रंग माझा वेगळा - बॅन्फ आणि जॅस्पर नॅशनल पार्क (Banff & Jasper)

 

आमचं कॅनडाला यायचं ठरल्यापासूनच पहिल्या उन्हाळ्यात कनेडीयन रॉकीज म्हणजे रॉकी पर्वतरांगांचा कॅनडातला भाग बघायचा असं ठरवलं होतं. कॅनडातल्या ब्रिटीश कोलंबिया आणि अल्बर्टा ह्या राज्यांच्या सीमेवर हा कनेडीयन रॉकीजचा प्रदेश असून इथे एक नाही दोन नाही तर तब्बल चार राष्ट्रीय उद्यानं आहेत! ह्या रॉकी पर्वतरांगा दक्षिणेला उत्तर अमेरिकेतल्या मोंटाना, आयडाहो, वायोमिंग आणि पुढे युटा, कोलोरॅडो राज्यांपर्यंत जातात. कोलोरॅडोमध्ये अमेरिकेतलं 'रॉकी माऊंटन नॅशनल पार्क' आहे. गेल्यावर्षी करोना महामारीमुळे उन्हाळ्यातले सगळेच बेत रद्द झाले. मार्च पासून शाळा बंद, घरून काम,  अगदी आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडणे  अश्या  सगळ्या प्रकारांमुळे ह्या ट्रीपचा विचार पूर्ण मागेच पडला. आम्ही मध्यंतरी एक लहान आरव्ही ट्रीप करून आलो पण रॉकीज इथून बरेच लांब असल्याने आरव्ही घेऊन तिकडे जाण्याचा आजिबात विचार केला नव्हता. बघता बघता उन्हाळा संपतही आला आणि आम्ही ट्रीपचा बेत पुढच्या वर्षीवर ढकलला. घरून काम असल्याने उन्हाळ्यात एकंदरीत खूप काम झालं. सारखेच कॉल आणि मिटींगा. ऑफिसला जाण्या-येण्याचा वाचलेला वेळ पुन्हा कामातच घालवल्याने खूप दमणूक झाली आणि कंटाळा आला. रियाची शाळा सुरू होण्याआधी जरा आराम आणि टाईमपास करावा म्हणून मी आठवडाभराची सुट्टी टाकली. सुट्टी सुरू व्हायच्या अगदी आदल्या दिवशीपर्यंत बरच काम असल्याने सुट्टीत काय करायचं वगैरे काहीच ठरलं नव्हतं. त्याच आठवड्यात आमच्या टीममधला एक जण त्याची सुट्टी संपवून परत आला आणि त्याने जास्पर नॅशनल पार्कला जाऊन आल्याचं सांगितलं. तो दुसर्‍यांदा गेला होता आणि यंदा फार गर्दी नव्हती. हवामानही खूप चांगलं होतं त्यामुळे ट्रीप छान झाली म्हणे. मग पुन्हा डोक्यात आलं की चांगली आठवडाभर सुट्टी आहे, पुढचा सोमवारही लेबर डेच्या सुट्टीचा. त्यामुळे छान मोठी ट्रीप करता येईल. पण तरीही हॉटेल किंवा एअर बीएनबीमध्ये रहायला नको वाटत होतं. कॅम्पिंग करायलाही हरकत नव्हती पण मग तिथली कॉमन टॉयलेट, बाथरूम वापरावी लागली असती ते ही नको वाटत होतं. मग रहता राहिला पर्याय आरव्हीचा! शनिवारी सकाळी बसून जरा रस्ता, अंतरं ह्यांचा आढावा घेतला. जाणं-येणं आणि तिथे फिरणं हे सगळं धरून साधारण २३०० किलोमिटर अंतर होत होतं. आरव्हीला प्रत्येक दिवशीचा भाड्याबरोबरच प्रत्येक किलोमिटर अंतराचे वेगळे पैसे असतात. गेल्यावेळी 'क्रुझ कॅनडा' नावाच्या कंपनी कडून आरव्ही घेतली होती. त्यांना पुन्हा फोन करून भाड्याचा अंदाज घेतला. एकंदरीत अंतर बघता खर्च फारच जास्त जात होता. मग बरेच पर्याय बघितले जसं की अर्ध्या अंतरापर्यंत गाडी घेऊन जाऊन तिथे आरव्ही उचलायची किंवा बॅन्फ आणि जास्पर पैकी एकच काहीतरी करायचं वगैरे. पण आरव्ही घेण्याची आणि परत देण्याची वेळ, अंतरं, सुट्टी वगैरे सगळ्या बाबी लक्षात घेता धड कुठलाच पर्याय पटेना आणि खर्चातही बसेना. हे होता होता शनिवार दुपार उजाडली. बहुतेक काहीच ठरत नाही असं वाटून लॅपटॉप बंद करता करता 'कॅना-ड्रीम' नावाच्या आरव्ही कंपनीची वेबसाईट दिसली. नेहमीप्रमाणे कसल्या कसल्या सवलती आहेत असं तिथे लिहिलं होतच. म्हटलं एकदा फोन करून विचारूया. फोन केला तर त्यांच्याकडे आमच्या तारखांना आम्हांला हव्या त्या साईजची आरव्ही उपलब्ध होती. शिवाय ते खरोखरच दर पाचशे किलोमिटरांवर अजून पाचशे किलोमिटर फुकट देत होते. त्यामुळे आम्हांला साधारण ११०० किमीचेच पैसे भरावे लागणार होते. एकंदरीत डिल बरं वाटलं. फोन वरची बाई जरा खडूस होती पण म्हणाली की तुम्ही कॅम्पग्राऊंड बूक केली नसतील तर ती आधी करा कारण एकदा तुम्ही आरव्ही बूक केली आणि नंतर कॅम्प ग्राऊंड मिळाली नाहीत तर मी पैसे परत देऊ शकत नाही. शिवाय आता दिलेला 'कोट'  मी उद्या सकाळ पर्यंत ठेवते तो पर्यंत फोन केलात तरी चालेल. म्हटलं ठिक आहे. एकदा वाहनाची सोय झाल्यावर मग आम्ही ट्रीपची रुपरेषा ठरवायला घेतली! काही नियम आम्ही ठरवून घेतले होते  ते म्हणजे एका दिवसात साधारण ४००-४५० किमीपेक्षा जास्त अंतर जायचं नाही. रात्रीचं ड्रायव्हिंग अजिबात करायचं नाही. सगळीकडे फुल सर्व्हिस साईट्स (वीज, पाणी आणि सांडपाण्याचा निचरा अश्या तीनही सोई असलेल्या) घ्यायच्या. शक्यतो स्टेटपार्क्स किंवा नॅशनल पार्क मध्ये रहायचं कारण त्यांच्याकडे सरकारी सुचना व्यवस्थित पाळल्या जातात आणि ऐनवेळच्या बदला-बदलीला त्यांची काही कटकट किंवा पैसे कापाकापी नसते. खाण्यापिण्याचं तसच रोजच्या वापरासाठी लागणारं सगळं सामान बरोबर न्यायचं म्हणजे शक्यतो कुठेही दुकानात, रेस्टॉरंटात जावं लागणार नाही. शनिवारी दुपारी आणि रविवारी सकाळी मिळून सगळी बुकिंग करून मग आरव्ही पण बुक केली. शिल्पाने तिच्याही ऑफिसमध्ये तीन दिवसांची रजा आणखी दोन दिवस वाढवत आहे असं कळवून टाकलं आणि सोमवारी सकाळी आम्ही आरव्ही सेंटरच्या दिशेने प्रस्थान केलं.


गेल्यावेळच्या तुलनेत ह्या 'कॅना-ड्रीम'वाल्यांची आरव्ही एकदम चकाचक होती! एकतर ती बर्‍यापैकी नवीन होती आणि सगळ्या सोई आणि आतली रचना बघता एकदम मस्त होती. गेल्यावेळप्रमाणेच आरव्ही मिळाल्या मिळाल्या आपलं सामान आत ठेवायच्या आधी आम्ही संपूर्ण आरव्ही आतून लायझॉल स्प्रे मारून पुन्हा एकदा पुसून काढली. आपल्याला द्यायच्या आधी ते स्वच्छ करून देतातच पण आपल्या मनात शंका नको. पहिल्या दिवशीचा आमचा मुक्काम होता फ्रेजर व्हॅली मधल्या केलोना नावाच्या शहरात. व्हँकुवर शहर आणि परिसर 'पॅसिफिक नॉर्थवेस्ट'मध्ये येतो. ह्या परिसराच्या पश्चिमेला पॅसिफिक महासागर तर पूर्वेला 'कॅसकेड' पर्वतरांगा आहेत. इथल्या भौगिलिक परिस्थितीमुळे इथे जवळ जवळ आठ महिने पाऊस आणि ढगाळ हवामान असतं. जस जसं आपण पूर्वेला जातो तसं कॅसकेड पर्वतरांगा ओलांडून पलिकडे जातो. पठार आणि दरी गेली की मग रॉकी पर्वत रांगा सुरू होतात. हा जो कॅसकेड आणि रॉकीजच्या मधला परिसर आहे तो 'फ्रेजर व्हॅली'ला परिसर. सगळा परिसर चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेला आहे.  फ्रेजर व्हॅली म्हणजे फ्रेजर नदीचं खोरं. इथलं हवामान कोरडं आणि विषम आहे. उन्हाळ्यात कडक उन आणि हिवाळ्यात कडाक्याची थंडी. तरीही कॅनडातला सगळ्यात उष्ण प्रदेशांपैकी एक आहे. खोर्‍याचा प्रदेश अत्यंत सुपीक आहे आणि फ्रेजर नदी मुळे मुबलक पाणी उपलब्ध आहे. ह्या फ्रेजर व्हॅलीत फळफळावळ तसेच शेती खूप होते.
गेल्यावेळच्या प्रवासातही आम्ही निघाल्यावर पूर्वेकडेच गेलो होतो फक्त तेव्हा हायवे न घेता आतले रस्ते घेतले होते पण ह्यावेळी मात्र आम्ही लगेचच ट्रान्स कॅनडा हायवे घेतला. इथे कॅनडात अमेरिकेतल्या इंटरस्टेट हायवे सारखे हायवे नाहीयेत. हा ट्रान्स कॅनडा हायवे पण मोठ्या शहरांच्या आसपास चौपदरी, सहा पदरी असला तरी बाहेर पडल्यावर काही ठिकाणी अगदी लहानही होतो. सुमारे तासभराने घाट सुरू झाला. इथे नेहमी दिसत तसं सुचीपर्णी वृक्षांची दाट झाडी आणि डोंगरांनी घातलेल्या बर्फाच्या टोप्या अस दृष्य होतं. अधेमधे थोडा पाऊसही लागला. घाट ओलांडून पर्जन्य छायेच्या प्रदेशात गेल्यावर एकदम दृष्य पालटलं. एकदम हिमालयातून उठून देशावर आल्यासारखं झालं. लालसर माती, अधेमधे दिसणार उघडे बोडके डोंगर आणि खुरटी झाडी. साधारण तीन तासांनी आम्ही ट्रान्स कॅनडा हायवे सोडून आत वळलो. हे आतले रस्ते स्टेट हायवे आहेत आपल्याकडे इस्लामपूर-सांगली वगैरे आतले रस्ते असतात, तश्याप्रकारचे. फक्त अतिशय उत्तम दर्जाचे आणि व्यवस्थित दिशादर्शक आणि सुचनाफलक असलेले आहेत. त्यामुळे इथेही स्पीडलिमिट १०० किमी इतकं होतं! ह्या रस्त्यावर सुमारे पाऊण तास गेल्यावर केलोना शहर दिसायला लागलं. केलोना शहराला 'लेक ओकॅनॅगन' ने दुभागलं आहे. एका बाजुला वेस्ट केलोना आणि पलिकडे केलोना. केलोना हे ब्रिटीश कोलंबियामधल्या मोठ्या शहरांपैकी एक आहे. शहराबाहेर भरपूर शेतं तसेच कारखाने दिसले. डोंगरावरून उतरताना लेक थोडासा दिसला पण नंतर लक्षात आलं की लेक प्रचंड मोठा आहे! हा कॅनडातला सगळ्यात उष्ण लेक आहे. त्यातल्या पाण्याचं तापमान बाकी ठिकाणपेक्षा सरासरी १० डिग्रीने कमी असतं म्हणे. आमची कॅम्पसाईट अगदी मध्यवर्ती भागात होती. हे म्हणजे कोणाची तरी थोडीशी जागा होती आणि तिथे घरं बांधायच्या ऐवजी आरव्ही साईट तयार केली आहे असं वाटलं. कॅम्पसाईटच्या समोरचा शहरातला मुख्य रस्ता ओलांडला की पलिकडे लेक होता. खरतर पोहोचल्यावर लगेच लेकवर जावं का असं वाटत होतं पण एकंदरीत सकाळपासूनची धावपळ आणि प्रवास ह्यामुळे सकाळी उठून जायचं ठरवलं. आरव्ही साईटवरच्या मातीत रियाने भरपूर खेळून घेतलं. आम्ही घरून नेलेले पराठे आणि वरण-भात खाऊन झोपून गेलो. भर उन्हाळा आणि कॅनडाला "उष्ण" भाग असूनही रात्री चांगली थंडी पडली होती. 

 ओकॅनॅगन लेक

 


सकाळी उठून आवरून लेकवर गेलो आणि त्या मुख्य रस्त्यावर थोडा फेरफटका मारला. केलोना गाव एकदम टुमदार वाटलं. आम्ही थांबलो होतो तो बहुतेक ट्रुरीस्टी भाग असावा पण प्रवासा दरम्यानचा पाहिलेला गावाचा भागही छान होता. इथे वॅन्कुवरपेक्षा घरं एकदम प्रशस्त वाटली आणि एकंदरीत शहराची रचना नीटनेटकी वाटली. वरच्या मॅपमध्ये बघितलं तर वॅन्कुअर ते बॅम्फ / जॅस्पर जाण्यासाठी खरतर कॅलोनाला यायची गरज नसते. ट्रान्स कॅनडा हायवेवरून सरळ कॅम्पलुप मार्गे जाता येतं. पण आम्ही इथे वाट वाकडी करून आलो होते ते म्हणजे इथलं 'कांगारू फार्म' पहाण्यासाठी! त्याचं झालं असं की यंदाच्या उन्हाळ्यात कुठे लांब जाणं शक्य नसल्याने सगळ्यांनी एक दिवसात कुठे तरी जाऊन येता येतील अश्या आसपासच्या जागा शोधल्या. त्यात ह्या कांगारू फार्मचा एकदम वरचा नंबर लागला. रियाच्या दोन मैत्रिणी तिथे जाऊन आल्या आणि त्यामुळे अर्थातच तिलाही जायचं होतं. म्हंटलं कांगारू बघायला ऑस्ट्रेलियाला जाऊ तेव्हा जाऊ, आत्ता निदान कनेडीयन कांगारू तरी बघून येऊ.  कांगारूंचा मुळ प्रदेश हा ऑस्ट्रेलिया. पण न्युझिलंडमध्येही कांगारू आहेत आणि पुढे त्यांची संख्या वाढायला लागली. त्यामुळे १० वर्षांपूर्वी न्युझिलंडमध्ये कांगारूंची संख्या कमी करण्याची मोहीम सुरू होती. ह्या कांगारू फार्मच्या मालकांना त्यावेळी एका व्यवसायाची कल्पना सुचली आणि त्यांनी त्यातले १२ कांगारू विकत घेऊन कॅनडाला आणले आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हे फार्म सुरू केलं. सध्या तिथे ५० च्यावर कांगारू आहेत. नंतर नंतर जंगलात सापडलेले, कोणी कोणी वाचवून आणलेले, आधी उत्साहाने पाळलेले पण नंतर झेपेनासं झाल्यावर नकोसे झालेले बाकीचे प्राणीही लोकांनी इथे आणून द्यायला सुरूवात केली. त्यामुळे ह्या कांगारूंच्या बरोबर पोपट आणि बाकीचे पक्षी, शहामृगं, टर्की, साळींदर, ससे, शुगर ग्लाईडर, जंगली शेळ्या वगैरे बरेच चित्रविचित्र प्राणी इथे एकत्र नांदतात.  सगळे प्राणी त्यांचं संपूर्ण आयुष्य इथे जगतात. कांगारूंची संख्या १०० झाली की मग ते 'लोकसंख्या नियंत्रण' सुरू करणार आहेत म्हणे. कारण त्यापेक्षा जास्त कांगारू उपलब्ध जागेत मावणार नाहीत. 

 कांगारू फार्म  

ह्या फार्मच्या एका भागात कांगारू आहेत. हा भाग म्हणजे मोठं मोकळं मैदान आहे कारण कांगारूंना उड्या मारायला मोठी जागा मिळते. दुसर्‍या भागात लहान विभगांमध्ये बाकीचे प्राणी आहेत. त्यात ससे आणि सांळीदर एकाच विभागात आहे. आम्ही गेलो तेव्हा प्राण्यांना नुकतच नुकतच खाणं दिलं होतं. ससे आणि साळींदर अक्षरशः एका ताटात जेवतात! शिवाय ते सांळीदर सशांच्या बिळातच झोपतं म्हणे कारण त्याला ते मऊ मऊ गुबगुबीत ससे गाद्या उश्यांसारखे घ्यायला आवडतात. 

कांगारू दिसायला एकदम गरीब बिचारी होती पण खूप मऊ मऊ होती. त्यांना हात लावायला परवानगी होती, फक्त पाठीवरच हात लावायचा. डोक्याला किंवा मानेला हात लावला की ते चिडतात. त्यांची शेपटी एकदम मस्त झुपकेदार दिसत होती. फार्मतर्फे त्या कांगारूंना देण्यासाठी पॉपकॉर्नही देत होते. त्यांना आता त्या पॉपकॉर्न भरवण्याची इतकी सवय झाली आहे की ते स्वतःहूनच लोकांच्या मागे जातात. कांगारूंच्या मैदानावर एक शहामृगही होतं. ते फारच दांडगट होतं! कांगारूना खाण्यासाठी पॉपकॉर्न जमिनीवर टाकले की ते येऊन त्याच्या लांब मानेचा वापर करून स्वत:च खात होतं. एकंदरीत त्याची उंची आणि दणादणा पाय आपटत चालण्याची  शैली ह्यामुळे कांगारू (आणि आम्ही पण!) त्याला बिचकून होती. 
कांगारू उड्या एकदम मस्त मारतात. कांगारूची मादी वर्षभरात एकच पिल्लू जन्माला घालते आणि पिल्लू जन्मल्यावर ते सुमारे सहा महिने आईच्या पोटाला असलेल्या पिशवीत असतं. ह्या पिल्लांना जोई म्हणतात. आम्ही गेलो तेव्हा तिथे एक नुकतच पिशवीतून बाहेर आलेलं जोई होतं. फार्ममधली एक कर्मचारी जोईला कडेवर घेऊन फिरवत होती. मधे मधे खाली जमिनीवरही सोडत होती. फक्त त्याला हात लावायची किंवा भरवायची परवानगी नव्हती. एकंदरीत इथले सगळे प्राणी बघायला (आणि काहींना हात लावायला) मजा आली. पण मला एकंदरीत हा प्रकार अनैसर्गिक वाटला. सिवर्ल्ड किंवा तत्सम ठिकाणी किलर व्हेल किंवा ऑर्काफिश ह्यांना शेपट्या हलवून माणसांना "हाय" किंवा "बाय" करायला शिकवतात तेव्हा ते मासे मला जसे बिचारे वाटतात तसच काहीसं ह्या कांगारूबद्दल वाटतं. फक्त त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी की निदान हे फार्म हा निव्वळ एक व्यवसाय आहे आणि आम्ही तो पैसे मिळवण्यासाठी चालवतो असं प्रांजळपणे कबूल करतात. सिवर्ल्डवाल्यांसारखी रिसर्च वगैरे दांभिक कारणं तरी देत नाहीत. व्यवसाय असल्याने प्राण्यांची काळजी घेणं, व्यवस्थापन हे व्यावसायिक पद्धतीनेच करतात आणि त्यामुळे जरी नैसर्गिक अधिवासात नसले तरी प्राण्यांची आबाळ तरी होत नाही. 

सकाळी फार्म बघून झाल्यावर आम्हांला थेट बॅन्फ पर्यंतचा पल्ला गाठायचा होता. संपूर्ण प्रवासातला हाच सगळ्यात मोठा टप्पा होता आणि साधारण साडेपाच सहा तासांचा प्रवास होता! जसे जसे आम्ही केलोना शहराबाहेर पडायला लागलो तशी आम्हांला खूप फळांची दुकानं दिसायला लागली. ह्या भागात शेती भरपूर होत असल्याने अगदी ताज्या भाज्या आणि फळं तिथल्या तिथे विकत मिळतात. शिवाय फळांपासून तयार केलेले बाकीचे पदार्थ, ज्यॅम, अर्क, बाटलीबंद फळं, ज्युस, आइस्क्रिम, चिप्स वगैरेही विकायला होते. अखेर न रहावून आम्ही एका दुकानात थांबलो. आत जाऊन बघतो तर दुकानदार पंजाबी. हे कुटूंब ७० च्या दशकात जालंधरजवळच्या खेड्यातून कॅनडाला आले. पहिली दहा वर्षे टोरांटो जवळ होते आणि नंतर केलोनाला आहेत. जवळच त्यांचं मोठं शेत आहे आणि त्यातली फळ भाज्या इथे विकतात तसचे कॅनडाच्या इतर भागांमध्ये पाठवतात. अतिशय उत्कृष्ठ चवीच्या चेरी आणि पीच मिळाली तसच सफरचंदाचे  चिप्स मिळाले. हे चिप्स बटट्याच्या चिप्ससारखे कुरकुरीत नव्हते पण गाडी चालवाताना चावत आणि चघळत बसायला बरे वाटले. ते म्हणे तुम्हांला बटर चिकन, समोसे वगैरे हवं आहे का? म्हटलं पंजाबीणीच्या हातच्या समोश्यांना कोण नाही म्हणणार? दे चार! तर ते फ्रोजन निघाले. व्हँकुवर जवळच्या सरे उपनगरातल्या दुकानातूनच आणलेले होते. पंजाबी खाद्यगृहातले होते. आम्ही तिथे पूर्वी गेलो आहे पण कधी समोसे खाल्ले नव्हते. त्यातल्या त्यात नवीन काहीतरी!


केलोनाहून निघून आम्हांला थोडं अंतर उत्तरेला जाऊन ट्रान्स कॅनडा हायवेला लागायचं होतं आणि मग त्या हायवेवरून पूर्वेला थेट बॅन्फ पर्यंत जायचं होतं.  हा आतल्या रस्त्यावरचा प्रवास आधी ओकॅनॅगन लेकच्या काठाने होता आणि नंतरही बर्‍याच नद्या, लहान लहान तळी, झाडं, शेत अश्या भागातून होता. रस्ता छान होता पण सिंगल लेन असल्याने कमी अंतराला बराच वेळ लागला. ट्रान्स कॅनडा हायवेला लागल्यावर एका पार्कींगलॉट वर थांबून कॉफी प्यायली आणि थोड काहीतरी खाऊन घेतलं. आरव्ही ट्रीपचा हा एक खूप फायदा असतो! ह्या रस्त्यावर साधारण दोन तासांनी थ्री वॅली लेक लागला. अतिशय शांत पाण्यात आजुबाजूच्या डोंगराचं सुंदर प्रतिबिंब पडलं होतं. तिथे थांबायला जागा नव्हती पण त्यातला त्यात मोठी जागा शोधून थांबलो. ह्या लेकच्या एका बाजुला हॉटेलची सुंदर लाल इमारत आहे. गाडी नीट उभी करता आली पण हायवेवरून गाड्या खूप जोरात जात असल्याने पूर्ण गाडी हलत होती. फार वेळ न घालवता पटकन निघालो. पण पुढे बघितलेल्या अनेक सरोवरांची एक झलक मिळाली. 

 थ्री वॅली लेक


 
ब्रिटीश कोलंबिया - अल्बर्टा राज्यांची सीमा जवळ यायला लागली तसा रस्ता रॉकी पर्वतरांगांच्या सोंडांमधून जायला लागला. इथे रस्त्याच्या बाजूने कनेडीयन रेल्वेलाईन सुद्धा जाते. ब्रिटीश कॉलनी असल्याने कॅनडात रेल्वेचं चांगलं जाळं आहे आणि मालवहातुकीसाठी रेल्वेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. २०० वर्षांपूर्वी ह्या डोंगरांमधून रेल्वेमार्ग बांधायला खूपच अवघड गेलं असणार! ह्या रस्त्यावर बोगदेही बरेच होते आणि ते नेहमीसारखे अर्धगोलाकार आणि पूर्ण बंदिस्त नसून चौकोनी आणि दरीच्या बाजूने हवेचे मोठे झरोके असलेले होते. मी मागे युट्यूबर अफगाणिस्तान आणि सोव्हिएट युनियनमधून स्वतंत्र झालेल्या काही देशांमधले व्हिलॉग पाहिले होते, त्यात अश्याप्रकारचे बोगदे होते आणि त्यात त्यांना 'सोव्हिएट स्टाईलचे बोगदे' असं म्हंटलं होतं! आता अमेरिकेपासून हाकेच्या अंतरावर हे सोव्हिएट स्टाईलचे बोगदे कसे आले कोणास ठाऊक!


आपला मुंबई-बंगलोर रस्ता कर्नाटकात शिरला की जसा एकदम फरक जाणवतो तसा अल्बर्टा राज्याची सीमा ओलांडल्यावर ट्रान्स कनेडीयन हायवे एकदम चकाचक झाला! जसजसं बॅन्फच्या जवळ पोहोचत होतो, तशी उंची वाढत होती आणि त्यामुळे आजुबाजूची झाडं आणि दृष्यही बदलत होती. मावळतीच्या उन्हात आरव्ही पळवायला मजा आली. ( "आखीव रेखीव रस्ते, दुतर्फा झाडी, सुंदर  हिरवळ" ) आमची कॅम्प साईट बॅन्फ गावात होती. हे गाव नॅशनल पार्कच्या पूर्वेला आहे. त्यामुळे योहो, कुटने नॅशनल पार्क आणि जॅस्परकडे जाणारा आईसफिल्ड पार्कवे हे सगळं आम्हांला रस्त्यात लागलं. आम्ही तिथे पुढच्या तीन दिवसात येणारच होतो. त्यामुळे आज एकदम पूर्वेला राहून चालणार होतं. फक्त पुढच्या तीन दिवसांचं तिथलं बूकींग जरा गैरसोईचं होणार होतं कारण रोज जाऊन येऊन जवळ जवळ १०० किलोमिटर प्रवास फक्त मुक्कामी पोहोचण्यासाठी करावा लागला असता. शिवाय लेक लुईस, लेक मोरेन वगैरे ठिकाणी पार्किंग मिळवण्यासाठी सकाळी खूप  लवकर जावं लागतं त्यामुळे ते ही जरा त्रासदायक झालं असतं. शोधाशोधी, फोनाफोनी करायची तर रस्त्यात मोबाईलला रेंजही नव्हती. म्हंटलं आता कँपससाईटवर जाऊनच विचारू. अखेरीस एकदाचे बॅन्फ गावात पोहोचलो. बॅन्फ अतिशय सुंदर आणि टिपीलक हिलस्टेशन आहे! एक मुख्य रस्ता, त्यावर सगळी टुरीस्टी सेवा देणारी दुकान, व्हिजीटर सेंटर, रेल्वे स्टेशन आणि आजूबाजूच्या लहान रस्त्यांच्या जाळ्यात स्थानिकांची घरं. चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेलं. (मी हे आईला सांगितल्यावर ती म्हणे "आमचं चाळीसगांव पण अगदी असच डोंगरांच्यामध्ये आहे. त्यामुळे खानदेशांतल्या मानाने चाळिसगांवला छान थंडावा असतो." मला अगदी सिनेमात दाखवतात तसं एका बाजूला चाळीसगांव आणि एकाबाजूला बॅन्फ असं डोळ्यासमोर आलं!) कॅम्पसाईट मुख्य गावापासून दोन किलोमिटरवर डोंगर उतारांवरच होती. ती आम्हांला वाटलं त्यापेक्षा फारच मोठी होती! जवळ जवळ २५० आरव्ही पार्क करता येतील एव्हड्या साईट्स आणि काही तंबू लावण्यासाठी वेगळी जाग एव्हडा मोठा पसारा होता. केलोनापेक्षा खूपच मोकळी ढाकळी आणि अगदी निसर्गाच्या सानिध्यात वगैरे होती.
आरव्ही पार्ककरून तिच्या वायरी, नळ्या जोडून झाल्यावर आधी चहा केला आणि मग कॅम्पसाईटचं बूकिंग बदलता येईल का ह्याची शोधाशोधी सुरू केली. बघितलं तर तिसर्‍या रात्री लेक लुईस जवळच्या साईटवर जागा होती. मग आमच्या आत्ताच्या साईटवर जाऊन विचारलं तर ते म्हणे आम्ही रद्द केलं तर ते पूर्ण पैसे परत देतील! मग केली बदला बदली. दोन्ही साईट्स 'पार्क कॅनडा'च्या असल्याने सोय झाली. ही कॅम्प साईट ज्या डोंगरावर होती त्याचं नाव टनेल माऊंटन कारण ह्या डोंगरातून बोगदा खोदून त्यातून रेल्वे मार्ग जाणार होता. पण पुढे मार्ग बदलला आणि बोगदा पलिकडच्या डोंगरतून नेला. पण तोपर्यंत सगळ्या कागदपत्रांवर ह्याचं नाव टनेल माऊंटन अस लिहिलं गेलं आणि मग पुढे ते तसच राहिलं. समोरच्या डोंगरातून असला तरी रेल्वेमार्ग जवळच होता आणि त्यामुळे रात्रभर गाड्यांचा आवाज येत होता. इथे व्हिजिटर सेंटरवर सांगितलं की ह्या भागात सध्या एल्क (सांबरं) दिसत आहेत आणि ती जरी दिसायला  रुबाबदार, सुंदर, गोजिरवाणी असली तर अंगावर येऊन शिंग मारू शकतात, त्यामुळे जपून रहा! आम्हांला संध्याकाळी एल्क्स दिसली पण आधीच सुचना मिळालेली असल्याने आम्ही लांबूनच पाहिली. दुसर्‍या दिवशी सकाळी बॅन्फ टाऊनमध्ये जाऊन मग पुढे काय करायचं ह्याची ठरवाठरवी करायची होती. आरव्ही न घेता जाताना चालत जायचं आणि येतानाचं येताना बघू असं ठरवलं. खाली जायला छान दोन अडीच किलोमिटरचा उतार होता. सिमल्याला जश्या शहरात वेगवेगळ्या लेवल आहेत आणि पूर्ण फिरून  न जाता खालीवर कराण्यासाठी लिफ्ट आहेत साधारण तशीच रचना फक्त लिफ्ट ऐवजी शॉर्टकट पायर्‍या आहेत. ह्या पायर्‍या स्थानिक वस्तीतून जातात त्यामुळे तिथली घरंही बघायला मिळाली. टुरीस्टी जागा असल्याने घरांच्या भोवती तसच गॅलर्‍यांमध्ये  फुलझाडांच्या छान रचना केलेल्या होत्या. इथे कॅनडात चौकाचौकातल्या कचराकुंड्यांवर फुलांची रंगीबेरंगी चित्र रंगवलेली असतात! इथल्या कचर्‍याकुंडयांची तर अजूनच मजा होती. इथे अस्वलं येऊन अगदी व्यवस्थित दोन पायांवर उभं राहून खरकट्या अन्नासाठी कचराकुंड्या उचकतात. त्यामुळे त्यांना उघडता येऊ नये म्हणून त्या कुंड्यांना एक झडप लावून त्याच्या आत खटका लावलेला असतो. तो खटका आत हात घालून दाबला की मगच कुंडी उघडते. अस्वलांना गंडवताना आमच्या सारखे टुरीस्टही गंडतात. त्यामुळे मग मोठ्या मोठ्या अक्षरांत सुचना लिहिलेल्या असतात. तरीही आमची एकदोनदा झटापट झालीच. 


कोव्हिडमुळे बॅन्फमधलं व्हिजिटर सेंटर बंद होतं. त्याऐवजी त्यांनी रस्त्याच्या एका भागात रहदारी बंद करून तंबू टाकले होते. तिकडे अंतर पाळून रांगा लावून ते माहिती देत होते. इथे आसपास केबल कारने जाऊन बघता येण्याजोगे दोन लूकआऊट पॉईंटस, गरम पाण्याचे झरे, एक-दोन संग्रहालयं तसेच आसपास दोन-तीन लेक आहेत, जवळच एक नदी असून त्यात कयाकींग / बोटींग करता येतं शिवाय जवळपास भटकायला सायकली भाड्याने मिळतात असंही कळतात.  कोव्हिडमुळे केबल कारमध्ये बसायचं नव्हतं, तसच गरम पाण्याच्या झर्‍यांमध्येही जायचं नव्हतं, संग्रहालयांमध्ये जाण्याचाही फारसा उत्साहं नव्हता. त्यामुळे सर्वानुमते कयाकिंगला जायचं ठरलं. नदीकाठ जवळच होता. इथल्या बर्‍याचश्या जलाशयांमध्ये हिमनद्यांमधून पाणी येतं. त्यामुळे हिरव्या आणि निळ्या रंगांच्या अतिशय सुंदर छटा दिसतात. ह्या बॅम्फ नदीचा रंगही 'टरकॉईस' होता. नदीचा परिसर अतिशय रम्य होता फक्त आणि आम्ही नदीवर पोहोचेपर्यंत वारा सुटला होता. कयाक भीड्याने घेण्यासाठीचे सगळे सोपस्कार पूर्ण करून आम्ही काठावर गेलो आणि तिथल्या माणसाने सगळ्या सुचना दिल्या. म्हणे एकाच बाजूला जा. विरुद्ध बाजूला अजिबात जायचं नाही कारण तिथे धबधबा आहे आणि तुम्ही १००० फूट खाली कोसळाल!  खरतर कयाकिंग करायचा सगळ्यात जास्त उत्साह शिल्पालाच होता पण हे ऐकूनच तिची घाबरगुंडी उडाली. उसन्या उत्साहाने ती आत बसली पण वारा, पाण्याच्या प्रवाहाचा जोर आणि आमच्या वल्ह्यांना न सापडलेली लय ह्यामुळे पहिल्या मिनिटभरातच ती इतकी घाबरली की आम्ही जेमतेम पाच फूट जाऊन पुन्हा मागे फिरलो! तिथल्या माणसाने आम्हांला बाहेर ओढलं. तो म्हणे तुम्ही इतका कमी वेळ पाण्यात होतात की मी तुमच्याकडून पैसे घेणार नाही. नदी काठी आलोच आहोत तर टरकॉईस पाण्यासमोर फोटो काढून घेतले. कयाकींगचा पोपट झाल्यावर मग बँफचं रेल्वेस्टेशन बघायला गेलो. ती ऐतिहासिक वास्तू आहे असं ऐकलं होतं. त्यामुळे माझ्या डोक्यात सिएसएमटी किंवा युनियन स्टेशन सारखं काहीतरी होतं पण एकतर ते स्टेशन बंद होतं आणि इमारत अत्यंत साधी होती. (हे चाळीसगांव स्टेशन सारखं होतं अगदी!)  

गावातून खरतर सायकली भाड्याने घेऊन आसपासच्या लेकपर्यंत जाता येतं पण तिथे चढ जरा जास्त आहे. त्यामुळे रियाला जमेल की नाही अशी  शंका वाटली. मग तिकडे आरव्ही घेऊनच जायचं ठरवलं. गावात थोडा टाईमपास करून तिथली स्थानिक बस पकडून आरव्ही कॅम्पला परत गेलो. जरावेळ ताणून दिली आणि कडक चहा घेऊन निघालो.  साधारण पाच किलोमिटरवर पहिला लेक लागला तो म्हणजे 'टू जॅक लेक' (Two Jack Lake). ह्याच नाव टू जॅक कारण हा लेक दोन गोलाकार भागांमध्ये विभागलेला आहे. ह्याच्या काठावर माऊंट रंडल आहे. हिवाळ्यात बर्फाच्छादीत शिखराचे सुंदर फोटो येतात. पण उन्हाळ्यातही टरकॉईस रंगामुळे लेक सुंदर दिसत होता. थंडगार बर्फाळ पाण्यात पाय बुडवून आणि पाण्याच्या काठी थोडा वेळ घालवून आम्ही पुढे निघालो आणि अगदी शेजारी असलेल्या लेक मिनेवांकाला (Lake Minnewanka) पोहोचलो. टू जॅक लेक लहान आहे पण मिनेवांकाची लांबी तब्बल २0 किलोमिटर आहे! आम्ही लेकवर पोहोचलो तेव्हा तिथे भन्नाट वारा सुटला होता!  संध्याकाळ झालेली असल्याने बोटींगला गेलेली मंडळी परत आली होती आणि त्यामुळे फार गर्दीही नव्हती. पार्कींग पासून थोडं चालल्यावर लेकच्या काठावर पोहोचलो. तिथे बराच वेळ वारा खात आणि रंग बघत बसून राहीलो. हळूहळू उन्हं कलली आणि ते रंग अजूनच खुलायला लागले.  आम्ही पूर्ण सुर्यास्तापर्यंत थांबलो नाही पण दृष्य कितीही बघितली आणि कितीही कॅमेर्‍यात कितीही साठवली तरी समाधान होत नव्हतं. अखेर थंडी वाढायला लागल्यावर तिथून निघालो. आजचे लेक हे खरतर बॅन्फ, जॅस्पर मधले पहिल्या दुसर्‍या क्रमांकाचे लेक नाहीयेत पण तरीही अतिशय सुंदर होते आणि त्यावरून उद्या काय बघायला मिळणार ह्याची झलक मिळाली.  

 टू जॅक लेक

 
 
लेक मिनेवांका


बुकींगची बदलाबदली केलेली असल्याने दुसर्‍या दिवशीचा मुक्काम लेक लुईसच्या जवळच्या कॅम्प साईटवर होता पण त्याआधी दिवसभरात एमराल्ड लेक, लेक लुईस आणि वेळ झाला (आणि पार्कींग मिळालं तर) लेक मोरेन बघायचे होते. ही ह्या परिसरातले सगळ्यांत सुंदर आणि त्यामुळे सगळ्यात प्रसिद्ध पर्यटन स्थळं आहेत. आम्ही सकाळी निघून सगळ्यात पश्चिमेच्या एमराल्ड लेककडे निघालो. हा लेक ब्रिटीश कोलंबिया राज्यातल्या योहो नॅशनल पार्कमध्ये आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यांची सीमा ओलांडली. चांगली गोष्ट अशी की हा लेक हायवेपासून जवळच आहे. फार आत जावं लागत नाही. हायवेवरून आत गेल्यावर साधारण दहा मिनीटांनी एक अरूंद रस्ता लागला. त्यावर एक लाकडी पूल ओलांडला आणि एकदम मोरपंखी रंगाचा विस्तीर्ण जलाशय दिसायला लागला. त्या एका दृष्यातच डोळ्यांचं पारणं फिटलं. सुमारे सव्वापाच किलोमिटर व्यासाचं हे सरोवर 'प्रेसिडेंट ' डोंगर रांगांनी वेढलेलं आहे. ह्याच डोंगरांवरच्या हिमनद्यांमुळे आणि वाहून आलेल्या वाळूच्या कणांमुळे ह्या लेकला सुंदर रंग आला आहे. आमचं धुड पार्क करायला जागा शोधून आम्ही एका बाजूच्या पाऊल वाटेने चालायला लागलो. तिथे थोडीफार स्थानिक वस्ती आणि किनार्‍यावर हॉटेल आहे. पुढे ही पाऊलवाट जंगलात शिरते. खरं सांगायचं तर किनार्‍याच्या काठाने लेकला प्रदक्षिणा घालायला सव्वापाच किलोमिटर अंतर चालावं लागेल हे त्यावेळी आम्हांला माहित नव्हतं, त्यामुळे आम्ही चालत राहिलो पण नंतर अंतर संपेना! अर्थात आजुबाजूची दृष्य इतकं सुंदर होतं आणि भर उन्हाळ्यातही हवा इतकी अल्हाददायक होती की त्या अंतराचे त्यामानाने फार कष्ट झाले नाहीत. रस्त्यात आम्हांला एक फ्रेंच मुलगी भेटली. इथे कॅनडात इंग्लिश बरोबरच फ्रेंच ही पण अधिकृत भाषा असल्याने अनेक फ्रेंच भाषिक लोकंही असतात. विशेषतः पूर्वेकडच्या राज्यांंमध्ये फ्रेंच भाषिकांच प्रमाण जास्त आहे. ही मुलगी मुळची फ्रांस मधली होती पण भाषेची अडचण नसल्याने कुबेक राज्यात काम करत होती. सुट्टी घेऊन कुठे जाता येत नाही, त्यामुळे त्यातल्या त्यात नॅशनल पार्क्स बरी म्हणून इथे आली होती. तिच्याबरोबर भरपूर्‍र गप्पा झाल्या आणि मुख्य म्हणजे तिच्याजवळ 'बेअर स्प्रे' (म्हणजे अस्वलाने हल्ला केलाच तर त्याच्यावर मारायचा स्प्रे )होत)त्यामुळे आम्हांला तेव्हडाच तिचा आधार वाटला. इथे जंगलात भरपूर अस्वलं असतात. इथे आढळणारी ग्रिझली अस्वलं आक्रमक असतातच शिवाय उन्हाळा हा त्यांचा विणीचा हंगाम असल्याने पिल्लांच्या काळजीने माद्या कधी कधी हल्लेही करतात. साधारण पाऊण अंतर काटल्यावर अचानक झाडी आणि हिरवळ संपून एकदम दगड धोंड्यांनी भरलेला पठारासारखा सपाट भाग आला. एकदम वेगळाच भाग बघून तिथे कुठे काही माहिती लिहिली आहे का ते बघितलं तर एक पाटी सापडली. ह्या भागाता 'अ‍लुवियल फॅन' (alluvial-fan) असं म्हणतात. डोंगरांवरच्या हिमनद्यांमधून पाणी आणि राडारोडा वाहत येताना त्यातले मोठे मोठे दगड धोंडे इथे अडकून राहून पाणी आणि बारिक रेती पुढे मुख्य जलाशयात जातात.  वर्षानुवर्षे साठून, अडकून राहिलेल्या ह्या दगडांमुळे इथे झाडंही वाढलेली नाहीत. उन्हाळ्यात ह्या तसचं परिसरातल्या इतर जलाशयांमध्ये हिमनद्यांमधलं पाणी यायला लागतं आणि त्यामुळे रंग खूप गडद दिसतो. 

 एमराल्ड लेक


आम्ही जिथून चालायला सुरूवात केली तिथे पोहोचता पोहोचता व्हिजीटर सेंटर दिसलं. मघाशी पाण्याचा रंग बघून फोटो काढण्याच्या नादात ते दिसलच नव्हतं. इथे बरेच लोकं कयाकिंग करतात तसच हिवाळ्यात 'स्नो-शुइंग' करतात. इथून एक ट्रेल वर डोंगराकडे जातो आणि वर उंचावरून लेकचा सुंदर फोटो काढता येतो. आम्हांला इथून पुढे लेक लुईसला जायचं असल्याने आम्ही तिथे गेलो नाही.  लेक लुईसला जाण्यासाठी पुन्हा अल्बर्टा राज्यात प्रवेश केला आणि जॅस्पर नॅशनल पार्कला जाणार्‍या 'आईसफिल्ड पार्कवे' ला लागलो. पण त्या आधी योहो नॅशनल पार्कमध्ये अजून एक भौगोलिक वैशिष्ट्य बघायला मिळालं ते म्हणजे 'नॅचरल ब्रीज'. Kicking Horse नावाच्या नदीवर अनेक वर्षांपूर्वी एक धबधबा होता. हा धबधबा ज्या खडकांवरून कोसळत असे, त्या खडकाला एक भेग होती. पाण्याच्या प्रवाहामुळे हे भेग हळूहळू खालच्या बाजूने मोठी होत गेली आणि कालांतराने धबधबा कोसळणं बंद होऊन पाणी खालच्या भगदाडातून वहायला लागलं आणि वर नैसर्गिक पूल तयार झाला. अर्थात ह्या खडकाची झीज अजून होतेच आहे आणि पुढे काही वर्षांनी हा पुलही पडून तिथे घळ तयार होईल असा भूगोल तज्ज्ञांचा अंदाज आहे. इथे पाण्याचा ध्रोंकार प्रचंड मोठा असून आपापसात खूप मोठ्याने बोलावं लागतं !  इथे त्या पुलासामोर उभं राहून स्वतःचे फोटो काढून घेणार्‍या पर्यटकांनी उच्छाद दिला. एक धड माणसांशिवाय फोटो काढता येईना. 

 नॅचरल ब्रीज


 

सर्वसाधारणपणे बॅन्फ आणि जॅस्पर नॅशनल पार्क म्हंटलं की जे फोटो दाखवले जातात (पर्यटकांकडून किंवा गुगल कडून) त्यातले सगळ्यात जास्त फोटो हे  लेक लुइसचे असतात. लेक लुईसला त्याचं नाव एकोणिसाव्या शतकात अल्बर्टा राज्याच्या गव्हर्नरच्या पत्नीच्या नावावरून मिळालं. व्हिक्टोरिया पर्वतरांगाच्या सानिध्यात असलेला हा लेक लुईस म्हणजे राणीच्या मुकुटातलं पाचुचं कोंदणच.  अतिशय संथ, शांत, गडद हिरवट निळसर (turquoise blue) रंगाचं पाणी, आजूबाजुच्या व्हिक्टोरिया पर्वतरांगा आणि मागच्या पडद्यावर ह्या पर्वतरांगांवरच्या हिमनद्या!  काहीही न करता नुसतं तासन तास तो रंग बघत बसावा. त्या रंगात आणि त्या वातावरणात काहीतरी जादू आहे नक्की. ह्या लेकच्या आजुबाजूला हिंडण्यासाठीही भरपूर पाऊलवाटा आहेत. उंचावर बसून बघायचं असेल तर तसे हाईकही आहेत. लेकच्या एका बाजुला फेअरमाँट शातो नावाचं भव्य (आणि खूप महाग) हॉटेल आहे.

आम्ही दुपारी उशीरा तिथे पोहोचलो, त्यामुळे मोठा हाईक करणं शक्य नव्हतं.  इथे लेक एमेराल्ड सारखी प्रदक्षिणा घालता येत नाही.  लेकच्या उजव्या  किनार्‍यावरून जाणारी पाऊलवाट घेऊन चालायला लागलो. ह्या पाऊलवाटेवर फोटो काढण्यासाठी अनेक जागा आणि दृष्य होती. दोन तीन ठिकाणी सुंदर लाकडी बाक दिसले. छान उन्हाळातल्या दिवशी एखाद पुस्तक घेऊन तासन तास ह्या बाकावर बसावं. समोरचं दृष्य बघायचं सोडून हातातलं पुस्तक वाचलं गेलं तर खर ते पुस्तक चांगलं म्हणायचं!  मधे एकेठिकाणी 'लेक अ‍ॅग्नेस टीहाऊस' कडे जाणारा फाटा लागला. कॅनडात एकंदरीत युरोपियन प्रभाव जास्त असल्याने अनेक ब्रिटीश पद्धतीची टीहाऊस, फ्रेंच बेकर्‍या तसचं इतरही युरोपियन खाद्यगृह पहायला मिळतात. हे टीहाऊस १०० वर्षांपेक्षा जास्त जुनं आहे! त्या टीहाऊस पर्यंत पोहोचायला मात्र चांगली दमणूक करणारा हाईक करावा लागतो. लेकच्या काठावर पुन्हा बराच वेळ रेंगाळून, अनेक फोटो काढून झाल्यावर सुर्यास्ताची वेळा व्हायला लागल्यावर परत फिरलो. लेक लुईसलाही कयाकिंग करता येतं. इथे वर्षभर गर्दी असते. उन्हाळ्यात कयाकिंग, आसपासचे हाईक्स वगैरे करण्यासाठी तर हिवाळ्यात बर्फाच्छादीत लेक बघायला तसच 'बॅककंट्री' स्किईंग करायला लोकगर्दी करतात. इथे पार्कींगची जागा मर्यादीत असल्याने सकाळी लवकर यावं लागतं किंवा मग बॅम्फ गावातून पाच किलोमिटर चालत वर यावं लागतं.  

 लेक लुईस

 


एकंदरीत आमच्या ह्या प्रवासात आम्हांला भारतीय लोकं खूपच कमी दिसले. कोव्हिडचं कारण असू शकेल किंवा हा भाग भारतीय पर्यटकांंमध्ये तितकासा प्रसिद्ध नसावा. पण लेक लुईसच्या काठावर आम्ही मराठीत बोलत असताना मागून कोणीतरी मराठीतून हाक मारून बोलायला लागलं. बघितलं तर मुळचं मुंबईचं आणि आता अल्बर्टा राज्यातल्या कॅलगरीत वास्तव्यास असलेलं एक मराठी कुटूंब होतं. त्यांच्याशी छान गप्पा झाल्या. कॅलगरी इथून अगदीच जवळ असल्याने ते इथे आधी बरेचदा येऊन गेले होते आणि आता त्यांच्या टोरांटोहून आलेल्या मित्रमंडळींना इथे घेऊन आले होते. त्यांच्या कडून पुढच्या प्रवासाबद्दल काही उपयुक्त माहिती मिळाली.


दुसर्‍या दिवशी सकाळी आम्हांला सुर्योदय बघण्यासाठी कुठल्यातरी एका लेकवर जायचं होतं. इथे लेक लुइसलाच पुन्हा येणं हा पर्याय होता नाहीतर मग लेक मोरेनला जाता आलं असतं. लेक मोरेनला इथल्यापेक्षाही कमी पार्किंग आहे शिवाय उन्हाळ्यात पाच सव्वापाचलाच फटफटायला लागतं, त्यामुळे चार वाजता जाऊन जागा पकडावी लागते लेक मोरेनला जाणारा रस्ता अरूंद असल्याने एकदम पहाटेच्या अंधारात साहस नको म्हणून आजच तिकडे जाऊन अंदाज घ्यायचं ठरवलं. साधारण दहा बारा किलोमिटरचा रस्ता होता अरूंद पण आरव्ही जाण्याच्या दृष्टीने फार अवघड वाटला नाही. आम्ही पोहोचेपर्यंत अंधार पडायला लागल्याने फक्त रस्ता आणि पार्कींगचा अंदाज घेऊन लगेच परतलो. गाडीतून लेक नजरेस पडला. काळसर पार्श्वभुमीवर पाण्याचा रंग अगदी निळ्या शाईसारखा दिसत होता.  तसही आमची आरव्ही असल्याने लवकर निघून गाडीत झोपण्याचा पर्याय होताच. कॅम्पवर परतल्यावर लवकर आवरून आणि पहाटे साडेतीनचा गजर लाऊन झोपून गेलो. ठरल्याप्रमाणे वेळेत लेक मोरेनला पोहोचलो आणि पार्किंगही मिळालं. लेक मोरेन बराच उंचीवर आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही बरीच थंडी होती. गर्दी वाढायला लागली तसं गरम कपडे घालून बाहेर पडलो. सुर्योदय बघण्यासाठी लेकच्या काठापाशी न जाता, साधारण एक किलोमिटरभर चढण चढून उंचावर जायचं. आम्ही वर जाऊन जागा पकडली. थोड्यावेळाने फटफटायला लागलं आणि समोरच दृष्य दिसायला लागलं. हिरवं-निळं पाणी, त्याभोवती पाईनची झाडं आणि पाण्याला वेढलेले राकट खालच्या बाजुला उघडे बोडके आणि वर बर्फाच्या टोप्या घातलेले डोंगर. सुर्योदय व्हायला लागली तशी उगवत्या सूर्याची किरणं ह्या डोंगरमाथ्यांवर पडायला लागली आणि हे डोंगरमाथे एकदम झळाळू लागले. ह्या सोनेरी, लालसर झळाळीचं प्रतिबिंब खालच्या निळरस पाण्यात पडायला लागलं ! सूर्य जसजसावर जातो, तसा किरणांचा कोन आणि सुर्याची प्रभाही बदलते आणि रंगांचा आणि प्रतिबिंबांचा खेळ संपतो.  काही मिनीटांचा खेळ. तो डोळ्यांत साठवावा की कॅमेर्‍यात हे ठरवेपर्यंत संपलाही.  असा हा स्वर्णिम अविष्कार मागे नैनितालजवळच्या कौसानीला हिमालयातील शिखरांवर पाहिला होता, अर्थात तिथे पाणी नव्हतं. सुर्योदयानंतरही बराच वेळ तिकडे रेंगाळत राहिलो. लेक मोरेन लेक लुइसपेक्षा लहान आहे पण बर्‍याच जणांना हा जास्त आवडतो. खरतर दोन्ही ठिकाणी दृष्य आणि रंग इतके सुंदर होते की आमच्या सारख्या पहिल्यांदा येणार्‍याला डावं-उजवं करणं शक्य झालं नाही. 

 लेक मोरेनला सुर्योदय 

 


आरव्हीत येऊन गरम गरम चहा प्यायला आणि मग पुढे 'आईसफिल्ड पार्कवे' कडे जायला निघालो. आईसफिल्ड पार्कवे हा बॅन्फ आणि जॅस्पर नॅशनल पार्कना जोडणारा २०० किलोमिटर लांब रस्ता आहे. संपूर्ण रस्ताभर अनेक अल्पाईन लेक आणि ते बघण्यासाठीचे 'लूक-आऊट पॉईंट' आहेत. तसच आसपासचा परिसर अनेक 'थरां'चा आहे. रस्त्याला लागून पाईन-सुचीपर्णी वृक्षांची दाट झाडी, त्यामागे डोंगरउतारांवरची झुडपं, आणखी वर म्हणजे ट्री लाईनच्या वर डोंगरांचे उघडे भाग आणि डोंगर माथ्यावर बर्फ किंवा हिमनद्या. रस्ता चढ उतारांचा आहे पण घाट नाहीये.  हा रस्ता जगातल्या सर्वात सुंदर दहा रस्त्यांपैकी एक आहे असं म्हणतात.  जॅस्पर नॅशनल पार्कचं तिकीट काढताना पार्कवेचं माहिती पत्रक मिळतं. त्यात रस्त्यावरच्या सर्व ठिकाणांबद्द्ल ते सविस्तर दिलं आहे. स्काय ट्राम, स्काय वॉक अशी मानव निर्मित आकर्षण आहेतच पण आम्हांला त्यापेक्षा इथली भौगोलिक आकर्षणं आणि विविधता बघण्याची जास्त इच्छा होती. आईसफिल्ड पार्कवेच्या सुरुवातीलाच पेटो (Payto) लेक लागतो. रंग आणि सौंदर्याच्या बाबतीत लुइस आणि मोरेन पाठोपाठ ह्याचा नंबर लागतो असं म्हणतात. इथे आपल्याला पाण्यापर्यंत जाता येत नाही तर वरून सुंदर दृष्य दिसतात. ह्यावर्षी कोव्हिडमुळे कमी पर्यटक येतील म्हणून त्यांनी पार्कींग लॉटचं काम काढलं आणि त्यामुळे आम्हाला पेटो लेक बघता आला नाही. पण पुढे अनेक मोरपंखी, निळ्या पाण्याचे लेक दिसले. त्यापैकी आम्ही वॉटर फाऊल लेक (Waterfowl) पाशी थांबलो. अगदी रस्त्याच्या लगत असल्याने फार आतही जावं लागलं नाही. निवांत वेळ घालवला आणि भरपूर फोटो काढले. तिथून निघून थोड पुढे गेल्यावर अथाबास्का (Athabasca)  नावाचा धबधबा लागला. हा धबधबा उंचीपेक्षा पाण्याच्या जोरासाठी पहावा! प्रत्येक सेकंदाला पाणी इतकं जोरात कोसळतं की नॅचरल ब्रीजसारखीच इथेही घळ तयार होत आहे.  अंगावर उडत असणारे पाण्याचे तुषारही जेमतेमच सहन होतील इतके प्रचंड गार होते. 

हॉर्सशू लेक 

आम्हांला तिघांनाही पाण्यात खेळायला, भिजायला खूप आवडतं. आता इतके सारे जलाशय, नद्या, धबधबे बघितले पण कुठेच पाण्यात जाता येणार नाही का असा प्रश्न पडला होता. आत्तापर्यंत पाहिलेल्या सगळ्या जलाशयांंअध्ये पाणी थेट हिमनद्यांमधून येतं त्यामुळे पाण्याचं तापमान अगदी क्वचित ४ डि. सेल्सियसच्या वर जातं. इतक्या थंड पाण्यात पोहोणं शक्य नसत पण अगदीच हौस असेल तर जेमतेम एखादी डुबकी मारता येते. इंटरनेटवर शोधल्यावर दिसलं कि ह्या आईसफिल्ड पार्कवेवर हॉर्सशू नावाचा लेक आहे त्यात हिमनद्यांंमधलं पाणी येत नाही आणि त्यामुळे ह्यात पोहोता येतं. शिवाय आजुबाजूला असलेल्या खडकांवरून थेट पाण्यात उड्याही (cliff jumping) मारता येतात. शिवाय हे ठिकाण अथाबास्का फॉल्सपासून जवळच होतं. तिथे पोहोचून बघितलं तर आमच्या सारखे बरेच पाणी प्रेमी जमले होते. कसंबसं पार्कींग मिळवलं. झाडीतून साधारण अर्धा किलोमिटर आत चालायला लागलं. इथल्या पाण्याचा रंग हिरवा निळा नाहीये. तिथे आधीच लोकं होती आणि त्यांचं उड्या मारणं सुरू होतं. काठावरून पाण्याचा अंदाज घेतला पण ते पाणी चांगलच गार होतं. उडी मारायचा बेत रद्द करून आम्ही फक्त पाय बुडवले आणि परतलो!  

पुढचा थांबा होता कोलंबिया आईसफिल्डचा. कोलंबिया आईसफिल्डहून समोरच अथाबास्का ग्लेशियर दिसतं. इथे ह्या हिमनदीचा अनुभव तीन प्रकारे घेता येतो. एकतर इथे काचेचा स्कायवॉक आहे. त्यावरून चालत हिमनदीच्या अगदी जवळ जाता येतं. दुसरा प्रकार म्हणजे तिथल्या वेगळ्या प्रकारच्या बसने ते आपल्याला अगदी तिथपर्यंत घेऊन जातात आणि आपल्याला त्या हिमनदीवर चालता येतं. कोव्हिडमुळे आणि तिथे नुकत्याच झालेल्या अपघातामुळे बस बंद होती. खरतर ती बंद होती तेच बरच होतं. एकीकडे ग्लोबल वॉर्मिंग आणि हिमनद्या वितळताय म्हणून गळे काढायचे आणि दुसरीकडे त्या हिमनद्यांपर्यंत थेट बस घेऊन जाऊन त्या खराब करायच्या! आम्ही तिसरा पर्याय निवडला तो म्हणजे पार्कींग लॉट पासून थोडं पुढे चालत जाऊन तिथूनच हिमनदी बघायची. होतो तिथूनही छान दिसलं आणि खरोखरच तो हिमप्रपात केव्हडा असेल ह्याची कल्पना आली.
जेवायची वेळ असल्याने तिथल्या फुडकोर्टमध्ये काही मिळतय का ते बघितलं तर तिथे एक वेगळीच गोष्ट दिसली ती म्हणजे फणसाची पॅटी असलेला बर्गर. तो दिसत अगदी मांसाच्या बर्गरसारखाच होता पण फणसाच्या भाजीसारखी चव लागत होती. वेगळा प्रकार छान वाटला. हल्ली ते 'मिट-अलाईक' प्रकार मिळतात त्यापेक्षा हे बरं लागलं. 

 आईसफिल्ड पार्कवेअथाबास्का ग्लेशियर

 

 वॉटर फाऊल लेक


आजच्या कॅम्प्साईटच्या  बुकिंगची जरा गडबड झाली होती हे मॅप बघताना लक्षात आलं. आम्ही जॅस्पर गावापासून अंतर बघायच्या ऐवजी, जॅस्पर पार्कच्या गेट पासून अंतर बघितलं होतं. जॅस्पर गाव ते पार्कचं गेट हे अंतरही बरच होतं!  जाऊन येऊन सुमारे ११० किलोमिटर अंतर वाढलं. जॅस्पर गाव हे बॅन्फ पेक्षाही छोटं आहे. एक मुख्य रस्ता आणि पलिकडे अजून एक रस्ता, तीन ते चार चौक की संपलं गावं. इथेही मोठं रेल्वे स्टेशन आहे आणि जॅस्पर रेल्वेने कॅनडातल्या पूर्व आणि पश्चिम शहरांशी जोडलेलं आहे. विसाव्या शतकात जॅस्पर आणि आसपासचा परिसर नॅशनल पार्क म्हणून घोषित झाला तेव्हा स्थानिकांना त्याची खबर पोहोचायला खूपच उशीर झाला. कारण निर्णय झाला तिकडे राजधानी आटोव्हात आणि जॅस्पर इतकं दुर! त्यानंतर मग रेल्वे आणि रस्त्यांचं जाळं विणलं गेलं.  आता इथूनही कॅनडातल्या बाकी शहरांना जाण्यासाठी थेट रेल्वेसेवा आहे. जॅस्परहून आईसफिल्ड पार्कवे सोडून आम्ही पुढे आलो होतो आणि जसे पूर्वेला जात होतो तसं 'मिडवेस्टीय' सपाट लँडस्केप दिसायला लागलं. त्यामुळे आमच्या कॅम्पसाईट पर्यंत म्हणजे हिंटन नावाच्या गावापर्यंतच प्रवास खूप कंटाळवाणा झाला. शिवाय ही कॅम्प्ससाईटही ठिकठिकाच होती.  जॅस्पर नॅशनल पार्कमध्येही खूप हाईक, लेक्स, धबधबे वगैरे आहेत पण दुसर्‍या दिवशीचा आमचा मुख्य कार्यक्रम होता तो म्हणजे लेक मलिन (Maligne) आणि स्पिरीट आयलँडची बोट टुर! मलिन लेक हा कॅनडीयन रॉकीजमधला सगळ्यात मोठा लेक आहे. ह्याची लांबी तब्बल २२ किलोमिटर आहे!

ह्यातल्या स्पिरीट आयलंडबद्दल खूप ऐकलं होतं कारण ज्यावेळी आयपॅड लाँच झाला, त्यावेळी आयपॅडवरचा पहिला वॉलपेपर हा ह्या स्पिरीट आयलँडचा होता. हे बेट लेकच्या सुरुवातीपासून १४ किलोमिटर आत आहे. बोट किंवा कयाकिंग ह्या दोनच मार्गांनी ह्या बेटापर्यंत जाता येतं. रस्ता किंवा हाईक हा मार्ग नाहीये. आमच्या कँपसाईट पासून हा मलिन लेक सुमारे सव्वाशे किलोमिटर दुर होता. आजची बोट राईड करून परतीच्या प्रवासाला लागायचं होतं. त्यामुळे आम्ही सकाळी लवकर उठून निघालो. बोटीच बुकींग आधीच केलेलं होतं पण ते तिथे पक्की वेळ देत नाहीत.  त्यामुळे लवकरात लवकर पोहोचायचं होतं. कालच्याच रस्त्याने जॅस्पर गावापर्यंत परत येऊन डावीकडचा फाटा घेतला. इथून पुढे रस्ता लहान झाला. साधारण पंचवीस किलोमिटर वर मेडिसिन नावाचा लेक लागला. इथल्या स्थानिक इंडिजिनियस लोकांच्या मते ह्या पाण्यात औषधी गुणधर्म आहेत म्हणून ह्याचं नाव मेडिसिन लेक. ह्या लेकचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यातलं पाणी दरवर्षी पूर्ण आटतं! पानगळ सुरू झाली की तळाच्या गुहांमध्ये हे पाणी झिरपायला लागतं आणि फक्त चिखल उरतो. वसंतात आजुबाजूच्या डोंगरमाथ्यांवरचं बर्फ वितळायला सुरुवात झाली कि पुन्हा पाणी साठायला लागतं. हे पाणी वाहून जाऊ नये म्हणून काही प्रयत्न झाले पण त्यांना यश आलं नाही.  लेकच्या काठाने जाताना अचानक झाडांच्या काड्या झालेल्या दिसायला लागल्या. पाचवर्षांपूर्वी लागलेल्या वणव्यामुळे इथलं बरच जंगल जळलं! 

लेक मलिनला पाणीपुरवठा करणारी हिमनदी

लेक मलिनच्या व्हिजिटर सेंटरला पोहोचून चौकशी केली तर आम्हांला तिघांना एकत्र जायचं असेल तर थेट दुपारी दोनची बोट मिळाली असती. पण मग आमच्या परतीचा प्रवास असल्याने तितका वेळ थांबणं शक्य नव्हतं. म्हणून मग आम्ही दोन आणि एक अश्या दोन वेगवेगळ्या बोटींवर सिट बूक केल्या. बोटी जिथून सुटतात, तिथला भाग अगदीच साधा होता. पाण्याला रंग नव्हता शिवाय दलदल असल्याने बरेच किडे होते. ह्यात नक्की काय सुंदर ते कळेना! पुढे बोट सुरू होऊन जसजशी आत जायला लागली तसा पाण्याचा रंग बदलायला लागला आणि आसपासच्या डोंगरांवरचं दृष्यही बदलायला लागलं.  ह्या लेकच्या भोवती असलेल्या डोंगररांगांना राणी इलिझाबेथचं नाव दिलं आहे. ५० च्या दशकात राणीच्या कॅनडा दौर्‍यानंतर तिच्या सन्मानाप्रित्यर्थ हे नामकरणं केलं गेलं पण त्यानंतर मात्र राणी एकदाही ह्या भागात आली नाही. ह्या लेकमध्ये तीन हिमनद्यांमधून तसच मलिन नावाच्या नदीतून पाणी येतं. लेकच्या सुरुवातीच्या भागात हिमनद्यांचं पाणी पोहोचत नाही, त्यामुळे तिथे रंग नाहीयेत पण पुढे मात्र मोरपंखी हिरवट रंग यायला सुरूवात झाली. एकवीस पैकी चौदा किलोमिटर आत गेल्यावर स्पिरीट आयलंड लागतं. बेटावरच्या जैववैविध्याला धोका निर्माण व्हायला लागल्याने  प्रत्यक्ष बेटावर जायला आता परवानगी नाहीये पण समोरच्या बाजुने फोटो काढता येतात. बर्फाच्छादित डोंगरांच्या पार्श्वभुमीवर हे बेट खरोखरच सुंदर दिसतं. उगीच नाही अ‍ॅपलने हे दृष्य आयपॅडवर वापरलं.  बोटीवरून जाताना डोंगरावरची काही पाईनची झाडं सोनेरी, केशरी झालेली दिसली. मला वाटलं की पानगळीच्या सुरुवातीला होतात तसे पानांचे रंग बदल सुरू झाले आहेत. पण बोटीवरच्या गाईडशी बोलताना एक महत्त्वाची माहिती समजली. काही वर्षांपासून रॉकी पर्वतरांगांमधल्या झाडांवर एक प्रकारची किड पडायला सुरूवात झाली आहे. ही किड लागलेल्या झाडांची पानं केशरी, लाल पडायला लागतात आणि वर्षभरात झाड उन्मळून पडतं!  एकदा झाडाला किड लागली की ती केवळ अति-थंडी किंवा आग ह्यांनीच मरू शकते. ह्या भागात कडक हिवाळा पडतो. पूर्वी तापमान उणे ३५ ते ४० डि.से. एव्हडं खाली जायचं त्यामुळे किड मरून जायची पण आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे एव्हडी थंडी पडत नाही आणि  आजुबाजूच्या परिसराला हानी न पोहोचवता किंवा धोका निर्माण न करता किडकी झाडं जाळणं शक्य होत नाही. सध्या कॅनडात ह्या कीडीबद्दल मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. अर्थात नॅशनल पार्कच्या हद्दीतल्या झाडांवर कोणताही कृत्रिम उपाय केला जात नाही. जे काय होईल ते नैसर्गिक प्रक्रियेद्द्वारे व्हावं अशी नॅशनल पार्क व्यवस्थापनाची विचारधारा आहे.  

 लेक मलिन बोट टूर


स्पिरीट आयलंड

 

 साहसी कयाकवीर आणि किडकी झाडं

ह्या बोट टूर दरम्यान काही साहसी कयाकवीर दिसले. स्पिरीट आयलंडला इतर कुठल्याही मार्गाने जाता येत नाही, त्यामुळे जाऊन येऊन अठ्ठावीस किलोमिटर कयाकिंग करायचं साहस काही जण करतात. एका दिवसात परतणं शक्य नसेल तर आसपास कुठेतरी रात्री तंबू ठोकून रहातात. ह्या परीसरात रात्रीच्यावेळी नैसर्गिक उजेड खूप कमी असतो,  शिवाय किर्र जंगल आणि रंगीत पाणी.  मला नुसता विचार करूनच भिती वाटली!  लेक मलिन आणि स्पिरीट आयलंड हा आमच्या ट्रीपचा शेवटचा टुरीस्टी थांबा होता. आता इथून पुढे परतीचा प्रवास होता. परत येताना केलोनाला जायची गरज नव्हती, त्यामुळे आम्ही रात्रीचा थांबा कॅम्पलुपला घेतला. जॅस्पर पासून कॅम्पलूपपर्यंतचा बराचसा प्रवास फ्रेजर नदीच्या काठाने होतो. जसजसे आपण रॉकी पर्वतरांगांपासून दुर जातो तसा नदीचा टर्कॉईस-निळा रंग कमी कमी होत जातो आणि ट्रीप संपल्याची जाणीव होते ! 


बॅन्फ आणि जॅस्पर परिसरातले सगळे जलाशय अतिशय सुंदर रंगांचे आहेत. आधी म्हंटल्याप्रमाणे हे ग्लेशियर किंवा हिमनद्यांमधून वहात आलेल्या रेतीमुळे पाण्याला हे रंग येतात. गेल्या वीस पंचवीस वर्षात एमेराल्ड, टरकॉईस, मोरपंखी रंगांच्या जलाशयांमधे जगभरात सगळीकडेच वाढ झालेली आहे. आपल्याला रंगांची पर्वणी मिळत असली आणि डोळ्यांचं पारणं फिटत असलं तरी अश्या जलाशयांची वाढती संख्या ही धोक्याची घंटा आहे! ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनद्या वितळून त्यांचं पाणी ह्या जलाशयांमध्ये येत आहे. ह्या सगळ्यात आपण काय करू शकतो तर जेव्हा अश्या ठिकाणी जाऊ तेव्हा निसर्गाला कुठल्याही प्रकारे हानी पोहोचणार नाही ह्याची काळजी घेणं आणि शक्य तितक्या लांबून गोष्टी पहाणं! ऐन कोव्हीडच्या काळात आम्हांला हा इतका सुंदर निसर्ग बघायला मिळाला ह्याकरता देवाचे आभार मानायला हवे! 

ट्रीपच्या आखणीच्या दृष्टीने :
१. प्रवासः कनेडीयन रॉकीजच्या परिसरातलं आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे कॅलगरी. इथे कॅनडा, अमेरीका तसेच युरोपमधल्या मुख्य शहरांपासून थेट विमानसेवा उपलब्ध आहे. व्हँकुअर किंवा पॅसिफिक नॉर्थवेस्टमधून स्वतःच्या गाडीने येणंही सोईचं पडतं. (व्हँकुअर पासून साधारण ८५० किलोमिटर). बँफ तसच जॅस्परला रेल्वेनेही जाता येतं. रेल्वेचा प्रवास जरा महाग आहे.
कॅलगरी, बँफ किंवा जॅस्परला जाऊन गाडी भाड्याने घेऊन प्रवास करणं सोईचं जातं. ते शक्य नसेल तर पॅकेज टूर आहेत. तसच महत्त्वाच्या प्रेक्षणीय ठिकाणणीसाठी सरकारी बससेवाही आहे. ह्याचं आधी बुकिंग करावं लागतं आणि त्यांच्या वेळा पाळाव्या लागतात.
२. रहाण्यासाठी तंबूतलं कॅम्पिंग, केबिन्स किंवा आरव्ही कॅम्पिंग मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. नॅशनल किंवा स्टेटपार्क्स मधल्या कॅम्पसाईट्सही अतिशय चांगल्या दर्जाच्या आहेत. ह्या शिवाय हॉटेलही आहेत. अर्थात उन्हाळ्यात गर्दी खूप होत असल्याने आधी वेळेत बुकींग करावं. ऐनवेळी रहाण्याची सोय होणं अवघड जाऊ शकतं. 
३. बॅंफ तसच जॅस्पर परिसरात खाण्याची सोय चांगली आहे. शाकाहारी किंवा भारतीय खाणं कितपत मिळतं ते माहित नाही कारण आम्ही आरव्ही नेल्यामुळे बाहेर खायची फार वेळच आली नाही.
४. तुम्हांला काय काय बघायचं आहे त्यानुसार तीन चार दिवसांपासून ते महिन्याभरापर्यंत कितीही दिवस ह्या परिसरात घालवू शकता. महत्वाची ठिकाणं ("पटेल स्पॉट") बघायचे असतील तर बँफमध्ये लेक लुईस, लेम मोरेन, लेक पेटो, जॅस्परमध्ये लेक मलिन, आईसफिल्ड पार्कवेवर कोलंबिया आईसफिल्ड ही ठिकाणी बास होतात. दोन्ही पार्कांमध्ये असंख्य हाईक, ट्रेल, सायकलिंग ट्रेल आहेत. जितका उत्साहं आणि स्टॅमिना आहे, त्याप्रमाणे ठरवता येतं.

जग आयलंड हाईक - (Jug Island Hike - Belcarra Regional Park)

 


बर्नबी माऊंटनचा हाईक झाल्यावर पुढचा शनिवार रविवार पावसात गेल्याने कुठे जाता आलं नाही. पण त्यानंतरच्या शनिवार रविवारी परत चांगलं उन पडणार होतं. त्यामुळे मग हाईकच्या दृष्टीने शोधाशोधी सुरू केली. शशी आणि कस्तुरीचे दुसरे कार्यक्रम ठरलेले असल्याने त्यांना जमणार नव्हतं. इथे वसंत  ॠतू सुरू झालेला असला तरी आजुबाजूच्या अनेक डोंगरांवर अजूनही बर्फ आहे. त्यामुळे आम्ही एखाद्या बर्फ असलेल्या ट्रेलवर जावं का असा विचार करत होतो. पण 'ऑलट्रेल.कॉम' तसच 'व्हॅंकुअर ट्रेल'  वेबसाईटवर संमिश्र माहिती दिसली. म्हणजे काही जण म्हणे 'स्नो स्पाईक्स' असलेले बुट वापरा, काही जण म्हणे साधे ट्रेकिंग शुजपण चालतील. काही ठिकाणी ट्रेलच्या दिशादर्शक खुणा गायब झाल्या आहेत असंही वाचलं. आमचे आम्हीच असताना उगीच बर्फातलं साहस करायला नको वाटायला लागलं. शिवाय आठवडाभर ऑफिसमध्ये बरीच दमणूक झालेली असल्याने एखादा लहानसा हाईक करावा असं वाटलं. मग अश्या "आखुड शिंगी - बहू दुधी" अटींमध्ये बसणारा बेलकारा रिजनल पार्क मधला 'जग आयलंड ट्रेल' बरा वाटला. जाऊन येऊन ५.५ किलोमिटरच्या ह्या ट्रेलवर साधारण ३०० मिटरची एकूण चढाई होते. तसा हा सोप्या प्रकारातला आहे. ट्रेल चालून गेलं की आपण इंडीयन आर्मच्या किनार्‍यावर जाऊन पोहोचतो आणि तिथून समोर 'जग आयलंड' नावाचं बेट दिसतं म्हणून ट्रेलचं नाव 'जग आयलंड ट्रेल'.  हे बेलकारा रिजनल पार्क आमच्या घरापासून उत्तर पूर्वेला आहे. योगायोगाने ह्यावर्षीचे आत्तापर्यंतचे तिनही हाईक हे आमच्या घरापासून उत्तर पूर्व दिशेला असणार्‍या परिसरातच होते पण गेल्यावर्षी मात्र आम्ही ह्या बाजूला एकदाही आलो नव्हतो.

शनिवार सकाळी दहा वाजता निघायचं म्हणत होतो पण निवांत उठून ऑमलेट-ब्रेडचा ब्रेकफास्ट करेपर्यत साडे अकरा वाजले. खाऊन झाल्यावर झोप यायला लागली आणि मग आता जाणं रद्द करावं की काय असं वाटायला लागलं. पण मग आळस झटकून उठलो आणि तयारी करून निघालो. हा ट्रेल 'डॉग फ्रेंडली' असल्याने ज्योईला पण घेऊन जायचं होतं पण अंतर कमी असल्याने फार तयारी करावी लागली नाही.

गुगल मॅप बेलकारा पार्कच्या पार्कींग लॉटमध्ये घेऊन गेला पण आम्ही ज्या रस्त्यावरून गेलो त्या बाजुचं गेट बंद होतं. तिथे समोर दोन बायका गाड्या लावत होत्या. आम्ही काही विचारायच्या आधीच त्या म्हणाल्या की हे दार बंद आहे, तुम्ही मागे मुख्य रस्त्याला लागा आणि उजवीकडे पार्कच्या प्रवेशद्वारातून आत जा की मग तुम्ही पार्कींगमध्ये पोहोचाल. आणि ह्या सगळ्याचं एकूण अंतर होतं ८ किलोमिटर! जवळचं दार बंद ठेऊन लोकांना एव्हडा मोठा फेरा मारायला लावण्यामागचं कारण काय ते कळलं नाही.

पार्कींगच्या जवळच पिकनीक एरिया  आहे. परिसर सुंदर आहे. किनार्‍याजवळ मस्त मोठी हिरवळ आहे. त्यावर अनेक ठिकाणी बसायला बाक तसचं पार्टी करायला गझिबो आहेत.  स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने आज बरीच गर्दी होती. एका मोठ्या ग्रुपची आऊटडोर पार्टी सुरू होती. शिवाय काही जण बार्बेक्यू करत होते. 
थोडावेळ तिकडे घालवून आम्ही ट्रेलची सुरुवात शोधून काढून चालायला सुरूवात केली. सुरुवातीला थोडा चढ गेल्यावर नंतर चढ उताराचा रस्ता आहे. हा डॉग फ्रेंडली ट्रेल असल्याने बरीच कुत्री येतात आणि त्यामुळे पार्कमध्ये जागोजागी आपल्या कुत्र्यांनी केलेली घाण उचलण्यासाठी प्लॅस्टीकच्या पिशव्या ठेवल्या आहेत. कुत्र्याची शी पिशवीने उचलून वेगळ्या ठेवलेल्या कचर्‍याच्या डब्यात टाकून द्यायची. काही जण मात्र त्या भरलेल्या पिशव्या इकडे तिकडे ठेऊन देत होते. पिशव्या जंगलात इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा ती घाण न उचलणं एकवेळ परवडलं! 

दोन्ही बाजूला दाट झाडी असल्याने छान वाटत होतं. एक छोटी टेकडी चढून उतरली की मग बीच येतो. रस्त्यात अनेक कुत्री भेटली, त्यामुळे ज्योईची एकदम मजा झाली. भेटणार्‍या प्रत्येक कुत्र्याबरोबर त्याला खेळायचं असतं.  इथे घराजवळ फिरवताना कधी कधी कुत्रेमालकांना घाई असली की कुत्र्यांना खेळता येत नाही पण इथे तसं नसल्याने सगळे थांबून खेळू देत होते. चढावर काही काही ठिकाणी लाकडी पायर्‍या केल्या आहेत. साध्या ट्रेलपेक्षा ह्या पायर्‍या जास्त त्रासदायक वाटतात! 


तार सुरू झाल्यावर अचानक झाडीतून समुद्राचं दर्शन झालं!  हळूहळू उतरून किनार्‍यावर आलो. समोरच जग आयलंड दिसत होतं. 

  भरपूर गर्दी होती. ज्योईला पाण्यात खेळायला फार आवडत नाही. त्यात तो जरा पाण्यात पाय घालायचा प्रयत्न करत होता पण लाटा आल्या की पुन्हा पळून जात होता. किनार्‍यावरच्या कुत्र्यांचं एकमेकांना भुंकून साद घालणं सुरू होतं. आम्ही जरावेळ वाळूत निवांत बसलो. कुठून तरी एक तरूण तरूणी कयाकींग करत किनार्‍यापाशी आले. तो मुलगा आधी उतरला, त्याने स्वतःची कयाक पाण्याबाहेर काढली , मग त्या मुलीची ओढली. थर्मास मधून आणलेली कॉफी त्याने तिला दिली आणि मग स्वतः प्यायली. थोडावेळ टाईमपास केला आणि पुन्हा निघाले. ती मुलगी स्वत:च्या कयाकमध्ये बसली ह्याने तिला आत ढकललं आणि मग हा निघाला. मी म्हंटलं ही एव्हडी कयाकिंग करू शकते मग हिला स्वत:चं स्वतः आत बाहेर करायला काय झालं ? तर शिल्पा म्हणे  ते  अजून "तुज्यासाठी कायपन!" मोडमध्ये असतील..  आपल्यासारखं नाही !

इथे पॅसिफिक नॉर्थ वेस्टात कायमच समुद्राचं किंवा कुठल्याही जलाशयाचं पाणी प्रचंड गार असतं.  पण बीचवर आल्यासारखं आम्ही पाण्यात हात पाय बुडवून आलो. शास्त्र असतं ते! पाणी खूप गार होतं पण आलेल्या एका ग्रुपमध्ये पाण्यात डुबकी मारायची पैज लागली. एक डुड ते आव्हान स्विकारून कपडे उतरवून खरच पाण्यात डुबक्या मारून आणि थोडं पोहून आला. नंतर बाहेत येऊन कुडकुडत होता. 

सुमारे पंधरा वीस मिनीटांनी ज्योई खूपच वसवस करायला लागल्यावर आम्ही परत निघालो.

परतीचा प्रवास बर्‍यापैकी आरामात झाला. ज्योईला खेळायला अजून दोन-चार कुत्री भेटली आणि तुज्यासाठी कायपन!" मोडमधलं अजून एक जोडपं भेटलं. ह्यात तो मुलगा त्या मुलीला पाठूंगळी घेऊन बराचसा ट्रेल चालून आला ! मघाशी लागलेल्या लाकडी पायर्‍या आता उतरून यायच्या होत्या. चढण्यापेक्षा उतरणं नेहमीच जास्त त्रासदायक वाटतं. तसच ह्या पायर्‍यांचंही झालं.  आल्यावर आजून एक गंमत दिसली ती म्हणजे कुत्र्यांना पाणी पिण्यासाठी हे वॉटर पाऊट. त्यांच्या उंचीला येईल अशापद्धतीने ह्याची रचना होती. शिवाय आपल्याला पायाने पाण्याचा नळ दाबता येईल अशी सोय, त्यामुळे हात लावायला नको. ज्योई आधी वहातं पाणी पाहून घाबरला पण नंतर एकदम गटागटा पाणी प्यायला!

 
जाऊन येऊन साडेतीन तासांत हा हाईक पूर्ण झाला. अंतर कमी असल्याने निवांत उशीरा निघूनही चाललं. एकंदरीत स्वच्छा सूर्यप्रकाशातला शनिवार सत्कारणी लागला.
 
 ----- 
 
लागलेला वेळ : पंधरा मिनिटांचा ब्रेक धरून अडीच तास
एकूण चढाई (एलेवेशन) : ९०९ फूट (२७७ मिटर) संदर्भासाठी: सिंहगडाची चढाई 1950 फूट (६०० मिटर) आहे.
 

 
नकाशा: