कैलास मानससरोवर यात्रा: समारोप



सरासरी चारहजार शब्दांचे सात भाग लिहून झाल्यावर अजून काय आता ? तर हे थोडसं उरलं सुरलं..

माझा कैलासमानसला जायचा उद्देश्य काहीही असला तरी या प्रवासाला सरकार दरबारी, कागदोपत्री 'यात्रा' असच म्हटलं जातं. त्यामुळे मी कैलास मानससरोवर यात्रेला जाणार आहे हे कळल्यावर बर्‍याच जणांची पहिली प्रतिक्रिया यायची 'यात्रेला ? ह्या वयात ? सगळं ठिक आहे ना?!' ट्रेकला, प्रवासाला कुठे कुठे जायचं, काय काय बघायचं ह्याची यादी न संपणारी आहे. कैलास मानससरोवर ह्या यादीत बरच वरच्या स्थानावर होतं. मी आधी लिहिल्याप्रमाणे मी दहावीत असताना आईच्या मैत्रिणीने लिहिलेलं यात्रेचं वर्णन वाचलं होतं आणि तेव्हाच इथे जायची इच्छा झाली होती. नंतर शिक्षण, नोकरी दरम्यान ही गोष्ट मागे राहिली. दोन वर्षांपूर्वी मायबोलीवरच अनयाने लिहिलेली लेखमालाही वाचली आणि कैलासमानस यात्रेची सुप्त इच्छा पुन्हा जागी झाली. त्यामुळे मी इथे लिहिल्याप्रमाणे ह्या यात्रेचं श्रेय अनयाच्या लेखमालेलाच!

यात्रेच्या सुरूवातीला सगळ्या यात्रींना 'तुम्हांला कैलासमानसयात्रेला का जावसं वाटतय?' असा प्रश्न विचारण्यात आला. बर्‍याच लोकांचा अगदी स्पष्ट धार्मिक हेतू होता. पापं धुणे, पुण्य कमावणे, जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातुन मुक्ती मिळवणे वगैरे. इथे आम्हांला ह्या जन्मातल्या गोष्टींचं प्लॅनिंग करता येत नाही तर पुढचे जन्म कोणी पाहिले? आणि धार्मिक बाबतीत मी कुंपणावरचा. इतर कोणी पुजा करत असतील तर मी त्यांना ते करू नका असं सांगणार नाही. पण मी त्यात भाग घेईनच असही नाही. देवळापर्यंत गेलो तर नास्तिक म्हणून बाहेर उभा रहाणार नाही, आत जाऊन दर्शन घेईन. पण आज देवळापर्यंत जायचं की नाही ते मात्र माझं मी ठरवेन. त्यामुळे बराच विचार करून यात्रेला का जायचं ह्याचं उत्तर मी 'to find spirituality in the nature' असं दिलं.

यात्रेत दिसणारा निसर्ग इतका खरोखरच अप्रतिम आणि गुढ आहे की त्यापुढेच नतमस्तक व्हायला होतं. परिक्रमेच्या दरम्यान एका वळणावर बराचवेळ डोंगराआड असलेल्या कैलासाचं अचानक दर्शन झालं आणि अक्षरशः भान हरपून त्याकडे बघतच बसलो. त्या पर्वतात काहीतरी अद्भुत नक्कीच आहे! कैलासाच दर्शन आणि मानससरोवरातली डुबकी अगदी आतून हलवून टाकते. एकप्रकारची उर्जा देऊन जाते.

ही यात्रा म्हणजे एक आव्हान आहे. शारीरीक, मानसिक, आर्थिक आणि म्हटलं तर प्रापंचिकही. सगळ्या गोष्टी जुळून आल्याशिवाय ती घडणं शक्य नाही आणि जुळवून आणायचे आपले प्रयत्न यशस्वी होतीलच असही नाही. प्रत्यंतर गेल्या वर्षी आलच. पाहिल्या तिनही गोष्टी जमल्या तरीही ऑफिसमधली इतकी मोठी सुट्टी, घरच्या जबाबदार्‍या, घरून पाठिंबा हे सगळंही तेव्हडचं महत्त्वाचं. माझ्या बाबतीत सुदैवाने ह्यावर्षी सगळ्याच गोष्टी जुळल्या. आर्थिक जुळवाजुळव तुम्ही आधीपासून करू शकता, जवळच्यांकडून मदत घेऊ शकता मात्र शारिरिक आणि मानसिक ताकद मात्र स्वतःची स्वतःच उभी करावी लागते. त्याचं उसनं अवसान आणता येत नाही. त्यामुळे ह्या प्रवासादरम्यान स्वतःच्या तीनही प्रकारच्या क्षमता ताणून बघण्याची उत्तम संधी लाभते. शारिरिक आणि मानसिक क्षमता अधेमधे ताणून बघायला खरतर मजा येते आणि त्या ताणून बघाव्याच. शिवाय आमच्या घरातले सगळे जण बर्‍यापैकी 'फॅडीस्ट' आहेत. प्रत्येकाची काही ना काही फॅडं सुरू असतात. ह्या सगळ्यात आधीचे आणि नंतरचे दोन चार माहिने बरे जातात. त्यामुळे ही यात्रा त्या दृष्टीनेही एक फॅड किंवा उपक्रमच होता.

मध्यंतरी 'साडेसाती'संबंधीच्या चर्चेत वाचलं की साडेसाती माणसाला पेशन्स शिकवते. ह्या यात्रेच्या निमित्ताने त्याचं अगदी पुरेपुर प्रत्यंतर आलं. एका वर्षीची यात्रा रद्द होऊन नंतर वर्षभर थांबून पुन्हा जायला मिळणे ह्या प्रकारात पेशन्सचा अगदी कस लागला. प्रत्येक गोष्टीतला वाट पहाण्याचा वेळ नको व्हायचा. पण नंतर त्यातुन मिळालेला अनुभव खूप आनंददायी होता! 'यात्रेला' जाऊन आल्यावर मी लगेच बदललो, संत प्रवृत्तीचा झालो असं अजिबातच नाही. (परत आल्यावर पहिल्याच आठवड्यात इथे मायबोलीवरच्याच एका चर्चेत आरे ला कारे करायचा मोह मला आवरला नाही!). पण यात्रेहून आल्यावर एकप्रकारचा आत्मविश्वास आला असं मात्र वाटतं. श्वास घेता येत नाही, हातात सॅकच काय पण पेनही धरवत नाही अश्या अवस्थेत लिपूलेख किंवा डोलमाची चढाई करू शकत असेन तर काहीही करता येणं शक्य आहे असं वाटायला लागलं. शिवाय करीयरची दहावर्ष झाल्यावर एक महीना सुट्टी स्वतःसाठी घेता येऊ शकते हा ही एक अनुभवच होता.

घरच्यांच्या भक्कम पाठिंब्याशिवाय इतक्या मोठ्या प्रवासाला जाणं शक्य नव्हतं. ट्रेकसाठी किंवा 'यात्रे'ला जाण्यासाठी तब्बल एक महिन्याची रजा मंजूर केल्याबद्दल ऑफिसमधल्या माझ्या वरिष्ठांचे आभार मानलेच पाहिजेत. ह्यावर्षी केदार बरोबर होता. कोणीतरी ओळखीचं बरोबर आहे हा स्वतःसाठी तसच घरच्यांसाठीही मोठा आधार होता. बाकी एकोणसाठ जणांशी पटलं नाही तरी एका माणसाशी काही बाबतीत का होईना पण पटेल ह्याची खात्री निघण्यापूर्वीच होती. मी आणि केदारने एकत्र खूप मजा केली, टवाळक्या केल्या. केदारचा स्टॅमिना आणि उत्साह (ह्या वयातही!) अफाट आहे. (चाचा चौधरींच्या पुस्तकांत जशी * करून वर वाक्य लिहिलेली असतात, तशी मी केदारबद्दल 'केदारको थंड नही लगती', 'केदार कभी मिठा नही खाता' आणि 'केदारको लेख-लडाखके बारे मे सबकूछ पता है' अशी काही वाक्य शोधून ती लेखांमध्ये लिहायचं ठरवलं होतं. पण मी त्यावरून प्रवासादरम्यान त्याला पुरेसं पिळलेलं आहे.)

ह्या सगळ्या प्रवासाचं वर्णन लिहून काढणं हा ही एक अतिशय आनंददायी अनुभव होता. लिहिताना, फोटो बघताना सगळं परत आठवत होतं. केदारने एका लेखाच्या प्रतिक्रिये लिहिलं तसं ह्या लेखांमध्ये भरपूर 'अडगळ' होती, पण ती 'समृध्द' होती आणि महत्त्वाची होती. मी हे आत्ता लिहून ठेवलं नसतं, तर बारिकसारिक गोष्टी हळूहळू विसरून गेलो असतो. त्यामुळे काही ठिकाणी पाल्हाळ झाली खरी पण एकंदरीत लिहून झाल्यावर थोडेफार बदल वगळता संपादन करणं मी टाळलं. लेखांवर प्रतिक्रिया यायच्याच पण बर्‍याच जणांनी इमेल, फोन, चॅटवर देखील लेख आवडत असल्याचं आवर्जून कळवलं. काही काही प्रतिक्रिया 'अगदी खास तुझी स्टाईल', 'लेखनाची उत्तम शैली' अश्या होत्या. आपल्या लेखनाला स्वतःची 'स्टाईल' आहे, ती लोकांना जाणवते आहे आणि मुख्य म्हणजे आवडते आहे हे वाचणं फारच सुखावून टाकणारं, गुदगुल्या करणारं वगैरे होतं! तर लेख वाचून प्रतिसाद देणार्‍या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार!

काही जणांनी 'यात्रेचं वर्णन खूप आवडलं, आता प्रत्यक्ष गेलं नाही तरी चालेल' असं काही लिहिलं आहे. तर सांगणं एव्हडच आहे, की शब्दांत कितीही वर्णन केलं तरी प्रत्यक्ष अनुभूती प्रत्येकासाठी निराळीच असणार आहे. त्यामुळे इच्छा असेल आणि शक्य असेल तर नक्की जा. वेळ असेल तर भारताच्या बाजूनेच जा कारण सगळाच परिसर खूप सुंदर आहे.

अनयाने तयारीबद्दलची सगळी माहिती लिहिलेलीच आहे. आमची 'key learning' तिथेच लिहिन, जेणेकरून माहिती एकत्र राहील.

|| ॐ नमः शिवाय ||
0 Responses

Post a Comment