Showing posts with label Vancouver and BC. Show all posts
Showing posts with label Vancouver and BC. Show all posts

जग आयलंड हाईक - (Jug Island Hike - Belcarra Regional Park)

 


बर्नबी माऊंटनचा हाईक झाल्यावर पुढचा शनिवार रविवार पावसात गेल्याने कुठे जाता आलं नाही. पण त्यानंतरच्या शनिवार रविवारी परत चांगलं उन पडणार होतं. त्यामुळे मग हाईकच्या दृष्टीने शोधाशोधी सुरू केली. शशी आणि कस्तुरीचे दुसरे कार्यक्रम ठरलेले असल्याने त्यांना जमणार नव्हतं. इथे वसंत  ॠतू सुरू झालेला असला तरी आजुबाजूच्या अनेक डोंगरांवर अजूनही बर्फ आहे. त्यामुळे आम्ही एखाद्या बर्फ असलेल्या ट्रेलवर जावं का असा विचार करत होतो. पण 'ऑलट्रेल.कॉम' तसच 'व्हॅंकुअर ट्रेल'  वेबसाईटवर संमिश्र माहिती दिसली. म्हणजे काही जण म्हणे 'स्नो स्पाईक्स' असलेले बुट वापरा, काही जण म्हणे साधे ट्रेकिंग शुजपण चालतील. काही ठिकाणी ट्रेलच्या दिशादर्शक खुणा गायब झाल्या आहेत असंही वाचलं. आमचे आम्हीच असताना उगीच बर्फातलं साहस करायला नको वाटायला लागलं. शिवाय आठवडाभर ऑफिसमध्ये बरीच दमणूक झालेली असल्याने एखादा लहानसा हाईक करावा असं वाटलं. मग अश्या "आखुड शिंगी - बहू दुधी" अटींमध्ये बसणारा बेलकारा रिजनल पार्क मधला 'जग आयलंड ट्रेल' बरा वाटला. जाऊन येऊन ५.५ किलोमिटरच्या ह्या ट्रेलवर साधारण ३०० मिटरची एकूण चढाई होते. तसा हा सोप्या प्रकारातला आहे. ट्रेल चालून गेलं की आपण इंडीयन आर्मच्या किनार्‍यावर जाऊन पोहोचतो आणि तिथून समोर 'जग आयलंड' नावाचं बेट दिसतं म्हणून ट्रेलचं नाव 'जग आयलंड ट्रेल'.  हे बेलकारा रिजनल पार्क आमच्या घरापासून उत्तर पूर्वेला आहे. योगायोगाने ह्यावर्षीचे आत्तापर्यंतचे तिनही हाईक हे आमच्या घरापासून उत्तर पूर्व दिशेला असणार्‍या परिसरातच होते पण गेल्यावर्षी मात्र आम्ही ह्या बाजूला एकदाही आलो नव्हतो.

शनिवार सकाळी दहा वाजता निघायचं म्हणत होतो पण निवांत उठून ऑमलेट-ब्रेडचा ब्रेकफास्ट करेपर्यत साडे अकरा वाजले. खाऊन झाल्यावर झोप यायला लागली आणि मग आता जाणं रद्द करावं की काय असं वाटायला लागलं. पण मग आळस झटकून उठलो आणि तयारी करून निघालो. हा ट्रेल 'डॉग फ्रेंडली' असल्याने ज्योईला पण घेऊन जायचं होतं पण अंतर कमी असल्याने फार तयारी करावी लागली नाही.

गुगल मॅप बेलकारा पार्कच्या पार्कींग लॉटमध्ये घेऊन गेला पण आम्ही ज्या रस्त्यावरून गेलो त्या बाजुचं गेट बंद होतं. तिथे समोर दोन बायका गाड्या लावत होत्या. आम्ही काही विचारायच्या आधीच त्या म्हणाल्या की हे दार बंद आहे, तुम्ही मागे मुख्य रस्त्याला लागा आणि उजवीकडे पार्कच्या प्रवेशद्वारातून आत जा की मग तुम्ही पार्कींगमध्ये पोहोचाल. आणि ह्या सगळ्याचं एकूण अंतर होतं ८ किलोमिटर! जवळचं दार बंद ठेऊन लोकांना एव्हडा मोठा फेरा मारायला लावण्यामागचं कारण काय ते कळलं नाही.

पार्कींगच्या जवळच पिकनीक एरिया  आहे. परिसर सुंदर आहे. किनार्‍याजवळ मस्त मोठी हिरवळ आहे. त्यावर अनेक ठिकाणी बसायला बाक तसचं पार्टी करायला गझिबो आहेत.  स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने आज बरीच गर्दी होती. एका मोठ्या ग्रुपची आऊटडोर पार्टी सुरू होती. शिवाय काही जण बार्बेक्यू करत होते. 




