आरव्ही ट्रीप - एक अनुभव


इथे पॅसिफीक नॉर्थवेस्टमध्ये जवळ जवळ ७-८ महीने पाऊस असतो. साधारण सप्टेंबर पासून ते मे हे पावसाळी महीने असतात. नेहमी अगदी मुसळधार  पाऊस पडत नसला तरी पावसाची रिपरिप बर्‍याचदा सुरू असते. त्यात हिवाळ्याचे तीन महीने म्हणजे लहान दिवस, थंडी आणि सतत चालू असलेली पावसाची झड किंवा ढगाळ हवा! नंतर जसा वसंत ऋतू सुरू होतो तसं पावसाचं प्रमाण कमी होतं आणि अधे मधे स्वच्छ सूर्यप्रकाश असलेले दिवस येतात. यंदा मात्र वसंत ऋतूबरोबर करोना महामारीचंही आगमन झालं आणि मनात असलेले प्रवासाचे अनेक बेत रद्द करावे लागले किंवा पुढे ढकलावे लागले. करोनाचं संकट जसं वाढू लागलं तसं  लॉकडाऊनमुळे गावातल्या गावात दुकानं, रेस्टॉरंट वगैरेंमध्येही जाता येईना, मोठ्या प्रवासाला जाणं तर दुरच राहिलं. सुदैवाने आम्ही रहातो त्या ब्रिटीश कोलंबिया राज्याच्या 'हेल्थ ऑफिसर' डॉ. बॉनी हेन्री ह्यांच्या खमकेपणामुळे आणि त्यांनी वेळीच उचललेल्या पावलांमुळे इथली रुग्णसंख्या आटोक्यात राहिली आणि राज्याने हळूहळू गोष्टी उघडायला सुरूवात केली. त्यातल्या दुसर्‍या टप्प्यात राज्यातली 'प्रॉव्हिंशीयल पार्क्स' सुद्धा उघडली. इथे डोंगर, दर्‍या आणि त्यातुन वहाणार्‍या नद्या, विस्तीर्ण समुद्र किनारे अश्या भौगोलिक परिस्थितीमुळे राज्यभर अशी अनेक पार्क आहेत आणि त्यात दरवर्षी जवळ जवळ लाखभर प्रवासी हायकिंग, ट्रेकिंग, कॅम्पिंग, तसच बाकीचे साहसी खेळ जसे की वॉटर राफ्टींग, सर्फिंग, कयाकिंग, रॉक क्लाइंबिंग वगैरे करायला येतात.


कॅम्पिंग मध्येही तीन प्रकार आहेत. एक म्हणजे तंबू ठोकून त्यात रहाणे, दुसरं म्हणजे लाकडी केबिन्समध्ये रहाणे आणि तिसरं म्हणजे तुम्ही आरव्ही (RV - Recreational vehicle) किंवा कॅराव्हॅन ('स्वदेस' सिनेमात शहारूख खान घेऊन फिरत असतो तीच) घेऊन येऊन त्यात रहाणे. 'अनलॉकिंग'च्या दुसर्‍या टप्प्यात तंबूतलं कॅम्पिंग सोडून बाकी बर्‍याच गोष्टी सुरू झाल्या आणि ज्या साईट्सवर आरव्ही साठी लागणार्‍या सगळ्या सोई असतील त्या ठिकाणी आरव्ही कॅम्पिंग सुरू झालं. ह्या सगळ्या बातम्या पेपरात वाचल्याने आणि बाकी बेत रद्द झालेले असल्याने आपण आरव्ही ट्रीप करावी का असं किडा डोक्यात वळवळायला लागला.

