात शिरून होडीप्रमाणे तरंगायला लागतं! उन्हाळ्यात साधारण दुपारी इथे येऊन सगळ्या राईड करून, नंतर खादाडी करून आणि लेझर शो बघून परतणे असा एक दिवसाचा कार्यक्रम बरेच जण करतात. लेझर शो खूपच उंचावर होत असल्याने लॉनवर कुठेही बसून दिसू शकतो. त्यामुळे लोकं आपल्याबरोबर घडीच्या खूर्च्या, चटया, चादरी वगैर घेऊन निवांत बसलेले असतात. वेळ असेल आणि हवा चांगली असेल तर इथल्या एखाद्या पिकनीक एरियामध्ये निवांत ग्रील करत दिवसभराचं आऊटींग करता येतं. हिवाळ्यात लेझर शो जिथे बसून बघतात त्या लॉनवर कृत्रिम बर्फ आणून टाकतात आणि त्यावर स्नो-ट्युबिंग करता येतं. साधारण जानेवारी फेब्रुवारी महिन्यांत हे स्नो-माऊंटन उघडतं. ६. स्वामी नारायण मंदीर : आता ह्याला पटेल स्पॉट म्हंटलेलं चालेल की नाही ते माहित नाही पण हे मंदिर सुद्धा अटलांटामधला मोठा टुरिस्ट स्पॉट आहे! बसच्या बस भरून देशी तसेच विदेशी लोकं मंदिर पहायला येत असतात. अमेरिकेतल्या सगळ्या स्वामी नारायण मंदिरांमधलं सगळ्यांत मोठं हे आहे असं म्हणतात. मंदिराच्या बाहेरच्या बाजूचं आणि आतलं कोरीवकाम अतिशय सुंदर आहे. मंदिराच्या आतली दिव्यांची रचना आणि आरासही सुरेख असते. दिवाळीला ह्या मंदिरावर वेगवेगळ्या रंगाचे प्रकाशझोत सोडून रोषणाई करतात तसच फटाक्यांची आतिषबाजी होते. मंदिराच्या आत दिवाळीच्या दिवसांमध्ये पणत्या आणि साध्या, फुलांच्या आणि धान्यांच्या रांगोळ्यांची फार सुरेख आरास केलेली असते. हि सगळी ठिकाणं अटलांटा शहराच्या जवळपास आहेत. शहराबाहेरच्या, एक दिवसात, जाऊन येता येण्याजोग्या अजून काही ठिकाणांबद्दल पुढल्या भागात...

पश्चिमेतला स्वर्ग - योसेमिटी, क्रेटर लेक

अमेरीकेत आल्यापासून प्रत्येक लाँग विकेंडला भटकंती सुरुच असते. सेंट लुईस तसच अटलांटा ह्या दोन्ही ठिकाणांपासून एखाद-दोन दिवसांत बघता येतील अशी ठिकाणं पहाणं साध्या विकेंडना चालू असतं आणि लाँग विकेंडना मोठ्या ट्रिप. बरेच मित्र-मैत्रिणी अमेरीकेतल्या वेगवेगळ्या भागांमध्ये विखुरलेले असल्याने त्यांच्या भागातल्या नविन नविन ठिकांणाबद्दल कळत असतं आणि मग तिथे जायचे प्लॅन्स ठरतात. अमेरीकेत यायच्या आधी नायगारा आणि ग्रँड कॅनियन सोडून बाकी काही नैसर्गिक गोष्टी बघण्यासारख्या आहेत हे माहित नव्हतं. योसेमिटी आणि क्रेटर लेक ही नावं मी साधारण दिड-एक वर्षांनंतर एका मित्राचे फोटो बघताना ऐकली होती. दोन्ही ठिकाणांचे फोटो खूप मस्त होते आणि त्यामुळे ह्या दोन्ही ठिकाणी जायचच ! असं नक्की ठरवून टाकलं होतं. पण बाकीची यशस्वी ठिकाणं बघण्यात आणि योसेमिटी /क्रेटर लेकचं हवामान, विमानाच्या तिकीटांच्या किंमती आणि सुट्ट्या ह्या सगळ्यांचा ताळमेळ घालण्यात सुमारे ३ वर्ष गेली. यंदाच्या वर्षी मेमोरीयल डे विकेंडला जोडून दोन दिवसांची सुट्टी मिळाल्याने योसेमिटी आणि क्रेटर लेकची "मच अवेटेड" ट्रीप पार पडली. स्वस्त डील मिळाल्यावर विमानाची तिकीटं काढून टाकली. बॉसला सुट्टीसाठी