थोडावेळ तिकडे घालवून आम्ही ट्रेलची सुरुवात शोधून काढून चालायला सुरूवात केली. सुरुवातीला थोडा चढ गेल्यावर नंतर चढ उताराचा रस्ता आहे. हा डॉग फ्रेंडली ट्रेल असल्याने बरीच कुत्री येतात आणि त्यामुळे पार्कमध्ये जागोजागी आपल्या कुत्र्यांनी केलेली घाण उचलण्यासाठी प्लॅस्टीकच्या पिशव्या ठेवल्या आहेत. कुत्र्याची शी पिशवीने उचलून वेगळ्या ठेवलेल्या कचर्‍याच्या डब्यात टाकून द्यायची. काही जण मात्र त्या भरलेल्या पिशव्या इकडे तिकडे ठेऊन देत होते. पिशव्या जंगलात इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा ती घाण न उचलणं एकवेळ परवडलं! 

दोन्ही बाजूला दाट झाडी असल्याने छान वाटत होतं. एक छोटी टेकडी चढून उतरली की मग बीच येतो. रस्त्यात अनेक कुत्री भेटली, त्यामुळे ज्योईची एकदम मजा झाली. भेटणार्‍या प्रत्येक कुत्र्याबरोबर त्याला खेळायचं असतं.  इथे घराजवळ फिरवताना कधी कधी कुत्रेमालकांना घाई असली की कुत्र्यांना खेळता येत नाही पण इथे तसं नसल्याने सगळे थांबून खेळू देत होते. चढावर काही काही ठिकाणी लाकडी पायर्‍या केल्या आहेत. साध्या ट्रेलपेक्षा ह्या पायर्‍या जास्त त्रासदायक वाटतात! 


तार सुरू झाल्यावर अचानक झाडीतून समुद्राचं दर्शन झालं!  हळूहळू उतरून किनार्‍यावर आलो. समोरच जग आयलंड दिसत होतं. 

 



 भरपूर गर्दी होती. ज्योईला पाण्यात खेळायला फार आवडत नाही. त्यात तो जरा पाण्यात पाय घालायचा प्रयत्न करत होता पण लाटा आल्या की पुन्हा पळून जात होता. किनार्‍यावरच्या कुत्र्यांचं एकमेकांना भुंकून साद घालणं सुरू होतं. आम्ही जरावेळ वाळूत निवांत बसलो. कुठून तरी एक तरूण तरूणी कयाकींग करत किनार्‍यापाशी आले. तो मुलगा आधी उतरला, त्याने स्वतःची कयाक पाण्याबाहेर काढली , मग त्या मुलीची ओढली. थर्मास मधून आणलेली कॉफी त्याने तिला दिली आणि मग स्वतः प्यायली. थोडावेळ टाईमपास केला आणि पुन्हा निघाले. ती मुलगी स्वत:च्या कयाकमध्ये बसली ह्याने तिला आत ढकललं आणि मग हा निघाला. मी म्हंटलं ही एव्हडी कयाकिंग करू शकते मग हिला स्वत:चं स्वतः आत बाहेर करायला काय झालं ? तर शिल्पा म्हणे  ते  अजून "तुज्यासाठी कायपन!" मोडमध्ये असतील..  आपल्यासारखं नाही !

इथे पॅसिफिक नॉर्थ वेस्टात कायमच समुद्राचं किंवा कुठल्याही जलाशयाचं पाणी प्रचंड गार असतं.  पण बीचवर आल्यासारखं आम्ही पाण्यात हात पाय बुडवून आलो. शास्त्र असतं ते! पाणी खूप गार होतं पण आलेल्या एका ग्रुपमध्ये पाण्यात डुबकी मारायची पैज लागली. एक डुड ते आव्हान स्विकारून कपडे उतरवून खरच पाण्यात डुबक्या मारून आणि थोडं पोहून आला. नंतर बाहेत येऊन कुडकुडत होता. 

सुमारे पंधरा वीस मिनीटांनी ज्योई खूपच वसवस करायला लागल्यावर आम्ही परत निघालो.

परतीचा प्रवास बर्‍यापैकी आरामात झाला. ज्योईला खेळायला अजून दोन-चार कुत्री भेटली आणि तुज्यासाठी कायपन!" मोडमधलं अजून एक जोडपं भेटलं. ह्यात तो मुलगा त्या मुलीला पाठूंगळी घेऊन बराचसा ट्रेल चालून आला ! मघाशी लागलेल्या लाकडी पायर्‍या आता उतरून यायच्या होत्या. चढण्यापेक्षा उतरणं नेहमीच जास्त त्रासदायक वाटतं. तसच ह्या पायर्‍यांचंही झालं.  आल्यावर आजून एक गंमत दिसली ती म्हणजे कुत्र्यांना पाणी पिण्यासाठी हे वॉटर पाऊट. त्यांच्या उंचीला येईल अशापद्धतीने ह्याची रचना होती. शिवाय आपल्याला पायाने पाण्याचा नळ दाबता येईल अशी सोय, त्यामुळे हात लावायला नको. ज्योई आधी वहातं पाणी पाहून घाबरला पण नंतर एकदम गटागटा पाणी प्यायला!

 
जाऊन येऊन साडेतीन तासांत हा हाईक पूर्ण झाला. अंतर कमी असल्याने निवांत उशीरा निघूनही चाललं. एकंदरीत स्वच्छा सूर्यप्रकाशातला शनिवार सत्कारणी लागला.
 
 ----- 
 
लागलेला वेळ : पंधरा मिनिटांचा ब्रेक धरून अडीच तास
एकूण चढाई (एलेवेशन) : ९०९ फूट (२७७ मिटर) संदर्भासाठी: सिंहगडाची चढाई 1950 फूट (६०० मिटर) आहे.
 

 
नकाशा:

बर्नबी माउंटन (Burnaby Mountain Trail)

गेल्या आठवड्यात ह्या वर्षीच्या हायकिंग सिझनचा श्रीगणेशा करून झाल्यावर लगेच पुढचा शनिवार रविवारही बिनपावसाचा, स्वच्छ सूर्यप्रकाशाचा आणि इथल्या मानाने जरा गरम (म्हणजे २४ डि.से.) हवा असलेला येणार होता. शुक्रवारी शिल्पा एकटीच लाँग सायकलींग राईडला जाऊन आली होती त्यामुळे पुन्हा लगेच हाईक करण्यापेक्षा कुठल्यातरी वॉटरफ्रंटला जावं का असं वाटत होतं. पण हा पहिला गरम सप्ताहांत असल्याने सगळीकडे गर्दी होईल असं वाटून तो बेत रद्द केला आणि ते बरच झालं! नंतर पेपरमध्ये सगळ्या समुद्र किनार्‍यांवर प्रचंड गर्दी झाली होती असं वाचलं! कोविडच्या बातम्या आणि आकडेवारी वाचून फार लांब जावसं वाटेना, मग अगदी आमच्या 'बॅकयार्डा'तच असलेल्या बर्नबी माउंटनवर चढाई करायचं ठरवलं. आम्ही वँकुअरला आल्याआल्या आमची कस्तुरी, शशी आणि काव्याशी ओळख झाली होती. त्यांच्याबरोबर आम्ही गेल्यावर्षी दोन हाईक केले. शशी तर एकदम एक्सपर्ट हाईकर आहे आणि दर आठवड्याला हाईक करतो. त्यांचा काही प्लॅन नसेल तर त्यांना विचारू म्हणून शिल्पाने त्यांना फोन केला. शशीचा प्लॅन ठरला नाही त्यामुळे ते यायला तयार झाले.

गेल्या आठवड्यातल्या हाईकला आम्ही ज्योईला घेऊन गेलो होतो पण आज दहा किलोमिटरपेक्षा जास्त अंतर असल्याने त्याला न्यायचं नाही असं ठरलं. त्यामुळे त्याचं डे-केअर उघडल्यावर त्याला तिकडे सोडलं आणि मग आम्ही साडेदहा वाजता बर्नबी माउंटन पार्कमध्ये पोहोचलो. ज्योई डेकेअरमध्ये मजेत रहातो. तिकडे त्याला बाकी कुत्र्यांबरोबर दंगा करता येतो! आम्ही बर्नबी माउंटनच्या पार्किंग लॉटमध्ये पोहोचलो तेव्हा बरीच जागा रिकामी होती. मागच्या वर्षी फॉलमध्ये आलो होतो तेव्हा पार्किंग शोधायला खूप त्रास झाला होता. त्या वेळी झाडांची पानगळ नुकतीच सुरू झाली होती पण आत्ता मात्र वसंताचा सुंदर फुलोरा फुलला होता.

 हे पार्क जवळजवळ शहरातच आहे. ह्या डोंगरावर एका बाजूला हे पार्क आहे, तर दुसर्‍या बाजूला सायमन फ्रेजर युनिव्हर्सिटीचा परिसर आहे. ह्या डोंगराची उंची ३६६ मिटर असून ह्यावर जवळजवळ २८ किलोमिटर लांबीचे ट्रेल आहेत. ह्या हाईकचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपण डोंगराच्या वरून चालायला सुरूवात करतो, मग खाली उतरतो आणि मग पुन्हा वर चढून सुरुवात केली तिथे पोहोचतो. आधी उतरणे आणि मग चढणे हा प्रकार जरा वेगळा वाटतो.

आम्ही पार्कींगमध्ये आलो आणि मागोमाग शशी, कस्तुरी आणि काव्याही आलेच. कोव्हिडमुळे त्यांना आम्ही सुमारे दहा महिन्यांनी भेटलो. पार्कींग जवळाच्या हॉरयझॉन रेस्टॉरंटच्या मागून जाणार्‍या पॅंडोरा ट्रेलने वर जाऊन पुढे ट्रान्स कॅनडा ट्रेलला लागलो. इथून थोडं पुढे गेल्यावर ऑक्टोपस म्युरल लागलं. ते म्युरल म्हणजे पाण्याच्या टाकीवर स्थानिक चित्रकारांनी चितारलेलं छान चित्र आहे. इथे 'सिटी ऑफ बर्नबी' स्थानिक चित्रकारांना अशी चित्र, शिल्प तयार करायला उत्तेजन देते. त्यानिमित्ताने शहर सुशोभिकरणही होतं. 

ट्रान्स कॅनडा ट्रेलला डावीकडे वळल्यावर एक दहा-बारा मिनिटे चालले असू नसू तर झाडीमधून 'बुरार्ड इनलेट' ( म्हणजे पॅसिफिक समुद्राचा व्हँकुअर परिसरात जमिनीत घुसलेला पट्टा. ह्याला खाडीच म्हणता येईल बहुतेक!) ची सुंदर दृष्य दिसायला लागली. खाली व्हँकुअर बंदराचा परिसर, जाणा-येणार्‍या मोठ्या बोटी तसच आज स्वच्छ सुर्यप्रकाश असल्याने स्थानिकांच्या लहान बोटी असं छान दिसत होतं. 

 

पहिले तीन-साडे तीन किलोमिटर एकसलग उतार होता. पुढे पॉवर लाईन ट्रेलचा फाटा गेल्यावर मात्र उतार एकदम वाढला. पुढच्या फक्त एका किलोमिटरमध्ये आम्ही सुमारे दिडशे मिटर खाली आलो. इथे ट्रेलवर वाळू-मुरूम असल्याने चालायलाही त्रास होत होता. खाली पाण्याजवळ पोहोचल्यावर 'सनकोर रिफायनरी' लागली आणि तिकडे ट्रेल सपाट झाला.  इथून पुढे अडीच किलोमिटर ट्रेल अगदी टळटळीत होता. जराही झाडांची सावली नाही आणि शेजारून हायवे! एकीकडे रिया आणि काव्याच्या 'हॅरी पॉटर' बद्दल गप्पा सुरू होत्या. थोडं पुढे रस्त्यात 'बाईक पार्क' लागलं. माऊंटन बाईकवरून कसतरी करायची हौस असणार्‍यांसाठी चांगली सोय केली आहे. 

 

बाईक पार्क गेल्यावर आता हळूहळू चढ सुरू झाला. जरा झाडांची सावली आल्यावर आम्ही जरा ब्रेक घेतला. तशी फार दमणूक होणार नाही हे माहित असल्याने फार खाणं आणलं नव्हतं. बरोबरची बिस्कीटं, सुकामेवा खाऊन पाणी प्यायलं. आता इथून पुढच्या ट्रेलचं नाव 'वेलोड्रोम ट्रेल' होतं. मी रिया आणि काव्याला 'वॉल्डमॉट ट्रेल' सांगून चिडवून घेतलं! थोडं पुढे गेल्यावर एकदम खडा चढ सुरू झाला. आधी उतरलेलं सगळं आता भरून काढायचं होतं. आता आम्ही वळून दुसर्‍या बाजूला आलेलो असल्याने बुरार्ड इनलेटच्या अजून आतला परीसर म्हणजे 'इंडीयन आर्म'चा परिसर दिसायला लागला.

 

ट्रेल वळून पुढे गेला आणि आता डोंगरमाथ्यावर पोहोचण्यासाठी पाचशे पायर्‍या चढायच्या होत्या. कस्तुरी सध्या छंद म्हणून फ्लाईट ट्रेनिंग घेते आहे. हा चढ चढताना तिने तिचे विमान उड्डाणाचे अनुभव सांगितले. एकंदरीत ते सगळे अनुभव ऐकायला भारी वाटलं! 

सगळ्या पायर्‍या आणि उरलेला थोडा चढ चढून आम्ही तीन-सव्वातीन तासांनी पार्किंगच्या जवळच्या 'प्लेग्राऊंड ऑफ गॉड्स'च्या परिसरात पोहोचलो. इथे खूप उंच उंच लाकडी शिल्पं आहेत. ही सगळी शिल्पं 'सिटी ऑफ बर्नबी' ला जपान मधल्या 'कुशिरो' ह्या शहराने भेट म्हणून दिली आहेत. ही दोन शहरं 'सिस्टर सिटीज' आहेत. (तिथली ही माहिती वाचून मला एकदम 'ब्रेमेन सर्कल' आठवलं!)  अमेरिकेतल्या मूळ रहिवाशांना जसं 'नेटीव्ह अमेरिकन' म्हणतात तसं कॅनडातल्या मूळ स्थानिकांना 'इंडिजिनियस' म्हणतात. काही इंडिजिनियस लोकं पुढे जपानातल्या बेटांवरही स्थलांतरीत झाली. त्यांच्या सन्मान करण्याच्या हेतूने 'प्लेग्राऊंड ऑफ गॉड्स' तयार केलं आहे. 


इथे मस्त मोठी हिरव़ळ आहे. आज एकदम स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने आणि हवाही त्यामानाने गरम असल्याने खूप लोकं उन्हं खातं, वाचत, गप्पा मारत तसच मुलं आणि कुत्र्यांबरोबर खेळत बसली होती. काही जणं बरोबर खाणं पिणं आणून छान पथार्‍या पसरून बसले होते. आम्हीही थोडावेळ सावलीत बसून गप्पा छाटल्या आणि मुलींनीही खेळून घेतलं.

एकंदरीत साडेदहा किलोमिटर चालणं आणि ३९१ मिटरची चढाई (elevation gain) असलेला हा हाईक एकदम छान आणि सुटसुटीत झाला. नंतर असं वाटलं की ज्योईला आणलं असतं तरी चाललं असतं. घराच्या एकदम जवळ असल्याने त्याला घेऊन पुन्हा एकदा करता येईल!

आरव्ही ट्रीप - एक अनुभव


इथे पॅसिफीक नॉर्थवेस्टमध्ये जवळ जवळ ७-८ महीने पाऊस असतो. साधारण सप्टेंबर पासून ते मे हे पावसाळी महीने असतात. नेहमी अगदी मुसळधार  पाऊस पडत नसला तरी पावसाची रिपरिप बर्‍याचदा सुरू असते. त्यात हिवाळ्याचे तीन महीने म्हणजे लहान दिवस, थंडी आणि सतत चालू असलेली पावसाची झड किंवा ढगाळ हवा! नंतर जसा वसंत ऋतू सुरू होतो तसं पावसाचं प्रमाण कमी होतं आणि अधे मधे स्वच्छ सूर्यप्रकाश असलेले दिवस येतात. यंदा मात्र वसंत ऋतूबरोबर करोना महामारीचंही आगमन झालं आणि मनात असलेले प्रवासाचे अनेक बेत रद्द करावे लागले किंवा पुढे ढकलावे लागले. करोनाचं संकट जसं वाढू लागलं तसं  लॉकडाऊनमुळे गावातल्या गावात दुकानं, रेस्टॉरंट वगैरेंमध्येही जाता येईना, मोठ्या प्रवासाला जाणं तर दुरच राहिलं. सुदैवाने आम्ही रहातो त्या ब्रिटीश कोलंबिया राज्याच्या 'हेल्थ ऑफिसर' डॉ. बॉनी हेन्री ह्यांच्या खमकेपणामुळे आणि त्यांनी वेळीच उचललेल्या पावलांमुळे इथली रुग्णसंख्या आटोक्यात राहिली आणि राज्याने हळूहळू गोष्टी उघडायला सुरूवात केली. त्यातल्या दुसर्‍या टप्प्यात राज्यातली 'प्रॉव्हिंशीयल पार्क्स' सुद्धा उघडली. इथे डोंगर, दर्‍या आणि त्यातुन वहाणार्‍या नद्या, विस्तीर्ण समुद्र किनारे अश्या भौगोलिक परिस्थितीमुळे राज्यभर अशी अनेक पार्क आहेत आणि त्यात दरवर्षी जवळ जवळ लाखभर प्रवासी हायकिंग, ट्रेकिंग, कॅम्पिंग, तसच बाकीचे साहसी खेळ जसे की वॉटर राफ्टींग, सर्फिंग, कयाकिंग, रॉक क्लाइंबिंग वगैरे करायला येतात.


कॅम्पिंग मध्येही तीन प्रकार आहेत. एक म्हणजे तंबू ठोकून त्यात रहाणे, दुसरं म्हणजे लाकडी केबिन्समध्ये रहाणे आणि तिसरं म्हणजे तुम्ही आरव्ही (RV - Recreational vehicle) किंवा कॅराव्हॅन ('स्वदेस' सिनेमात शहारूख खान घेऊन फिरत असतो तीच) घेऊन येऊन त्यात रहाणे. 'अनलॉकिंग'च्या दुसर्‍या टप्प्यात तंबूतलं कॅम्पिंग सोडून बाकी बर्‍याच गोष्टी सुरू झाल्या आणि ज्या साईट्सवर आरव्ही साठी लागणार्‍या सगळ्या सोई असतील त्या ठिकाणी आरव्ही कॅम्पिंग सुरू झालं. ह्या सगळ्या बातम्या पेपरात वाचल्याने आणि बाकी बेत रद्द झालेले असल्याने आपण आरव्ही ट्रीप करावी का असं किडा डोक्यात वळवळायला लागला.

