तारकर्ली, देवबाग, सिंधुदूर्ग



तर त्याचं झालं असं की मध्यंतरी आम्ही रियाची बेबी डायरी भरत होतो. त्यात एक प्रश्न होता 'Baby's first beach trip'. तेव्हा आमच्या लक्षात आलं की रियाला अजून समुद्रावर नेलेलच नाहीये! कोकणात जायला कधीही आवडतच. शिवाय दिवाळी नंतर कोकणातलं हवामानही चांगलं असतं. डिसेंबरमध्ये सुट्टी मिळायलाही फार अडचण नसते, त्यामुळे मग डिसेंबरमध्ये कोकणवारी करायचं नक्की केलं. भावा बहिणींच्यात विषय काढल्यावर आधी सगळे उत्साहाने हो म्हणाले आणि नंतर तारखा/ठिकाण आणि कोण-कोण येणार ह्याच्यावरून सगळ्यांनी इतका घोळ घातला की ह्यांची ए.को. आडनाव बदलून टाकावी! आम्ही अजून पर्यंत सिंधुदूर्ग जिल्ह्यात गेलो नव्हतो. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातली बरीच ठिकाणं बघून झाली होती. कोकणवारी होईल, शिवाय नवीन ठिकाणही बघितलं जाईल असा विचार करून मग सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या तारकर्लीला जायचं नक्की केलं. तारकर्ली/ देवबाग हे हल्लीच्या काळातलं पर्यटकांचं एकदम फेव्हरीट ठिकाण आहे. शिवाय तिथल्या लोकांनी पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी म्हणून बरेच प्रयत्नही चालवलेले आहेत. ह्यामुळे पर्यटनाच्या हंगामात तारकर्लीला रहाण्याची सोय फार लवकर करावी लागते. नाहीतर बुकींग मिळत नाही. तारकर्ली/देवबाग परिसराची भौगोलीक रचना फार मस्त आहे. मालवणहून डावीकडे एक जमिनीचा एक सुळका आहे ज्याच्या एका बाजूला कर्ली नदी आणि दुसर्‍या बाजूला समुद्र आहे. ही नदी देवबाग जवळ समुद्राला मिळते त्यामुळे जसजसे पुढे जाऊ तसतसा हा सुळका निमुळता होत जातो. देवबागला तर रस्त्याच्या एका बाजूला चालत दोन मिनीटांवर समुद्र लागतो आणि दुसर्‍या बाजूला चालत दोन मिनीटांवर नदी लागते. मधे घरं आणि नारळी पोफळीच्या बागा / वाड्या आहेत. आता बर्‍याच स्थानिक लोकांनी त्यांच्या घरांच्या आवारात 'सि फेसिंग रीसॉर्ट' बांधली आहेत.   ह्या खालच्या फोटोत उजवीकडून नदी येते आहे तर डावीकडे समुद्र आहे. मधला जमिनीचा सु़ळका म्हणजे देवबाग आणि जसं आत जाऊ तसं तारकर्ली येतं आणि मग पुढे मालवण.

आमचं ठिकाण आणि तारखा नक्की व्हायला जवळ जवळ डिसेंबरचा दुसरा आठवडा उजाडला. मग इंटरनेटवर शोधाशोधी केली. तारकर्लीला एमटीडीसीचं रिसॉर्ट सुंदर आहे. अर्थातच त्याचं बुकींग मिळालं नाही. महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागातर्फे इथे केरळ किंवा काश्मिरला असते तशी हाऊस बोट कर्ली नदीत चालवली जाते. सोय खूप चांगली वाटली पण जरा महाग आहे. तिचं फक्त दोन दिवसांच बुकिंग मिळत होतं. मायबोलीवर एकांनी दिलेल्या रीसॉर्टला फोन केला तर त्यांच्या नवीन खोल्यांचं बांधकाम पुर्ण झालं तर ते तुम्हांला देऊ असं म्हणाले. दोनचारदा फोन झाल्यावर त्यांनीच तिथल्या अजगांवकर काकांचा फोन नंबर दिला. हे अजगांवकर तारकर्लीचे पण आता रहातात मुंबईला. ते पर्यटनाच्या हंगामात तारकर्लीला येऊन त्यांचं घर 'होम स्टे' म्हणून भाड्याने देतात. आम्हांला रिया बरोबर असल्याने होम स्टे जास्त सोईचं होतचं कारण लागलं तर तिचं जेवण तिथे बनवता आलं असतं. शिवाय घर समुद्रापासून दुरही अगदी दोन मिनीटांवर होतं. त्यांच्याकडे बुकींग करून टाकलं आणि प्रवासाच्या सोईच्या मागे लागलो.

पुणे तारकर्ली अंतर बरच आहे. जवळ जवळ सात-साडेतास तासांचा प्रवास आहे. पुण्याहून तारकर्लीला जायला साधारण तीन रस्ते आहेत. कोल्हापुर शहर पार केल्यावर कोकणात उतरण्यासाठी दोन घाट आहेत एक म्हणजे गगनबावड्याचा तर दुसरा म्हणजे फोंडा घाट. कोल्हापुर शहरात शिरायचं नसेल तर कर्नाटकातल्या संकेश्वरला जाऊन उजवीकडे वळून अंबोली घाटातून कोकणात उतरता येतं. गगनबावड्याचा परिसर सुंदर आहे पण रस्ता फारसा चांगला नाहीये असं बर्‍याच जणांनी सांगितलं, फोंड्याबद्द्ल कोणी काही बोललं नाही त्यामुळे आम्ही अंबोलीवरून जायचा निर्णय घेतला. ह्या रस्त्याने साधारण तीस/पस्तीस किलोमिटर अंतर जास्त पडतं. पण रस्ता अतिशय चांगला आहे. नीरज-निशांतचं ही आमच्या बरोबर यायचं ठरल्याने करोला घेऊन जायचं ठरवलं. मोठी गाडी आणि डिझेल मुळे खर्च कमी.  पहाटे लवकर उठून निघायचं होतं कारण रिया तशी उशिरा उठते त्यामुळे गाडीतला तिचा जास्तितजास्त वे़ळ झोपेत गेला असता.

ठरल्याप्रमाणे पहाटे साडेपाचला निघालो. सातारा रोडने प्रवास आणि विरंगुळा हॉटेलमध्ये थांबलो नाही असं होतच नाही. त्यामुळे प्रथेप्रमाणे तिथे भरपेट ब्रेकफास्ट केला आणि मग चांगला वेग घेतला. एकीकडे शिल्पाला गाडी लागून उलट्या सुरु झाल्या. मुंबई बंगलोर हायवे कर्नाटकात शिरल्यावर फारच सुरेख होतो. अगदी आखिव-रेखिव आणि शिस्तशिर ट्रॅफिक.. आपल्या इथल्यासारखा ट्रक उलट्याबाजूने आणण्यासारखा आचरटपणा दिसला नाही! उस तोडणीचा हंगाम असल्याने उसाने भरलेले अनेक ट्रॅक्टर डुलत डुलत जाताना दिसले. अरूंद रस्त्यावर त्यांना ओलांडून पुढे जायचं म्हणजे फार पेशन्सचं काम होतं. आंबोलीचा घाट सुंदर आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने धबधब्याला अजूनही भरपूर पाणी होतं. सावंतवाडीला पोचेपर्यंत दिड वाजला. सांवतवाडी मालवण फाट्याच्या खाली आहे. त्यामुळे मुंबई गोवा हायवेला लागून साधारण दहा किलोमिटर वर येऊन मग पिंगुली गावाच्या इथे मालवण फाटा लागतो. सावंतवाडी गावात न शिरता बायपास घेऊन हायवे पर्यंत पोचता येतं, आम्ही तेच केलं. तिथे एका हॉटेलमध्ये जेऊन पुढे निघालो. सावंतवाडी पासून तारकर्ली फार दुर नाहीये. पण लहान रस्ता असल्याने वेग मंदावला. सगळीकडे लाल माती, आजुबाजूला वाड्या, दाट झाडी असं दृष्य दिसत होतं. मालवणहून तारकर्लीकडे वळल्यावर रस्ता आणखीनच लहान झाला, एकच गाडी एकावेळी जाऊ शकेल एव्हडाच. पुलावरून जाणार्‍या दोन बकर्‍यांच्या त्या गोष्टीसारखी एक गाडी बाजुला थांबून समोरचीला वाट देत होती. समुद्राचं अस्तित्त्व आता जाणवत होतं पण अजून दिसत नव्हता. एका वळणावर अचानक समुद्राने दर्शन दिलं. सगळ्यांचा प्रवासाचा शीण आणि कंटाळा एकदम पळाला. नंतर पुढे दुसर्‍या बाजूची नदीवरची जेटी पण दिसली. तिकडे वॉटर स्पोर्ट्सला घेऊन जाणार्‍या बोटी दिसल्या. तारकर्लीचा समुद्र किनाराही दिसला. आम्हांला पुढे देवबाग पर्यंत जायचं होतं. मधे कॅथलीक लोकांची वस्ती लागली. तिथे नाताळानिमित्त रोषणाई केली होती आणि गाणी लावली होती. रस्त्यापाशी एका मंडपात येशुख्रिस्त, मेरी मदर आणि इतर संतांच्या मुर्ती ठेऊन गणपतीतल्यासारखी सजावट केली होती. हे पाहून गंमत वाटली!

आम्ही जातोय जातोय पण अजगावकरांचं घर काही येईना. म्हटलं आता संगमावर पोहोचू. संगमापासून अर्ध्या किलोमिटवर  अजगांवकर काका भेटले. त्यांच घर नदीच्या बाजूला दाट झाडीत होतं. आम्हांला वरच्या मजल्यावरची मोठी हॉल वजा खोली मिळाली. सामान टाकून, चहा घेऊन लगेच समुद्राकडे धावलो. सुर्यास्त पाहिला. रियाला पाण्यात खेळायला खूप आवडतं. तिला या आधी स्विमींग पूलमध्ये बर्‍याचदा नेलं आहे. पण समुद्राला मात्र ती घाबरली. कदाचित तिला आधी जरा खेळू देऊन मग पाण्यात न्यायला हवं होतं. तिने जोरदार भोकाड पसरलं आणि आम्हांलाही पाण्यात जाऊ देत नव्हती. पण थोड्यावेळाने नीरज, निशांत आणि तिने मातीत मनसोक्त राडा करून घेतला.

ह्या परिसरात बर्‍याच ठिकाणी घरगुती जेवणाची सोय होते. समुद्रावर येतानाच तिथल्या अश्या एका ठिकाणी जेवणाची ऑर्डर देऊन ठेवली होती. ट्रीपमधल्या पहिल्या माश्यावर ताव मारला. अतिशय चविष्ट सुरमई फ्राय आणि करी होती. पाण्याला घाबरल्याने किंवा झोप आल्याने किंवा एकंदरीत प्रवासाने कंटाळून रियाने संध्याकाळपासून जी रडारड सुरु केली होती ती थांबतच नव्हती. बाकीची ट्रीप रद्द करून उद्याच परत जावं की काय असं आम्हांला वाटायला लागलं. जेवायला गेलो तिथल्या काकूंनी मिठ मोहोर्‍या ओवळून टाका असं सांगितलं. म्हणाल्या तुम्ही शहरात काही करत नाही, पण इथे गावात असच असतं. शिवाय अजगांवकरांच्या घरात जायच्या यायच्या रस्त्यात चिंचेचं झाड आहे, त्यामुळे खोलीत गेलात की कराच हे! सुमारे बारा वाजेपर्यंत कुरकुर करून मग ती झोपली. शिवाय दोन मेंब्र उलट्यांनी गळपटलेली असल्याने दुसर्‍या दिवशी सकाळचा काही प्लॅन ठरवला नव्हता.

दुसर्‍या दिवशी सकाळी समोरच्या एका होमस्टे कम रीसॉर्टमध्ये ब्रेकफास्ट सांगून ठेवला होता. निवांत जाऊन तिथे घावन, चटणी खाल्ली. त्याच्याबरोबर त्यांनी रस म्हणजे नारळाचं दुध पण केलं होतं. मलातरी ते आवडलं. छान गोडसर होतं. बाकी कोणाला ते दुध फार नाही आवडलं. खरं आम्ही लगेच डॉल्फिन पॉईंट बघायला जाणार होतो पण ऊन वाढलेलं असल्याने सगळ्यांनी ठरवलं की दुपारी जाऊ. रियालाही झोप आली होती. मग तिला रूमवर झोपवून मी आणि शिल्पा, नीरज निशांतला घेऊन समुद्रावर गेलो. समुद्र किनार्‍यावरून संगमापर्यंत चालत गेलो. देवबागच्या किनार्‍यावर पांढरी वाळू आहे. भेळेच्या गाड्या वगैरे प्रकार नसल्याने किनारा स्वच्छ आहे एकदम! कालच्यापेक्षा आज गर्दी वाढलेली होती पण तिथे मस्त वाटत होतं.

तिथे एकेठिकाणी एक भली मोठी रबरी ट्युब दिसली. पुढे गेल्यावर बघितलं तर अजून एका ठिकाणी दिसली. जरा चौकशी केली तर कळलं की किनार्‍याची धुप होऊ नये म्हणून त्या लावल्या आहेत. दत्ता सामंत मुळचे देवबागचे. त्यांनी मागे तारकर्ली देवबागच्या समुद्रकिनार्‍याबद्दल बर्‍याचदा आवाज उठवला होत्या. किनार्‍याची धुप थांबवायला हवी नाहितर ही दोन गावं पाण्यात जातील ह्यासाठी उपाय योजण्याची मागणी केली होती. अखेर युती सरकार आल्यावर त्यांनी ह्यात लक्ष्य घातलं आणि मग संगमापाशी भल्यामोठ्या मोठ्या रबरी ट्युब टाकून बुडत्या किनार्‍याला आधार दिला. शिवाय वाड्यांमधून किनार्‍यावर उतरतो त्या ठिकाणी दगडांचे बंघारे घातले जेणेकरून तिथली वाळू घसरून जाणार नाही. एकंदरीत ह्या परिसरात युती सरकारबद्दल आणि तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राण्यांबद्दल बराच आदर दिसला. त्यांच्यामुळे ह्या भागाचा विकास झाला असे उल्लेख बर्‍याच जणांनी केले. समोर दिसणार्‍या एका किनार्‍यावर डोंगराचा उतार आणि नारळाच्या झाडांमुळे मगरीच्या तोंडासरखा आकार तयार झाला आहे. त्याला क्रॉकोडाईल पॉईंट म्हणतात.


समुद्रात कितीही खेळलं तरी कमीच वाटतं त्यामुळे जवळ जवळ साडेबारा एकला लाटांवर खेळणं थांबवून परतलो. पाण्यात खेळून सडकून भुक लागली. मस्त तळलेले बांगडे आणि करीवर हात मारला आणि एक डुलकी काढली. आज जेवायला गेलो त्या रीसॉर्टमधली जेवायची जागा अगदी समुद्रावर नारळाच्या झाडीमध्ये होती. सुग्रास जेवण आणि मस्त नजारा मिळाला. साडेचारच्या बोटीचं बुकींगही करून टाकलं.
तारकर्ली/देवबाग/मालवण परिसरात स्थानिकांच्या प्रयत्नांनी वॉटर स्पोर्ट्सची सोय करण्यात आली आहे. नंतर त्याला सरकारी पाठवळही लाभलं. स्थानिक तरूणांना प्रशिक्षण देऊन आज स्नॉर्कलिंग, स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग, जेट स्की, बनाना बोट वगैरे खेळ चालवले जातात. शिवाय इथल्या समुद्रात खूप डॉल्फिन मासे दिसतात. लहान माश्यांना खायला ते किनार्‍याजवळ येतात. त्यामुळे डॉल्फीन बघण्यासाठी बोट राईडही असतात. इथल्या बोटी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. नव्या पद्धतीच्या मोटरबोट न आणता लाकडी जुन्या पद्धतीचा बोटी त्याच ठेऊन त्यांना इंजिन आणि छप्पर बसवलं आहे.  त्यामुळे सोयही होते आणि जुन्या पद्धतीच्या बोटी जपल्याही आहेत.
कुठे काही स्थानिक प्राणी-बिणी पहायला गेलं की ते आम्हांला कधीच दिसत नाहीत. (नाही म्हणायला यल्लोस्टोन मध्ये एक अस्वल दिसलं होतं!) त्यामुळे इथेही डॉल्फीन दिसले नाहीतच. त्या दिवशी सकाळी खूप दिसले होते म्हणे. शेवटी त्यांचा नाद सोडून परत फिरलो. पण बोट राईड मस्त होती. मागे मी एकट्याने समुद्रात जेट स्की, बोट राईड्स वगैरे खूप केल्या आहेत. पण आता रिया बरोबर असली की जरा लाटा आल्या, पाणी वाढलं, बोट हलली की भिती वाटते. मागे कुर्ग जवळच्या डुबारेच्या कावेरी नदीतही अशी भिती वाटली होती!
येताना बोटीच्या मार्गात सीगल आयलंड लागलं. तिथे उतरून फोटो काढले. शिवाय समोर भोगवे बीच पण दिसतो. बोटवाल्यांना थोडे पैसे दिले की ते तिथे घेऊन जातात. तो अगदी 'कहो ना प्यार है' सिनेमात दाखवतात तसा बीच आहे म्हणे! पण आम्हांला वॉटरस्पोर्ट करायचे होते त्यामुळे तिकडे गेलो नाही. २००४ च्या त्सुनामीच्या वेळी तारकर्ली नदी आणि समुद्राच्या संगमापाशी वाळू साठून एक बेट तयार झालं आहे. तसं लहानसं आहे. सगळे वॉटरस्पोर्ट ह्या बेटावरून चालवले जातात. कारण जेट स्की वगैरे साठी लागणारं फार उथळ नसलेलं पण समुद्रापेक्षा शांत पाणी इथे आहे. पॅरासेलिंगसाठी मात्र समुद्राच्या आत घेऊन जातात. नीरज, निशांत, शिल्पा, श्वेता पॅरासेलिंगला गेले आणि मी, रिया आणि बाबा त्सुनामी आयलंडवर थांबलो. रियाला खेळायला वाळू मिळाल्यावर ती एकदम खूष! आम्ही मागे अमेरिकेत पॅरासेलिंग केलेलं आहे. शिल्पाच्या म्हणण्याप्रमाणे तिथला आणि इथल्या अनुभवात काही फारसा फरक नव्हता. ते अगदी नीट योग्य ती काळजी घेऊन हे करतात. ही खूपच चांगली गोष्ट आहे. पॅरासेलिंग आटोपेपर्यंत अंधार पडला आणि हवा अचानक थंड झाली. शिवाय समुद्राची गाज, चहुकडे पाणी, झाडांच्या सावल्या असं एकदम गुढ वातावरण तयार झालं.
रिया कालच्या संध्याकाळ सारखी आज रडारड करत नव्हती. छान खेळली, जेवली, झोपली. आज माश्यांच्या ऐवजी अंडाकरी खाल्ली.दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर निघून मालवणला सिंधुदूर्ग किल्ल्यावर जायचं ठरवलं शिवाय मालवण गावात थोडंफार फिरायचं होतं. सकाळी लवकर निघा म्हणजे उन कडक व्हायच्या आत सिंधुदूर्ग बघून होईल असं सगळ्यांनी सांगितलं.   पण एकंदरीत ह्या काळात कोकणातलं हवामान फार छान होतं. जराही दमटपणा नाही, त्यामुळे घाम नाही. रात्रीतर पंखा बंद करावा लागायचं इतकं गार व्हायचं. आम्ही जेवायला गेलो होतो तिथले काका म्हणाले कोकणी भाषेत सध्या 'उत्तर वारे' चालू आहेत. त्यामुळे हवा गार आहे. फेब्रुवारी/मार्च पासून 'दक्षिण वारे' सुरु होतील की मग हवा गरम, दमट व्हायला सुरुवात होईल.


सकाळी चविष्ट पोह्यांचा नाष्ता करून मावलणच्या जेटीकडे निघालो. आता रस्ता माहितीचा होता त्यामुळे मालवण एकदम पटकन आलं. सकाळी जेटीवर फार गर्दीही नव्हती. मुरूड जंजिर्‍याच्या तुलनेत हा किल्ला खूप मोठा दिसत होता. किल्ल्याच्या मागच्या बाजुला स्नॉर्कलिंग करतात.

बोटीने किल्ल्यावर सोडतात आणि फिरण्यासाठी साधारण सव्वातास वेळ देतात. आम्ही आसपासचा परिसर पाहिला, बरेच फोटो काढले. खरतर किल्ल्याची डागडुजी करायला हवी आहे. त्याकाळतलं एव्हडं भक्कम आणि सुनियोजीत बांधकाम बघुन थक्क व्हायला होतं. प्रवेशद्वारापाशी शिवाजी महाराजांच्या बोटांचे ठसे आहेत म्हणे. ते इतके लहान आहेत की ते खरच त्यांचे आहेत का असा प्रश्न पडतो. निघेपर्यंत उन वाढायला लागलं. शिवाय ओहोटी सुरु झाल्याने बोटी पाणी जास्त असलेल्या खडकापाशी लागायला सुरुवात झाली. आल्यावर मालवणच्या बाजारात गेलो. तिथे सोमवारचा बाजार भरला होता. कोलंबीचं आणि माईनमुळ्याचं लोणचं, मालवणी मसाला, खाजा, शेवखंडाचे लाडू असं काहीबाही खरेदी केलं.

 मालवण गावात जयंत साळगावकरांनी बांधलेलं गणपतीचं देऊळ आहे. ते पहायला गेलो. देऊळ छोटसं पण छान आहे. तिथे मुर्ती पाहून एकदम प्रसन्न वाटलं! ह्याशिवाय मालवणमध्ये रॉक गार्डन आणि कुठलासा लेक आहे. आम्हांला हे दोन्ही बघण्याचा फारसा उत्साहं नव्हतं. कारण चंदिगडचं सगळ्यांत मोठं रॉक गार्डन बघितलेलं आहे आणि समुद्राच्या ठिकाणी येऊन लेक काय बघायचा!











शिवाय इतकं फिरून होईपर्यंत सडकून भूक लागली. हॉटेल अतिथी बांबू बद्दल बरच ऐकलं होतं त्यामुळे शोधत शोधत तिथे गेलो. पापलेट आणि कोलंबी वर तुटून पडलो. अतिशय चविष्ट जेवण होतं आणि पुण्यापेक्षा बरच स्वस्तही! खरतर मला 'कालवं' पण खाऊन पहायचं होतं पण त्याचा फोटो पाहून ते खावसं वाटेना! पुढच्या वेळी थेट तयार डीशच मागवायची आहे. इथली सोलकढीपण एकदम मस्त होती.

परतीच्या रस्त्यात काजूच्या कारखान्याची पाटी पाहून थांबलो. आतमध्ये काजू खाण्यायोग्य करण्याचं काम सुरु होतं. आधी काजूच्या बिया भल्यामोठ्या ओव्हनमध्ये भाजल्या जातात. नंतर त्यांच्यावरचं आवरण दगडाने फोडून काढून त्या परत एकदा भाजल्या जातात. मग त्या सोलण्यासाठी पाठवतात. त्यांची सालं काढताना काही काजू तुटतात. मग असे तुटलेले काजू वेगळे करून चांगले काजू पॅकींगला किंवा मग खारवायला, मसाला लावायला पाठवले जातात.

काजूचं फळ असतं त्याचं सरबत किंवा फेणी बनवली जाते. तिथे काजूंची विक्रीही सुरु होतीच. घरच्यासाठी आणि देण्यासाठी काजूंची खरेदी करून आम्ही देवबागला परतलो.





संध्याकाळ मोकळी होती त्यामुळे अर्थातच समुद्र! दुसर्‍या दिवशी आम्ही निघणार असल्याने समुद्रावर जाऊन परत भिजलो. किनार्‍यावर दुरपर्यंत चक्कर मारून आलो.

आज सकाळच्या माश्यांनी इतकं समाधान झालं होतं की परत रात्री मासे खायची इच्छाच झाली नाही! साध आमटी भाताचं जेवण केलं. इथे जाणवलेली एक गोष्ट म्हणजे लोकं अगदी सहजपणे आलेल्या गिर्‍हाईकांना जात विचारतात आणि त्याचं कारण म्हणजे त्यांना त्याप्रमाणे जेवण बनवायचं असतं. आम्हांला ते जरा कमी तिखट जेवण द्यायचे कारण 'घाटी' (म्हणजे कोल्हापुर वगैरे घाटमाथ्यावरच्या) लोकांइतकं तिखट जेवण तुम्हांला चालणार नाही म्हणे. खेड्यांमध्ये समोरच्याच्या जातीचे, धर्माचे उल्लेख सर्रास करतात पण  आपल्याला मात्र अवघडायला होतं!
परत येताना आम्ही अंबोलीच्या ऐवजी फोंडा घाटातून यायचं नक्की केलं. अंतर कमी होतं आणि तिथे आलेल्या एकांनी रस्ता वाईट नाहीये असं सांगितलं. आज आम्ही मालवणला पोहोचेपर्यंत तिथला मासळीबाजार संपलेला होता. त्यामुळे परतीच्या प्रवासात तो पहायचा होता. दुसर्‍या दिवशी सकाळी अगदी लवकर निघून सातच्या सुमारास मालवण जेटीजवळच्या मासळी बाजारात गेलो. टोपल्याच्या टोपल्या भरून माश्यांचा लिलाव सुरु होता. मासे ताजे असले की त्यांचा वास येत नाही.  मोठेच्या मोठे अख्खे सुरमई त्यांच्या आकाराप्रमाणे साडेसातशे ते हजार रूपयांना विकले जात होते! बर्‍याच प्रकारचे लहान मोठे मासे पहायला मिळाले.


परतीच्या प्रवासात आमच्या आणखी दोन मेंब्रांना उलट्या झाल्या. त्यामुळे फक्त मी आणि नीरजचं उलट्यांपासून बचावलो. फोंड्याचा रस्ताही चांगला आहे. फक्त राधानगरी ते कोल्हापुर अतिशय बेशिस्त ट्रॅफिक आहे. कोकणातून देशावर आल्याआल्या गोडवा संपून बेशिस्तपणा, अरेरावीची भाषा सगळं सुरु झालं!

तारकर्ली, देवबागसाठी चार दिवस आम्हांला पुरे झाले पण अजून एखाद दिवस चालला असता असं वाटलं. तिथला निवांतपणा, लोकांचं आदरातिथ्य आणि समुद्र हे सोडून परतावसं वाटतच नव्हतं.आता पुढचं डेस्टिनेशन गोवा ठरलय !!

-----------------------------------

ट्रीपच्या प्लॅनिंगच्या दृष्टीने काही लिंक्स :
एम टी डी सी  रिसॉर्ट : http://www.maharashtratourism.gov.in/mtdc/HTML/MaharashtraTourism/MTDC_Resort/Tarkarli/Tarkarli.html

एम टी डी सी हाऊसबोट www.maharashtratourism.gov.in/mtdc/HTML/MaharashtraTourism/Default.aspक्ष/strpage/MaharashtraTourism/Attractions/BoatHouse.html&ei=PObbUtDgK8mPrQfG24D4BA&usg=AFQjCNFezyP54taawlpioCSrrdL89X1dnA&bvm=bv.59568121,d.bmk

हेरंब न्याहरी निवास फोन नंबर (श्री. केळुस्कर)  : ९४०४९३२००१

श्री. अजगांवकर ह्यांचा फोन नंबर : ९८३३९२७४९१