तीन लोकांना झोपता येईल अश्या लहान आरव्ही पासून ते सात किंवा अधिक लोकांना झोपता येईल अश्या मोठ्या आरव्हीपर्यंत बर्‍याच प्रकारच्या आरव्ही उपलब्ध असतात. ह्यातही दोन प्रकार असतात. एक म्हणजे कॅम्पर आणि दुसरी म्हणजे फुल आरव्ही. कॅम्पर आपल्या गाडीला मागे जोडून घेऊन जाता येतो. तो बिनागाडीचा चालत नाही. बर्‍याचदा लोकं आपल्या एसयुव्ही किंवा ट्रकला मागे कॅम्पर लावून ट्रीपला जातात. तो कॅम्पर एकदा पार्क केला की मग आसपास गाडीने फिरता येतं. दरवेळी सगळा लवाजमा बरोबर घेऊन फिरायची गरज रहात नाही. पण ह्या प्रकाराचा तोटा एकच की गाडी आणि कॅम्पर वेगवेगळे असल्याने चालत्या गाडीत एकमेकांमध्ये ये-जा करता येत नाही आणि त्यामुळेच चालत्या गाडीत किचन, टॉयलेट, फ्रिज ह्यांचा वापर पुढे गाडीत बसलेल्यांना करता येत नाही. पहिल्या-दुसर्‍यांदा जाणार्‍यांनी हा प्रकार शक्यतो घेऊ नये. कारण तितकी मजा कदाचित येणार नाही. फुल आरव्हीमध्ये ड्रायव्हर आणि शेजारची सिट ह्यांची रचना आपल्या नेहमीच्या गाडी सारखी असते पण मागे पूर्ण वेगळं असतं आणि सगळं जोडलेलं असल्याने बाकी प्रवाश्यांना अगदी बेडवर आडवं झोपताही येऊ शकतं. ह्या आरव्ही मध्ये जागेचा वापर अतिशय कल्पकतेने केलेला असतो. सातपेक्षा मोठ्या आरव्ही ह्या बस सारख्या दिसणार्‍या असतात तर लहान ह्या साधारण ट्र्क सारख्या असतात. काही जण फुल आरव्हीच्या मागे गाडी टो करून घेऊन जातात. जर जास्त दिवसांची ट्रीप असेल तर ते सोईचं ठरू शकतं पण मी केलेल्या ट्रीपमध्ये आम्ही सगळेकडे आरव्हीनेच फिरलो.

ड्रायव्हरच्या वर तीन जण (दोन मोठे आणि एक लहान मुल) झोपू शकतील असा बेड असतो. शिवाय एक टेबल कम बेड, आकारानुसार एक किंवा दोन साधे बेड, गॅस, मायक्रोवेव्ह, फ्रिज, टॉयलेट, शॉवर आणि काहीवेळा टिव्ही आणि डिव्हीडी प्लेयर असतो. ह्यातले गॅस आणि फ्रीज प्रोपेनवर चालतात तर बाकी सगळी उपकरणं विज किंवा जनरेटरवर चालतात. (सगळ्याच आरव्हीमध्ये जनरेटर नसतो. इथे कॅनडात फक्त ७ किंवा जास्त माणसांसाठीच्या आरव्हीमध्येच जनरेटर असतो. अमेरीकेत सगळ्या वाहनांमध्ये असलेला बघितला आहे.) जनरेटरची बॅटरी गाडी सुरु असताना चार्ज होत असते. वापरायचं पाणी आणि सांडपाणी  साठवण्यासाठी वेगवेगळ्या टाक्या असतात. साठवायचं पाणी पिण्यासाठी वापरता येऊ शकतं पण आम्ही तीनही वेळा पाण्याच्या बाटल्या / कॅन घेऊन गेलो होतो. आरव्हीत ठिकठिकाणी प्लग पॉईंट आणि दिवे असतात. जनरेटर, प्रोपेन, ताजं पाणी, सांडपाणी ह्या सगळ्याची पातळी दाखवणारा डॅशबोर्ड असतो.  आरव्हीमध्ये हिटर आणि एसी सुद्धा असतो पण तो फक्त वीजेवरच चालू शकतो. हवा खेळती ठेवण्यासाठी छताला एक झडप पण असते. मी केलेल्या तीनही ट्रीपमध्ये रात्री ती झडप उघडी ठेऊन काम भागलं होतं. हीटर किंवा एसी लावायची गरजच पडली नाही. आत्ता ह्यावेळी तर रात्री थंडीच वाजली!

आरव्ही कँपसाईटमध्ये ज्या साईट 'फूल सर्व्हिस' असतात तिथे प्रत्येक आरव्हीसाठी विजेचा पॉईंट, पाणी पुरवठ्यासाठी नळ आणि सांडपाण्याची टाकी रिकामी करण्यासाठी सोय पुरवली जाते. काही ठिकाणी नळ आणि सांडपाणी बाहेर टाकायची व्यवस्थ्या प्रत्येक आरव्हीला न देता कुठेतरी एकेच ठिकाणी केलेली असते. आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा आरव्ही तिथे घेऊन जायची आणि ही पाण्याची टाकी भरणे आणि सांडपाण्याची टाकी रिकामी करणे हे करून टाकायचं.  टॉयलेटमधलं पाणी म्हणजे ब्लॅक वॉटर आणि बाकी ठिकाणचं (म्हणजे वॉश बेसिन, सिंक वगैरेंमधलं) ग्रे वॉटर. आधी ब्लॅक वॉटर काढायचं आणि नंतर ग्रे. म्हणजे पाईप स्वच्छ होऊन जातो. काही ठिकाणी विजेचा पॉईंटही नसतो. त्यामुळे सगळी उपकरणं जनरेटवर चालवावी लागतात. अर्थात त्यात फ्रीज पूर्ण पॉवरवर चालत नाही. आरव्ही हे एकंदरीत मोठं धूड असल्याने अंतरावर थोड्या मर्यादा येतात शिवाय तुम्ही आरव्ही किती अंतर चालवता ह्यावर भाडं बदलतं.

मी मागे दोन वेळा आरव्ही ट्रीप केलेली आहे. पहिल्या ट्रीपला मोठी मित्रांची गँग बरोबर होती, त्यामुळे मला काही विशेष बघावं लागलं नव्हतं. गेल्यावर्षीही शिल्पाचा भाऊ अमित आणि त्याची फॅमिली बरोबर होती त्यामुळे अगदीच एकटे नव्हतो. पण यंदा सोशल डिस्टंसिंगमुळे बाकी कोणाला विचारलं नव्हतं आणि आम्ही तिघच जाणार होतो त्यामुळे काय करावं ठरत नव्हतं. अर्थात हॉटेल किंवा कॅबिनमध्ये रहाण्यापेक्षा आणि तंबूत राहून कॅम्पसाईट वरची कॉमन बाथरूम आणि टॉयलेट वापरण्यापेक्षा आरव्हीचा पर्याय सगळ्यात चांगला वाटत होता. सलग साडेतीन महिने घरात बसून खूप कंटाळाही आला होता. त्यामुळे ऑफिसमधल्या कामाचा आढावा घेऊन, शनिवार रविवारला जोडून दोन दिवस सुट्टी टाकली आणि कुठे जायचं ते नंतर ठरवू  असं म्हणून आरव्हीचं बुकिंग करून टाकलं.

कुठे जायचं ते ठरवण्यासाठी दोन तीन घटक होते. एक म्हणजे बॉर्डर ओलांडून अमेरीकेत जायचं नव्हतं कारण  एकतर बॉर्डर खुली नव्हती आणि जरी असती तरी कधी बंद होईल ह्याचा भरोसा नव्हता.  ब्रिटीश कोलंबिया सोडून दुसर्‍या कुठल्या राज्यात जायचं नव्हतं, कारण इथे आंतरराज्या सीमा बंद नसल्या तरी तसा प्रवास शक्यतो करू नका अश्या सुचना होत्या. ब्रिटीश कोलंबियाच्या पश्चिमेला 'वँकुअर आयलंड' हा भाग येतो. त्या भागात खूप सुंदर समुद्र किनारे आहेत आणि प्रॉव्हींशियल पार्क्स आहेत. तिथे जायचा पर्याय होता पण ह्या भागात जायचं तर गाडी बोटीवर चढवून न्यावी लागते. ह्या बोटी मध्यंतरी बंद होत्या. म्हटलं आपण तिकडे गेलो आणि पुन्हा बंद झाल्या तर कोण अडकून पडणार म्हणून मग तो पर्यायही रद्द केला. थोडी शोधाशोध केल्यावर एक 'कोस्ट माऊंटन सर्कल लूप' नावाचा रूट सापडला. ह्यात व्हॅन्कुअर ते लिटन, लिटन ते लिलूएट, लिलूएट ते व्हिसलर (इथे २०१० चं विंटर ऑलिंपिक झालं होतं) आणि परत व्हॅंकुअर असा प्रवास होता. लिटन आणि लिलुएट ही अक्षरशः खेड्यांपेक्षाही लहान गावं आहेत. आम्हांला फार कुठे प्रेक्षणीय स्थळ बघायची नव्हती आणि तशीही बरीचशी बंदच होती. त्यामुळे मुळ उद्देश्य हा घराबाहेर पडणे आणि निसर्ग बघणे हाच होता. 

आम्हांला बाहेरच्या लोकांशी संपर्क शक्य तितका टाळायचा असल्याने आम्ही कुठल्याही दुकानात, रेस्टॉरंटात जायला लागू नये अश्या दृष्टीने तयारी करून नेली होती. काही काही आरव्ही रेंटलमध्ये भांडी (स्वंयपाक करायची तसेच ताटल्या, ग्लास वागैरे) मिळतात पण सध्याच्या काळात ते ही नको वाटलं त्यामुळे आम्ही आमची भांडी बरोबर घेतली होती. इंस्टा पॉट बरोबर ठेवला होताच  चार दिवस कधी कधी काय काय खायचं हे साधारण ठरवून त्याप्रमाणे शिधा बरोबर ठेवला होता. अर्थात ट्रीपला जाऊन पुन्हा स्वंयपाक करा, भांडी घासा हेच करायचं नव्हतं त्यामुळे सँडविच, पोहे, खिचडी, ब्रेड भुर्जी, ऑमलेट असे साधे सोपे पदार्थ करायचे ठरवले आणि एकावेळ साठी फ्रोजन पराठे बरोबर ठेवले होते. छोटा कोळश्याच्या ग्रील आणि त्याबरोबर कोळसे, ईग्नाईट लिक्व्हिड हे ही ठेवलं. दुधाचा कॅन आणि चहाचं सामान अर्थातच बरोबर होतच. सटरफटर खाणं म्हणून मफिन्स, चिप्स, फळं ठेवली होती. रेंटल कंपन्या अंथरूण / पांघरूणाचा सेटही देतात पण तो सुद्धा आम्ही आमचाच बरोबर घेतला होता. शिवाय बरोबर वाचायला पुस्तकं, बोर्ड गेम्स आणि आयपॅडवर सिनेमे डाऊनलोड करून घेतले होतो. सध्या लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हँडसानीटतसेच, मास्क घेतलच आणि त्याबरोबर लायजॉलचा स्प्रे ही घेतला.  देताना आरव्ही सॅनीटाईज केलेली असतेच पण तरीही आरव्ही मिळाल्या मिळाल्या आधी संपूर्ण आरव्ही लायजॉल स्प्रे मारून पुसुन काढली आणि मगच आमचं सामान आत ठेवलं.

आमच्या ट्रीपमध्ये व्हिसलरचं ऑलिंपींक पार्क वगळता बाकी कुठलीच प्रेक्षणीय स्थळ नव्हती पण तरीही ब्रिटीश कोलंबियातले डोंगर, सुचीपर्णी झाडांची घनदाट जंगलं, प्रचंड मोठ्या आणि वहात्या नद्या, लांबच्या लांब रेल्वे गाड्या, अगदी लहान लहान खेडेगावं, डोंगररांगा ओलांडून पूर्वेकडे गेल्यावर येणारा पर्जन्यछायेचा प्रदेश आणि तिथला उघडा-बोडका परिसर असं बरच काय काय अनुभवलं. लिटन आणि लिलुएटच्या कॅम्पसाईट अतिशय निर्जन जागी होत्या आणि दोन्ही नदीच्या काठी होत्या. दोन्ही नद्यांना प्रचंड पाणी होतं आणि प्रवाहाचा ध्रोंकार रात्रभर ऐकू येत होता. त्यामाने व्हिसलरची साईट शहरी गजबजाटातली होती. पण एकूणच सध्याच्या परिस्थितीत आरव्ही ट्रीपपेक्षा अजून सुरक्षित कुठली ट्रीप करता आली नसती. पहिल्यांदा आरव्हीचं मोठं धुड बघितल्यावर ते चालवायचं दडपण येऊ शकतं. आम्ही एकदा तर आरव्ही आपल्या चालवता येणार नाही ह्या भितीने ट्रीप जवळ जवळ रद्दच केली होती! पण तास-दोन तास चालवून झाल्यावर काहीच वाटत नाही. 'रियर व्ह्यू' मिरर नसतो आणि त्यामुळे साईड मिरर वापरायची सवय करावी लागते आणि गाडी मागे नेताना कोणाची तरी मदत घ्यावी लागते, इतकाच काय तो फरक. पण सहज शक्य असल तर विंचवाचं बिर्हाड पाठीवर घेऊन फिरायचा अनुभव एकदा घेऊन बघायला काहीच हरकत नाही. खूप मजा येईल ह्याची १००% खात्री.

२०१९ मध्ये माऊंट रेनियरला नेलेली ७ सिटर आरव्ही:


यंदाची (२०२०ची) ३ सिटर छोटीशी आरव्ही : 

आरव्हीचा एक व्हिडीयो: