Where the dreams come true..!

साधारण दुसर्‍या महायुद्धाच्या आसपासची गोष्ट असावी. अमेरिकेत एक गृहस्थ आपल्या दोन छोट्या मुलींना बागेत खेळायला घेऊन जात असत. मुली खेळत असताना ते स्वतः बागेत इकडे तिकडे फिरून बागेचं निरिक्षण करत. बागेतली  घाण, कचरा, अव्यवस्था, लाकडी खेळण्यांचे उडलेले रंग, वैतागलेले उद्धट कर्मचारी आणि कंटाळलेले पालक ह्या सगळ्यांचा त्यांना फार त्रास होत असे. ते नेहमी विचार करत असतं की एखादं असं पार्क असावं ज्याचं स्वरूप एखाद्या परिकथेतल्या नगरीसारखं असेल, जिथे मुलांना खेळायला भरपूर जागा असेल, मोठ्यांना बसायला बाक असतील, भरपूर झाडं झुडपं असतील, रेल्वे स्टेशन, गाडी, नदी आणि त्यातून जाणारी बोट असेल, पार्कमध्ये आरामदायी, आपुलकीचं वातावरण असेल, संपूर्ण कुटूंब तिथे सहलीला येऊ शकतील. अमेरिकेतल्या हॉलिवूडला (किंवा अगदी आपल्याकडे मुंबईला) अनेक लोकं चित्रपटातल्या सारखा झगमगाट, तारेतारका वगैरे पहायला मिळतील म्हणून मोठ्या आशेने येतात पण त्यांच्या पदरी निराशाच पडते. पण ह्या पार्कात येणार्‍या मुलांची सगळी स्वप्न अगदी खरी होतील! हे  गृहस्थ होते सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि कलाकार वॉल्ट डिस्ने आणि त्यांच्या स्वप्रातलं पार्क होतं जगप्रसिद्द डिस्नेलँड. सुमारे पंधरा ते वीस वर्षांच्या अथक मेहेनतीतून आपल्या मनातल्या कल्पनेला आकार देऊन, तिला प्रत्यक्षात उतरवून, अमेरिकेतल्या लॉस एंजल्स जवळ १९६५ साली डिस्नेलँड हे 'थीम पार्क' सुरू झालं आणि पुढे सुमारे दहावर्षांनंतर अमेरिकेतल्या फ्लोरिडा राज्यात वेगवेगळ्या प्रकारची चार थीम पार्क्स असलेलं "डिस्नेवर्ल्ड" सुरू झालं.


माझ्या अमेरिकेतल्या वास्तव्यादरम्यान डिस्नेवर्ल्डमधल्या "मॅजिक किंगडम"ला अनेक भेटी झाल्या. "Where the dreams come true.." अशी बिरुदावली मिरवणार्‍या ह्या मॅजिक किंगडममध्ये खरच स्वप्न प्रत्यक्षात उतरतात! मी लग्नाआधी मित्रांबरोबर, नंतर बायकोबरोबर आणि पुढे मुलीबरोबर मॅजिक किंगडमला भेटी दिल्या. आयुष्यातली हा  प्रत्येक कालखंड वेगळा आणि प्रत्येक वेळी मॅजिक किंगडममध्ये काहितरी वेगळं, नवीन सापडलं.
मॅजिक किंगडमसारख्या प्रंचड मोठ्या आणि गर्दीच्या ठिकाणाला एकच प्रवेशद्वार आहे. वॉल्ट डिस्ने ह्यांच्यामते पार्कमध्ये येणार्‍या प्रत्येकाला सारखा अनुभव मिळायला हवा. जर एकापेक्षा जास्त प्रवेशद्वार ठेवली तर अनुभवात फरक पडेल आणि लोकं गोधंळून जातील. मॅजिक किंगडमचं 'कार्टुनिकरण' अगदी वाहनतळापासूनच सुरू होतं. इथल्या वाहनतळाचे 'हिरो' आणि 'व्हिलन' असे दोन भाग आहेत. डिस्नेपटांमधल्या वेगवेगळ्या चांगल्या आणि वाईट व्यक्तिरेंखांची नावं वेगवेगळ्या रांगांना दिलेली आहेत. त्यामुळे गाडी लावल्यापासूनच आपण डिस्नेमय होऊन जातो. फ्लोरीडा ही पाणथळ जागा असल्याने उपल्ब्ध भौगोलिक रचनेचा योग्य पद्धतीने वापर करून एक मोठं तळं बनवण्यात आलं. वाहनतळापासून मुख्य प्रवेशद्वारापाशी जाण्यासाठी हे तळ बोटीने किंवा मेट्रोट्रेनने ओलांडून जावं लागतं.
चक्राकार रचना असलेल्या पार्कचे मेनस्ट्रीट, टुमोरोलँड, फँट्सीलँड, फ्रंटीयरलँड, लिबर्टी स्क्वेअर आणि अ‍ॅडव्हेन्चरलँड असे सहा मुख्य विभाग आहेत. ह्या चक्राच्या मध्यभागी देखणं सिंडरेला कॅसल आहे. (लॉसएन्ज्ल्सच्या डिस्नेलँडमध्ये बरेच विभाग समान आहेत फक्त सिंडरेला कॅसलच्या जागी स्लिपिंग ब्युटीचं कॅसल आहे.) ह्या सिंडरेला कॅसलचं सगळ्यात वरचं टोक संपूर्ण पार्कमधून कुठूनही दिसतं आणि त्यामुळे दिशा शोधायला मदत होते.


बोटीने किंवा मेट्रोट्रेनने मुखप्रवेशद्वारपाशी येतायेताच सिंडरेला कॅसलचं दर्शन होतं आणि कॅमेर्‍यांची क्लिक-क्लिक सुरू होते. हा पार्क म्हणजे काही अनेक वर्षांपूर्वी बांधलेलं ऐतिहासिक ठिकाण नाही, त्यामुळे प्रत्येक गोष्ट बांधताना ती कुठून कशी दिसेल, फोटो कुठून काढता येतील वगैरे व्यावसायिक बाबींचा पूर्ण विचार करून बांधलेल्या आहेत. पार्कमध्ये प्रवेश केल्यावर पहिला विभाग लागतो तो 'मेन स्ट्रीट, युएसए'. इथे अमेरिकन शहराच्या डाऊनटाऊनमध्ये असते तशी रचना आहे. एक चौक, मुख्य रस्ता आणि वेगवेगळ्या कचेर्‍या, दुकानं, दवाखाना, सिनेमा थिएटर, ग्रंथालय वगैरेंच्या इमारती आहेत. त्यांच्यावर अगदी खर्‍यासारख्या नावांच्या पाट्या, घरक्रमांक  आहेत. ह्यातल्या काही इमारती वापरात आहेत, काही नुसते देखावे आहेत. ह्या इमारती किंवा मॅजिक किंगडममधली प्रत्येक गोष्ट मोठ्या माणसांनाच नाही तर लहानमुलांच्या नजरेलाही व्यवस्थित दिसावी म्हणून वॉल्ट डिस्ने बांधकाम चालू असताना गुडघ्यांवर बसून गोष्टींचं निरिक्षण करीत आणि त्या उंचीवरून ती गोष्ट 'सुंदर' दिसत नसेल तर त्यात सुधारणा केल्या जात! ह्याच एका इमारतीच्या खिडकीवर आपल्या वडींलाचं नाव लिहून वॉल्ट डिस्ने ह्यांनी आपल्या वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. मेन स्ट्रीट जवळ पार्कमधल्या रेल्वेचं पहिलं स्टेशन आहे. ही रेल्वे पार्कच्या भोवती फिरते. त्यामुळे बरीच तंगडतोड झाल्यावर एखादं स्टेशन गाठून ह्या ट्रेनमधून निवांत चक्कर मारायला छान वाटतं. पूर्वी मेन स्ट्रीट वरून सिंडरेला कॅसलपर्यंत घोडागाडीने जाता येत असे. आता घोडागाडीची जागा ट्रामने घेतली आहे. वॉल्ट डिस्नेचं आद्य कार्टून कॅरॅक्टर मिकी माऊस आणि त्याची मैत्रिण मिनी माऊस ह्यांची परेड दिवसातून तीनचार वेळा मेनस्ट्रीटवरून जाते. ही परेड गाठली की टीव्हीवरची कार्टून्स प्रत्यक्षात भेटायची सुरूवात तिथेच होते.
मॅजिक किंगडममधला आमचा सर्वात आवडता विभाग म्हणजे फँटसीलँड. त्यामुळे मेनस्ट्रीटवरून आम्ही लगेच सिंडरेला कॅसलच्या डाव्या बाजूने फँटसीलँडकडे चालायला लागतो. त्यातही आमची सगळ्यांत आवडती 'राईड' म्हणजे 'ईट्स अ स्मॉल वर्ल्ड'. कयाक सारखी लहान बोट आपल्याला एक रंगीबेरंगी दुनियेत घेऊन जाते. जगभरातली वेगवेगळी शहरं आणि तिथली लोककला दाखवणार्‍या शेकडो बाहुल्यांचे अतिशय सुंदर रंगसंगतीतले देखावे दोन्ही बाजूंना दिसतात. "though the mountains divide and the oceans are wide, its a small world afterall! ", असा विश्वबंधुतेचा संदेश देणारं सुश्राव्य सुरावटीतलं गाणं नंतर दिवसभर कानात वाजत रहातं. ह्या राईडमध्ये एकदा बसून सगळं बघुन होत नाही आणि समाधानही होत नाही. त्यामुळे बर्‍याचदा बाहेर येऊन पुन्हा रांगेत उभं राहिलं जातं.

फँटसीलँडमध्ये बाकीच्या परिकथांमधल्या राईड्स आहेत. हिमगौरीची गोष्ट आणि सातबुटक्यांच्या गंमती, लंडन शहराच्या देखाव्यावरून जाणारी पिटर पॅनची फ्लाईट, मस्त्यकन्येची पाण्याखालची अद्भुतकथा आणि विनी नावच्या अस्वलाच्या पिल्लाची फजिती पहाताना लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही गंमत वाटते. ह्या शिवाय अगदी लहान मुलांनाही बसता येतील असे डंबो हत्ती, मॅड टी पार्टी आणि राजकुमाराचे रहाटपाळणेही ह्या परिसरात आहेत.  मिकी, मिनी, गुफी वगैरे मंडळींबरोबर फोटो काढणे तसेच सिंडरेला, रॅपुंझल, स्नो व्हाईट वगैरे डिस्नेच्या राजकन्यांना भेटणे किंवा त्यांच्या बरोबर नाश्ता, जेवण इत्यादी कार्यक्रमांकरीता 'प्रिंसेस फेअरीटेल' हॉलही ह्याच विभागात आहे.
मुलं थोडी मोठी असतील आणि योग्य उंचीची असतील तर फ्रंटीयरलँड आणि अ‍ॅडव्हेंचर लँडकडे मोर्चा वळवावा.
ह्या दोन्ही विभागांमध्ये खूप झाडी आहे आणि साधारण अमेरीकेच्या मध्य आणि पश्चिम भागांमधल्या सारखी भौगिलिक रचना केली आहे. खूप उंचावर घेऊन एकदम पाण्यात पडणारी 'स्प्लॅश माऊंटन'ची गाडी आणि डोंगराळ भागातल्या चढ उतारांवरून वेगाने जाणारी रेल्वेगाडी आपल्या पोटात गोळा आणतात. फँटसीलँडमधल्या पर्‍यांच्या जगातून एकदम स्प्लॅश माऊंटनमध्ये बसणं हे एकदम दुसरं टोक होऊन जातं! ह्याच विभागात आपल्याला 'टॉम सॉयर आयलंड' ह्या कृत्रिम बेटावर जाता येतं. ह्या बेटावर खाण्यापिण्याची सोय आहे तसेच थोडीफार खरेदीही करता येते. दुपारच्या वेळी टॉम सॉयर आयलंडच्य झाडीत निवांतपणे जेवण करून पुढच्या भटकंतीची तयारी करता येते. पुढे अ‍ॅडव्हेंचरलँडमध्ये जंगल, वाळवंट, ओअ‍ॅसिस अश्या सगळ्या गोष्टी एकत्र बघायला मिळतात. अ‍ॅडव्हेंचरलँडच्या सुरुवातीलाच 'स्विस ट्री हाऊस' आहे. अनेक कार्टून्समध्ये ट्री हाऊस किंवा मचाण असल्याने हे ट्री हाऊस बघायला मुलांची झुंबड उडते. 'पायरेट्स ऑफ करेबियन' ह्या चित्रपटावर आधारीत राईडमध्ये पायरेट्सचं जग बघायला मिळतं. ह्यातले आवाज आणि प्रकाशयोजना जरा भितीदायक वातावरण तयार करतात आणि मग काही काही ल्हानमुलांची समुद्री चाच्यांचे अवतार बघुन घाबरगुंडी उडते.
अ‍ॅडव्हेंचर लँडमध्ली साहसं करून झाली की मोर्चा वळवावा तो टुमोरो लँडकडे. ह्या विभागात गेलं की परिकथेच्या चित्रपटात एकदम "साय-फाय" दृष्य आल्यासारखं वाटतं. ह्या विभागातली सगळी आकर्षणं ही उद्याच्या जगाबद्दलचा कल्पनाविलास करणारी आहेत. ह्यातलं आमचं सगळ्यात आवडतं आकर्षण म्हणजे करॉसल ऑफ प्रोगेस. हे करॉसल ऑफ प्रोगेस म्हणजे फिरत्या प्रेक्षागृहात घडणारं बाहुल्यांच नाटक. १९६४ साली न्यूयीर्क येथे जीई ह्या कंपनीतर्फे भरवलेल्या जागतिक परिषदेसाठी वॉल्ट डिस्नेने हे नाटक बसवलं. पुढे परिषद संपल्यावरही ह्या नाटकाची लोकप्रियता इतकी होती की डिस्नेने हे नाटक डिस्नेवर्ल्डमध्ये आणायचं ठरवलं. १९४० पासून ते आत्तापर्यंत एका कुटूंबाच्या दैनंदिन जीवनात कसे विज्ञान / तंत्रज्ञानाने कसे बदल होत गेले हे ह्या नाटकात दाखवलं आहे. साधारण १०-१५ वर्षांचा कालावधी दाखवणारं ५ मिनीटांचं एक दृष्य आहे. हे दृष्य संपल की प्रेक्षगृह फिरतो आणि आपण दुसर्‍या दृष्याच्या सेट समोर येतो. ह्या मुळे एकंदरीत नाटक २० मिनिटांचं असलं तरी दर पाच मिनिटांनी नविन प्रेक्षक आत येतात. त्यामुळे इथली रांग कायमच मोठी असली तरी भराभर पुढे सरकते. ह्या खेरीज वेगाने गाड्या चालवण्याची हौस भागवण्यासाठी हायस्पीड गो-कार्टींग, व्हिडीयो गेममध्ये दाखवतात तसा शत्रूला मारण्याचा थरार अनुभवण्यासाठी ग्रेट एस्केप आणि प्रत्यक्ष आकाशगंगेतून वेगाने प्रवास करण्यासाठी स्पेस माऊंटन अशी काही आकर्षणं आहेत. मॉन्स्टर लाफ्टर फ्लोअर नावाच्या एका शोमध्ये पडद्यावरचा राक्षस प्रेक्षकांशी विनोदी संवाद साधतो, कधी त्याची स्वतःची फजिती होते तर कधी प्रेक्षकांची. आजच्या आर्टीफिशल इंटलिजन्सच्या काळात "टुमॉरो लँड"मधली ही गोष्ट आजच शक्य होऊ लागली आहे.
दिवसभर फिरतात पोटपूजा करण्यासाठी पार्कमध्ये विविध ठिकाणी खाण्याची सोय आहे. बर्‍याच ठिकाणी उपहारगृहांची सजावटही अत्यंत आकर्षक आहे. मोठे हवेशीर हॉल, त्यात रंगीबेरंगी दिव्यांची प्रकाशयोजना, मोठमोठी झुंबरं, तुम्ही ज्या भागात आहत त्याला साजेशी सजावट ह्या सगळ्यामुळे दोन घास जास्तच खाल्ले जातात. बसून जेवायचं नसेल तर पटकन घेऊन खाता येणारे अनेक पदार्थ उदा. प्रेटझेल्स, पॉपकॉर्न, आईस्क्रीम, कॉफी वगैरेचे चिकार ठेले ठिकठिकाणी आहे. टॉमसॉयर आयलंड जवळ मिळणार नटेला चॉकोलेट आणि स्ट्रोबेरी घातलेला क्रेपे म्हणजे डोश्यासारखा प्रकार आम्हांला फार आवडतो. दर ट्रीपमध्ये हे क्रेपे खाल्ले जातातच. दिवसभर फिरून फिरून इतकी दमणूक झालेली असते की हे खाताना कॅलरींचा विचारही मनात येत नाही.
दिवेलागणीची वेळ व्हायला लागली की सगळ्यांची पावलं पुन्हा मेन स्ट्रीट आणि सिंडरेला कॅसलकडे वळतात. कारण आता वेळ असते ती इलेक्ट्रिक परेड आणि त्यानंतरच्या फटाक्यांच्या आतिषबाजीची. अंधार पडल्यानंतर पार्कमधले सगळे दिवे घालवले जातात आणि आगगाडीच्या शिट्टीने परेडची वर्दी दिली जाते. वेगवेगळे प्राणी, पक्षी, फुलं, डिस्नेपटांमधली पात्र, राजपुत्र, राजकन्या वगैरे असलेले अनेक रथ दिव्यांच्या रोषणाईसह एकामागोमाग एक मेन स्ट्रीटवर येत रहातात. सोबत तालबद्ध नृत्य करणार्‍या कलाकारांचे संच आणि सुश्राव्य संगिताची सुरावट. हे सगळं पहाताना फक्त लहान मुलच नाही तर मोठी माणसंही अगदी रंगून जातात. परेड दरम्यान वाजवली जाणारी सुरावट फक्त त्या दिवशीच नाही तर दुसर्‍या दिवशीही कानात गुंजत रहाते. एकावर्षी परेडच्या वेळी जोरदार पाऊस आला. आमच्याकडे चौघांत मिळून एक  छत्री होती. तरीही आम्ही कॅमेरे वाचवत आणि स्वत: भिजत पूर्ण परेड पाहिली. सगळ्या कलाकारांनीही पावसाची पर्वा न करता पूर्ण परेड सादर केली!
परेड आवरली की सिंडरेला कॅसलवर फटाक्यांची आतिषबाजी होते. कॅसलच्या पार्श्वभुमीवर विविधरंगी आणि विविधढंगी फटाक्यांची रोषणाई बघणंही अत्यंत नेत्रसुखद असतं. फटाके संपले की कॅसलवर दिव्यांची रोषणाई करतात. गेली दोन वर्ष कॅसलवर 'फ्रोजन' हया चित्रपटाची संकल्पना घेऊन बर्फवृष्टीची रोषणाई केली होती. फ्लोरीडा राज्यात बर्फ पडत नाही, त्यामुळे बर्फाने झाकलेलं सिंडरेला कॅसल बघणं हे ही एकप्रकारचं 'ड्रिम कम ट्रू' म्हणायला हवं!

वॉल्ट डिस्नेंनी स्वप्न बघितल्याप्रमाणे खरच ह्या पार्कमध्ये खेळायला भरपूर जागा आहे, भरपूर झाडी आहे, रेल्वे स्टेशन, आगगाडी, बोट आहे.  अतिशय आपुलकीने वागणारे हसतमुख कर्मचारी आहेत. संपूर्ण कुटूंबाची  सहल होईल असं हे ठिकाण आहे. लहानमुलांसाठी  त्यांची आवडती कार्टुन कॅरेक्टर आणि राजकन्या / राजपूत्र प्रत्यक्ष भेटल्याने खरोखरच 'ड्रिम कम ट्रू' अनुभव देणारं ठिकाण आहे. सुरू झाल्यापासून आज पंचावन्न साठ वर्षांनीही सगळ्या गोष्ट ताज्या टवटवीत वाटतात ह्याचं श्रेय वॉल्ट डिस्नेंच्या कलादृष्टीला आणि दुरदृष्टीला आहे.
0 Responses

Post a Comment