तीन लोकांना झोपता येईल अश्या लहान आरव्ही पासून ते सात किंवा अधिक लोकांना झोपता येईल अश्या मोठ्या आरव्हीपर्यंत बर्‍याच प्रकारच्या आरव्ही उपलब्ध असतात. ह्यातही दोन प्रकार असतात. एक म्हणजे कॅम्पर आणि दुसरी म्हणजे फुल आरव्ही. कॅम्पर आपल्या गाडीला मागे जोडून घेऊन जाता येतो. तो बिनागाडीचा चालत नाही. बर्‍याचदा लोकं आपल्या एसयुव्ही किंवा ट्रकला मागे कॅम्पर लावून ट्रीपला जातात. तो कॅम्पर एकदा पार्क केला की मग आसपास गाडीने फिरता येतं. दरवेळी सगळा लवाजमा बरोबर घेऊन फिरायची गरज रहात नाही. पण ह्या प्रकाराचा तोटा एकच की गाडी आणि कॅम्पर वेगवेगळे असल्याने चालत्या गाडीत एकमेकांमध्ये ये-जा करता येत नाही आणि त्यामुळेच चालत्या गाडीत किचन, टॉयलेट, फ्रिज ह्यांचा वापर पुढे गाडीत बसलेल्यांना करता येत नाही. पहिल्या-दुसर्‍यांदा जाणार्‍यांनी हा प्रकार शक्यतो घेऊ नये. कारण तितकी मजा कदाचित येणार नाही. फुल आरव्हीमध्ये ड्रायव्हर आणि शेजारची सिट ह्यांची रचना आपल्या नेहमीच्या गाडी सारखी असते पण मागे पूर्ण वेगळं असतं आणि सगळं जोडलेलं असल्याने बाकी प्रवाश्यांना अगदी बेडवर आडवं झोपताही येऊ शकतं. ह्या आरव्ही मध्ये जागेचा वापर अतिशय कल्पकतेने केलेला असतो. सातपेक्षा मोठ्या आरव्ही ह्या बस सारख्या दिसणार्‍या असतात तर लहान ह्या साधारण ट्र्क सारख्या असतात. काही जण फुल आरव्हीच्या मागे गाडी टो करून घेऊन जातात. जर जास्त दिवसांची ट्रीप असेल तर ते सोईचं ठरू शकतं पण मी केलेल्या ट्रीपमध्ये आम्ही सगळेकडे आरव्हीनेच फिरलो.

ड्रायव्हरच्या वर तीन जण (दोन मोठे आणि एक लहान मुल) झोपू शकतील असा बेड असतो. शिवाय एक टेबल कम बेड, आकारानुसार एक किंवा दोन साधे बेड, गॅस, मायक्रोवेव्ह, फ्रिज, टॉयलेट, शॉवर आणि काहीवेळा टिव्ही आणि डिव्हीडी प्लेयर असतो. ह्यातले गॅस आणि फ्रीज प्रोपेनवर चालतात तर बाकी सगळी उपकरणं विज किंवा जनरेटरवर चालतात. (सगळ्याच आरव्हीमध्ये जनरेटर नसतो. इथे कॅनडात फक्त ७ किंवा जास्त माणसांसाठीच्या आरव्हीमध्येच जनरेटर असतो. अमेरीकेत सगळ्या वाहनांमध्ये असलेला बघितला आहे.) जनरेटरची बॅटरी गाडी सुरु असताना चार्ज होत असते. वापरायचं पाणी आणि सांडपाणी  साठवण्यासाठी वेगवेगळ्या टाक्या असतात. साठवायचं पाणी पिण्यासाठी वापरता येऊ शकतं पण आम्ही तीनही वेळा पाण्याच्या बाटल्या / कॅन घेऊन गेलो होतो. आरव्हीत ठिकठिकाणी प्लग पॉईंट आणि दिवे असतात. जनरेटर, प्रोपेन, ताजं पाणी, सांडपाणी ह्या सगळ्याची पातळी दाखवणारा डॅशबोर्ड असतो.  आरव्हीमध्ये हिटर आणि एसी सुद्धा असतो पण तो फक्त वीजेवरच चालू शकतो. हवा खेळती ठेवण्यासाठी छताला एक झडप पण असते. मी केलेल्या तीनही ट्रीपमध्ये रात्री ती झडप उघडी ठेऊन काम भागलं होतं. हीटर किंवा एसी लावायची गरजच पडली नाही. आत्ता ह्यावेळी तर रात्री थंडीच वाजली!

आरव्ही कँपसाईटमध्ये ज्या साईट 'फूल सर्व्हिस' असतात तिथे प्रत्येक आरव्हीसाठी विजेचा पॉईंट, पाणी पुरवठ्यासाठी नळ आणि सांडपाण्याची टाकी रिकामी करण्यासाठी सोय पुरवली जाते. काही ठिकाणी नळ आणि सांडपाणी बाहेर टाकायची व्यवस्थ्या प्रत्येक आरव्हीला न देता कुठेतरी एकेच ठिकाणी केलेली असते. आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा आरव्ही तिथे घेऊन जायची आणि ही पाण्याची टाकी भरणे आणि सांडपाण्याची टाकी रिकामी करणे हे करून टाकायचं.  टॉयलेटमधलं पाणी म्हणजे ब्लॅक वॉटर आणि बाकी ठिकाणचं (म्हणजे वॉश बेसिन, सिंक वगैरेंमधलं) ग्रे वॉटर. आधी ब्लॅक वॉटर काढायचं आणि नंतर ग्रे. म्हणजे पाईप स्वच्छ होऊन जातो. काही ठिकाणी विजेचा पॉईंटही नसतो. त्यामुळे सगळी उपकरणं जनरेटवर चालवावी लागतात. अर्थात त्यात फ्रीज पूर्ण पॉवरवर चालत नाही. आरव्ही हे एकंदरीत मोठं धूड असल्याने अंतरावर थोड्या मर्यादा येतात शिवाय तुम्ही आरव्ही किती अंतर चालवता ह्यावर भाडं बदलतं.

मी मागे दोन वेळा आरव्ही ट्रीप केलेली आहे. पहिल्या ट्रीपला मोठी मित्रांची गँग बरोबर होती, त्यामुळे मला काही विशेष बघावं लागलं नव्हतं. गेल्यावर्षीही शिल्पाचा भाऊ अमित आणि त्याची फॅमिली बरोबर होती त्यामुळे अगदीच एकटे नव्हतो. पण यंदा सोशल डिस्टंसिंगमुळे बाकी कोणाला विचारलं नव्हतं आणि आम्ही तिघच जाणार होतो त्यामुळे काय करावं ठरत नव्हतं. अर्थात हॉटेल किंवा कॅबिनमध्ये रहाण्यापेक्षा आणि तंबूत राहून कॅम्पसाईट वरची कॉमन बाथरूम आणि टॉयलेट वापरण्यापेक्षा आरव्हीचा पर्याय सगळ्यात चांगला वाटत होता. सलग साडेतीन महिने घरात बसून खूप कंटाळाही आला होता. त्यामुळे ऑफिसमधल्या कामाचा आढावा घेऊन, शनिवार रविवारला जोडून दोन दिवस सुट्टी टाकली आणि कुठे जायचं ते नंतर ठरवू  असं म्हणून आरव्हीचं बुकिंग करून टाकलं.

कुठे जायचं ते ठरवण्यासाठी दोन तीन घटक होते. एक म्हणजे बॉर्डर ओलांडून अमेरीकेत जायचं नव्हतं कारण  एकतर बॉर्डर खुली नव्हती आणि जरी असती तरी कधी बंद होईल ह्याचा भरोसा नव्हता.  ब्रिटीश कोलंबिया सोडून दुसर्‍या कुठल्या राज्यात जायचं नव्हतं, कारण इथे आंतरराज्या सीमा बंद नसल्या तरी तसा प्रवास शक्यतो करू नका अश्या सुचना होत्या. ब्रिटीश कोलंबियाच्या पश्चिमेला 'वँकुअर आयलंड' हा भाग येतो. त्या भागात खूप सुंदर समुद्र किनारे आहेत आणि प्रॉव्हींशियल पार्क्स आहेत. तिथे जायचा पर्याय होता पण ह्या भागात जायचं तर गाडी बोटीवर चढवून न्यावी लागते. ह्या बोटी मध्यंतरी बंद होत्या. म्हटलं आपण तिकडे गेलो आणि पुन्हा बंद झाल्या तर कोण अडकून पडणार म्हणून मग तो पर्यायही रद्द केला. थोडी शोधाशोध केल्यावर एक 'कोस्ट माऊंटन सर्कल लूप' नावाचा रूट सापडला. ह्यात व्हॅन्कुअर ते लिटन, लिटन ते लिलूएट, लिलूएट ते व्हिसलर (इथे २०१० चं विंटर ऑलिंपिक झालं होतं) आणि परत व्हॅंकुअर असा प्रवास होता. लिटन आणि लिलुएट ही अक्षरशः खेड्यांपेक्षाही लहान गावं आहेत. आम्हांला फार कुठे प्रेक्षणीय स्थळ बघायची नव्हती आणि तशीही बरीचशी बंदच होती. त्यामुळे मुळ उद्देश्य हा घराबाहेर पडणे आणि निसर्ग बघणे हाच होता. 

आम्हांला बाहेरच्या लोकांशी संपर्क शक्य तितका टाळायचा असल्याने आम्ही कुठल्याही दुकानात, रेस्टॉरंटात जायला लागू नये अश्या दृष्टीने तयारी करून नेली होती. काही काही आरव्ही रेंटलमध्ये भांडी (स्वंयपाक करायची तसेच ताटल्या, ग्लास वागैरे) मिळतात पण सध्याच्या काळात ते ही नको वाटलं त्यामुळे आम्ही आमची भांडी बरोबर घेतली होती. इंस्टा पॉट बरोबर ठेवला होताच  चार दिवस कधी कधी काय काय खायचं हे साधारण ठरवून त्याप्रमाणे शिधा बरोबर ठेवला होता. अर्थात ट्रीपला जाऊन पुन्हा स्वंयपाक करा, भांडी घासा हेच करायचं नव्हतं त्यामुळे सँडविच, पोहे, खिचडी, ब्रेड भुर्जी, ऑमलेट असे साधे सोपे पदार्थ करायचे ठरवले आणि एकावेळ साठी फ्रोजन पराठे बरोबर ठेवले होते. छोटा कोळश्याच्या ग्रील आणि त्याबरोबर कोळसे, ईग्नाईट लिक्व्हिड हे ही ठेवलं. दुधाचा कॅन आणि चहाचं सामान अर्थातच बरोबर होतच. सटरफटर खाणं म्हणून मफिन्स, चिप्स, फळं ठेवली होती. रेंटल कंपन्या अंथरूण / पांघरूणाचा सेटही देतात पण तो सुद्धा आम्ही आमचाच बरोबर घेतला होता. शिवाय बरोबर वाचायला पुस्तकं, बोर्ड गेम्स आणि आयपॅडवर सिनेमे डाऊनलोड करून घेतले होतो. सध्या लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हँडसानीटतसेच, मास्क घेतलच आणि त्याबरोबर लायजॉलचा स्प्रे ही घेतला.  देताना आरव्ही सॅनीटाईज केलेली असतेच पण तरीही आरव्ही मिळाल्या मिळाल्या आधी संपूर्ण आरव्ही लायजॉल स्प्रे मारून पुसुन काढली आणि मगच आमचं सामान आत ठेवलं.

आमच्या ट्रीपमध्ये व्हिसलरचं ऑलिंपींक पार्क वगळता बाकी कुठलीच प्रेक्षणीय स्थळ नव्हती पण तरीही ब्रिटीश कोलंबियातले डोंगर, सुचीपर्णी झाडांची घनदाट जंगलं, प्रचंड मोठ्या आणि वहात्या नद्या, लांबच्या लांब रेल्वे गाड्या, अगदी लहान लहान खेडेगावं, डोंगररांगा ओलांडून पूर्वेकडे गेल्यावर येणारा पर्जन्यछायेचा प्रदेश आणि तिथला उघडा-बोडका परिसर असं बरच काय काय अनुभवलं. लिटन आणि लिलुएटच्या कॅम्पसाईट अतिशय निर्जन जागी होत्या आणि दोन्ही नदीच्या काठी होत्या. दोन्ही नद्यांना प्रचंड पाणी होतं आणि प्रवाहाचा ध्रोंकार रात्रभर ऐकू येत होता. त्यामाने व्हिसलरची साईट शहरी गजबजाटातली होती. पण एकूणच सध्याच्या परिस्थितीत आरव्ही ट्रीपपेक्षा अजून सुरक्षित कुठली ट्रीप करता आली नसती. पहिल्यांदा आरव्हीचं मोठं धुड बघितल्यावर ते चालवायचं दडपण येऊ शकतं. आम्ही एकदा तर आरव्ही आपल्या चालवता येणार नाही ह्या भितीने ट्रीप जवळ जवळ रद्दच केली होती! पण तास-दोन तास चालवून झाल्यावर काहीच वाटत नाही. 'रियर व्ह्यू' मिरर नसतो आणि त्यामुळे साईड मिरर वापरायची सवय करावी लागते आणि गाडी मागे नेताना कोणाची तरी मदत घ्यावी लागते, इतकाच काय तो फरक. पण सहज शक्य असल तर विंचवाचं बिर्हाड पाठीवर घेऊन फिरायचा अनुभव एकदा घेऊन बघायला काहीच हरकत नाही. खूप मजा येईल ह्याची १००% खात्री.

२०१९ मध्ये माऊंट रेनियरला नेलेली ७ सिटर आरव्ही:


यंदाची (२०२०ची) ३ सिटर छोटीशी आरव्ही : 

आरव्हीचा एक व्हिडीयो: