कैलास मानससरोवर यात्रा: समारोपसरासरी चारहजार शब्दांचे सात भाग लिहून झाल्यावर अजून काय आता ? तर हे थोडसं उरलं सुरलं..

माझा कैलासमानसला जायचा उद्देश्य काहीही असला तरी या प्रवासाला सरकार दरबारी, कागदोपत्री 'यात्रा' असच म्हटलं जातं. त्यामुळे मी कैलास मानससरोवर यात्रेला जाणार आहे हे कळल्यावर बर्‍याच जणांची पहिली प्रतिक्रिया यायची 'यात्रेला ? ह्या वयात ? सगळं ठिक आहे ना?!' ट्रेकला, प्रवासाला कुठे कुठे जायचं, काय काय बघायचं ह्याची यादी न संपणारी आहे. कैलास मानससरोवर ह्या यादीत बरच वरच्या स्थानावर होतं. मी आधी लिहिल्याप्रमाणे मी दहावीत असताना आईच्या मैत्रिणीने लिहिलेलं यात्रेचं वर्णन वाचलं होतं आणि तेव्हाच इथे जायची इच्छा झाली होती. नंतर शिक्षण, नोकरी दरम्यान ही गोष्ट मागे राहिली. दोन वर्षांपूर्वी मायबोलीवरच अनयाने लिहिलेली लेखमालाही वाचली आणि कैलासमानस यात्रेची सुप्त इच्छा पुन्हा जागी झाली. त्यामुळे मी इथे लिहिल्याप्रमाणे ह्या यात्रेचं श्रेय अनयाच्या लेखमालेलाच!

यात्रेच्या सुरूवातीला सगळ्या यात्रींना 'तुम्हांला कैलासमानसयात्रेला का जावसं वाटतय?' असा प्रश्न विचारण्यात आला. बर्‍याच लोकांचा अगदी स्पष्ट धार्मिक हेतू होता. पापं धुणे, पुण्य कमावणे, जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातुन मुक्ती मिळवणे वगैरे. इथे आम्हांला ह्या जन्मातल्या गोष्टींचं प्लॅनिंग करता येत नाही तर पुढचे जन्म कोणी पाहिले? आणि धार्मिक बाबतीत मी कुंपणावरचा. इतर कोणी पुजा करत असतील तर मी त्यांना ते करू नका असं सांगणार नाही. पण मी त्यात भाग घेईनच असही नाही. देवळापर्यंत गेलो तर नास्तिक म्हणून बाहेर उभा रहाणार नाही, आत जाऊन दर्शन घेईन. पण आज देवळापर्यंत जायचं की नाही ते मात्र माझं मी ठरवेन. त्यामुळे बराच विचार करून यात्रेला का जायचं ह्याचं उत्तर मी 'to find spirituality in the nature' असं दिलं.

यात्रेत दिसणारा निसर्ग इतका खरोखरच अप्रतिम आणि गुढ आहे की त्यापुढेच नतमस्तक व्हायला होतं. परिक्रमेच्या दरम्यान एका वळणावर बराचवेळ डोंगराआड असलेल्या कैलासाचं अचानक दर्शन झालं आणि अक्षरशः भान हरपून त्याकडे बघतच बसलो. त्या पर्वतात काहीतरी अद्भुत नक्कीच आहे! कैलासाच दर्शन आणि मानससरोवरातली डुबकी अगदी आतून हलवून टाकते. एकप्रकारची उर्जा देऊन जाते.

ही यात्रा म्हणजे एक आव्हान आहे. शारीरीक, मानसिक, आर्थिक आणि म्हटलं तर प्रापंचिकही. सगळ्या गोष्टी जुळून आल्याशिवाय ती घडणं शक्य नाही आणि जुळवून आणायचे आपले प्रयत्न यशस्वी होतीलच असही नाही. प्रत्यंतर गेल्या वर्षी आलच. पाहिल्या तिनही गोष्टी जमल्या तरीही ऑफिसमधली इतकी मोठी सुट्टी, घरच्या जबाबदार्‍या, घरून पाठिंबा हे सगळंही तेव्हडचं महत्त्वाचं. माझ्या बाबतीत सुदैवाने ह्यावर्षी सगळ्याच गोष्टी जुळल्या. आर्थिक जुळवाजुळव तुम्ही आधीपासून करू शकता, जवळच्यांकडून मदत घेऊ शकता मात्र शारिरिक आणि मानसिक ताकद मात्र स्वतःची स्वतःच उभी करावी लागते. त्याचं उसनं अवसान आणता येत नाही. त्यामुळे ह्या प्रवासादरम्यान स्वतःच्या तीनही प्रकारच्या क्षमता ताणून बघण्याची उत्तम संधी लाभते. शारिरिक आणि मानसिक क्षमता अधेमधे ताणून बघायला खरतर मजा येते आणि त्या ताणून बघाव्याच. शिवाय आमच्या घरातले सगळे जण बर्‍यापैकी 'फॅडीस्ट' आहेत. प्रत्येकाची काही ना काही फॅडं सुरू असतात. ह्या सगळ्यात आधीचे आणि नंतरचे दोन चार माहिने बरे जातात. त्यामुळे ही यात्रा त्या दृष्टीनेही एक फॅड किंवा उपक्रमच होता.

मध्यंतरी 'साडेसाती'संबंधीच्या चर्चेत वाचलं की साडेसाती माणसाला पेशन्स शिकवते. ह्या यात्रेच्या निमित्ताने त्याचं अगदी पुरेपुर प्रत्यंतर आलं. एका वर्षीची यात्रा रद्द होऊन नंतर वर्षभर थांबून पुन्हा जायला मिळणे ह्या प्रकारात पेशन्सचा अगदी कस लागला. प्रत्येक गोष्टीतला वाट पहाण्याचा वेळ नको व्हायचा. पण नंतर त्यातुन मिळालेला अनुभव खूप आनंददायी होता! 'यात्रेला' जाऊन आल्यावर मी लगेच बदललो, संत प्रवृत्तीचा झालो असं अजिबातच नाही. (परत आल्यावर पहिल्याच आठवड्यात इथे मायबोलीवरच्याच एका चर्चेत आरे ला कारे करायचा मोह मला आवरला नाही!). पण यात्रेहून आल्यावर एकप्रकारचा आत्मविश्वास आला असं मात्र वाटतं. श्वास घेता येत नाही, हातात सॅकच काय पण पेनही धरवत नाही अश्या अवस्थेत लिपूलेख किंवा डोलमाची चढाई करू शकत असेन तर काहीही करता येणं शक्य आहे असं वाटायला लागलं. शिवाय करीयरची दहावर्ष झाल्यावर एक महीना सुट्टी स्वतःसाठी घेता येऊ शकते हा ही एक अनुभवच होता.

घरच्यांच्या भक्कम पाठिंब्याशिवाय इतक्या मोठ्या प्रवासाला जाणं शक्य नव्हतं. ट्रेकसाठी किंवा 'यात्रे'ला जाण्यासाठी तब्बल एक महिन्याची रजा मंजूर केल्याबद्दल ऑफिसमधल्या माझ्या वरिष्ठांचे आभार मानलेच पाहिजेत. ह्यावर्षी केदार बरोबर होता. कोणीतरी ओळखीचं बरोबर आहे हा स्वतःसाठी तसच घरच्यांसाठीही मोठा आधार होता. बाकी एकोणसाठ जणांशी पटलं नाही तरी एका माणसाशी काही बाबतीत का होईना पण पटेल ह्याची खात्री निघण्यापूर्वीच होती. मी आणि केदारने एकत्र खूप मजा केली, टवाळक्या केल्या. केदारचा स्टॅमिना आणि उत्साह (ह्या वयातही!) अफाट आहे. (चाचा चौधरींच्या पुस्तकांत जशी * करून वर वाक्य लिहिलेली असतात, तशी मी केदारबद्दल 'केदारको थंड नही लगती', 'केदार कभी मिठा नही खाता' आणि 'केदारको लेख-लडाखके बारे मे सबकूछ पता है' अशी काही वाक्य शोधून ती लेखांमध्ये लिहायचं ठरवलं होतं. पण मी त्यावरून प्रवासादरम्यान त्याला पुरेसं पिळलेलं आहे.)

ह्या सगळ्या प्रवासाचं वर्णन लिहून काढणं हा ही एक अतिशय आनंददायी अनुभव होता. लिहिताना, फोटो बघताना सगळं परत आठवत होतं. केदारने एका लेखाच्या प्रतिक्रिये लिहिलं तसं ह्या लेखांमध्ये भरपूर 'अडगळ' होती, पण ती 'समृध्द' होती आणि महत्त्वाची होती. मी हे आत्ता लिहून ठेवलं नसतं, तर बारिकसारिक गोष्टी हळूहळू विसरून गेलो असतो. त्यामुळे काही ठिकाणी पाल्हाळ झाली खरी पण एकंदरीत लिहून झाल्यावर थोडेफार बदल वगळता संपादन करणं मी टाळलं. लेखांवर प्रतिक्रिया यायच्याच पण बर्‍याच जणांनी इमेल, फोन, चॅटवर देखील लेख आवडत असल्याचं आवर्जून कळवलं. काही काही प्रतिक्रिया 'अगदी खास तुझी स्टाईल', 'लेखनाची उत्तम शैली' अश्या होत्या. आपल्या लेखनाला स्वतःची 'स्टाईल' आहे, ती लोकांना जाणवते आहे आणि मुख्य म्हणजे आवडते आहे हे वाचणं फारच सुखावून टाकणारं, गुदगुल्या करणारं वगैरे होतं! तर लेख वाचून प्रतिसाद देणार्‍या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार!

काही जणांनी 'यात्रेचं वर्णन खूप आवडलं, आता प्रत्यक्ष गेलं नाही तरी चालेल' असं काही लिहिलं आहे. तर सांगणं एव्हडच आहे, की शब्दांत कितीही वर्णन केलं तरी प्रत्यक्ष अनुभूती प्रत्येकासाठी निराळीच असणार आहे. त्यामुळे इच्छा असेल आणि शक्य असेल तर नक्की जा. वेळ असेल तर भारताच्या बाजूनेच जा कारण सगळाच परिसर खूप सुंदर आहे.

अनयाने तयारीबद्दलची सगळी माहिती लिहिलेलीच आहे. आमची 'key learning' तिथेच लिहिन, जेणेकरून माहिती एकत्र राहील.

|| ॐ नमः शिवाय ||

कैलास मानससरोवर यात्रा: भाग ७ - ने मजसी ने....

दिवस १७ : तकलाकोट ते गुंजी

लवकर झोपायला गेलो खरे पण नेमकी त्याच रात्री झोप येईना. फुटबॉल मॅचची एक्साईटमेंट, उद्याच्या लिपूलेखच्या प्रवासाचं थोडसं दडपण किंवा प्रवास संपत आल्याची जाणीव अशी कारणं अनेक होती. मग मी आणि केदार बराच वेळ गप्पा मारत बसलो. धर्म, आध्यात्म, घरातलं त्याबद्दलचं वातावरण, स्वतःची मतं वगैरे नेहमीचे यशस्वी विषय होते. अखेर गप्पा आवरत्या घेतल्या कारण उद्याचा मोठा प्रवास होता. आधी २० किलोमिटर बस प्रवास, नंतर ३ किलोमिटर लिपूलेखची चढण नंतर लिपूलेख ते नाभीढांग, नाभीढांग ते कालापानी आणि कालापानी ते गुंजी असे २५/२६ किलोमिटर चालत म्हणजे एकूण २८ किलोमिटरचा ट्रेक होता. लिपूलेखपासून पुढे सगळा उतार आहे. त्यामुळे येताना सारखा नाभीढांगला मुक्काम नव्हता. भारतातून येणारी सातवी बॅच आम्हांला लिपूलेखला भारतीये वेळेनुसार सात वाजता भेटणार होती, त्यामुळे आम्ही ४ वाजता तकलाकोटहून बसने निघणार होतो. मी फुटबॉल फायनल पहाण्यासाठी एकचा गजर लाऊन दीड/ पावणेदोनच्या सुमारास उठलो. बघतो तर मध्यंतर झालेला आणि गोलशून्य बरोबरी होती. माझा जर्मनीला पाठिंबा होता. निर्धारीत वेळ संपली तरी गोल काही झाला नाही. पेनल्टी शुट आऊटची वेळ येऊ नये अशी मनोमन इच्छा होती कारण मेस्सी आणि कंपनीचा पेनल्टी शुट आऊटमध्ये भरोसा वाटत नव्हता. अखेर एक्ट्रा टाईममध्ये जर्मनीने गोल मारला आणि मी पण खोलीत जोरदार ओरडा केला. त्या आवाजाने केदार उठलाच. मग आवरता आवरता बक्षिस समारंभ बघितला. मर्केल बाई भारी उत्साहात होत्या आणि मेस्सीचा चेहेरा अजिबात बघवत नव्हता. मला ती टीम आवडत नसली तरी त्याच्याबद्दल जरा वाईटच वाटलं. माझी आवडती टीम जिंकल्याने मी पण एकदम उत्साहात होतो. फुटबॉल वर्ल्डकपच्या गेल्या पाच फायनल मी डोंबिवली, पुणे, सेंट लुईस, अटलांटा आणि आता तकलाकोट अश्या वेगवेगळ्या ठिकाणी पाहिल्या, त्यामुळे पुढच्या फायनल साठी नवीन ठिकाणाची शोधाशोध आत्तापासूनच करायला हवी हे ठरवून टाकलं.

तोपर्यंत चहा आणि नाश्ता तयार असल्याची खबर आली. तिथेही मॅचची चर्चा सुरू होती. शिवाय अचानक कुठूनतरी घरी परत गेल्यावर काय काय खायचं ह्याचा विषय निघाला. सगळे एकदम सुटलेच! जोरदार हसाहशी चालू होती. हायमा म्हणे इथे लोकांना 'लो माऊंटन सिकनेस' झालाय. मेंदूला जास्त ऑक्सिजन सोसत नाहीये त्यामुळे हे असं काहीतरी बरळतायत!

सामान ट्रकमध्ये भरून, पुन्हा कस्टमचे सोपस्कार पार पडून तकलाकोट सोडलं. हळूहळू फटफटायला लागलं होतं. लक्षात आलं की हवा ढगाळ आहे. लिपूलेखच्या खाली बस जिथपर्यंत जाते तिथे पोहोचेपर्यंत ढग, वारं, धुकं आणि हलकासा हीमवर्षाव (फ्लरीज) सुरू झाला.

थंडीही खूप होती. बसमधून उतरून छोट्या जीपमध्ये बसलो. बसलो म्हणण्यापेक्षा स्वत:ला त्यात कोंबलं. तशा वातावरणात जीपवाला अगदी कौशल्याने जीप चालवत होता. येताना लिपूलेखमध्ये अगदी व्यवस्थित ऊन आणि अल्हाददायक वगैरे हवा होती. पण सगळे अनुभव यायला हवेत ना, त्यामुळे हवा आता अशी झाली होती. जीपवाला तोडक्या मोडक्या हिंदीत म्हणाला 'जल्दी उपर जाईये, बादल खराब हो रहे है!' जीप सोडून सामान पाठीवर घेतलं आणि चालायला सुरूवात केली. जीपने बरच वर आणलं होतं त्यामुळे सुमारे दिड किलोमिटरचाच चढ बाकी राहिला होता. गेल्या आठ दिवसांत इथे बराच बर्फ पडला होता. त्यामुळे बर्फावरूनच चालावं लागत होतं. कुंद हवा, अंगात घातलेले खूप कपडे, पाठीवर जड सॅक, ऑक्सिजनची कमतरता आणि हलकासा हीमवर्षाव ह्यामुळे उघड्यावरही घुसमटायला होत होतं. मजल दरमजल करत पुढे जात राहिलो आणि शेवटची चढण आली. दरम्यान पलिकडून सातव्या बॅचचे यात्री उतरून यायला लागले. ते आमची आपुलकीने चौकशी करत होते आणि प्रवास, दर्शन कसं झालं विचारत होते. काही यात्रीतर आमच्याच पायाला हात लाऊन नमस्कार करत होते. हे असं काही झालं की फार अवघडून जायला होतं. एका काकांना सांगितलं की तुम्ही कैलासाला नमस्कार करा, आम्हांला नको.

शेवटच्या वळणावर आयटीबीपीच्या अधिकार्‍यांचे ओळखीचे चेहेरे दिसले आणि त्यांचं अभिवादन स्विकारत भारताच्या हद्दीत प्रवेश केला. अक्षरश: सुटल्यासारखं झालं! यात्रेआधी चिन सरकार प्रत्येक यात्रीकडून एका निवेदनावर सही करून घेतं त्यात असा मजकूर असतो की जर यात्रेदरम्यान तुमचं काही बरं वाईट झालं तर तुमचे 'remaining' (ह्यात तुमचा देहही आला!) भारतात आणले जाणार नाहीत. त्याची तिथेच विल्हेवाट लावली जाईल. आता भारताच्या हद्दीत प्रवेश केल्यावर जाणीव झाली की आता काहीही झालं तरी आयटीबीपीच्या मदतीने उभे किंवा आडवे कसे का होईना पण निदान घरी तरी पोहोचू! आमच्या एलओनी चिनी अधिकार्‍यांच्या साक्षीने गुरूला 'फिडबॅक फॉर्म' भरून दिला. त्यात अगदी स्वच्छ शब्दांत 'Not satisfied' असा शेरा मारला. गुरूची अशी अपेक्षा होती की बक्षिशी देऊ नका पण फॉर्मवर असे शेरे मारू नका. पण आम्ही आधी उच्चायुक्ताकडे तक्रारही केली होतीच.

थोडसं पुढे आल्यावर केदारचा घोडेवाला भेटला. त्याने येऊन आधी आमच्या बॅगा घेतल्या. तो म्हणाला कमान खाली नाभीढांगला थांबलाय कारण त्याची तब्येत अजूनही बरी नाहीये. त्याने न सांगता केदारच्या बॅगेबरोबर माझी बॅगही घोड्यावर बांधली. माझं जॅकेट त्या भुरभुर बर्फाने ओलं झालं होतं. पण तो म्हणाला खाली हवा चांगली आहे. रेनकोट घालायची गरज नाही. आता नाभीढांगपर्यंत संपूर्ण उताराचा रस्ता असल्याने आम्ही टणाटण उड्या मारत निघालो.

येताना ह्यातला जवळ जवळ पाऊण प्रवास अंधारात केला होता. त्यामुळे नक्की किती चढ चढलो होतो ह्याची आता जाणीव होत होती. मी, केदार, भीम आणि बन्सलजी बरोबर होतो. श्यामला एलओंनी मागे काहितरी कामाला लावलं होतं. आता नाभीढांगला लवकर पोहोचून ॐ पर्वत दिसतो का ते बघायचं होतं. नाभीढांगच्या कॅम्पच्या थोडं आधी एक कोसळलेलं हेलिकॉप्टर दिसलं. ते काही वर्षांपूवी कोसळलं म्हणे. आमच्या बॅचमधल्या अतिउत्साही विरांनी त्या अवषेशांवर बसून स्वतःचे फोटो काढून घेतले!

नाभीढांगच्या कॅम्पला पोहोचेपर्यंत हवा छान उघडली होती. कोवळं ऊन पडलं होतं पण ॐ पर्वत मात्र येताना इतकाही दिसला नाही. संपूर्णपणे ढगात गुडूप होता. भारतात आल्याची पहिली जाणीव म्हणजे पोहोचल्या पोहोचल्या हातात कोमट पाण्यातल्या मधूर सरबताचा ग्लास मिळाला आणि आपुलकीने चौकशी झाली. केएमव्हीएनच्या ह्या आपुलकीची चिनमध्ये फार आठवण व्हायची. एकंदरीत चिनमध्ये फार दडपणाखाली असल्यासारखं वाटायचं, अजिबात मोकळेपणा जाणवला नाही. (ह्याला जोडून 'अमेरिकेत नाही होत कधी असं!!' हे वाक्य मायबोलीवरच्या लेखात टाकलं तर पुढे काय 'चर्चा' होईल ह्याचे मी आणि केदारने थोडावेळ अंदाज बांधले.. ) इतक्यात मागून आलेलं कोणितरी सांगायला लागलं की लिपूलेख चढून वर आल्यावर निलम काकूंना अचानक त्रास झाला. त्यांना गुदमरल्यासारखं होऊन श्वासच घेता येईना. आयटीबीपीच्या डॉक्टरांनी ऑक्सिजन सिलेंडर काढून ते लावायची तयारी केली होती पण तोपर्यंत त्या सावरल्या. हा एक प्रसंग वगळता आमच्या संपूर्ण प्रवासात कोणालाही त्रास झाला नाही.

नाभीढांगला गरम गरम चमचमीत छोले आणि गोड दलिया असा नाश्ता मिळाला. तिथल्या थंडीत बसून हे खायला मस्त वाटलं. खाता खाता गप्पा सुरूच होत्या. आम्ही मानससरोवराच्या काठी होतो तेव्हा पौर्णिमा होती तर आज कुठली तिथी असेल असा काहितरी विषय सुरू होता. तर त्यावर केदारने 'आज एकादशी असूच शकत नाही. कारण महिन्यात एकच पौर्णिमा आणि एकच अमावस्या असते तशी एकच एकादशी असते' असं काहीतरी धक्कादायक विधान केलं. केदार सारख्या हिंदू संस्कृतीच्या अभ्यासकाने हिंदू कॅलेंडर संबंधी केलेलं हे विधान ऐकून मला आयुष्यातला सगळ्यांत मोठा धक्का बसला होता! पण मग तो केदारचा दोष नसून नाभीढांगच्या हवेत नसलेल्या ऑक्सिजनचा आहे असं ठरलं. पण तरी मी पुढे केदारला ह्यावरून पिडायची एकही संधी सोडली नाही. काही मंडळी ॐ पर्वत दिसतो का हे पहाण्यासाठी तास दोन तास थांबूया म्हणाली पण तिथे इतके जास्त ढग होते की आम्ही त्या मोहात न पडता पुढे निघायचं ठरवलं. नाभीढांगला कमान भेटला, तसच अभिलाष न येता त्याचा भाऊ आला होता. दोघांनीही आपुलकीने प्रवास कसा झाला वगैरे चौकशी केली.

नाभीढांग ते कालापानी प्रवासही पूर्ण उताराचा होता. बन्सलजी आमच्या बरोबर निघाले पण नंतर मागे पडले. नंतर आम्ही एकेठिकाणी पाणी पिण्यासाठी थांबलेलो असताना मागून धावत पळत आले आणि म्हणाले आता पुढे गेलात बघा! तुम्हांला गाठायला इतके श्रम होतात आणि गाठलं की तुम्ही पळून जाता. लिपूलेखला असलेल्या ढग, वारा, बर्फाचा आता मागमुसही नव्हता. त्यामुळे पुढचा प्रवास अगदी आरामात होऊन आम्ही १०.३०लाच कालापानीला पोहोचलो. कालापानीला जेवणाची सोय होती पण आम्ही लवकर पोहोचल्यामुळे जेवण तयार नव्हतं. शिवाय इथे परतीची पासपोर्ट तपासणी असल्याने सगळे येईपर्यंत थांबायला लागणार होतं. तिथला माणूस म्हणाला आत खोल्या आहेत तुम्हांला आडवं व्हायचं असेल तर व्हा. रात्री एक पासून जागरण झालेलं असल्याने पडल्या पडल्या लगेच झोप लागली. एकदम स्वप्नच पडायला लागली आणि स्वप्नात काय दिसावं तर ऑफिस !!! प्रवास, सुट्टी संपत आल्याची तीव्र जाणिव मेंदूपर्यंत गेलेली होती तर! अर्ध्या पाऊण तासांच्या त्या झोपेने एकदम मस्त वाटलं. तोपर्यंत बाकीची मंडळीही यायला लागली होती. ॐ पर्वताचं दर्शन झालच नाही. जेवणावर ताव मारून पासपोर्ट घ्यायला गेलो. आता कालापानी कॅम्पवरून भारतात शिरल्याचा शिक्का मारला गेला. कालापानीहून गुंजीपर्यंत आयटीबीपीचा ट्रक जातो असं कळलं. पण तो निघाला तर तीन वाजता निघतो, त्यामुळे त्यासाठी न थांबायचं आम्ही ठरवलं. कारण तीन पर्यंत थांबून ट्रक मिळाला नाही तर पुढचा प्रवास जिवावर आला असता.आता फक्त मी आणि केदारच बरोबर होतो. बाकीचे एकतर पुढे गेले होते, मागे पडले होते किंवा ट्रकसाठी थांबले होते. आमच्या आत्तापर्यंतच्या प्रवासात मायबोलीचा विषय फारसा निघाला नव्हता. पण ह्या आठ नऊ किलोमिटर दरम्यान नेहमीचे यशस्वी बाफ, आयडी, गटगातल्या गंमतीजमती वगैरेंबद्दल बर्‍याच गप्पा झाल्या. गुंजीपासून दोन तीन किलोमिटरवर असताना आयटीबीपीचा ट्रक आम्हांला मागे टाकून पुढे गेला. थांबलेल्या लोकांचा पेशन्स फळला होता!

आज मोठा प्रवास झाला होता, शिवाय आता बरच खाली आल्याने थंडीही कमी होऊन उन्हाचा चटका बसायला लागला होता. एकंदरीत थकायला झालं होतं खरं! साधारण चारच्या सुमारास गुंजीला येऊन पोहोचलो. यात्रा पूर्ण झाल्याबद्दल आयटीबीतर्फे त्यांच्या मेसमध्ये आमच्यासाठी आज 'बडा खाना' आयोजित केलेला होता. त्यावेळी एलओंनी आमच्या बॅचतर्फे आयटीबीपीचे आभार मानले. आयटीबीपीच्या जवानांचं आमच्याशी इतकं आदबीनी वागणं फार अवघडून टाकायचं. त्यांना तसं सांगितल्यावर ते म्हणाले की हा आमच्या कामाचा भाग आहे त्यामुळे तुम्ही काही वाटून घेऊ नका. यात्रा पूर्ण झालेली असली तरी बुधी ते गाला दरम्यानच्या प्रवासात येताना सारखीच शक्य तितकी काळजी घ्या, अजिबात हलगर्जीपणा करू नका अशी सुचना द्यायला आयटीबीपीचे अधिकारी विसरले नाहीत.

दिवस १८ : गुंजी ते बुधी

गुंजीला असं समजलं की परतीच्या वाटेवर बुधी ते गाला दरम्यानच्या ४४४४ पायर्‍या टाळून थेट धारचुलाला पोहोचता येतं. ४४४४ पायर्‍यांना असलेला पर्यायी रस्ता नदीच्या पात्रातून जातो आणि गाडी सस्त्यापाशी नेऊन सोडतो. त्यामुळे गालाचा मुक्काम टाळून जीपने धारचुलाला जाता येतं. आता सगळ्यांनाच घरी लवकरात लवकर जायची ओढ लागली होती. त्यामुळे दिवस वाचवून लवकर घरी पोहोचता येईल का ह्याची सगळे जण चाचपणी करायला लागले. पण भक्तगण ग्रुपचं असं म्हणणं होतं की वाचलेल्या दिवशी आपण जागेश्वरला जाऊ आणि तिथे दर्शन घेऊन दिल्लीला ठरलेल्या दिवशीच पोहोचू. मग आम्ही समविचारी लोकांचा कंपू करून बुधीला एलओंशी बोलायचं ठरवलं.

दुसर्‍या दिवशी सकाळी आठ वाजता बुधीसाठी प्रयाण करायचं होतं. पण झालं असं की हे दिवस वाचायचं ठरलं आणि त्यामुळे आमचं चालायचं अंतरही वाचणार होतं हे लक्षात आलं. त्यामुळे काही यात्रींच्या सुपिक डोक्यातून अशी कल्पना आली की जर आपण कमी अंतर चालणार तर त्या कमी झालेल्या अंतराचे पैसे पोर्टर आणि घोडेवाल्यांच्या पैशांतून कापून घ्यायचे! आता हे घोडेवाल्यांच्या आणि पोर्टरच्या कानावर गेल्यावर अर्थातच ते वैतागले आणि त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन सांगितलं की जर आम्हांला पूर्ण पैसे मिळणार नसतील आम्ही इथून पुढे येणारच नाही. खरतर हे यात्री त्या बिचार्‍या कष्टकर्‍यांची अडवणूक का करत होते काय माहित! इतके पैसे खर्च करून आता ७००-८०० रूपये वाचवण्याची इतकी का धडपड करावी आणि ती ही ह्या अश्या मार्गानी? आमच्या पोर्टर आणि घोडेवाल्यांना खात्री होती की आम्ही पैसे कापणार नाही, पण त्यांना त्यांच्या लोकांच्या विरूद्धही बोलता येईना. त्यामुळे ते आमच्या सॅक घेऊन जरा पुढे जाऊन थांबले. इथे खरतर आमच्या एलओंनी मध्यस्थी करून यात्रींना समजावयला हवं होतं पण त्यांनी त्यांची नेतेगिरी भलतीचकडे केली आणि त्या पोर्टर आणि घोडेवाल्यांनाच धमकावले. सगळ्या यात्रींना सांगितलं की आपण त्यांच्याशिवाय पुढे जाऊ. हा निर्णय अत्यंत चुकीचा होता कारण कित्येक ठिकाणी लोकांना पोर्टरचा हात धरल्याशिवाय चालता यायचं नाही. निर्णय चुकीचा होता ह्याची प्रचिती गुंजीच्या कॅम्पबाहेरच्या पहिल्याच उतारावर आली. मी स्वतःच एकावेळी निलम काकू, गुप्ते बाई आणि मराठे काकांना मदत करत होतो आणि बाकी प्रत्येक जण कोणाना कोणा ज्येष्ठ नागरीकांना मदत करत होता. तो उतार गेल्यावर सगळ्यांनाच जाणवलं की हे वाटतं तितकं सोपं नाहीये. मग ज्यांची पैशांबद्दल कटकट नव्हती त्यांनी आपल्या पोर्टरना पूर्ण पैसे देऊ सांगितलं आणि मग बाकीच्यांनाही तयार केलं. अखेर सगळा जत्था बुधीच्या दिशेने निघाला.

वाटेत गरब्यांग लागलं. येताना आम्ही इथे समोसा खाल्ला नव्हता. आज आम्हीच कमानला म्हटलं की समोसा खाऊ. मग तिथल्या एका टपरीवर एकदम चविष्ठ समोसा खाल्ला. थोडं पुढे आलो तर गुंजीच्या दिशेने जाणार्‍या आठव्या बॅचमधली लोकं भेटायला लागली. बरीच मराठी मंडळी भेटली. त्यांनी माहिती विचारली. मग आमच्या जवळ उरलेले युवान लगेच त्यांना विकून टाकले. एलओ म्हणे, हे बरय तुम्ही इथे हवाला सुरू केला. आता चियालेखच्या मागच्या बाजूची चढाई लागली. लिपुलेख, डोलमा वगैरेच्या चढाया करून झालेल्या असल्याने ही चढाई येताना पेक्षा बरीच सौम्य वाटली. चक्क व्यवस्थित श्वास घेता येत होत आणि छाती आत्ता फुटेल की मग असं वाटण्याइतकी जोरात धपापत नव्हती.. !

येतानापेक्षा चियालेखच्या खाईत बरीच फुलं फुललेली दिसत होती. दरम्यानच्या काळात झालेल्या पावसाचा परिणाम असावा. पासपोर्टची अखेरची तपासणी झाली आणि आम्ही चियालेखच्या माथ्यावर पोहोचलो. इथे मस्त ढगाळ हवेत गरम गरम छोले पुर्‍या खाल्ल्या. आता चार किलोमिटरचा उतार उतरला की बुधीचा कॅम्प! 'चढापेक्षा उतार त्रासदायक' ह्याचं पुन्हा एकदा प्रत्यंतर आलं. ही चार किलोमिटरची उभी उतरंड उतरताना पायात चांगलेच गोळे आले. नेहेमीप्रमाणे आम्ही लवकर बुधीला येऊन पोहोचलो. त्या पायातल्या गोळ्यांनी हालत इतकी खराब झाली की कॅम्पमधल्या चार पायर्‍या उतरतानाही झोकांड्या जायला लागल्या.

आमच्या बॅचमध्ये डॉक्टर मयुरीबेन साधारणपणे सगळ्यात शेवटी कॅम्पवर पोहोचायच्या. आम्हांला आतल्या गोटातून अशी खबर कळली होती की त्यांच्याकडे खूप खाऊ शिल्लक आहे. बुधीला सगळ्यांना फारच भुक लागली होती आणि जेवायला अवकाश होता. त्यामुळे सगळेजण मयुरीबेनची फार आतुरतेने वाट पहात होते. त्या आल्याआल्या सगळ्यांनी त्यांना गरडा घातला. आपल्या येण्याची इतकी जणं वाट बघत आहेत हे पाहून त्यांचा थकवा एकदम पळूनच गेला. त्यांनी बराच गुज्जू खाऊ काढून दिला आणि आम्ही यछेच्छ ताव मारला.

काही वेळाने बरेच गावकरी कॅम्पच्या दिशेने धावत यायला लागले. आम्हांला कळेना की झालं काय. थोड्यावेळाने एक हेलिकॉप्टरही घोंगावायला लागलं. हल्ली रुग्णांना शहरातल्या दवाखान्यात हलवायचं असेल तर हेलिकॉप्टरची सोय केलेली आहे. गावातल्या एका रुग्णाला तातडीने शहरात न्यायचं होतं म्हणून हेलिकॉप्टर आलं होतं. आमच्या कॅम्पजवळ हेलिकॉप्टर उतरायची सोय होती. त्यामुळे सगळेजण कॅम्पवर आले होते. अशी सोय मर्यादीत प्रमाणात का होईना पण उपलब्ध होत असेल तर ते गावकर्‍यांच्या दृष्टीने फार चांगलं आहे.

काल ठरवल्याप्रमाणे बुधीला एलओंशी बोलायचं होतं पण एलओ संध्याकाळच्या मिटींगला आलेच नाहीत. त्यांनी फक्त निरोप पाठवला की उद्या सकाळी लवकर निघायचं आहे आणि नदीला पाणी नसेल तर थेट धारचुलाला जायचं. अर्थात आम्ही नंतर त्यांना पकडलच. पण दिल्लीला लवकर पोहोचायची आमची मागणी त्यांनी सपशेल फेटाळली. म्हणे परराष्ट्र मंत्रालयातून सक्त ताकीद मिळाली आहे की वेळापत्रकात बदल करून लवकर यायचं नाही कारण त्यामुळे त्यांच्या व्यवस्थेचा बोर्‍या वाजतो आणि ऐनवेळी धावपळ होते. आम्ही म्हटलं धारचुलाहून दिल्लीला आम्ही आमचं जातो कारण तिथून थेट बसही मिळू शकते. तर त्यालाही नाही म्हणे. मी तुम्हांला absconding जाहीर करेन! एकंदरीत आमच्या एलओंचे नेतृत्त्वगुण फार भारी नव्हते हे लहान सहान प्रसंगांवरून दिसून यायचं. सगळ्यांनी बरीच नाराजी व्यक्त केली पण काही उपयोग नव्हता. अखेर सगळे जण तो प्रकार विसरून जाऊन पुन्हा टवाळक्या करायला लागले.

दिवस १९ : बुधी ते धारचुला

आज बुधी ते गाला/धारचुला हा प्रवासातला शेवटचा अवघड टप्पा होता. पुन्हा कालीनदीच्या काठूनचा तो अरूंद रस्ता, खालून रोरावणार्‍या कालीनदीचा प्रवाह आणि आज भरीस भर म्हणून पाऊस. जर आम्ही धारचुलाला गेलो असतो तर आजचा शेवटचा ट्रेक. आत्तापर्यंत कुठेही पाऊस लागला नाही, पण हा ही अनुभव हवाच. त्यामुळे शेवटच्या दिवशी पाऊस आला. बुधीहून निघायच्या आधीपासून पाऊस सुरूच होता. त्यामुळे निघतानाच रेनकोट चढवून निघालो. कमानने सांगितलं की मी सांगेन तिथेच फोटो काढायला थांबायचं. जर पाऊस वाढला तर कॅमेरा आत ठेऊन द्यायचा. म्हटलं ठिक आहे बाबा. व्यवस्थित घरी पोहोचलो तर त्या फोटोंचा उपयोग. त्यामुळे तू सांगशील तसं. ऊन नसल्याने आज थकायला अजिबात होत नव्हतं. पावसामुळे सगळी हिरवळ मस्त टवटवीत झाली होती आणि सावलीमुळे हा परिसर आज अजूनच सुंदर दिसत होता. पण वाट घसरडी झालेली होती, चिखल होता शिवाय घोड्यांची तसच प्रवाशांची ये-जा आज जास्त होती. त्यामुळे खूपच काळजीपूर्वक चालावं लागत होतं. सगळे निवांतपणे आपापल्या लयीत चालले होते. जेवायच्या ठिकाणी समजणार होतं की आम्ही थेट धारचुलाला जाणार की ४४४४ पायर्‍या चढून गालाला जाणार. खरतर त्या पायर्‍यांचे कष्ट वाचावे असं वाटत होतच पण आज ट्रेक संपणार ह्याबद्दल हुरहुरही वाटत होती. गेले तीन आठवडे दिवसभर चालायचं, मस्त दमायचं, छान अंघोळ करायची, पोटभर जेवायचं आणि ताणून द्यायची, शिवाय गप्पाटप्पा, टिंगळ-टवाळ्या, शुद्ध हवा, वेळच वेळ, ट्रॅफिक नाही, घाई नाही, कसलीही चिंता नाही असं सगळं सवयीचं होऊन गेलं होतं. ते सगळं आज संपणार होतं!

त्यामुळे ह्या शेवटच्या नितांत सुंदर रस्त्याचा क्षण अन् क्षण सगळे जण अनुभवत होते. लामारी कॅम्पला जाताना प्रमाणेच चहा मिळाला आणि मग मालपाला जेवायला थांबलो. थोड्यावेळाने एलओ आणि केएमव्हिएनचे गाईड जोशीजी आले. त्यांनी सांगितलं की नदीपात्रात रस्ता चालू आहे, त्यामुळे त्या मार्गाने गाडी रस्त्यापर्यंत जा. तिथे जीपची व्यवस्था केलेली आहे. आमच्या ट्रेक आज संपणार हे नक्की झालं. जेऊन पुढे निघालो. पायर्‍याच्या सुरुवातीला खाली जाणारी एक छोटी वाट होती. ती नदीच्या प्रवाहाच्या अगदी जवळून, दगडांवरून जात होती. ही वाट बर्‍यापैकी अवघड होती. पण पुढे बघितलं तर गावातले लोकं सर्रास त्या रस्त्याने ये-जा करत होती. शाळेतली छोटी छोटी मुलंही एकटी तिथून जात होती. तो रस्ता जरी त्यांच्याकरता रोजचा आणि सवयीचा असला तरी त्या मुलांना असं एकटं-दुकटं जाताना बघून भितीच वाटली! ह्या रस्त्यावर दोन तीन ठिकाणी वरून पडणार्‍या झर्‍यांच्या मधून जावं लागलं. पण शेवटचाच दिवस असल्याने त्याचीही मजा वाटत होती. कपडे वाळले नाही तर काय वगैरे काही भिती नव्हती. आता डोंगरावरून दिसणारा गाडी रस्ता दिसायला लागला. शेवटी साधारणा ८०० मिटरची उभीच्या उभी जवळ जवळ ७० अंश कोनातली चढण आली. ती चढून वर गेलं की गाडी रस्ता लागणार होता. ह्या चढणीवर दगड लाऊन 'क्रुकेडेस्ट स्ट्रीट' सारखी वळणा-वळणांची वाट बनवली होती. तिच्या पायथ्याशी उभं राहून वर पाहिलं तर छातीच दडपावी अशी चढण होती ती. सौम्या म्हणायला लागला मी येतच नाही वर, माझं जे काय करायचं ते इथेच करा! पोर्टरने आणि इतरांनी बरच समजावून त्याला वर नेलं. मी, केदार आणि भीम साधारण ५-७ मिनीटे खाली थांबलो, पाणी प्यायलं आणि मग हिय्या करून निघालो. मस्त दमछाक होत वीस-बावीस मिनिटांत वर पोहोचलो. ट्रेकचा शेवट ह्या अश्या दणदणीत चढणीने व्हावा ह्याचा आम्हांला फार आनंद झाला! मात्र बर्‍याच यात्रींची ह्या चढावर वाट लागली. घोड्यावर बसावं तर ते फारच भितीदायक होतं, कारण एकतर घोडा दरीच्या बाजूने चालतो आणि चुकून खाली लक्ष गेलं तर भोवळ येईल असं दृष्य आणि घोड्यावर न बसावं तर प्रचंड दमछाक! काहीजण तर अक्षरश: रडकुंडीला आले.

वर एका टपरीवर जेवायची व्यवस्था केलेली होती आणि जीपही तयार होत्या. कमान तसच घोडेवाल्याला निरोप द्यायची वेळ आली होती. त्यांचे पैसे तसेच बक्षिशी त्यांना दिली. कमानने त्याचा पत्ता, फोन नंबर दिला. म्हणे परत आलात तर नक्की मला फोन करा. मी माझ्याजवळचे काही कपडे, जॅकेट, रेनकोट वगैरे त्याला दिलं. म्हटलं तुला हवं तर तू वापर नाहीतर गावात कोणाला तरी दे. ह्या गोष्टी डोलमापासमध्ये टाकण्यापेक्षा ह्यांना दिल्या तर कोणीतरी वापरेल तरी. आम्हांला पोर्टर, घोडेवाले किंवा कॅम्पमधले कर्मचारी कोणाचाही काही त्रास झाला नाही. सगळे अतिशय चांगले वागले. पुढे एका बस ड्रायव्हरने येऊन सांगितलं की 'पुरे बॅचमे आपका ग्रुपही हमसे तमिजसे बात कर रहा है..'. त्याला म्हटलं, आम्ही असू कितीही भारी पण ते आमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये, पण आत्ता तूच महत्त्वाचा आहेस ना.. आम्हांला थोडीच हिमालयात बस चालवता येणार आहे. त्यामुळे तमिज सोडून करणार काय? माझी आई नेहमी सांगते की बोलणं जरा गोड ठेवलं आणि हात थोडा सैल ठेवला की समोरचा सगळी मदत करतो. महत्प्रयासाने का होईना दोन्ही गोष्टी थोड्याफार जमवल्या खर्‍या! जीपचा तासभर प्रवास झाला आणि दरड कोसळून रस्ता बंद झालेला दिसला. थोडावेळ थांबलो पण बुल्डोझर यायची चिन्ह दिसेना. ढिगार्‍याच्या पलिकडेही काही जीप थांबलेल्या दिसल्या. मग केदारने जाऊन त्या जीपवाल्याला पटवलं आणि आम्ही त्या बाजूच्या जीपमध्ये आणि ते लोकं आमच्या जीपमध्ये असं साटंलोटं करून पुढचा प्रवास सुरू केला.

धारचुलाच्या गावात शिरता शिरता हे सुंदर इंद्रधनुष्य दिसलं. प्रवासाची रंगिबेरंगी सांगता झाली!

दिवस २० : धारचुला ते पिठोरागड

आता गालाच्या वाचलेल्या मुक्कामाऐवजी धारचुला ते दिल्ली प्रवासात पिठोरागड आणि जागेश्वर असे दोन मुक्काम होते. पुन्हा एकदा जागेश्वरला न जाता थेट पिठोरागड ते दिल्ली असा प्रवास करावा का ह्यावर बरच चर्वितचर्वण झालं पण काही जणांना जागेश्वरला दर्शन घेऊनच पुढे जायचं होतं. म्हटलं आता एव्हडं महाकैलासाचं दर्शन झालं की! पण शेवटी दोन्ही मुक्काम करायचे असं ठरलं.

धारचुलाहून पुन्हा एकदा त्या पाय ठेवायला जागा नसलेल्या बस मधून निघालो. धारचुला ते पिठोरागड प्रवासादरम्यान मिरथीचा कॅम्प लागला. आमच्या बॅचच्या कॉमन फंडमधून उरलेले पैसे आम्ही आयटीबीपीच्या शाळेला देणगी म्हणून दिले. मिरथीच्या कॅम्पवर पुन्हा एलओंनी बॅचतर्फे आयटीबीपी तसच केएमव्हिएनचे आभार मानले. आयटीबीपीतर्फे सगळ्या यात्रींना यात्रा यशस्वीपणे पूर्ण केल्याचं प्रशस्तीपत्रक तसच बॅचचा लॅमिनेट केलेला फोटो दिला गेला. हा समारंभही आयटीबीपीच्या शिस्तीत पार पडला.

पिठोरागडला चारच्या सुमारास पोहोचलो. पिठोरागड डोंगरदर्‍यांवर वसलेलं एकदम टुमदार गावं आहे. जिल्ह्याचं ठिकाण असल्याने मोठं आहे. संध्याकाळ मोकळी असल्याने आम्ही बाजारात चक्कर मारली. तिथेही आम्हांला बघून लोकं कुठून आलात, कश्यासाठी आलात वगैरे चौकशी करत होते. कैलासमानसला जाऊन आलो आहे म्हटल्यावर काहींनी फळं देऊ केली! एकंदरीत त्या बाजारात आम्ही प्रचंड खा खा केली. गरम गरम जिलब्या, भजी नंतर एका हॉटेलात चाट, डोसे, चायनीज जे काय असेल ते मागवून खाल्लं. नंतर एका मिठाईच्या दुकानात गेलो. श्यामला म्हटलं काय चांगलं असेल, तर तो म्हणे सगळच थोडं थोडं घेऊ. मग किलोभर वेगवेगळ्या प्रकारची मिठाई घेऊन तिचा फडशा पाड्ला. सौम्या आणि रानडे गेस्ट हाऊसलाच थांबले होते. उरलेली मिठाई त्यांच्यासाठी बांधून घेऊन आलो. ते म्हणे तुम्ही असे दुष्काळी भागातून आल्यासारखे काय खात सुटला आहात? त्या रात्री इंग्लंड विरुद्धची क्रिकेटची मॅच बघत बसलो.

दिवस २१ : पिठोरागड ते जागेश्वर

दुसर्‍या दिवशी पहाटे लवकर उठून जागेश्वरला जायला निघालो. आता तीन दिवसांत आम्ही घरी पोहोचणार होतो! जागेश्वर हे बारा जोतिर्लिंगांपैकी एक असं शंकराचं देवस्थान आहे. पिठोरागड ते जागेश्वर अंतर फार नाहीये. त्यामुळे दुपारपर्यंत पोहोचून जाऊ असा अंदाज होता. मात्र पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू होता. प्रवासाचा वेग कमी होता. प्रवास होता मात्र सुंदर. अगदी हिमालयातला प्रवास असतो तसा. मधे एकेठिकाणी झाड रस्त्यात पडलेलं होतं. ते आम्हीच मिळून बाजुला करून बस जाण्याइतकी जागा काढली.

अजून पुढे आलो तर दरड कोसळलेली दिसली. हा दरड मोठी होती आणि अजूनही वरून राडारोडा रस्त्यात येऊन पडतच होता. समजलं की बुल्डोजर येतो आहे. नंतर गावकरी सांगत आले की पुढे दोन अडीच किलोमिटरवर ह्यापेक्षाही मोठी दरड आहे आणि बुल्डोजर तिथे येऊन काम करत आहे. मग बस मधून उतरून चालत त्या दुसर्‍या दरडीपाशी गेलो.

तिथला ढिगारा खरच खूप मोठा होता आणि एका बुल्डोजरने तो हटेना. साफ केलं की पुन्हा वरून कोसळत होतं. मग त्यांनी दुसरा बुल्डोजर बोलावला. एलओने तिथेही उगीच नेतेगिरी करून त्या काम करणार्‍या लोकांना दरडावलं. मधे एक टपरी सापडली. तिथे चहा, मॅगी, भजी , बिस्कीटं असं काय काय मिळत होतं. केदार आणि फुडकमिटीने मिळून सगळ्या बॅचसाठीच चहा, खाणं मागवलं. तो टपरीवाला इतकी मोठी ऑर्डर बघून एकदम खुष झाला. म्हणे माझा जेव्हडा शिधा एक महिना पुरतो, तो आज एका दिवसातच संपणार आहे! आता खूप उशीर झालेला असल्याने आणि हवा चांगली नसल्याने खरोखरच जागेश्वरला जायचं की थेट भीमताल/ नैनिताल/काठगोदामला मुक्काम करायचा ह्यावर बरीच चर्चा झाली. एलओ सकट आमच्या कंपूचं म्हणणं होतं की पुढेच जाऊ. पण भक्तगणांनी जागेश्वरला जायचच म्हणून खूपच ओरडा केला. शेवटी एलओंनी सांगितलं की परिस्थिती पाहून जो काय निर्णय असेल तो मी घेणार आहे! केएमव्हिएन गाईड जोशीजींनी बरीच फोनाफोनी करून कुठे रहायची सोय होईल का ह्याची चौकशी केली. मग असं ठरलं की जर इथून निघायला बराच उशीर झाला तर जागेश्वरला रहायचं कारण ते जवळ आहे आणि त्यामुळे रात्रीचा प्रवास टळेल. ह्या सगळ्या फोनाफोनी दरम्यान एक रोमहर्षक घटना घडली. जोशीजींचा फोन बंद पडत होता. त्यामुळे ते मधेमधे माझा फोन वापरत होते, त्यामुळे कधी त्यांना येणारे फोन मी उचलत होतो, निरोप देत/घेत होतो, बोलणं अर्थातच हिंदीत सुरू होतं. सगळं बोलणं झाल्यावर त्यांनी मला विचारलं की तू कुठून आलास. मी सांगितल्यावर ते म्हणे, 'आपकी मातृभाषा हिंदी न होते हुए भी आप बोहोत अच्छा हिंदी बोल लेते है! आजकल ये देखनेको नही मिलता!' मी त्यांना म्हटलं तुम्ही प्लिज लगेच, आत्ताच्या आत्ता हे माझ्या घरी आणि मित्र-मैत्रिणींना फोन करून सांगा किंवा परत बोला म्हणजे मी ते रेकॉर्ड करून घेतो. एखाद्या 'तेहेजीब से' हिंदी बोलणार्‍या उत्तर प्रदेशीय माणसाने माझ्या हिंदीचं कौतूक केलेलं बघून मला एकदम 'सातवे आसमानपर' गेल्यासारखं वाटलं !!

आम्हांला इथे अडकून पडून आता जवळ जवळ साडेतीन तास झाले होते. तो दुसरा बुल्डोजर एकदाचा आला. तो जास्त शक्तीशाली होता. त्या दोघांनी मिळून वाहतूक सुरू होईल इतका रस्ता उघडला आणि मग आमच्या बसजवळच्या दरडीपाशी आला. तिथला आता ढिग वाढला होता. पण त्याने ते भराभर साफ केलं आणि अजून राडा यायच्या आत पुढे हला असं सांगितलं. वरून लहान लहान दगड असूनही पडतच होते. त्यामुळे बस तिथून जात असताना जरा भिती वाटली. ह्या दरडींमुळे आम्ही तब्बल सहा तिथे अडकून पडलो होतो आणि जेवणाच्या ठिकाणी पोहोचायला संध्याकाळचे साडेचार झाले. पाऊस अजून सुरूच होता. जेवणं आटोपून जागेश्वरला जायला सात वाचले. देऊळ आठला बंद होतं आणि त्याआधी आरती, पुजा असते. देवळातल्या पुजार्‍यांनी लगेच यायला सांगितलं. ह्या देऊळाच्या परिसरात खूप देवळं आहेत. एकंदरीत परिसर सुंदर आहे.

देवळाच्या गाभार्‍यातही छान, प्रसन्न वाटत होतं पण यात्रींनी जास्तितजास्त पुढे जाण्यासाठी चक्क धक्काबुक्की केली! गर्दी पांगल्यानंतर छान दर्शन झालं. आजचा प्रवास दरडीमुळे कंटाळवाणा झाला होता शिवाय उद्या दिल्लीपर्यंत मोठा प्रवास असल्याने आणि हवा चांगली नसल्याने पहाटे चार वाजता निघायचं होतं.

दिवस २२ : जागेश्वरे ते दिल्ली

सकाळी काही मंडळी पुन्हा देवळात जाऊन दर्शन घेऊन आली आणि आम्ही सव्वाचार साडेचारला निघालो. आज सात साडेसातच्या सुमारास नाश्ता अल्मोड्याला तर बाराच्या सुमारास जेवण काठगोदामला होतं. काठगोदामहून पुढे वॉल्वो बस मिळणार होती. एकंदरीत ह्या यात्रेमध्ये गणपतीबाप्पाचा फारच अनुल्लेख होतो. प्रवासाच्या सुरूवातीला 'हरहर महादेव', 'वीर बजरंगी जयवीर हनुमान', मग कुठली तरी दत्ताची घोषणा असं काय काय म्हणायचे पण 'गणपती बाप्पा मोरया' नाहीच! होमहवनाच्या सुरूवातीलाही गणेश पुजन झालं नाही. प्रत्येक गोष्टीची 'श्री गणेशाय नमः' ने सुरूवात करणार्‍या मराठी मंडळींना शेवटी शेवटी हे फारच जाणवायला लागलं. मग आज चौबळ साहेबांनी त्यांच्या मोबाईलवरची गणपतीच्या गाण्यांची मोठी प्लेलिस्ट ऐकवून सगळ्यांना गणपतीबाप्पाची आठवण करून दिली!

पाऊस सुरू होता परंतु तरीही वेळेत अल्मोड्याला पोहोचलो. पुन्हा पुरीभाजी किंवा छोले नको असं म्हणत असतानाच गरम गरम बटाट्याचे पराठे दिसले. सगळे अक्षरशः त्या पराठ्यांवर तुटून पडले. पुढचा प्रवास सुरू झाल्यावर कोणीतरी भजन म्हणायला सुरूवात केली. ते संपल्यानंतर आम्ही त्या भजनाचं शेवटचं अक्षर घेऊन कोणालातरी पुढचं भजन म्हणायला सांगितलं. अल्मोड्यापर्यंतच्या प्रवासात सगळ्यांची चांगली झोप झाली होती आणि आता पोटही भरलं होतं, शिवाय अंताक्षरीची झलक दिसल्यावर सगळे एकदम उत्साहात आले. बायका विरूद्ध पुरूष अश्या पार्ट्या पडून अंताक्षरी सुरू आणि मग लोकांनी जे काय सुर लावलेत त्याला तोड नाही. यात्रेदरम्यान 'ही असली' गाणी म्हणण्याचा भानुभाई पटेल, कृष्णा वगैरेंनी निषेध करायचा प्रयत्न केला पण त्यांना कोणी दाद दिली नाही. तिकडून निलम काकू, अंजू, हायमा, मयुरीबेन वगैरे तर इकडून केदार, मी, भीम, श्याम, अनिरुद्ध, मलकेशभाई वगैरे खिंड लढवत होतो. केदारने काही काही गाणी 'ऑन द फ्लाय' रचली. अंताक्षरीतली अजून एक मजा म्हणजे मी 'या अली' गाणं कडव्या आणि मधल्या म्युझिक सकट अगदी ताला सुरात म्हटलं आणि थोड्यावेळाने निलम काकूंनी तेच म्हणायला सुरूवात केली. त्यांना म्हटलं आत्ता हेच ते गायलं की पाच मिनीटांपूर्वी !! तर त्या अगदी दिल्ली ढंगात म्हणे 'हँ, वो ये गाना था, हमे पताही नही चला...' म्हटलं झालं, सगळं मुसळ केरात! हायमा मला आणि केदारला म्हणायला लागली की तुम्ही संगीताच्या क्षेत्रात न जाता आयटीत गेलात ते फार बरं झालं, नाहीतर भारतीय संगीत बंद पडलं असतं. ह्या अंताक्षरीमुळे प्रवास बराच सुसह्य झाला. पायांना होणारी अडचण जाणवली नाही, तसच कंटाळा आला नाही.

काठगोदामला समितीतर्फे पुन्हा एकदा हार, तुरे, सत्कार झाला. केएमव्हिएनतर्फे प्रशस्तिपत्रक आणि भेटवस्तू मिळाल्या. काठगोदामला व्हॉल्वोत बसलो. एव्हड्या मोठ्या लेगस्पेसचं करायचं काय ? पाय नक्की कुठे कुठे ठेवायचे ? असे प्रश्न पडायला लागले! काठगोदामपासून यात्री पांगायला सुरूवात झाली. रामनरेशजी उत्तराखंडातले असल्याने ते तिथूनच घरी गेले, रामसेवकजी रस्त्यात उतरून बिहारमधल्या त्यांच्या गावी गेले. आता खरच प्रवास संपल्याची जाणीव झाली आणि फारच रुखरुख वाटायला लागली.

ह्या प्रवासातही बसमध्ये बराच दंगा झाला. दिल्लीच्या बाहेर बराच ट्रॅफिक लागेल आणि आम्हांला उशीर होईल असा स्थानिकांचा अंदाज होता, पण चक्क फारसा ट्रॅफिक नव्हता. दिल्लीच्या जवळ आल्यावर एकदम ट्रॅफिक, गर्दी, आवाज, धुळ, धुर सगळ्याची जाणीव झाली. मजल दरमजल करत साडेसहा सातला गुजराथी समाजात पोहोचलो. तिथे परत हार, टिळे, आरती वगैरे झालं. दिल्लीकरांचे नातेवाईक त्यांना घ्यायला आले होते. सगळेच सगळ्यांचं अभिनंदन करत होते, जोरदार गप्पाटप्पा चालल्या होत्या. दिल्ली सरकार तसच परराष्ट्र मंत्रालयातर्फेही यात्रा पूर्ण झाल्याची प्रशस्तीपत्रक मिळाली. तेव्हा अंजू मला एकदम म्हणाली, 'जरा बताओ तो आप कहा तक पढे हो?' मी म्हटलं बापरे ही एकदम माझं शिक्षण का काढायला लागली. सांगितल्यावर म्हणे 'क्या वो पढाई खतम होने पर भी इतने सर्टीफिकट्स मिले थे ? जितने यहा मिल रहे है ?' ते मात्र खरं होतं अगदी! आरतीनंतर प्रसाद म्हणून खूप भारी चवीची रबडी मिळाली. केदार आणि रानड्यांनी खूप गोड खूप गोड करत खाल्ली नाही आणि माझ्याकडे बरेच तुच्छ कटाक्ष टाकले. पण मी अजिबात लक्ष न देता दिलेली सगळी संपवली.

सामानाचा ट्रक आल्यावर दिल्लीकर निघायला लागले. घरी जायची ओढ सगळ्यांना होतीच पण ते निरोप घेणं नको वाटत होतं. सौम्या, अंजू, निलम काकू वगैरे मंडळी घरी गेली. रानडे त्यांच्या मित्राकडे गेले. आम्ही खोलीत येऊन दुसर्‍या दिवशीच्या विमान प्रवासाच्या दृष्टीने सामान बांधून टाकलं. केदार एकंदरीत त्या दिवशी गुजराथी समाजात झालेल्या आरती, पुजा वगैरेला बराच वैतागला होता. म्हटलं नको त्रास करून घेऊस. आता एकच रात्र फक्त!

दिवस २३ : दिल्ली ते पुणे आमचं विमान दुपारचं होतं त्यामुळे सकाळी वेळ असल्याने मायबोलीकर अल्पनाला भेटायचं ठरलं होतं. आम्ही लवकर पोहोचल्याने चांदनी चौकातलं गालिबचं घर बघायला गेलो. नंतर हल्दीराममध्ये अल्पनाला भेटलो. ती फोटोतल्या पेक्षा फारच वेगळी दिसते. त्यामुळे आम्हांला वाटलं की तोतया अल्पना आली की काय. भीमही आमच्याबरोबर होता. फक्त एका वेबसाईटवरच्या ओळखीवर एकटी मुलगी दोन अनोळखी मुलांना भेटायला आली आणि भेटल्यानंतर आम्ही तिघेही वर्षानुवर्षांची ओळख असल्यासारख्या गप्पा मारतो आहोत ह्याचं त्याला आश्चर्य वाटलं! त्याला म्हटलं ओळख आहेच वर्षानुवर्षांची, फक्त प्रत्यक्ष भेटलो नव्हतो कधी. केदार आणि अल्पनाचं मराठवाडा कनेक्शन असल्याने त्यांच्या बर्‍याच ओळखी निघाल्या. हल्दीराममध्ये दहीभल्ले, कचोरी वगैरेंवर ताव मारला.

नंतर परत खुर्चन मिळवायचा प्रयत्न केला पण ते नसल्याने रबडीवर समाधान मानून घेतलं.

मला घरी नेण्यासाठी मिठाई घ्यायची होती. केदारने तसं करण्यापासून मला परावृत्त करायचा बराच प्रयत्न केला. शिवाय अल्पनाने दिल्लीतली मिठाई कशी ओव्हररेटेड असते, आम्ही कशी घेत नाही वगैरे मुद्दे मांडून त्याला माफक साथ दिली. शेवटी मी म्हटलं तुमच्या मराठवाड्यात कायमच दुष्काळ असल्याने तुम्हांला गोड खायची सवय नाही. तेव्हा मला घेऊ द्या. अल्पनाने दुकान आणि मिठाईबाबत चांगल्या सुचवण्या केल्या. दोड्डा बर्फी आणि घिवर फार अप्रतिम होतं! परतीचा विमानप्रवास विनासायाय पार पडला. मी झोपायचा, वाचायचा प्रयत्न केला पण काहीच जमलं नाही. महिन्याभराच्या प्रवासातल्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या. शिवाय कधी एकदा रियाला भेटतो असं झालं होतं. एअरपोर्टवर सगळ्यात शेवटचा निरोप केदारचा घेतला. आम्ही दोघांनीच 'नम: पार्वतीपदे.. ' ची घोषणा दिली. आई, वहिनी, शिल्पा आणि रिया घ्यायला आल्या होत्या. मी महिनाभर दाढी केली नव्हती, केस वाढले होते आणि बराच बारीकही झालो होतो (म्हणे) त्यामुळे त्यांनी मला दुरून ओळखलच नाही! रियानेही 'मी बाबाला ओळखलं नाही' असं जाहिर करून टाकलं पण जरावेळाने माझ्याकडे आली. तिला उचलून घेतल्यावर अगदी बरं वाटलं. माहिनाभराचे सगळे श्रम पळून गेले पण अतिशय सुंदर,अविस्मरणीय आणि हव्याहव्याशा वाटणार्‍या अश्या यात्रेच्या आठवणी मात्र कायम राहिल्या!

कैलास मानससरोवर यात्रा: भाग ६ - मुक्कामपोस्ट मानससरोवरबस निघायच्या आधी तिथे संपूर्ण बॅचचा ग्रुप फोटो काढावा अशी टुम निघाली पण सगळे त्यावेळी इतके प्रचंड उत्साहात होते की सगळ्यांना एका जागी जमा करणं शक्यच झालं नाही. तिबेटी पोर्टर आणि घोडेवाल्यांना निरोप द्यायची वेळ आली होती. आम्ही त्यांचे पैसे आधीच दिलेले होते. त्यामुळे आमच्या जवळचा थोडाफार खाऊ आणि बक्षिशी त्यांना दिली. काही पोर्टर मुली आमच्या बरोबर बसने दार्चेन गावापर्यंत आल्या. ह्या सगळ्या गडबडीत केदारचा मोबाईल हरवला. म्हणजे झालं असं की रघू की कोणाचा तरी मोबाईल सापडत नव्हता म्हणून त्याबद्दल बोलणं चाललं होतं म्हणून केदारने आपला मोबाईल आहे ना हे चाचपून बघून तो जॅकेटच्या खिशात ठेवला आणि तो खिशातून बसमध्ये पडला. एक पोर्टर सिटखाली काहीतरी गोळा करत होती हे आम्ही पाहिलं. कदाचित आमच्यापैकी कोणाचा नसेल असं समजुन तिने बहूतेक तो उचलला. पण झालं असं की आमचा सगळ्यांचाच घरच्यांशी संपर्क तुटला कारण आम्ही केदारच्या मोबाईलवरून मेट्रीक्स कार्ड वापरायचो. पुढे एकदा चौबळ साहेबांचा मोबाईल आम्ही वापरला पण भारतात परतेपर्यंत घरी फारसं बोलणं झालच नाही. परिक्रमेदरम्यान आमचं मुख्य सामान आम्ही दार्चेनला ठेवलं होतं. ते घेण्यासाठी बस दार्चेनला थांबली. तिथे बॅचमधल्या एका ज्येष्ठ नागरिकांना गुरू काहीतरी उद्धटपणे बोलला. श्यामने त्याला त्यावरून हटकल्यावर त्याच्या आत्तापर्यंत आमच्यावर असलेल्या रागाचा विस्फोट झाला आणि तो काय वाट्टेल ते बोलायला लागला. तुमच्यावर 'अँटी चायना अ‍ॅक्टीव्हिटीज'चा आरोप लाऊन तुरूंगात टाकेन वगैरेही बोलला. पुढे तर शर्टाच्या बाह्या सरसावून श्यामच्या अंगावर धाऊन जाण्यापर्यंत त्याची मजल गेली. केदार आईल सिटवर असल्याने गुरूला येताना बघून तो श्याम आणि त्याच्या मधे उभा राहिला म्हणून पुढचा प्रकार टळला. नंतर आमचे एलओ उगवले आणि त्यांनी सगळ्यांना शांत केलं. वास्तविक परिस्थिती इतकी पराकोटीला जाईपर्यंत ते स्वस्थ का बसले होते काय माहित!

इथून पुढे ९५ किलोमिटरचा प्रवास छान होता. निवांत बसमध्ये बसून आसपासच्या प्रदेश पहात होतो. थोड्यावेळाने मानससरोवरा काठून प्रवास सुरू झाला. हा रस्ता झाल्यापासून मानस परिक्रमा बसने होते अन्यथा ही पण पायी करावी लागायची. इथे जवळच सिंधू नदीचा उगम आहे. तसच मानस सरोवर आणि राक्षसताल ह्यांना जोडणारा एक लहानसा प्रवाह आहे. पण गुरू आम्हांला तिथे घेऊन जायची अजिबात शक्यता नव्हती त्यामुळे आणखी अपमान करून घेण्यापेक्षा आम्ही त्याला विचारलच नाही. तसही पुढच्यावेळी पुन्हा तिथे जाण्यासाठी काही निमित्त पाहिजे ना! मधे एक लहान गाव लागलं. तिथे भाज्या वगैरे घेता आल्या असत्या. पण मधले एक दोन दिवस सकाळचं जेवणं केलेलच नसल्याने त्यावेळसाठी घेतलेल्या भरपूर भाज्या आमच्याकडे शिल्लक राहिल्या होत्या.

रस्त्याच्या एका बाजूला मेंढ्याचा एक मोठा कळप दिसला. खरतर इथलं मुख्य जनावर म्हणजे याक. पण हल्ली मेंढ्या आणि घोडेही सामान वाहतूकीसाठी वापरले जातात. ह्याबद्दल एक रोचक माहिती कळली. विरळ हवेमुळे इथे गवताचं प्रमाण कमी आहे. म्हणजे आपल्या इथे हिमालयात जसं खूप गवत किंवा हिरवळ असते तसं इथे नसतं. मधे मधे पट्टे असतात. याक जेव्हा चरतं तेव्हा आपल्या धारदार जिभेचा 'लॉन मोवर' सारखा उपयोग करून फक्त वरवरचं गवत कापून खातं पण मेंढ्या किंवा घोडे/खेचरं गवत मुळापासून उपटून खातात. त्यामुळे त्यांचा कळप चरून गेला की तिथला गवताचा पट्टा नाहीसा होऊन जातो आणि तो परत उगवायला बरेच दिवस जातात आणि मग आसपासच्या परिसरात चार्‍याचा तुटवडा जाणवतो. नैसर्गिक गोष्टींचा विरुद्ध केलेल्या गोष्टी कश्या अपायकारक ठरू शकतात ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे.

दोन अडीच तासाच्या प्रवासानंतर कुगूचा कॅम्प आला. हा कॅम्प अतिशय सुंदर आहे. मानससरोवराच्या अगदी काठावर आणि प्रत्येक खोलीच्या मोठ्या खिडकीतून मानससरोवर आणि त्या पाठीमागे कैलास दिसत रहातो. कॅम्पच्या बाहेर एक सुंदर मॉनेस्ट्रीपण आहे. आजही स्वच्छ ऊन पडलं होतं. त्यामुळे पवित्र स्नानाचा कार्यक्रम आज होता. आमचे स्वैपाकी स्वैपाकाला लागले आणि जेवण तयार होईपर्यंत आम्ही अंघोळी करून घ्याव्या असं ठरलं. कॅम्पपासून उजव्या बाजूला थोडं पुढे जाऊन आम्ही पाण्यात उतरलो. पाणी अति म्हणजे अति थंड होतं. पहिली डुबकी मारल्यावर डोळ्यासमोर तारे, मेंदूत झिणझिण्या, सर्वांगातून शिरशिरी वगैरे सगळे प्रकार झाले. तीन डुबक्या माराव्या म्हणतात. बाहेर येऊन कोरडं झाल्यावर बरं वाटलं. पापांचा घडा रिकामा झाला!

जेवणं झाल्यानंतरचा उद्योग म्हणजे खोलीच्या खिडकीतून कैलास आणि मानससरोवराकडे बघत बसणे. बसल्याजागून इतकं सुंदर दृष्य दिसत होतं की बाहेर जायचीही आवश्यकता नव्हती. केदार आणि रघू थोडावेळ पूल खेळून आले. संध्याकाळी एलओने मिटींग बोलावली होती. दुसर्‍या दिवशी आम्ही मानससरोवराच्या काठी होमहवन आणि पुजा करणार होतो, त्याची ठरवाठरवी करायची होती. कोणीतरी टुम काढली की होमहवनाच्या आधी मानस सरोवरात अंघोळ करायची आणि पुजेआधी नाश्ता करायचा नाही. मानस सरोवरात अंघोळ करायची तर अकरा वाजेपर्यंत थांबावं लागलं असतं कारण तोपर्यंत पुरेसं ऊन पडत नाही. त्याबद्दल आमची काही हरकत नव्हती पण नाश्ता करायचा नाही हे चालणार नव्हतं. आधीच कैलास परिक्रमेदरम्यान खाण्याचे जरा हाल होऊन लोकांना अ‍ॅसिडीटीचा, उलट्यांचा त्रास झाला होता आणि तिथे पुन्हा भुकेलं राहून तब्येत बिघडवणं परवडण्यासारखं नव्हतं. काही गुज्जू मंडळींचं सुरू झालं की इतक्या दुर आलात तर जरा भुक धरवत नाही का वगैरे. मी मिटींगमध्ये विचारलं की जर आम्ही नाश्ता केला आणि पुजेला बसलो तर तुमच्या पुजेत काही बाधा येणार आहे का किंवा विटाळ वगैरे होणार आहे का ? तर सगळे म्हणाले नाही तसं काही नाही. म्हटलं मग ज्यांना खायचं त्यांना खाऊ द्या, तुम्ही कशाला मधे पडता. मग जेव्हडे लोक नाश्ता करणार आहेत त्यांच्या पुरता नाश्ता बनवायचा असं ठरलं. जवळ जवळ पंचवीस जणांनी नाश्ता करण्याला होकार दिला !! ह्यावेळी गुरूच्या वर्तनाबद्दलही चर्चा झाली. सगळ्या यात्रींनी मिळून एलओंना लेखी तक्रार नोंदवायचं ठरवलं आणि त्यानुसार एलओ चिन मधल्या भारतीय उच्चायुक्त्ताकडे तक्रार करणार असं ठरलं.

मानससरोवरामध्ये रात्री चमत्कार पाहायला मिळतात असं म्हणतात. कैलास तसच गुर्लामांधाता पर्वतावर रहाणारे यक्ष आणि किन्नर रात्री स्नानासाठी मानससरोवर येतात आणि त्यामुळे रात्रीच्या वेळी कैलास पर्वतावरून निघुन मानससरोवरात उतरणारे प्रकाश किरण दिसतात. त्यामुळे हे पहाण्यासाठी रात्री जागायचं होतं. फक्त एकच गोष्ट होती की आज पौर्णिमेची रात्र होती. त्यामुळे खूप चंद्रप्रकाश होता. जितका अंधार जास्त तितके तो प्रकाश दिसायची शक्यता अधिक असते. संध्याकाळी जेवणं झाल्यावर एलओचा दरबार भरला. त्यांनी दिल्लीतल्या निवडणूका किंवा त्याआधीच्या घडामोडींवरच्या बर्‍याच गोष्टी सांगितल्या.

रात्रे साडेदहा अकराच्या सुमारास आम्ही बाहेर सरोवराच्या काठी जाऊन बसलो. थंडी बरीच होती. त्यामुळे बरेच कपडे घालावे लागले. माझ्याकडे ट्रायपॉड होता, त्यामुळे आज रात्रीचे फोटो काढायची चांगली संधी होती. आम्ही कॅमेर्‍याच्या सेटींग्ज बद्दल बरीच बडबड करत होतो पण आमच्या बडबडीमुळे ते यक्ष आणि किन्नर येत नाहीयेत असं वाटून बाकीचे लोक वैतागत होते. खरं म्हणजे आम्ही ज्या दिशेला बघत होतो तिकडे आता रस्ता बांधलेला आहे. त्यामुळे मधूनच एखादा वाहनाचा दिवा दिसायचा. पण पार्वते वगैरे मंडळींनी त्याच दिव्यांना दिव्य प्रकाश समजून दुसर्‍या दिवशी चाळीस वेळा तसा प्रकाश दिसल्याचं सांगितलं! आम्ही अर्थातच त्याला काहीही सांगायच्या फंदात पडलो नाही. माझ्या कॅमेर्‍यामधून शटर स्पीड कमी करून बरेच फोटो काढले. केदारने बर्‍याच उपयुक्त सुचना, सुचवण्या केल्या. ट्रायपॉडवर कॅमेरा बसवण्या-काढण्यात मी आणि भिमाने जरा शक्ती प्रयोग केले त्यामुळे ट्रायपॉड खराब झाला आणि केदारचा कॅमेरा त्यावर बसेचना. खरतर केदारकडे खूप चांगल्या लेन्स होत्या, त्यामुळे तो कॅमेरा ट्रायपॉडवर बसवता आला असता तर अजून बरेच प्रयोग करून मस्त फोटो काढता आले असते. दरम्यान कोणीतरी चहाची सोयही केली. चांदण्या रात्री, मस्त थंडीत, निरव शांततेत, मानससरोवराच्या काठी, कैलास पर्वताच्या समोर गरम गरम चहाचे घोट घेत, इतर कसलीही काळजी, घाई, गडबड नसताना निव्वळ आजुबाजूचं दृष्य न्याहाळत रहाण्यासारखं दुसरं सुख नाही! ह्या केवळ ह्या दहा-पंधरा मिनीटांसाठीही प्रवासादरम्यान झालेले सगळे कष्ट अगदी सत्कारणी लागल्यासारखं वाटलं. अडीच तीन पर्यंत जागूनही दिव्य प्रकाश वगैरे न दिसल्याने मी खोलीत परतलो. खोलीतूनही बाहेरच दृष्य दिसत होतच. त्यामुळे पुन्हा थोडावेळ खिडकीपाशी रेंगाळलो आणि कधीतरी उशीरा झोपलो.

हे फोटो रात्री दिड दोन वाजता काढलेले आहेत.

चमत्कार बघण्यासाठी बसलेले यात्री :

दुसर्‍या दिवशी उठायची घाई नव्हती. अंघोळ, पुजा उशीरा उन्हं वर आल्यावर होती. पुजेमध्ये सहभागी व्हायचं की नाही ह्यावरून आमच्या कंपूमध्ये बरीच बोलाचाली झाली. मी पुजेत भाग घ्यायचा हे आधीच ठरवलेलं होतं. बाकीच्यांचं मात्र ठरत नव्हतं. दुसरे सांगतात किंवा करतात म्हणून सगळ्याच धार्मिक गोष्टी मी करत नाही. पण मला पटतील आणि ज्या करून बरं वाटतं अश्या गोष्टी मी करतो. शिल्पाचही तसच आहे. पण मानससरोवराच्या काठी करणार्‍या होमहवनात मी सहभागी व्हावं अशी तिचीही इच्छा होती आणि त्यापुढे एक पायरी म्हणजे मी सोवळं नेसून ती पुजा करावी असा तिचा ठाम आग्रह होता !! हे (खुळ) तिच्या डोक्यात कुठून आलं होतं ते माहित नाही पण तिचा युक्तीवाद असा होती की आपण ठराविक प्रसंगी/ठिकाणी ठराविक प्रकारचे कपडे घालण्याबाबत आग्रही असतो जसं की ऑफिसमध्ये फॉर्मल, पार्टीला कॅज्युअल, खेळताना किंवा ह्या प्रवासासाठी ड्राय फिट वगैरे तर मग पुजेला बसायचं तर ट्रॅक सुट का? सोवळं का नको! म्हटलं ठिक आहे, महिनाभर मला तिथे जाऊ देणार असशील तर हा एक हट्ट पुरा करायला माझी काही हरकत नाही. फक्त ते सव्वा दिड किलो वजनाचं सोवळं वागवायला जरासा त्रास झाला. काही काळ ते केदारच्या सामानातही ठेवावं लागलं त्यामुळे होमहवनातलं माझ्या वाटच थोडं पुण्य केदारलाही मिळालं असेल.

उन्हं वर आल्यावर पुन्हा एकदा मानससरोवरात डुबक्या मारल्या. कालच्या अंघोळीमधून काही पापं निसटली असतील तर ती पण धुवून निघाली. नंतर ते सोवळं नेसणं ह्या प्रकारावरून बर्‍याच गंमतीजमती झाल्या. रानडे आणि केदार म्हणायला लागले की ह्या खोलीत इतकं सामान आणि त्यात एक जण तयार होतो आहे हे म्हणजे अगदी लग्न घरासारखं वाटतं आहे. म्हटलं पण प्लीज मला परत एकदा बोहोल्यावर चढवू नका. एका स्त्रीहट्टामुळे हे सोवळं नेसायाला लागतं आहे, दुसरी काय करायला लावेल माहित नाही! बाहेर येऊन बघतो तर सगळे जण ठेवणीतले चांगले, स्वच्छ कपडे वगैरे घालून, नीट तयार होऊन आले होते. बर्‍याच जणांनी साड्या, झब्बे, धोतरं वगैरेही आणली होती. अगदी सणासुदीसारखं वाटत होतं. मानससरोवरा काठी होमकुंड बांधलेलच आहे. त्यामुळे ते सोडून इतर ठिकाणी पुजा करून परिसर घाण करू नये अशी अपेक्षा असते आणि ती रास्त आहे. आमच्या बॅचमधले रामनरेशजी बॅचचे पंडीत म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे तेच पुजा सांगणार होते. आपल्याकडे कशी प्रत्येक पुजेची सुरुवात गणपतीच्या पुजेपासून होते तशी उत्तर भारतीय लोकं करत नाहीत. त्यांनी एकदम नवग्रहांची पुजा सुरू केली. एकंदरीत होमहवन त्यांनी खूप व्यवस्थित पार पाडला. प्रत्येक विधीचा अर्थ समजावून सांगत होते आणि शिवाय पुजा खूप लांबवलीही नाही. एकंदरीत प्रसन्न वातावरणात सगळं पार पडलं. आमच्या कंपूतला सौम्या वगळता सगळेजण नाही नाही करत करत पुजेला बसलेच, मग आधी इतकी चर्चा कशाला केली काय माहीत. अर्थात तिथे चर्चा करण्याव्यतिरिक्त दुसरं काही फारसं करण्यासारखं नव्हतच म्हणा! पुजा झाल्यावर, प्रसाद म्हणून जर कोणी काही आणलं असेल तर त्याचा नैवेद्य दाखवला. आम्हांला दिल्लीत गुजराथी समाजातर्फे पुजेच्या सामानाचा डबा मिळाला होता. त्यात प्रसादाचं पाकीट होता. त्याचा नैवेद्य इथे दाखवणं अपेक्षित होतं म्हणे. पण आम्ही मात्र हुशारी करून ती पाकीटं आधीच्या प्रवासातच खाऊन संपवली होती! मग आम्ही इतरांचाच प्रसाद गोड मानून घेतला. आज जेवायचा शिरा पुरीचा स्पेशल बेत होता. गुरूपौर्णिमेच्या दिवशी मानससरोवराकाठी पुजा करायला मिळाली म्हणून सगळे भक्तगण एकदम खुषीत होते. पौर्णिमेमुळे इतर बॅचच्या बर्‍याच लोकांनी बॅच बदलून आमच्या बॅचमध्ये यायचा प्रयत्न केला होता म्हणे. आणखीन एक गोष्ट म्हणजे, कैलास परिक्रमेचे 'आऊटर कोरा' आणि 'इनर कोरा' असे दोन प्रकार असतात. आम्ही जी परिक्रमा केली ती आऊटर कोरा होती. इनर कोरा कैलास पर्वताच्या अजून जवळून आणि आतल्या बाजुला आहे. बारावेळा आऊटर कोरा केल्यानंतर यात्री इनर कोरा साठी पात्र ठरतात. मात्र यंदा 'हॉर्स इयर' असल्याने आम्ही एकदा आऊटर कोरा करूनही इनर कोरासाठी पात्र ठरलो आहोत. एकंदरीत बर्‍याच दृष्टीने आमची बॅच भाग्यवान होती तर.

दुपारी कॅम्प बाहेरची मॉनेस्ट्री पाहून आलो. आतमध्ये खूप सारे तेलाचे दिवे लावले होते. त्या दिव्यांच्या प्रकाशात बुद्धमुर्ती फार सुंदर दिसत होती.

आजची संध्याकाळ कैलास तसेच मानससरोवराच्या सानिध्यातली आमची शेवटची संध्याकाळ. त्यामुळे उजेड असेपर्यंतचा सगळा वेळ बाहेरच घालवायचा ठरवून आम्ही मानससरोवराच्या काठाने दुरवर फिरून आलो. आपल्याइथे जसं बोकड कापतात तसं इथे याक कापून देवाला अर्पण करतात. अर्थात हे अगदी खास प्रसंगीच केलं जातं. त्या याकचं डोकं ज्याला मिळतं तो भाग्यशाली समजला जातो. नंतर त्या याकची शिंग देवळाबाहेर वगैरे मांडून ठेवली जातात. याकच्या शिंगांच्या अश्या चळती बर्‍याच ठिकाणी बघायला मिळतात.

बर्‍याच विषयांवर भरपूर गप्पा झाल्या. उद्यापासून आमच्या परतीचा प्रवास सुरू होणार होता. घरी जायची ओढ होतीच पण आता हा प्रवास संपत आल्याची जाणीव झाल्याने सगळ्यांनाच जरा वाईट वाटायला लागलं होतं. संपूर्ण संध्याकाळ मानससरोवराकाठी घालवून डोळे आणि मन भरून तो परिसर पाहून घेतला. सामानाची बांधाबांध केली आणि आज फारसे जाग्रण न करता किंवा चमत्कार बघायची अपेक्षा न करता वेळेत झोपायला गेलो. कुगूच्या कॅम्पची उंची खरतर कैलास परिक्रमेमधल्या कॅप्सच्या तुलनेत कमी होती. पण कुगूला दोन्ही दिवशी रात्री श्वास घ्यायला जरा त्रास होता. खूप दीर्घ श्वास घ्यावे लागत होते. नंतर आम्ही खोलीचं दार उघडं ठेवलं होतं जेणेकरून खोलीतल्या ऑक्सिजनची पातळी खाली जाणार नाही.

दिवस १६ : कुगू ते तकलाकोट अंतर: ६५ किमी.

आजचा बसचा प्रवास छोटासा होता. तकलाकोटच्या जवळ सरदार झोरावरसिंगच्या स्मारकापाशी थांबलो. झोरावरसिंग हे काश्मिरच्या राजाचे सेनापती. त्यांनी स्वांतत्र्यापूर्वीच्या एका युद्धात हा सगळा परिसर जिंकून घेतला होता. मात्र तेव्हा संपर्क सुविधांच्या अभावी राजापर्यंत त्यांना ही बातमी पोहोचवताच आली नाही आणि नंतर ते काश्मिरला परतत असताना हिवाळी हवामानामुळे त्यांचा मृत्यू झाला. अन्यथा हा सगळा परिसर आज काश्मिरचा आणि पर्यायाने भारताचा भाग असता. विजयानंतर झोरावरसिंगांनी स्थानिक जनतेवर कोणतेही अन्याय किंवा अन्याय केले नव्हते. त्यामुळे ह्या स्थानिक जनतेने त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे स्मारक इथे बांधले आहे.

चिनी सरकारने तकलाकोटच्या आसपास शेतीचे अनेक प्रयोग सुरू केले आहेत. थेट पंजाबची आठवण करून देणारी सरसोची शेते इथे हल्ली बघायला मिळतात. झोरावरसिंग स्मारकापाशी असच एक टवटवीत शेत पहायला मिळालं.

नंतर तकलाकोटहून पुढे १०-१५ किलोमिटरवर असलेलं एक बुद्धीस्ट देऊळ बघायला गेलो. ह्या देवळात राम, सिता आणि लक्षमणाच्या हिंदू तसेच बौध्द धर्मिय मुर्ती आहेत. हिंदू मुर्ती म्हणजे आपल्या देवळांमध्ये असतात तश्या तर बौद्ध मुर्तीमध्ये त्यांची आयुधं, आभुषणं वेगळी आहेत. ह्या देवळाचा परिसर खूप सुंदर होता. आपल्या इथे जश्या आज्या सकाळी आन्हिकं आटोपून देवळात जातात तश्या अनेक तिबेटी आज्या देवदर्शनासाठी आलेल्या दिसल्या. इथे ह्या देवळातर्फे याकच्या दुधातला चहा दिला.

बाराच्या सुमारास हॉटेलवर पोहोचलो. जाताना आम्हांला जुन्या इमारतीत खोली मिळाली होती. त्यामुळे आज आम्हांला नवीन इमारतीतली खोली दिली. खोलीत येऊन हिटर सुरू केला आणि आधी गरम पाण्याच्या शॉवरने अंघोळ केली. तकलाकोटहून निघाल्यापासून मानससरोवरातल्या डुबक्या वगळता अंघोळ केलीच नव्हती. त्या गरम पाण्याच्या शॉवरने इतकं बरं वाटलं की त्यासाठी चिन्यांचे अगदी शंभर नाही पण निदान एक दोन अपराध तरी माफ! तकलाकोटचा आजचा दिवस पूर्ण मोकळा होता. पुन्हा एकदा बाजारात चक्कर मारली. जरा फुटकळ खरेदी केली. घराची ओढ लागलेली असल्याने तसेच प्रवासातले सगळे मुख्य टप्पे पूर्ण झालेले असल्याने आज खूप बरं वाटत होतं. हॉटेलमधल्या कॅफेत सहज चक्कर टाकली तर तिथली बाई 'इंदो कॉफी' हवी आहे का असं विचारायला लागली. म्हणजे काय विचारलं तर तिने नेस कॅफेची बाटली दाखवली. छान गरम कॉफी घेऊन खोलीत परतलो. केदार आणि कंपनीने हिशोबाची कामं संपवली. स्वैपाक्यांची पैसे देणे, जमाखर्च मांडणे, शिलकीच्या पैशांचं काय करायचं हे ठरवलं. टोपीवाल्याने ५०० युवानांचा घोळ घालून ठेवला होता. केदार कडून पैसे घेतले आणि परत देताना फूड कमिटीला देतो असे सांगून दिलेच नाहीत! हिशोबाच्यावेळी ते लक्षात आलं. ह्यावेळी मात्र केदारने त्याची चांगलीच कान उघडणी केली. आम्ही तकलाकोटला आलो त्यावेळी नाभीढांगहून निघाल्यापासून जवळ जवळ १२ तास काहीच खायला मिळालं नव्हतं. उद्या येणार्‍या बॅचचे असे हाल होऊ नयेत म्हणून आम्ही आमच्या कॉमन फंडातल्या उरलेल्या पैशांमधून त्यांच्यासाठी ज्युसच्या बाटल्या, बिस्कीटे, फळे वगैरे आणून ती बसमध्ये ठेऊन द्यायचं असं ठरलं. त्याप्रमणे ती खरेदी केली.

आज रात्री जर्मनी विरूद्ध अर्जेंटीना अशी फुटबॉल फायनल होती. मॅच दाखवणारा चॅनेल शोधून झोपायला गेलो. उद्यापासून परतीचा प्रवास सुरू होणार होता. लिपुलेखपासमध्ये सीमा ओलांडून भारतात परतायचं होतं. संपूर्ण यात्रेतला सगळ्यांत मोठा म्हणजे तब्बल २८ किलोमिटरचा ट्रेक होता आणि त्याआधी १ वाजता उठून फायनल बघायची होती. एकंदरीत मोठा दिवस असणार होता !

क्रमशः

कैलास मानससरोवर यात्रा: भाग ५ - कैलास परिक्रमा

दिवस ११ : तकलाकोट ते दार्चेन. अंतर: १०२ किमी. उंची: १५३२०फूट / ४६७०मिटर

आजपासून परिक्रमा सुरू होणार होत्या त्यामुळे सगळे उत्साहात होते. इथून पुढे मुख्य सामान ट्रकमधून वाहून नेलं जातं. ते आदल्या दिवशीच ट्रकमध्ये बांधून टाकलं होतं. नाश्ता करून सकाळी साडेआठ वाजता बसने निघालो. आज फक्त बसचा प्रवास होता. दार्चेन ह्या गावी कैलास परिक्रमेचा बेस कॅम्प आहे. नेपाळ मार्गे येणारे यात्री तकलाकोटला न येता एकदम दार्चेनलाच येतात. तकलाकोट शहराच्या बाहेर पडल्यावर ड्राय माऊंटन्स आणि टिपीकल तिबेटी दृष्ये दिसायला लागली. रखरखीत डोंगर, गवताचं एकही पातं नसलेली वाळूमय जमीन, निळशार आकाश, त्यात मधे मधे पांढर्‍या ढगांनी तयार झालेल्या नक्ष्या आणि अधून मधून दर्शन देणारी दुरवरची बर्फाच्छादित शिखरं. खरंतर प्रत्येक दृष्यच फोटो काढण्याजोगं होतं. पण हलत्या बसमधून कसरत करण्यापेक्षा तो परिसर डोळेभरून पाहून घेतला. साधारण तासभराच्या प्रवासानंतर राक्षसताल जवळ आल्याचं कळलं. ह्या परिसरात मानससरोवर आणि राक्षसताल अशी दोन सरोवरं आहेत. राक्षसतालाच्या काठी बसून रावणाने शंकराची तपश्चर्या केली आणि शिवलिंग प्राप्त केलं अशी आख्यायिका आहे. आपलं आणि रावणाचं जमत नसल्याने राक्षसताल पवित्र मानला जात नाही. (श्रीलंकन यात्रेकरू इथे येतात का ह्याची चौकशी केली पाहिजे!) इथे कोणी आंघोळी करत नाही किंवा तीर्थ घेत नाही. एक वळण घेऊन बस राक्षसतालाच्या काठी थांबली. स्वच्छ सुर्यप्रकाश आणि निरभ्र आकाश असल्याने राक्षसतालाचं पाणी निळशार दिसत होतं! शिवाय पाण्याच्या पातळीपासून जरा वर होतो त्यामुळे दृष्य अगदी छान दिसत होतं. हा ताल अतिशय सुंदर आहे. उगीच नाही रावणाला ह्या परिसराची भुरळ पडली!

कितीही फोटो काढले तरी समाधानच होत नव्हतं. वेगवेगळे कोन, जागा, सेटींग्ज करत करत बरेच फोटो काढले. ग्रुप फोटोही काढले. आमच्या बॅचमध्ये नुकतच लग्न झालेला एक प्रभू नामक मनुष्य होता. तो दिसेल त्या प्रत्येक जागेसमोर उभं राहून स्वतःचे फोटो काढून घेत असे. त्याचं म्हणण की कुठल्याही जागेचे गुगलवर खूप फोटो सापडतात, त्यामुळे स्वतःचा फोटो काढणं महत्त्वाचं! अर्थातच बरोबरच्या लोकांना कामाला लावत असे. इथे त्याने स्वतःचे सुमारे ५० तरी फोटो काढले असतील! राक्षसतालाचं पाणी मानसिक रोगांवर गुणकारी असतं कोणीतरी म्हणत होतं. खरं खोटं रावण जाणे.

इथून पुढे दार्चेनपर्यंत जो रस्ता जातो तोच हा काराकोरम हायवे. जो चिनने तिबेटमधल्या ल्हासापासून, पाकव्याप्त काश्मिरातून नेऊन पुढे काराकोरम पर्वतरांगांमधून ताश्कंदपर्यंत नेला आहे. अतिशय उत्कृष्ठ दर्जाचा हा हायवे सीमेपासून खूपच जवळ आहे. ह्यामुळे चिनला सैन्याची हालचाल करणं खूपच सोईचं झालं आहे आणि भारतासाठी ते खूपच धोकादायक आहे. तिबेट आणि पाकव्याप्स काश्मिरातल्या ह्या बांधकामाबद्दल आपण कडक निषेध करण्याशिवाय काहीच करू शकलो नाही. दार्चेन जवळ येता येता रघूने एक ठिकाण सांगितलं. तिथे एक मॉनेस्ट्री आहे आणि ह्या मॉनेस्ट्रीतून कैलास पर्वत, मानससरोवर, राक्षसताल आणि गुर्लामांधाता पर्वत ही चारही ठिकाणं दिसू शकतात. हे ठिकाण अगदी आमच्या रस्त्यावर होतं पण आमच्या गुरू गाईडने तिथे बस थांबवायला नकार दिला. थोडं अंतर गेल्यानंतर मानससरोवराच पहिलं दर्शन होणार होतं. इथे एका चिनी आर्मीच्या एका चौकीवर बस थांबली आणि तिथल्या एका अधिकार्‍याने सुचना दिल्या की मानससरोवरात साबण, शॅम्पू वगैरेचा वापर करायचा नाही, तसच सैन्याच्या कुठल्याही कॅम्पचे, वस्तूंचे किंवा जवानांचे फोटो काढायचे नाहीत. हा अधिकारी बोलून एकदम चांगला वाटला. पुढे बस वळून मानससरोवराच्या काठी थांबली. आम्ही इथे पोहोचेपर्यंत आकाशात थोडेफार ढग आले होते, त्यामुळे मानससरोवर बरच गढूळ रंगाचं दिसत होतं. अगदी खरं सांगायचं तर त्या प्रथमदर्शनी मानससरोवरापेक्षा राक्षस तालच जास्त सुंदर दिसला होता. मी केदारला तसं म्हटलही. तो म्हणाला हळू बोल रे बाबा. आधीच आपण नास्तिक, पापी वगैरे गटातले, त्यात जर आपण मानससरोवरापेक्षा राक्षसताल सुंदर असं म्हणालो तर आपल्याला वाळीतच टाकायचे!

मानससरोवरात स्नान केलं की सात जन्मांची पापं धुतली जातात आणि जन्ममृत्यूच्या फेर्‍यातून सुटका मिळते असं मानतात. त्यामुळे सगळ्यांना मानससरोवरात डुबकी मारायची प्रचंड घाई असते. आम्हांला सुचना दिलेल्या होत्या की पाणी प्रचंड थंड असतं त्यामुळे दुपारी आणि ऊन असतानाच सरोवरात जायचं म्हणजे थंडीचा त्रास होत नाही. खरतर पुढे आम्हांला मानससरोवराच्या काठावर मुक्कामासाठी जवळजवळ दोन दिवस मिळणार होतो पण आत्ता ह्या दोन्ही अटी पूर्ण होत होत्या. खाली उतरल्या उतरल्या आम्ही फोटो काढायला लागलो, पण दुसरा ग्रुप मात्र कपडेच काढायला लागला. काय चाललय हे कळायच्या आता मंडळी पाण्यात! नंतर अचाकन पार्वते की कोणीतरी 'कच्छा दे दो.. कच्छा दे दो' ओरडायला लागलं. आम्हांला कळेना आता हे काय आणखी! तर कपडे ओले होऊ नयेत म्हणून एकाने अंघोळ करताना वापरलेलीच अंडरवेअर पुढचा माणूस चढवून अंघोळ करत होता!! मुळात बेसिक स्वच्छताच जिथे पाळली जात नाहीये, अश्या अंघोळीला पवित्र का म्हणावं ? मी, केदार, सौम्या वगैरे हा प्रकार दुरुन बघत होतो. राग, किळस, चिडचिड, हताश वगैरे भावना येऊन गेल्यानंतर आम्हांला ह्यावर जोरदार हसू यायला लागलं आणि आम्ही आता ही पवित्र अंडरवेअर घालून अंघोळ करणारा पुढचा माणूस कोण असणार ह्यावर पैज लावायला लागलो!

नंतर आम्ही आसपासच्या परिसरात चक्कर मारून आलो. कोणाशीही काही न बोलता, कुठलाही आवाज न करता फक्त पाण्याकडे बघत रहावं. फक्त स्वतःच्या श्वासाचाच तेव्हडा आवाज येतो. अतिशय शांत वाटलं!
लोकांच्या आंघोळी पांघोळी आटोपल्यावर बसने पुढे निघालो. तासभराचा प्रवास झाल्यावर दुरवर कैलासपर्वताचं पहिलं दर्शन झालं. बाकी सगळी शिखरं बोडकी असताना फक्त कैलास बर्फाच्छादित आहे. हिमालयात बर्फाच्छादित शिखरं खूप दिसतात. नक्की काय ते सांगता येणार नाही पण कैलासपर्वतात नैसर्गिक म्हणा, धार्मिक म्हणा पण खूप काहीतरी विशेष आहे आणि ते प्रत्येक वेळी त्याचं दर्शन झाल्यावर जाणवलं. अनुभूती वगैरे जड शब्द मी नाही वापरणार पण कैलास दर्शनाचा तो अनुभव प्रत्येकासाठी वेगळा, स्वत:चा असावा असं मला वाटलं.

हा गुर्लामांधाता पर्वत

आता परिक्रमा संपेपर्यंत कैलास आमच्या सोबत असणारच होता. दार्चेनला कैलासपर्वाताचा 'साऊथ फेस' आहे. आपण देवळात जशी प्रदक्षिणा घालतो तशी कैलासाला उजव्या हाताला ठेऊन प्रदक्षिणा घालायची होती. दार्चेन गावात शिरण्यापूर्वी पुन्हा एकदा सामानाची तपासणी झाली. इथे बरीच दुकानं आणि बाजार आहे. दार्चेनला चांगलं बांधलेलं गेस्ट हाऊस आहे. तसच स्वयंपाक करण्यासाठी वेगळी खोली आहे. इथे मोठ्या प्रमाणावर सोलार पॅनल दिसली.बाहेरचे तर सगळेच दिवे सोलार बॅटरीवर चालणारे होते. दार्चेनहून जीपने 'अष्टपाद' नावाच्या ठिकाणी जाता येतं. अष्टपाद हे जैन धर्मियांचे पवित्र स्थान आहे. तसच अष्टपादच्या एकेका पायरीवर पांडवांनी प्राण सोडून स्वर्गात प्रवेश केला होता असं मानलं जातं. खरतर दिवस मोकळा होता पण गेल्यावर्षी अ‍ॅक्सीडेंट झाले असं सांगून गुरूने अष्टपादला जाण्याची परवानगी नाकारली. सौम्याची ह्याच्यावरून गुरूशी खडाजंगी झाली.

आमच्या स्वयंपाक्यांनी जेवण बनवायला सुरुवात केली. आम्ही खोलीत येऊन, आवरून जरा पडलो होतो. वाचता वाचता डोळा लागला. बोलण्याच्या आवाजाने जाग आली तर दोन तिबेटी ललना त्यांच्या जवळच्या माळा, ब्रेसलेट वगैरे फुटकळ वस्तू विकण्यासाठी आमच्या खोलीत येऊन थेट पलंगावर बसल्या होत्या आणि केदार त्यांच्याशी कुठल्यातरी वस्तूवरून घासाघीस करत होता! त्यांना 'हाऊ मच' सोडून काही कळत नाही. कॅल्क्युलेटरवर त्यांनी आणि आपण किंमत टाईप करायची आणि ठरवायचं. कसंबसं त्यांना बाहेर घालवलं. तोपर्यंत जेवण तयार झालं होतं. जेवण झाल्यावर साडेतीन चारच्या आसपास बाजारात फेरफटका मारला तसच थोडे फोटो काढले. येताना दार्चेनला मुक्काम नसणार होता आणि इथे विकायला होत्या त्या माळा वगैरे सोव्हिनिअर वस्तू तकलाकोटला दिसल्या नव्हत्या. मग शेवटी मी पण थोडीशी म्हणजे म्हणजे माझ्या पाऊचमध्ये मावेल इतकी खरेदी करूनच टाकली. बाजारात एक जरा वेगळ्या प्रकारचं ब्रेसलेट दिसलं. तिबेटी बाई म्हणे २०० युवानला. मी विचार केला फारतर नाही म्हणेल आणि तसही कुठे ती बाई मला परत भेटणार आहे शिव्या घालायला, १० युवानला मागून पाहू. १० म्हटल्यावर तिने रागीट चेहेरे केले, काहितरी पुटपुटली. मी निघून जायला लागलयावर २५ म्हणे. मग अजून जरा प्रयत्न केल्यावर शेवटी तिने २०० युवानचं ते ब्रेसलेट २० युवानला दिलं. माझी ही बार्गेनिंग पॉवर बघून आमच्या बॅचमधल्या (आणि नंतर घरातल्याही) बायका एकदम खुष झाल्या!

संध्याकाळी / रात्री करण्यासारखं काही नसल्याने नेहमीप्रमाणे टवाळक्या करून झोपून गेलो. खरतर आजचा इथला मुक्काम उगीच होता. हा कमी करून यात्रेतला एक दिवस कमी करता आला असता.

दिवस १२ : दार्चेन ते देराफुक. अंतर: १९ किमी. उंची: ५०६०फूट / १६६०० मिटर

४८ किलोमिटरच्या परिक्रमेचा आजचा पहिला दिवस. दार्चेन ते यमद्वार हे ७ किलोमिटरचं अंतर बसने तर पुढे १२ किलोमिटरचा ट्रेक होता. यमद्वाराला यमाचं देऊळ आहे. म्हणजे हे आपलं नेहमी सारखं देऊळ नाहीये. खरोखरच एक दार आहे आणि ते ओलांडून परिक्रमेची सुरुवात करायची असते. यमद्वारातून पुढे गेलं की परिक्रमा करणार्‍याला यमाची भिती रहात नाही आणि परिक्रमा सुरळीत पार पडते असं मानतात. तसच एकदा ते ओलांडलं की माघारी फिरायचं नाही. फक्त पुढेच जायचं.

यमद्वारहून कैलास दर्शन खूप सुंदर झालं. इथे आम्हांला चिनी घोडेवाले आणि पोर्टर मिळणार मिळाले. आज पासून तीन दिवस आमचं मुख्य सामान मिळणार नव्हतं त्यामुळे अगदी आवश्यक तितक्याच गोष्टी सॅकमध्ये घेतल्या होत्या. इथे पोर्टर आणि घोडेवाला ह्या दोघीही मुली होत्या. नवरा बायको मिळून हे काम करतात. बायको सामान घेते आणि नवरा घोडा हाकतो. ह्यांना हिंदी किंवा इंग्रजी अजिबात येत नाही. त्यामुळे कमान आणि अभिलाषशी जश्या गप्पा व्हायच्या किंवा ते जसे आम्हांला धिर देत रहायचे तसं इथे अजिबात होत नव्हतं.

यमद्वारहून पुढे एका नदीच्या काठून प्रवास सुरू झाला. मानससरोवरातून सतलज, सिंधू, ब्रम्हपुत्रा आणि कर्नाली अश्या चार नद्या उगम पावतात. मला वाटलं की ह्यातलीच कुठली नदी आहे. पण ही त्यातली नव्हती. हिचं स्थानिक नाव 'लाच्यू'.

आता आम्ही अधिकाधिक उंची गाठत होतो त्यामुळे विरळ ऑक्सिजनचा चांगलाच प्रभाव जाणवत होता. थोडा जरी चढ आला तरी हृदयाचे ठोके इतके वाढायचे की भिती वाटावी. त्यात केदार, भिम, श्याम, बन्सल वगैरे मंडळी पुढे निघून गेली होती कारण त्यांनी घोडे केले नव्हते. माझी घोडेवाल्याशी भेट होईपर्यंत जवळ जवळ तासभर फुकट गेला. मी चालत असताना माझ्या आजूबाजूला सगळी घोड्यावर बसलेली लोकं होती. म्हणजे घोडे, पोर्टर आणि घोडेवाले अश्या सगळ्या तिबेटींबरोबर मी एकटाच भारतीय चालत! सहयात्री 'अरेरे बिचारा' वगैरे नजरेने बघत माझी चौकशी करत होते आणि त्यामुळे अजूनच थकायला होत होतं.

बरीच थंडी होती, पण वाढलेल्या हृदयाच्या ठोक्यांमुळे आणि अंगातल्या मणभर कपड्यांमुळे घामाघुम व्हायला होत होतं. इतकं की माझ्या अनेकदा धुतलेल्या, रंग न जाणार्‍या टीशर्टचाही रंग गेला! रानडे म्हणाले ऊसाच्या गुर्‍हाळातुन बाहेर आलेल्या पिळवटून निघालेलेल्या चिपाडासारखं झालं आहे तुझं! होणार्‍या कष्टांकडे दुर्लक्ष करण्यासाठी मी मॅराथॉन पळताना जो 'डे ड्रिमिंगचं' उपाय वापरतो तो ही इथे उपयोगी पडेना कारण आजुबाजूची सुंदर दृष्य बघताना त्या 'डे ड्रिम्स' कडे लक्षच लागत नव्हतं! पुढे रघू आणि हायमा भेटले. रघूने सांगितलं आता जवळ आलं आहे. समोरच्या वळणावर दोन डोंगरांच्या फटीतून कैलास दर्शन होईल. मग त्या आशेने पावलं रेटत राहिलो. उजवीकडे सहज नजर गेली आणि कैलासाचं इतकं जवळून आणि सुंदर दर्शन झालं की कितीवेळ बघत राहिलो कळलच नाही. एकदम ताजतवानं व्हायला झालं. हा कैलासचा 'नॉर्थ फेस'.

आता पाऊण एक किलोमिटरच अंतर राहिलं आहे असं नेपाळी यात्रेचा गाईड म्हणाला. नंतर एक लहानसा पुल लागला. खाली मध्यम आकाराचा प्रवाह होता. रघू आणि हायमा खाली गेले. हायमा म्हणाली हा एकमेव प्रवाह आहे की जो थेट कैलासपर्वतातून येतो. त्यामुळे हे तीर्थ आहे. तर तू पण खाली ये. मी म्हटलं पुलावर उभा रहातो. तू खालून पाणी उडव. तेव्ह्ड्या पाण्याने जे काय पुण्य मिळायचं तेव्हडं मिळेल. पण आता अजून कष्ट केले तर तेच तीर्थ गंगाजलासारखं माझ्या तोंडात घालावं लागेल! ते तिथे थांबले आणि मी चालत राहिलो. अखेर एकदाचा कॅम्प आला. केदार वगैरे मंडळी येऊन बरीच स्थिरस्थावर झाली होती. मी येऊन तसाच्या तसा पलंगावर आडवा झालो. इथून साधारण दोन किलोमिटरवर 'चरणस्पर्श' नावाचं ठिकाण आहे. इथे कैलासपर्वताच्या सगळ्यात जवळ जाऊन त्याच्या चरणांना स्पर्श करता येतो. मागे काही अपघात झाल्यामुळे चिनी सैन्याने आता तो मार्ग बंद केला आहे. जेमतेम पाऊण किलोमिटर जाऊ देतात. मी तरी चरणस्पर्शला जायचा बेत रद्द केलेला होता. थोड्यावेळाने सुप आलं. गरम गरम सुप घेतल्यावर जरा बरं वाटलं. एका हातात सुपचा ग्लास आणि गळ्यात कॅमेरा अडकवून कॅम्पच्या बाहेर आलो. खोलीच्या मागे कैलासपर्वत होता.

तिथे गेल्यावर अचानक काय स्फुरण चढलं कोण जाणे. अजिबात ठरलेलं नसताना सरळ चरणस्पर्शची वाट चढायला लागलो. पायात बुटही नव्हते. फक्त सॉक्स आणि फ्लोटर्स. साधारण एमआयटीच्या मागची टेकडी आहे तेव्हडी चढण चढल्यावर दोर्‍या लाऊन वाट बंद केली होती. तिथे काही यात्री होते. मस्त ऊन होतं. कैलासावर अजिबात ढग नव्हतं. तिथे बराच वेळ बसून राहिलो. मस्त वाटलं.

केदार वगैरे मंडळी दोर्‍या ओलांडून अजून पुढे जाऊन आल्याचं नंतर कळलं. कितीही वेळ बसलं तरी समाधान होत नव्हतं पण जरा थंडी वाजायला लागल्यावर खाली आलो. आता बरीच हुषारी वाटत असल्याने मघाशी जो प्रवाहं लागला होता, तिथपर्यंत मागे जाऊन आलो. अतिथंड पाणी होतं! ह्या कॅम्पवर एक अचाट प्रकार बघितला तो म्हणजे खोल्यांची दार खिडक्या कैलासच्या उलट बाजुला, म्हणजे खोलीत बसून कैलास दर्शन होत नाही. पण टॉयलेटमात्र विरुद्ध बाजुला. तिथे कार्यक्रम उरकत असताना समोर कैलास. हे असं बांधकाम करण्यामागचं प्रयोजन अजिबात समजलं नाही!

कैलास पर्वाताचे जे सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघालेले फोटो असतात ते दार्चेनहूनच सुर्योदयाच्या वेळी काढलेले असतात. त्यामुळे दुसर्‍या सकाळी ढग नसतील तर सुर्योदय होईपर्यंत थांबायचं अन्यथा पहाटेच निघायचं असं ठरलं. उद्या डोलमा पासचा सगळ्यांत अवघड भाग होता. एकंदरीत आजची स्थिती बघता उद्याचं दडपण आलं होतं.

दिवस १२ : देराफुक ते झुंझुंरपू अंतर: १९ किमी. उंची: १६६०० फूट / ५०६० मिटर

पहाटे उठून पाहिलं तर कैलासपर्वताला ढगांनी वेढलं होतं. त्यामुळे सुर्योदयापर्यंत न थांबता सगळ्यांनी निघायचं ठरवलं. डोलमा पासची उंची तब्बल ५५९० मिटर आहे. पहिल्या सहा किलोमिटरमध्ये आम्ही ५३० मिटर म्हणजे जवळ जवळ १८०० फूट उंची गाठणार होतो आणि ते ही आणखीन कमी ऑक्सिजन पातळी असलेल्या हवेत. सुरवातीचा चढ ठिक होता. आम्ही आता वळण घेतल्याने कैलास डोंगराच्या मागे गेला. एक किलोमिटरनंतर चढण वाढली. माझ्याबरोबर घोडा होता. त्यामुळे घोड्यावर बसून टाकावं अशी तीव्र इच्छा झाली. घोड्यावर बसावं की नाही ह्या घोळात जवळ जवळ १५, २० मिनीटे मी एका जागी थांबून होतो. मानसिक कणखरतेची कसोटी लागते म्हणतात ती अशीच. शेवटी म्हटलं अजून थोडावेळ चालूया मग बघू. परत चालायला लागलो. मागून एलओ आले. ते म्हणाले आपण १८०० पैकी जवळ जवळ ८०० फूट उंची गाठली सुद्धा. त्यामुळे आता काही फार नाही. तू तर तरूण आहेस. चालत रहा. जरा धीर आला. सुकामेवा, लिमलेटच्या गोळ्या खात, घोटघोट पाणी घेत चालत होतो.

एक मोठी चढण संपली आणि जरा पठारी भाग आला. पोर्टरला खाणाखुणा करून विचारलं हीच का डोलमा पास तर तिने समोरच्या एका मोठ्या डोंगराकडे बोट दाखवलं. तो डोंगर पाहून पोटात गोळा आला. पठार ओलांडून पुढे गेलो. उजवीकडे कैलासाने डोंगरामागून हळूच डोकावून मस्त दर्शन दिलं.

एक अगदी छोटा उतार गेल्यानंतर शेवटची चढण सुरु झाली. अगदी 'शेवटाकडे नेणारी' प्रकारात मोडणारीच ती चढण होती.

सारखीच धाप लागत होती. कितीही छाती भरून श्वास घेतला तरी तो कमीच पडत होता. मी चालायला सुरुवात केली की आकडे मोजायला सुरुवात करायचो. विस झाल्या शिवाय थांबायचच नाही असं ठरवलं होतं. जर पंचविस झाले तर भारी आणि तिस झाले तर दिल्लीला परतल्यावर स्वतःला एक गुलाबजाम किंवा एक मोठा चमचा आईस्क्रिम ह्यांचा बोनस! कितीही चढून गेलं तरी माझ्या पुढच्या माणूस माझ्या वरच्या पातळीवर दिसायचा ह्याचा अर्थ अजून चढ बाकी होता. आलच आता करत करत स्वतःला ओढत होतो. श्वास कोंडून जीव जाताना नक्की काय होत असेल ह्याची बारिकशी झलक ह्या चढावर अनुभवता येते असं म्हणणं वावगं ठरू नये.

इथे सगळे एकमेकांना मदत करत असतात. एक तोडकं मोडकं हिंदी बोलणारा पोर्टर माझ्याजवळ आला आणि म्हणाला मी तुझा हात धरतो, चल पुढे. मी म्हटलं तू धरशील रे पण माझे पाय उचलले पाहिजेत ना! नेपाळ मार्गे येणार्‍या ग्रुप मधल्या एका काकांना अचानक खूपच धाप लागली आणि ते जवळजवळ कोसळायच्या बेतात होते. आम्ही जवळपासच्या लोकांनी हात धरून त्यांना सावरलं. जरा वेळाने ते सावध झाले आणि पुढे गेले. मी माझ्या जरा पुढे गेलेल्या पोर्टर कडे पाणी मागत असलेलं पाहून तिथेच जवळ असलेल्या त्यांच्या नेपाळी गाईडने त्याच्या जवळची ज्युसची बाटली पुढे केली. अखेर मणामणाचं एकेक पाऊल उचलत आम्ही अखेर डोलमा पासच्या सर्वोच्च ठिकाणी पोहोचलो.

ह्यावर्षी तिबेटमध्ये 'हॉर्स इयर' सुरु असल्याने मे महिन्यात स्थानिकांचा खूप मोठा कुंभमेळा भरला होता. त्यामुळे मंत्र लिहिलेल्या बर्‍याच तिबेटी पताका (प्रेयर फ्लॅग्स) सगळीकडे लावलेल्या होत्या. डोलमा म्हणजे तारा देवी. ह्या परिसरात तारा देवीचं वास्तव्य होतं. इथून जाणार्‍या प्रत्येकाची साक्षात यम परिक्षा पहातो. त्यामुळे इथे स्वतःची भौतिक सुखांपासून मुक्तता करून घ्यावी, स्वतःमधील स्वत्त्वाचा / गर्वाचा त्याग करावा असं मानतात. त्याचं प्रतिक म्हणून इथे स्वतःच्या कपड्यांमधलं काही, इतर वस्तू, इतकच काय तिबेटी लोकं नखं, केस, रक्त असंही काही बाही टाकतात. तारा देवीच्या नावाची एक मोठी शिळाही तिथे आहे. तिथे बरच धुकं असल्याने आम्ही अगदी तिथपर्यंत गेलो नाही. एलओ सह काही जण वर थांबलो. एका गुज्जू भाईने पुस्तक काढून त्यांची कुठलीतरी प्रार्थना / स्तोत्र म्हटली. उदबत्ती लावली. डोलमा पासच्या इतक्या उंचीवर दहा पंधरा मिनिटांपेक्षा जास्तीवेळ थांबू नये असं म्हणतात. त्यामुळे मी आत्तापर्यंत गेलेल्या जगातल्या त्या सगळ्यांत उंच स्थानावरून देवाचे म्हणा, निसर्गाचे म्हणा, कोणत्यातरी शक्तीचे म्हणा आभार मानले आणि पुढे जायला निघालो.

आता इथून पुढे जोरदार उतार होता. पाच एक मिनीटे पुढे गेल्यावर उजवीकडे हिरव्या रंगाचं 'गौरी कुंड' लागलं. ह्या कुंडात पार्वती स्नान करायला येत असे म्हणतात. म्हणजे गणपती बाप्पाचा जन्म इथेच जवळपास कुठेतरी झाला असणार! गौरी कुंडाचं पाणीही पवित्र मानलं जातं पण ते आमच्या मार्गापासून जवळ जवळ हजार फूट खाली असल्याने तिथे जाणं शक्य नव्हतं मग आम्ही एलओंच्या पोर्टरला पाणी आणायला सांगितलं.

गौरी कुंड मागे टाकल्यावर जवळ जवळ तिन किलोमिटरची अतिशय तीव्र उतरंड पार करून खाली आलो.

उंचीतला फरक तसच डोलमा पास पार झाल्यामुळे गेलेलं दडपण ह्यामुळे खूपच बरं वाटत होतं. खाली काही तंबूंमध्ये खायचे पदार्थ विकत होते. आमच्या घोडेवाल्यांकडे आणि पोर्टरकडे त्यांचे डबे असायचे. थर्मासमध्ये चिनी चहा आणि याकचं चिज असं बरोबर असायचं आणि रस्त्यातल्या अश्या तंबूंमधले नुडल्स ते विकत घ्यायचे. एकंदरीत त्यांचं सामान-सुमान, खाणं वगैरे बघता बरीच गरिबी आहे हे जाणवतं. केदारच्या पोर्टरला ४/५ वर्षांचा लहान मुलगा होता आणि तो ही आईचा हात धरून आमच्याबरोबर संपूर्ण परिक्रमा चालला. एकंदरीत केदारला सगळ्या 'वर्किंग मदर'च भेटत होत्या! इथे भिमची तब्येत बिघडली होती. खाल्ल्यावर त्याला आणि सगळ्यांनाच बरं वाटेल असा विचार करून आम्हीही दोन तिन पाकीटं नुडल्स आणि बरोबरचे डिंकाचे लाडू असा नाश्ता केला. इतक्यात गुरू मला शोधत आला. माझ्या घोडेवाल्याने माझी तक्रार केली होती की हा घोड्यावर बसत नाही आणि मला पुढेही जाऊ देत नाही तर त्याला नक्की काय प्रॉब्लेम आहे ते विचार. गुरू म्हणाला डोलमा पास आता पार झाला आहे. आता कॅम्पपर्यंत साधा सपाट रस्ता आहे तर तू बस घोड्यावर. त्या घोडेवाल्यालाही बरं वाटेल. म्हटलं ठिक आहे. तसही सर्वोच्च स्थान सर करून झालेलं आहे. त्यामुळे आता एकदा घोड्यावर बसायचा अनुभवही घ्यायला हरकत नाही. मग इथून झुंझुरपूच्या कॅम्प पर्यंत घोड्यावर बसलो. घोड्यावर बसणं हा एकंदरीत फार विचित्र आणि अवघड प्रकार होता. तेव्हड्या दहा बारा किलोमिटर पुरतच ठिक होतं. हा रस्ता अत्यंत रटाळ होता. आमचा प्रवास आता झ्याच्यु नदीच्या काठून सुरु होता. घोडेवाले, पोर्टर कसलीतरी सरबतं पिऊन बाटल्या रस्त्यातच टाकून देत होते. मला त्यांना त्यावरून टोकावं असं फार वाटत होतं पण एकतर भाषेचा अडसर आणि दुसरं म्हणजे आपलं घरचं झालं थोडं, बाहेरच्यांना कुठे शहाणपणा शिकवा असा विचार करून गप्प बसलो. तास दोन तासांनंतर कॅम्पवर पोहोचलो. मी हे शेवटचं अंतर घोड्यावरून आलो त्यामुळे लवकर आलो. केदार, भीम आणि बन्सल तासाभराने आले. भिमाची तब्येत चांगलीच बिघडली होती. मग रानड्यांनी जरा दादागिरी करून त्याला आमच्या जवळचा खाऊ खायला देऊन आणि औषध देऊन झोपायला लावलं. रानडे तब्येतीच्या बाबतीत सगळ्यांची नेहेमी चौकशी करायचे आणि वेळप्रसंगी योग्य ती दादागिरीही करायचे. मग मी, केदार, श्याम आणि रानडे समोरच्या नदीवर जाऊन हात, पाय, चेहेरा धुवून आलो. पाणी प्रचंड गार होतं पण खूप ताजतवानं वाटलं. डोलमा पासचा ट्रेक पूर्ण झाल्याने एकदम हलकं वाटत होतं. इथे केदारच्या मोबाईलवर मॅट्रीक्स कार्ड चालू होतं. त्यामुळे आम्ही सगळे मिळून ते वापरायचो. मिस्ड कॉल दिला की घरून फोन यायचा. आज घरच्यांशी खूप गप्पा मारल्या. वर्णन सांगितलं. तिकडची खुशाली कळली. जर्मनीचे ब्रॅझिलचा धुव्वा उडवला आणि आता अर्जेंटीनाशी फायनल, क्विटोव्हा आणि ज्योको जिंकले असे बाकीचे अपडेट्सही कळले. जर्मनी माझी आवडती तर अर्जेंटीना नावडती टीम आणि त्यात फायनलच्या वेळी आम्ही तकलाकोटला असणार होतो. त्यामुळे तिथे फायनल पहाता येणार होती! आता इतके सगळे विषय निघालेच आहेत तर मी आदित्य-मेघनाचं कुठवर आलय हे ही विचारून घेतलं. त्यावर 'घरी ये, मग सांगते!' हे उत्तर अश्या काय टोनमध्ये मिळाळं की मी लगेच विषय बदलला.

झुंझुरपूच्या कॅम्पवर आमच्या स्वैपाक्यांनी खूप घोळ करून सकाळचं जेवण बनवलच नाही. एकदम संध्याकाळी देऊ म्हणे. त्यावर काही भक्तगणांचं म्हणणं होतं की यात्रेलाच आलो आहोत, ठिक आहे. पण इतके कष्ट करून आल्यावर खूप भुक लागली होती आणि शिवाय काही लोकांना अ‍ॅसिडीटीचा त्रासही व्हायला लागला. जेवण ह्या विषयावर बरीच गरमागरमी झाली. अखेर संध्याकाळी त्यांनी जेवण दिलं.

संध्याकाळी लवकर चंद्रोदय झाला. पौर्णिमा जवळ आली असल्याने चंद्र इतका सुंदर दिसत होता! रात्रीही बाहेर टिपुर चांदणं पडलं होतं. आम्ही चार पाच जाण बराच वेळ चांदण्यात गप्पा मारत बसलो होतो. ह्या कॅम्पहून कैलास दर्शन होत नाही. अन्यथा चांदण्यातले सुरेख फोटो काढता आले असते. सकाळी लवकर निघायचं होतं त्यामुळे अखेर गप्पा आवरल्या घेतल्या.

दिवस १३ : झुंझुंरपू ते कुगू अंतर: १०० किमी. (५ किमी ट्रेक) उंची: १५१६० / ४७८०मिटर

आज कैलास परिक्रमा संपवून मानससरोवराच्या काठी मुक्कामाला जायचं होतं. आजचा ट्रेक फक्त पाच किलोमिटर होता. तो सहज संपवून दार्चेनच्या जवळ पोहोचलो. तिथे बस मिळणार होती. दिशांचं मला जेव्हडं ज्ञान आहे त्यानुसार कैलास पर्वत आमच्या उजवीकडे असायला हवा होता, पण केदार कुठल्यातरी डावीकडे दुरवर दिसणार्‍या पर्वताला कैलास म्हणत होता. बराच वेळ त्याला समजवायचा प्रयत्न केला. शेवटी गुरुला विचारलं. त्याने असे काही कटाक्ष टाकलेत की बस! आज अंतर कमी असल्याने सगळे जण पटापट पोहोचत होते. निलम काकू आणि अंजू पोहोचल्यावर एकदम रडायलाच लागल्या! मला वाटलं त्यांची तब्येतच बिघडली. पण नंतर कळलं की परिक्रमा पूर्ण झाल्याने टडोपा आलं आहे! मग बराच वेळ सगळे एकमेकांचं अभिनंदन करत होते आणि वयाप्रमाणे पाया पडत होते. काही जणांनी कैलासाच्या दिशेला साष्टांग नमस्कार घातले. एकंदरीत भारलेलं वातावरण होतं.

जिथून निघालो होतो तिथे परत :

थोड्यावेळाने बस आल्या आणि आम्ही मानससरोवर मुक्कामाच्या ठिकाणाकडे म्हणजे कुगुकडे प्रयाण केलं.

क्रमशः

(ह्या भागातले काही फोटो केदार कडून साभार.)