पटवणं आणि तिथलं प्लॅनिंग हे नंतर करायला ठेवलं. प्लॅन आखायला घेतल्यावर मात्र "रात्र थोडी आणि सोंग फार" अशी स्थिती झाली ! ज्याला विचारू तो " हे नक्क्कोच अजिबात.. तेच्च्च पहा" टाईप मतं सांगत होता. शिवाय आमच्या बरोबर अजून एक मित्र आणि मैत्रिण येणार होते त्यांना त्यांचे मित्र-मैत्रिणी असेच सल्ले देत होते. त्यामुळे रोज रात्री आमचा फोन झाला की प्लॅन बदललेला असे !! शेवटी निघायच्या आदल्या रविवारी दोन दिवस योसेमिटी, दीड दिवस क्रेटर लेक आणि शेवटचा दीड दिवस सॅन फ्रँन्सिस्को असा प्लॅन नक्की केला आणि हॉटेल्स बूक करून टाकली. हवामानाचा अंदाज रोज पहात होतो. एकडून तिकडे किंवा तिकडून इकडे येणार्‍या हवेच्या झोतांमूळे कधी स्वच्छ सूर्यप्रकाश, कधी पाऊस तर कधी बर्फ असा रोज बदलता "अंदाज" दाखवला जात होता. पण आता विमानाची तिकिटं काढली आहेत त्यामुळे काय वाट्टेल ते झालं तरी जाऊच असं ठरवून हवामानाचे अंदाज बघणं बंद करून टाकलं. एकूण ट्रीपचा प्लॅन बघता धबधबे, लेक, समुद्र, खाडी ह्या सगळ्यांचं बर्‍याचदा दर्शन होणार होतं. :) बे-एरीया मधून योसेमिटीला जायला निघाल्यावर रस्त्यावर जवळच्या बागांमधून तोडून आणलेल्या ताज्या आणि अतिशय चविष्ठ चेरी आणि स्ट्रॉबेरीचे स्टॉल लागले. आम्ही लगेच गाडी तिकडे वळवून ताज्या फळांवर ताव मारला ! * <फोटो १>
* नंतर हे स्टॉल बर्‍याचदा दिसले. रस्त्यांवर दुतर्फा फळांच्या बागा दिसत होत्या. शाळेतल्या भूगोलाच्या पुस्तकात वाचलेला फळफळावळ पिकवणारा कॅलीफोर्निया पहायला मिळाला. एकदा तर आम्ही लंच न करता किलो-दोन किलो चेर्‍या आणि स्ट्रॉबेर्‍याच फस्त केल्या ! * <फोटो २ > * हायवे १२० वर घाट सुरु होण्याच्या आधी एक सुंदर लेक लागला. खूप मोठा होता आणि अधेमधे गाड्या थांबवून फोटो काढण्याकरता जागा पण होती. ह्या लेकचं नाव मात्र कळू शकलं नाही. * <फोटो ३> * योसेमिटी नॅशनल पार्क हे अमेरिकेतल्या जुन्या नॅशनल पार्क्सपैकी एक आहे. हे दरीत वसलेलं आहे. त्यामुळे सगळ्या बाजूंनी डोंगररांगा, दाट झाडी, डोंगरावरच्या बर्फाचे पाणी वितळल्यामुळे खळाळणारे धबधबे असं नयनरम्य दृष्य वसंतात आणि उन्हाळ्यात दिसतं. दरीत असल्यामुळे थंडीतही तिथे जाता येतं पण आजुबाजूला डोंगरांवर चढाई करण्याचे रस्ते तसचं उंचावरची प्रेक्षणीय स्थळं पहाता येतं नाहीत. * <फोटो ४> * पार्कमध्ये शिरता शिरता ब्रायडलवेल धबधबा लक्ष वेधून घेतो. ह्या धबधब्याच्या अगदी जवळ जाता येतं. पाणी बर्फाचं असल्याने भयंकर गार होतं तरीही कुडकूडत आम्ही तिथे जाऊन आलोच ! जवळजवळ पूर्ण भिजलो आणि एखादी चहाची टपरी जवळपास हवी होती अशी तीव्र जाणिव झाली. * <फोटो ५ > * पार्कमध्ये पुढे गेल्यावर एक झुलता पूल लागतो. त्याच्या आसपास खूप मोठं हिरवळ असलेलं मैदान आहे. अनेक लोक तिथे खेळत, वाचत, चित्र/फोटो काढत, ग्रील वरच्या गरमागरम पदार्थांवर ताव मारत किंवा नुसतेच उन्हं खात बसले होते. इथूनच योसेमिटी धबधब्याच्या वरच्या भागाचे दर्शन झाले. * <फोटो ६ > * आम्हीही जरावेळ टाईमपास करून मग पुढे निघालो. हा रस्ता पुढे पार्कच्या मुख्य भागात म्हणजे योसेमिटी वॅलीत जाऊन पोहोचतो. या पार्कमध्ये आत फिरण्यासाठी बस आहेत, जेणेकरून प्रत्येक ठिकाणी वाहनांची गर्दी होत नाही. मध्यभागी असलेल्या वाहनतळावर गाडी ठेऊन बसने आरामात फिरता येतं. आम्हीही गाडी तिथे ठेऊन योसेमिटी धबधब्यापाशी जाणारी बस पकडली. ह्या धबधब्याच्या वरच्या भागात जाता येतं किंवा खालचा अर्धाभाग पाहून परतता येतं. वरचा अर्धा भाग पार करणं खूप अवघड आहे असं तिथे लिहिलेलं होतं तसच सूर्यास्त होईपर्यंत आम्ही तिथून परतू शकलो नसतो त्यामुळे आम्ही खालच्याच सुमारे ३ मैलांच्या ट्रेलवर गेलो. * <फोटो ७> * तिथून परतेपर्यंत थंडी चांगलीच वाढली होती आणि अंधारही पडायला लागला होता. त्यामुळे मग गाडी घेऊन करी व्हिलेजमध्ये जिथे आम्ही एक तंबू भाड्याने घेतला होता, तिथे जायला निघालो. हा तंबू फारच सोईचा होता. आतमध्ये हिटर होता. तसच झोपायला पलंगही होते. बाहेर अस्वलांपासून अन्नपदार्थ लपवून ठेवण्यासाठी पेट्या पण होत्या. इथली अस्वलं खाण्याचा वास आला तर गाड्यांची दारंही तोडतात. त्यामुळे खाद्यपदार्थ तसेच वास येणार्‍या कुठल्याही गोष्टी ह्या पेटीच ठेवणं बंधनकारक आहे.
* <फोटो ८ >
* इथल्या बर्‍याच नॅशनल पार्क्समध्ये सरकारच्या नॅशनल पार्क सर्व्हिसेस तर्फेच खाण्यापिण्याची तसेच रहाण्याची सोय केलेली असते. त्यामुळे अतिशय चांगली सोय वाजवी दरात उपलब्ध असते. अश्याच रेस्टॉरंटमध्ये पोटपूजा करून आम्ही मिरर लेकच्या दिशेने प्रयाण केले. जाता जाता सहज तिथल्या ऑफिसमध्ये चौकशी केल्यावर कळले की गेले काही महिने बर्फामुळे बंद असलेला ग्लेशियर पॉईंटचा रस्ता त्या दिवशी दुपारी बारा वाजता उघडणार होता ! आम्ही आमच्या पुढच्या प्लॅनमध्ये लगेच बदल केले कारण ग्लेशियर पॉईंट अजिबात चुकवायचा नव्हता. मिरर लेक नावाप्रमाणेच आरसा आहे. नितळ पाण्यात आजुबाजूच्या दृष्याचे सुंदर प्रतिबिंब पडतं.
*<फोटो ९ > * मिरर लेक हून परत येईपर्यंत ग्लेशियर पॉईंट उघडायची वेळ झाली. लगोलग आम्ही गाडी तिकडे वळवली. ग्लेशियर पॉईंट हा डोंगरमाथ्यावर आहे आणि त्यामुळे तिथून योसेमिटी व्हॅलीचं सुंदर दृष्य दिसतं. जसजसे वर जात होतो तसा आजुबाजूला साठलेला बर्फ दिसायला लागला. रस्त्यावरून गाड्या जाता याव्या म्हणून रस्ता तेव्ह्डा साफ केलेला होता. मध्ये एकेठिकाणी खूप मोठा बोगदा आहे आणि ह्या बोगद्याच्या सुरुवातीला गाड्या थांबवून फोटो काढता येतात. आपण साधारण डोंगराच्या मध्यापर्यंत आलेलो असतो. ग्लेशियर पाँईटहून दिरणारं दृष्य हे योसेमिटीमधल्या सौंदर्याची परमावधी म्हणायला हरकत नाही ! आजुबाजूचे राकट पहाड, मुळात भली मोठी असलेल्या पण वरून नाजूक दिसणार्‍या झाडांनी भरलेली दरी, खळाळते धबधबे आणि अजिंक्य दिसणारा हाफ डोम असं हे सगळच फार सुंदर दिसतं ! आम्ही तर १० मिनीटे काही न बोलता नुसते बघतच बसलो.
* <फोटो १० > * वरून दिसणारा पार्कचा परिसर
* <फोटो ११> * ग्लेशियर पॉईंटहून हाफ-डोम ही सुरेख दिसतो. हा डोंगर एकाबाजूने सरळसोट उभा आहे तर दुसर्‍याबाजूने डोमच्या आकाराचा आहे. ह्यावर चढाईपण करता येते.
* <फोटो १२ > * हा एक पॅनोरमाचा प्रयत्न
* <फोटो १३> * हे सगळं दृष्य डोळ्यांत आणि कॅमेर्‍यात साठवून आम्ही मॉरीपोसाला जायला निघालो. मॉरीपोसाला पृथ्वीवरचे सगळ्यात मोठे सजिव अर्थात जायंट सेक्वा ट्री आहेत. तिथे उन्मळून पडलेल्या झाडाच्या मुळावरूनच आकाराची कल्पना येईल.
* <फोटो १४ > * हे ग्रिझली जायंट. ह्याची उंची सुमारे ६३ मिटर आणि घेर ८ मिटर आहे. ह्याच्या अतिभव्यतेपुढे काय बोलावं सुचतच नाही !
* <फोटो १५ >
* पुढे कॅलिफोर्निया जायंट लागतो. ह्याचं चित्रही भूगोलाच्या पुस्तकात पाहिलं असेल. ह्या झाडाच्या बुंध्याला भलं मोठं भोक पाडून पूर्वी ह्यातून गाड्या जात असत. आता हे भोक हळूहळू (म्हणजे फारच हळू) बुजतय. अश्याप्रकारचा प्रयत्न केलेलं हे एकमेव झाड आता जिवंत आहे.
* <फोटो १६ >
*
मागे यलोस्टोन नॅशनल पार्कला जाऊन आलेलो असल्याने योसेमिटी आणि येलोस्टोनची सारखी तुलना होतं होती. योसेमिटी नक्कीच जास्त सुंदर आहे पण मानवी वस्तीपासून जवळ असल्याने तसेच पर्यंटकांची खूप गर्दी असल्याने हे सौंदर्य हरवणार नाही ना अशी कुठेतरी भिती वाटून गेली ! योसेमिटी बघून झाल्यावर आम्ही बे-एरीयात परतून क्रेटर लेकच्या दिशेने प्रयाण केलं. क्रेटर लेक हा कॅलिफोर्नियाच्या उत्तरेला असलेया ऑरेगन राज्यात येतो. गेल्यावेळच्या ट्रीपमध्ये ऑरेगन कोस्ट मला फार म्हणजे फारच आवडला होता ! बे-एरीयाच्या हाईपपुढे ऑरेगन हे एखाद्या फेमस हिरॉईनच्या सुंदर पण दुर्लक्षित बहीणीसारखं वाटतं (ट्युलिपच्या ब्लॉगमधून साभार ! :) ) ऑरेगनच्या प्रेमामुळे आम्ही खरतर पोर्टलँडपर्यंत ड्राइव्ह मारायचा विचार करत होतो पण वेळेआभावी ते रद्द करावं लागलं. क्रेटर लेक हा भुकंपामुळे तयार झालेल्या प्रचंड मोठ्या खळग्यात साठलेल्या बर्फाच्या तसेच पावसाच्या पाण्याच्या साठ्यापासून तयार झाला आहे. ह्या लेकमध्ये ना कुठले झरे, नद्या येऊन मिळतात ना लेकमधून उगम पावतात. पाण्याचा स्त्रोत फक्त पाऊस किंवा बर्फ असल्याने पाणी अतिशय शुद्ध आणि स्वच्छ आहे. बे-एरीयातून जसजसे उत्तरेला जात होतो तसं आजूबाजूचं दृष्य बदलतं होतं. आधी फळांच्या बागा, मग वाळलेलं गवत असलेली जमीन, मधेच उजाड डोंगर. माऊंट शास्ता जवळ आल्यावर झाडांची उंची वाढायला लागली आणि जरा वेळानी पाऊसही आला. दरम्यान आम्ही ऑरेगनमध्ये प्रवेश केला होता. तिथे तर थंडीही जोरदार वाढली पण ऊन मात्र होतं. आत एका विजीटर सेंटरवर विचारलं तर तिथल्या काकूंनी अगदीच उसासे सोडले. म्हणे बघा जाऊन लेक पर्यंत नशिब असेल तर मिळेल बघायला. म्हंटलं बाई बर्‍या आहेत ना ! इथे ऊन पडलय आणि बर्फाचं काय घेऊन बसल्यात. मुख्य रस्ता सोडून आत वेळल्यावर आजुबाजूला साठलेला बर्फ दिसायला लागला.
* <फोटो १७> * हळूह्ळू तो वाढायला लागला. रस्ता अगदी बर्फातून कोरून काढला होता ! विजिटर सेंटरचं वळणं आलं. मात्र तिथे काही असेल असं वाटतं नव्हतं.
*
<फोटो १८>
* ते व्हिजिटर सेंटर पाहिल्यावर मात्र आम्ही अवाक झालो ! ह्या भागात इतका बर्फ पडतो की ती पूर्ण इमारत बर्फात गाडली जाते. ती वापरता यावी म्हणून अधेमधे त्याच्या खिडक्या आणि दारं खणून काढतात !
*
<फोटो 1९>
*
ह्या सेंटरपासून लेक पुढे साधारण ३ मैलांवर आहे. इथे फक्त २ महिने बर्फ नसतो. तेव्हड्यावेळात लेकच्या कडेने गाडी नेता येते तसच पाण्यापर्यंत जाता येतं. आम्ही व्ह्यू पॉईंटपाशी पोचलो तर तिथेही रस्त्याच्या बाजूला सुमारे १५ फुट उंचीचे बर्फाचे ढिगारे होते. त्यावर चढून गेल्यावर पाण्याचं पहिलं दर्शन झालं.
* <फोटो २०>
*
हळूहळू त्याच्या प्रचंड आकाराचा अंदाज येत गेला. लेकच्या एका कोपर्‍यात एक बेट आहे.
* <फोटो २१>
*
मध्येच एकदम ढगबाजूला झाले आणि प्रखर सुर्यप्रकाश पडला. पाणी गडद निळ्या रंगाचं दिसायला लागलं, जसं काही तिथे शाईची दौतच उपडी केली आहे !
* <फोटो २२>
* सगळ्या बाजूंनी बर्फाच्छादीत डोंगर आणि झाडं, शार निळं पाणी आणि चकाकणारा सूर्यप्रकाश अश्या त्या दृष्याचं वर्णन करणच शक्य नाही ! ते आम्ही अक्षरशः डोळे भरभरून बघितलं. जरा वेळाने फोटो काढले. हा एक पॅनोरमाचा प्रयत्न :
* <फोटो २३> * परत हळूहळू ढगांची छाया पडायला लागली. एका बाजूला थोडा सूर्यप्रकाश होता.
* <फोटो २४>
* तर दुसर्‍या बाजूने अचानक बर्फवृष्टी सुरु झाली. बर्फ हळूहळू सरकत होता आणि लेकचा तो तो भाग दिसेनासा होत होता.
* < फोटो २५ > * बर्फात उभं रहाणं अशक्य झाल्यावर आम्ही अखेर गाडीत बसलो आणि परतीच्या प्रवासाला निघालो ! ह्या दोन्ही ठिकाणी निसर्गाची अनेक रुपं आणि वर्णनातीत सौंदर्य पाहिलं. बर्‍याच दिवसांपासूनची योसेमिटी आणि क्रेटर लेक पहायची इच्छा पूर्ण झाली. आता अजून एक इछा होते आहे ती म्हणजे रिटायरमेंट घेतल्यानंतर यलोस्टोन, योसेमिटी किंवा क्रेटरलेक च्या विजिटर सेंटरवर "हाऊ मे आय हेल्प यू?" वाल्यांचं काम करायचं म्हणजे सगळ्या ऋतूंमध्ये ह्या गोष्टी पहाता येतील. बघूया हे पूर्ण होतय का... :) ---------------------------------------------------------------------------------------------------------------- माहितीसाठी काही लिंक्स : नॅशनल पार्क सर्व्हिसेसच्या वेबसाईट वर सगळी माहिती व्यवस्थित दिलेली आहे. रस्त्यांची सध्याची स्थिती, हवामान तसच सद्यस्थिती दाखवणारे कॅमेरे ह्याचा खूप उपयोग होतो.
१. योसेमिटी : http://www.nps.gov/yose/index.htm
२. क्रेटर लेक : http://www.nps.gov/crla/index.htm
ह्या शिवाय योसेमिटीचं प्लॅनिंग करण्यासाठी मला खालचा ब्लॉग खूप उपयोगी पडला. http://www.yosemitefun.com/images/yosemite_park.htm