कैलास मानससरोवर यात्रा: भाग ३ - सिरखा ते गुंजी

दिवस ४ : सिरखा ते गाला. अंतर: १५ किमी. मुक्कामी उंची: ७६८० फूट / २३४० मिटर.

सिरखाहून निघाल्यावर रस्ता अगदी ढगांमधून जाणारा होता! पहिल्या उतरंडीनंतरच्या गावात घोडेवाला मिळणार होता. त्या गावापर्यंतचं चालणं अगदी छान रमत गमत झालं. मला घोडेवाल्याचं जे नाव सांगितलं होतं, तो माणूस तिथे नव्हताच मग कमानच्या ओळखीचा अभिलाष नावाचा दुसरा घोडेवाला तयार झाला. कमानने बॅग घोड्यावार बांधली आणि म्हणाला आपण पुढे जाऊया, घोडा येईल मागून. तिथे त्याने झर्‍याचं पाणी बाटलीत भरून घेतलं. रस्त्यात गावातली मुलं आजुबाजूला थांबलेली दिसली. त्यांना यात्रींकडून गोळ्या चॉकलेटांची अपेक्षा असते. आम्हांला ते आधीच माहित असल्यान गोळ्यांची पाकिटं वरच ठेवली होती. ही लहान मुलंही यात्री दिसल्यावर हात जोडून 'ॐ नमः शिवाय' म्हणतात.

थोड्यावेळाने चढण सुरु झाली. सिंहगडावर अगदी वर पोचत आल्यावर एक दगडांची चढण लागते. साधारण तितपत म्हणजे ५० ते ६० डिगरीच्या कोनात चढाई होती. इथे सगळ्यांचा दम निघायला लागला. रस्ता सरळसोट नव्हता, झिग-झॅग होता. त्यामुळे कष्ट थोडे कमी झाले पण एकूण अंतर मात्र वाढलं. आमच्या प्रवासातली ही पहिलीच मोठी चढण आणि ती फार सुंदर होती. सगळीकडे हिरवंगार, दाट जंगल, पक्ष्यांची किलबिल, अधेमधे दिसणारे झरे. दम लागला आणि थांबून आजुबाजूला बघितलं की थकवा निघून जायचा. अर्ध्यापेक्षा थोडं जास्त अंतर चढून गेल्यावर एका झोपडीत नाश्त्याची सोय केली होती. गेल्यागेल्या तिथल्या मुलांनी कोमट पाणी प्यायला दिलं. सकाळच्या थंडीत ते अगदी बरं वाटलं. उसळ, रोट्या आणि पुदिन्याची अतिशय चविष्ट चटणी होती. इथे आसपास खूप पुदिना उगवतो. त्यामुळे अगदी ताज्या पुदिन्याची वाटलेली चटणी होती. अशी चटणी नंतरही बर्‍याच ठिकाणी मिळाली. आम्ही निघता निघता अभिलाष घोड्यासकट येऊन पोचला. घोडा चरत होता, त्यामुळे आम्ही पुन्हा त्याच्यासाठी न थांबता पुढे निघालो.

उरलेलं चढण संपता संपता घंटेचे आवाज ऐकू यायला लागले. कमान म्हणाला, वर देऊळ आहे. वर पोहोचलेली मंडळी दर्शन घेऊन घंटा वाजवत असतील. खरतर घंटा खूप मोठी नव्हती पण आसपासच्या डोंगरांमुळे आवाज घुमत होता. सकाळी सकाळी तो घंटेचा आवाज खूप प्रसन्न वाटत होता. ह्या टॉपचं नाव रिंगलिंग टॉप. रिंगलिंग नावाचा चिनी हेर भारताच्या हद्दीत शिरला पण आपल्या जवानांना त्याची खबर लागल्याने ते त्याच्या मागे लागले. आम्ही ज्या मार्गाने चढून आलो त्या मार्गाने तो वर चढून ह्या डोंगरमाथ्यावर येऊन पोचला. पण इथून चिनी हद्द खूप लांब असल्याचं लक्षात आल्यावर त्याने इथे गोळी झाडून आत्महत्या केली. त्यामुळे ह्या माथ्याला रिंगलींग टॉप म्हणतात. अगदी सुरुवातीला माझा घोडेवाला न सापडल्याने मी जरा मागे पडलो होतो. पण ह्या टॉपपर्यंत पोहोचेपर्यंत केदार, श्याम, भीम वगैरे मंडळी भेटली. केदारच्या घोड्याला तीन चार महिन्यांचं पिल्लू होतं. ते पण आमच्याबरोबर पार लिपुलेखपर्यंत आलं. ते खूपच लहान असल्याने अजून गवत वगैरे काही खात नाही. फक्त आईचं दुध पितं आणि आई पडली 'वर्कींग मदर'. काम सोडता येत नाही आणि पिल्लालाही टाकून जाता येत नाही. त्यामुळे मग निघाली त्यालाही बरोबर घेऊन. घोडेवाला म्हणाला, पिल्लाचे पायही आत्तापासून तयार होतील. मग पुढे ते ही हेच काम करेल. एकंदरीत काय माणसं असो की घोडे, वर्कींग मदर्सच्या समस्या सारख्याच!

रिंगलींग टॉपच्या पलिकडे खूप उतार होता. उतारापेक्षा चढ परवडला असं जे बरेच अनुभवी ट्रेकर्स म्हणतात त्याची प्रचिती इथे आली. पायाचे अंगठे आणि गुडघे ह्यांची अश्या उतारांवर खूप वाट लागते. पावलं तुटेपर्यंत चढा आणि गुडघे फुटेपर्यंत उतरा ह्या पॅटर्नची ही सुरुवात होती. दरम्यान कमान आसपासच्या झाडीत जाऊन मश्रूम तोडून घेऊन आला. रात्रीच्या मुक्कामी भाजी करू म्हणे त्यांची.

थोडसं खाली गेल्यावर बाजूच्या हिरवळीवर ही कोब्रा फ्लॉवर्स दिसली.

लांबून बघावं तर अगदी खरच फणा काढलेला नाग वाटावा! आम्ही बरेच फोटो काढले. कमान म्हणाला 'आगे काली जुबान वाले भी मिलेंगे' आणि पुढे खरच काळ्या जिभेची फुलं ही होती. ही दिसतात नागासारखी आणि विषारीही असतात त्यामुळे जनावरं ह्यांच्या वाट्याला फारशी जात नाहीत.

आमच्या ह्या फोटोग्राफी दरम्यान चेटचंद, रामसेवकजी आणि श्याम पुढे गेले. पुढे एकेठिकाणी मी रस्त्याच्या कडेला थांबून पाणी पित असताना कमान एकदम ओरडला 'संभलके साहब, बिच्छू है..' मी घाबरून बाजूला झालो, मला वाटलं मी विंचवावर पाय दिला की काय! पण तिथे बिच्छू नावाची झाडं होती. ह्यांच्या नुसत्या स्पर्शाने विंचू चावल्यासारखी आग आणि वेदना होतात. तास - दोनतास काही कमी होत नाहीत. आपल्या मलमा-क्रिमांचाही काय फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे ह्यांच्यापासून जपून रहावं लागतं. ह्या विंचवांवर उतारा म्हणून जंगल्यातल्याच कुठल्यातरी दुसर्‍या वनस्पतीचा पाला वाटून लावतात.

थोड्यावेळाने एक मोठा झरा पार केला. अजून पाऊस फारसा झालेला नसल्याने झर्‍याला खूप पाणी नव्हतं.

कुठल्याही वेगळ्या आधाराशिवाय चालत पार करण सहज शक्य झालं. झरा ओलांडल्यावर दुरवर गालाचा कॅम्प दिसला. फोटोत वाटेच्या शेवटी जी घरं दिसत आहेत तो गाला कॅम्प.

कमानला विचारलं की किती वेळ लागेल अजून तर तो म्हणाला दोन अडीच तास तरी लागतील. रिंगलींग टॉपच्या पुढे आम्ही चांगला वेग घेतला होता. इथून पुढे डोंगरांच्या सोंडांलगत वळणावळणांचा थोड्याफार चढ उताराचा रस्ता होता त्यामुळे वेग कायम राखता आला. इथे चालत असताना केदारला एकंदरीत लेह लडाखची खूपच आठवण येत होती आणि इथल्या तुलनेत ते कसं जास्त चांगलं आहे असं बराच वेळ सांगत होता. मी म्हटलं आता इथे आलोच आहोत तर हे बघून घेऊ, लेह-लडाखला (किंवा स्पितीला) ट्रीप प्लॅन करू. थोड्यावेळाने मॅराथॉनवीर फनी दिसला. त्याची आज खूपच वाट लागल्याचं दिसत होतं. तो अक्षरशः झोकांड्या खात होता. आम्ही त्याला म्हटलं की तुझं सामान घेऊ का, तुझा हात धरू का? तर नको म्हणाला. तो उतारावर सुसाट असायचा पण थोडा जरी चढ आला की पार ढेपाळायचा!

थोडं पुढे गेल्यावर आयटीबीपीचा चेकपोस्ट होता. तिथे गाला कॅम्प वर स्वागत आहे वगैरे पाट्या होत्या. तिथे जवानांनी चहा आणि चिप्स दिले. आम्हांला वाटलं आलाच कॅम्प. पण इथून ही पुढे जवळ जवळ दिड किलोमिटरचा हलका चढ असलेला रस्ता होता. इथे घोड्यांची मुक्कामी जागा असल्याने रस्ताभर लीद पडलेली होती आणि त्याची घाण सुटली होती!

नंतर कळलं की श्याम, रामसेवकजी आणि टेकचंद आमच्या आधी अर्धातास म्हणजे साडेनऊ वाजताच ह्या चेकपोस्टला येऊन पोहोचले. एव्हड्या लवकर यात्री सहसा येत नसल्याने जवानांनी त्यांची तुम्ही कोण, इथे कसे आलात वगैरे चौकशी सुरू केली. यात्री इतक्या लवकर आले कळल्यावर त्यांना खूपच आश्चर्य वाटलं! आम्ही मजल-दरमजल करत साडे दहाच्या सुमारास गाला कॅम्पला पोहोचलो. हा कॅम्पपण अगदी दरीकाठी आहे. श्यामने आमच्यासाठी खोली पकडलीच होती. पाणी/सरबत पिऊन स्ट्रेचेस केल्या. आंघोळीसाठी गरम पाणी तयार होतं. पण माझा घोडा आणि घोडेवाला येतच नव्हते आणि सामान घोड्यावर बांधलेलं! मला धड आवरता येत नव्हतं. तश्या घामट कपडयांनी पलंगावर आडवंही होता येत नव्हतं. एकंदरीच जरा चिडचिडच झाली. दोन तासांनी एकदाचा अभिलाष उगवला. म्हणे घोडा खूप भुकेलेला होता, त्यामुळे तो चरत राहिला आणि उशीर झाला. मात्र तेव्ह्ड्यावेळात मला कॅम्पवरच्या सॅटेलाईट फोनवरून घरी फोन करून घेता आला. तेव्हा फारसं कोणी आलेलं नसल्याने गर्दी नव्हती. रियाच्या प्ले-स्कूलचा आज पहिला दिवस होता. त्याची सगळी हकिगत कळली. आंघोळी, जेवणं वगैरे आटोपून आम्ही बाहेर निवांत बसलो होतो. अजून बाकीचे यात्री एक-एक करून येत होते. सगळ्यात शेवटी साधारण दोन अडीचला गुज्जू मंडळी आली. आज सामानही मिळणार होतं. त्यामुळे कपडे धुणे, हव्या त्या गोष्टी सामानातून काढणे-घालणे वगैरे कार्यक्रम केले. आमचा मुख्य टाईमपास हा कंपू करून गप्पा मारणे असायचा. सौम्या, रानडे, केदार, मी आणि बन्सलजी आमची पूर्णवेळ टकळी सुरू असायची. श्याम आणि भीम अधेमधे बोलायचे. संध्याळाकी दरीकाठी चक्कर मारली आणि फोटो काढले.

इथे रात्री सिरखा इतका अंधार नव्हता आणि मुख्य म्हणजे दमणूक झालेली असल्याने चांगली झोप लागली. दुसर्‍या दिवशीचा रस्ता म्हणजे गाला ते बुधी हा यात्रेतला सगळ्यात अवघड टप्पा असल्याचं ब्रिफींगमध्ये सांगितलं. गाला हे सिरखापेक्षा कमी उंचीवर आहे. त्यामुळे आजच्या प्रवासात चढाबरोबरच उतारही बराच होता. पण उद्या मात्र बुधीला आम्ही जवळ जवळ १२०० फूट जास्त उंचीवर पोहोचणार होतो त्यामुळे ह्या १८ किलोमिटरच्या रस्त्यात चढण बरीच असणार होती. त्याचाच विचार करत सगळे झोपून गेले!

दिवस ५ : गाला ते बुधी. अंतर: १८ किमी. मुक्कामी उंची: ८८९० फूट / २७१० मिटर.

आजच्या मार्गात गाला कॅम्पहून निघाल्यावर सुमारे दोन किलोमोटर कालच्या रस्त्याच्याच पुढचा रस्ता होता. नंतर तिथून पुढे ३ किलोमिटर अंतर ४४४४ पायर्‍या उतरून कालीनदीकाठच्या लखनपुरपर्यंत जायचं होतं. लखनपुरहून पुढे पूर्ण रस्ता कालीनदीच्या काठून होता. हा डोंगरात कोरून काढलेला अतिशय अरूंद रस्ता आहे. इथे दोन्ही बाजूंनी माणसे तसेच घोडे ह्यांची ये-जा सुरू असते. घोडे आले की डोंगराच्या कडेला खेटून उभं रहायचं, दरीच्या बाजूला अजिबात जायचं नाही असं सतत बजावून सांगितलं गेलं. फोटो काढतानाही नेहमी डोंगराच्याच बाजूला थांबायचं शिवाय पोर्टर/गाईड/आयटीबीपीचे जवान ह्यांच्या सुचना काटेकोर पाळायच्या असंही सांगितलं गेलं. इथे जर कालीनदीच्या प्रवाहात कोणी पडलं तर वाचायची अजिबात शक्यता नाही. प्रवाह अतिशय वेगवान आहे. मागे २०१० साली यात्रेदरम्यान परतीच्या प्रवासात फोटो काढताना एक मराठी गृहस्थ ह्या नदीत पडले. त्यांचा अजुनही पत्ता लागलेला नाही. दुर्दैवाने त्यांची पत्नीही सोबत त्याच बॅचला होती! त्यांची अवस्था काय झाली असेल ह्याची कल्पनाही करवत नाही.

पहाटे पाचवाजता बोर्नव्हिटा घेऊन सगळे निघालो. पहिला दोन अडीच किलोमिटरचा प्रवास एका लयीत विनासायास पार पडला.

नंतर एक छोटं देवीचं देऊळ लागलं. तिथे एक पुजारी पुजा करत होता. नमस्कार करून, प्रसाद खाऊन जेमतेम दहा पावलं पुढे आलो आणि एका वळणानंतर ४४४४ पायर्‍यांची उतरंड सुरू झाली.

हा अक्षरशः ७०-७५ डिग्री कोनातला रस्ता आहे. उभाच्या उभा जीना! पायरीवरून पाय घसरून पडलं तर कपाळमोक्ष अटळ. अधेमधे कोसळणार्‍या दरडींमुळे पायर्‍यांवर बरेच दगड, राडारोडा पडलेला होता. अर्थात कोणतंही साहस न करता काळजीपूर्वक चाललं तर काही अवघड नव्हतं. जरी तुम्ही घोड्यावरून जात असाल तरी कुठल्याही उतारावर घोड्यावर बसता येत नाही. कारण घोड्याचा पाय सटकू शकतो. त्यामुळे जेष्ठ नागरीकांचे ह्या पायर्‍यांवरून उतरताना बरेच हाल झाले.

ह्या उतारादरम्यान सोलापूरजवळच्या एका गावातला मराठी जवान आमच्याबरोबर होता. त्याच्याशी बर्‍याच गप्पा झाल्या. आमच्याबरोबर तो ही त्याच्या कॅमेर्‍यातून मधेमधे फोटो काढत होता ते पाहून गंमत वाटली. तसं सांगितलं तेव्हा कळलं की त्याचं ह्या भागातलं हे पहिलच पोस्टींग होतं आधीची वर्ष तो हिमाचलमध्ये असायचा. सुमारे पन्नास एक मिनीटांत पायर्‍या उतरून खाली लखनपूरला पोचलो. आता नदी आमच्यापासून अगदी हाताच्या अंतरावर होती. तिथे एका टपरीवर नाश्त्याची सोय होती. ढगाळ, थोड्याश्या थंड वातावरणात, नदीच्या काठी बसून गरम गरम भटूरे आणि बटाट्याची भाजी आणि चहा घ्यायला छान वाटलं. इथून पुढे कालीनदीच्या काठचा अरूंद रस्ता सुरू झाला. माणसे तसेच खेचरांची ये-जा बरीच होती. पण नशिबाने पाऊस नव्हता. पावसात ह्या रस्त्यावर अवघड गेलं असतं. दोन उंच पहाडांच्या मधली अरूंद दरी, डोंगरातून काढलेला रस्ता, हवेत सुखद गारवा, नजर पोहोचेपर्यंत हिरवळ आणि प्रवाहाचा लयीत येणार आवाज! एक प्रकारच्या ट्रान्समध्ये जायला होत होतं. आसपासचा निसर्ग इतका सुंदर होता की काहीही न बोलता ते काय म्हणतात तसं स्वत:शीच संवाद साधत वगैरे मार्गक्रमण करत होतो. इथल्या झर्‍यांचं पाणीही अतिशय चवदार होतं. मधे एकेठिकाणी काली नदी आणि एका मोठ्या प्रवाहाचा संगम लागली. बरोबरच्या जवानाला विचारलं की कुठली नदी, तर तो म्हणे ही गोरी नदी. म्हटलं म्हणजे धौली गंगा का? तर म्हणे नाही ती वेगळी, ही जरा गोरी आहे म्हणून गोरी नदी!

पुढे थोड्या अंतरावर मालपा आलं. मालपाला पूर्वी कॅम्प असायचा. पण १९९८ दरम्यान प्रचंड मोठी दरड ह्या कॅम्पवर कोसळली आणि संपूर्ण बॅच, त्यांचे पोर्टर, घोडे आणि घोडेवाले, बरोबरचे आयटीबीपी जवान आणि गावातली लोकं असे जवळ जवळ दोन अडीचशे जण एकतर गाडले जाऊन मृत्युमुखी पडले किंवा वाहून गेले. प्रसिद्ध नृत्यांगना प्रोतिमा बेदी सुद्धा ह्या बॅचमध्ये होत्या. तेव्हापासून काली नदीच्या काठावर कुठलाही कॅम्प न ठेवता एकदम बुधीलाच मुक्काम केला जातो. कालापानीला ह्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली म्हणून स्मारक बांधलं आहे. मालपाला आमच्या सकाळच्या जेवणाची सोय केली होती. पण आम्ही तिथे ९ वाजताच पोचलो! तिथला माणूस म्हणाला जरावेळ थांबा गरम रोट्या करून देतो. शिवाय आम्हांला फारशी भूकही नव्हती. पण पुढे बुधीला जेवण मिळणार नव्हतं. मग तिथेच थोडं खाऊन निघायचं ठरवलं.

इथून पुढे सात किलोमिटरचा रस्ता बाकी होता. सगळे जण म्हणाले फार अवघड नाही. आत्ता आलात तसेच चालत रहा. पण ह्या रस्त्यात बरेच चढ होते. आजुबाजूची दृष्य इतकी सुंदर होती की कितीही वेळ बघितलं तरी नजर हटत नव्हती आणि कितीही फोटो काढले तरी समाधान होत नव्हतं.

मधे एकेठिकाणी नदी बरीच जवळ आली. प्रवाहातल्या एका मोठ्या शिळेवर पाणी आपटून त्याचे तुषार वरपर्यंत उडत होते. डोळे बंद करून ते तुषार अंगावर, चेहेर्‍यावर घेत उभं राहिलो. जगातली कुठलाही शॉवर, टब, झॅकुझी वगैरे ह्याच्या समोर फिके पडावे. आलेला थकवा क्षणार्धात नाहीसा होऊन सगळे ताजेतवाने झाले. काही काही ठिकाणी झर्‍यांच्या/धबधब्यांच्या खालून रस्ता पार करावा लागत होता. तो प्रवाह अंगावर घ्यायलाही फार छान वाटत होतं.

तयारी करत असताना वाचनात आलं होतं की चालताना सुकामेवा खावा, त्यानं लगेच शक्ती येते. त्याप्रमाणे मी सुक्या मेव्याच्या लहान लहान पुड्या करून नेल्या होत्या. त्यातल्या रोज थोड्या थोड्या बॅगेतून काढून खिशात ठेवायचो. शक्ती येते की नाही ते माहीत नाही पण चालताना ते खायला बरं वाटायचं खरं. एका लयीत बरच चालणं झाल्यावर मी केदारला सांगणार होतो की जरा पाणी पिण्यासाठी थांबूया. पण तितक्यात आयटीबीपीच्या लामारी कॅम्पची पाटी आली आणि तिथल्या जवानांनी चहा-पाण्यासाठी बसायला सांगितलं. अमृत अमृत म्हणतात ते असंच काहीसं असावं असा तो चहा लागला! जवानांना अनेक धन्यवाद देऊन पुढे निघालो. आता चार किलोमिटर बाकी होतं. आता बरीच चढण होती. पार्वते आधी आमच्या बरोबर होता. पण नंतर तो मागे पडला. पण आम्ही चहा घेत असताना तो लामारीला पोचला. आम्हांला निघालेलं बघून घाईघाईने निघून केदारला अक्षरशः धक्का देऊन पुढे गेला. लोकांना कसली घाई असते इतकी कोण जाणे! आता ढग जाऊन ऊन्हाचा चटका बसत होता. चढही होता. एकंदरीत दमायला होत होतं. शेवटी एकदाची बुधी गावाची पाटी आली. कमानला विचारलं की कॅम्प कुठे आहे. तर त्याने दरीच्या पलिकडे एका टेकडीकडे बोट दाखवलं आणि म्हणे तो बघ तिथे आहे. तिथून जवळ जवळ दिड किलोमिटर अत्यंत जाचक चढ होता. पुढे रस्त्याच्या कडेला पार्वते बसलेला दिसला. विचारलं काय झालं? तर म्हणे चढावर उगीच फास्ट आलो, खूप दम लागला, श्वास फुलला. म्हटलं भोगा कर्माची फळं! केदार दरीवरच्या पुलापाशी फोटो काढायला थांबला. पण मला आता एकदाचा तो कॅम्प आल्याशिवाया थांबणं नको वाटायला लागलं. हिय्या करून पुढे चालत राहिलो आणि मजल दरमजल करत शेवटी कॅम्पवर पोचलो! तिथल्या माणसाने स्वागत करून मधूर सरबताचा ग्लास हातात दिला. आमचे यशस्वी कलाकार श्याम, टेकचंद, रामसेवकजी पोहोचलेले होतेच. काल मी सज्जड दम भरल्याने आज अभिलाष मागे न रहाता वेळेत सामान घेऊन आला. तितक्यात केदारही आला. माझ्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे लगेच जाऊन घरी फोन केला. नंतर छान गरम पाण्याने अंघोळ केली. खरतर एक दीड वाजला होता पण इथे जेवण मिळणार नव्हतं मग आमच्या सामानातला खाऊ खाल्ला. वेळच वेळ होता. ऊनही होतं त्यामुळे लगेच कपडे धुतले पण हिमालयात आहोत हे विसरलो. तासाभरात ऊन जाऊन पाऊस आला! अर्थात रात्री वार्‍यात वाळले कपडे. जे यात्री अजूनही येत होते त्यांची मात्र पावसात जरा त्रेधा उडाली. शेवटचे यात्री विनोद सुभाष काका तब्बल सात वाजता पोहोचले! आज सौम्या, रानडे, बन्सलजी वगैरे मंडळी खूप लवकर आली. त्यामुळे नेहमीप्रमाणेच दुपारी आणि संध्याकाळी गप्पा, इतरांच्या टवाळक्या हे कार्यक्रम रंगले. केदारने त्याच्या मोबाईलमधली काही गाणी ऐकवली पण ती आता बंद केली नाहीत तर मी मोबाईल गायब करून टाकेन असा दम श्यामने भरला. इथे नक्की कश्यामुळे काय माहित पण खोलीच्या आता बसलं की मला सारख्या शिंका यायच्या जरा बाहेर फिरून आलं की बरं वाटायचं. मग सगळ्यांच्या सांगण्यावरून गोळी घेतली. रात्री दुसर्‍या दिवशीच्या प्रवासाबद्दल ब्रिफींग झालं. उद्याचा रस्ता आजच्या तुलनेत सोपा होता पण उद्या आम्ही हाय अल्टीट्युड एरिआत जाणार होतो कारण उद्याच्या मुक्कामाचं ठिकाण गुंजी हे दहा हजार फुटांच्या वर होतं. दिवे गेल्यावर करण्यासारखे काहीच नसल्याने सगळे झोपून गेले.

दिवस ६ : बुधी ते गुंजी. अंतर: १७ किमी. मुक्कामी उंची: १०३७० फूट / ३१६० मिटर. बुधी ते गुंजी प्रवासात निघाल्याबरोबर पहिली ३ किलोमिटरची खडी चढण लागते. हिला चिलालेखची चढाई म्हणातात. ही चढण चढून मग मागे थोडं उतरायचं की तो परिसर वॅली ऑफ फ्लॉवर्स किंवा फुलोंकी घाटीचा भाग आहे. जसजसा उन्हाळा वाढत जातो आणि पाऊस पडतो तशी इथे खूप फुलं फुलतात. मग पुढे पुन्हा कालीनदीच्या काठून गुंजीपर्यंत साधारण १० किलोमिटरचा सरळ रस्ता आहे.

नेहमीच्या प्रथेप्रमाणे सकाळी गरम बोर्नव्हिटा घेऊन निघालो. पोर्टर आणि घोडेवाल्यांना आदल्या दिवशी तिथल्या निवडणूकीतल्या उमेद्वाराने (ओली) पार्टी दिली होती म्हणे. त्यामुळे सगळे जणं जरा पेंगत होते. चियालेखची चढाई एकदम सणसणीत होती! ७०/७५ डिगरीच्या कोनात चढताना एकदम दम निघाला. घोडेही मधे थांबून दम खात होते. मित्तलजींचं त्यांच्या घोडेवाल्याशी भांडण झालं. तो म्हणायला लागला की घोडा दमलाय, मी काही तुम्हांला त्याच्यावर बसू देणार नाही. पण ती चढण त्यांना चालत चढता येत नव्हती. मित्तलजी त्याला म्हणे, 'ये यात्रा है इसलिये, नही तो तुम्हे और तुम्हांरे घोडे को यहांसे उठाकार खाई मे फेंक दिया होता!' त्यांचा एकंदरीत आवेश पाहून घोडेवाला जरा वरमला. थोडी विश्रांती झाल्यावर ते पुढे आले. इथे एक गोष्ट चांगली होती की ऑक्सिजनची कमतरता नव्हती. त्यामुळे अगदी धाप लागत नव्हती. खरतर ह्या चढादरम्यान आम्ही गुंजीपेक्षा जास्त उंचीवर चढून खाली आलो होतो. आम्ही जसजसे वर जात होतो तसतसं उजाडत होतं. वरची शिखरं छान चमकत होती.

काही ठिकाणी उंच डोंगरांवर रात्रीत बर्फ पडून त्यांचे पट्टे तयार झालेले दिसत होते.

मी, केदार, भीम बरोबर होतो. मधे सौम्या घोड्यावरून पुढे गेला. एकंदरीत १६०० फुटांची उंची आणि तीन किलोमिटर अंतर आम्ही पावणे दोन तासांत चढून गेलो. वर गेल्यावर एका छान टुमदार झोपडीत नाश्ता होता. चढण चढल्यावर सगळ्यांनाच भूक लागली होती त्यामुळे सगळ्यांनी पुरी भाजी वर आडवा हात मारला.

पुढे पठारावर भारतीय सेनेने पासपोर्ट तपासले. कारण इथून पुढे इनर लाईन परमिट लागतं. हा पठाराचा प्रदेश सुंदर होता. मोठं हिरवगार मैदान होतं. फुलं फारशी नव्हती. पण सकाळच्या कोवळ्या उन्हात तिथे चालायला छान वाटत होतं.

मधेच कोणीतरी म्हणायला लागलं की तिथल्याच कुठल्यातरी गुहेतून रावणाने सितेला पळवलं होतं. आता मी काही इतिहास/संस्कृतीतज्ज्ञ नसलो तरी ऐकलेल्या माहितीवरून दंडकारण्य म्हणजे हा प्रदेश नसावा असं वाटलं. पण कोण वाद घालणार म्हणून सोडून देऊन पुढे गेलो. पठारावर चार किलोमिटर गेल्यावर 'गरब्यांग' नावाचं गाव आलं. हे 'सिंकींग विलेज' आहे. दोन अर्थाने सिंकींग. एकतर तिथली जमीन खरच खचते आहे आणि दुसरं म्हणजे पूर्वी हे गाव सिल्क रूटवर होतं. तेव्हा व्यापार होता, लोकांना काम होतं पण आता काहीच उद्योगधंदे नाहीत त्यामुळे लोकही स्थलांतरीत होत आहेत. कमान म्हणाला टपरीवर समोसे खाऊ. पण आम्ही म्हटलं जे काय खाण्याचे प्रयोग ते येताना आत्ता काही नको.

गरब्यांग नंतर पुन्हा एकदा पासपोर्ट तपासणी आणि नोंदणी झाली. पुढचा आठ-साडेआठ किलोमिटरचा प्रवास मात्र अत्यंत रटाळ होता! भारताच्या बाजूला आता रस्त्याचे काम सुरू आहे. सीमेपर्यंत रस्ता होईल ही खूपच चांगली गोष्ट आहे. पण ह्या कामामुळे सगळीकडे सुरुंगाने फोडून ठेवलं होतं. आम्हांला दिलेल्या ब्रिफींगममध्ये तसेच बरेच ठिकाणी वाचलेलं होतं की हा टप्पा सगळ्यांत सुंदर आहे, पण तसं अजिबातच जाणवलं नाही. मजल दरमजल करत आम्ही गुंजीच्या जवळ पोहोचत होतो.

इथे रस्ता चांगला रुंद आहे. कालीनदीही कालच्या सारखी भितीदायक नाहीये. प्रवाह उथळ आहे. मधे एकेठिकाणी कालीला काली का म्हणतात हे स्पष्ट दाखवणारा प्रवाहांच्या रंगांमधला फरक दिसतो.

तसेच एकेठिकाणी नदीच्या पात्रात तयार झालेला बदामाचा आकार आणि त्यात जाणार बाण दिसला!

दरम्यान आदी कैलासाचं दर्शन झालं. एकूण पाच कैलास आहे. त्यातले तीन हिमाचलात, एक तिबेटमध्ये आणि हा आदीकैलास उत्तराखंडात. आदी कैलासला जाण्यासाठीही केएमव्हिएन तर्फे यात्रा आयोजित केली जाते. त्यामुळे कुठले गावकरी आम्हांला भेटले की ते विचारायचे की छोटे कैलास जा रहे हो या बडे कैलास?

आयटीबिपीचे अनेक जवान ह्या मार्गावर ये-जा करत होते. त्यातले एक अधिकारी आमच्याशी बोलायला थांबले. त्यांना मी भसकन् म्हटलं हा परिसर किती रटाळ आहे, कालच कसं छान होतं. तर त्यांना ते आवडलं नसावं बहुतेक, त्यांनी विचारलं काय वाईट आहे, काय आवडत नाहीये वगैरे. मी नंतर सारवासारव केली पण त्यांचं बरोबरच आहे. ती लोकं आपल्या कुटूंबापासून दुर, संरक्षणाच्या हेतूने इथे रहातात. हा परिसर त्यांच्यासाठी घरच! आणि त्याला मी अशी नावं ठेवलेली कोणाला अवडणार? (केदार उगीचच्या उगीच येता जाता कोथरूडला नावं ठेवत असतो तेही मला खटकायचं, ह्या अधिकार्‍यांचा तर पोलिसी खाक्या!)

कालच्या प्रमाणेच गाव आलं तरी कॅम्प मात्र गाव ओलांडून नदीच्या पलिकडे भला मोठा चढ चढल्यावर! हा चढही बराच वैतागवाणा होता. गुंजीचा कॅम्प बराच मोठा आहे.इथे दवाखाना, बॅंक, दुकानं वगैरे सोई आहेत. आजुबाजूच्या डोंगरांना खूप वेगवेगळे रंग आहेत. करडा, राखाडी, जांभळट, हिरवट वगैरे बर्‍याच छटा दिसतात. आम्ही आता हाय अल्टीट्युड परिसरात असल्याने आम्हांला खोलीत बसून राहू नका असं सांगितलं होतं. जितकं बाहेर फिराल तितकं अ‍ॅक्लमटायजेशन लवकर होईल, बिपी वाढलं असेल तर ते लवकर खाली येईल असं सांगितलं होतं. गुंजीला पुन्हा वैद्यकीय तपासणी होते आणि तुम्ही पास झालात तरच पुढे जाता येतं नाहीतर परत फिरावं लागतं. आत्तापर्यंतच्या प्रवास फार सुंदर परिसरातून झाला होता. त्यामुळे तपासणीत नापास झालोच असतो तरी इथून परत फिरणं एकवेळ तरी ठिक होतं. इथे खोलीवाटपावरून पुन्हा भांडणं झाली. पार्वतेचं म्हणणं की नवरा बायकोंना एका खोलीतच ठेवायचं! खरतर अजून कुठले नवरा बायको पोचलेच नव्हते पण ह्यालाच समाजसेवेची हौस. त्या गोंधळात आम्हांला चांगली खोली सोडवी लागली. इतक्यात भानुभाई पटेल फनीला उद्धटपणे बोलले. फनी आल्यापासून पाणीही न पिता खोल्यांचा घोळ निस्तरत होता, त्यामुळे ह्यावेळी आम्ही फनीची बाजू घेऊन भानुभाईंना गप्प बसवलं. इथे दुपारी जोरदार वारं सुटलं होतं. दुसर्‍या दिवशी वैद्यकिय तपासण्यांसाठी मुक्काम असल्याने आज सगळे निवांत होते. दुपारी आणि संध्याकाळी पुन्हा टवाळक्या करून निवांत वेळ घालवला.

संध्याकाळी असं लक्षात आलं की आमच्या चीनमधल्या जेवणाच्या शिध्याची खोकी सामानाबरोबर आलेलीच नाहीयेत . इतकच नाही तर ती कुठल्या कॅम्पपर्यंत आली आहेत हे ही कोणाला आठवेना, धारचुलापर्यंत नक्की होती एव्हडच आठवत होतं. फूड कमिटी त्याबद्दल पूर्ण विसरून गेली होती. मग एलओ नि जरा त्यांच्यावर जरा चिडचिड केली पण बरीच फोनाफोनी करून दुसर्‍या दिवशीपर्यंत ती खोकी गुंजीत आणायची व्यवस्था केली. रात्री जेवायला नेहमीच्या भाज्या सोडून छान कढी पकोडे होते. त्यामुळे सगळे एकदम खुष. दुसर्‍या दिवशी मेडीकल असल्याने चारला उठायची गरज नव्हती साडेआठला दवाखान्याबाहेर भेटायचं होतं. पण रोजच्या सवयीने सगळे लवकरच उठून बसले. सुर्योदयाच्या वेळी बाहेर अन्नपूर्णा शिखराचं दर्शन झालं.

आयटीबिपीच्या देवळात एलओ तर्फे पुजा झाली आणि मग बाहेर तिथल्या डॉक्टरने ब्रिफिंग दिलं. रांगेने एकेकाची तपासणी सुरू झाली. तिथे आत जाणापूर्वी रांगेतल्या व्यक्तीशी जवान तसेच डॉक्टर गप्पा मारत होते जेणेकरून टेन्शन येऊन बिपी वाढणार नाही. त्या डॉक्टरचं व्यक्तिमत्त्व एकदम रुबाबदार होतं (आणि नाव पराग होतं!) माझं बिपी एकदम नॉर्मल पेक्षा नॉर्मल आलं. कदाचित शुद्ध हवेमुळे आणि व्यायामामुळे आधी वाढलेलं कमी झालं असावं. सगळेजण मेडिकल पास झाले. फक्त सगळ्यात मोठे यात्री विनोद सुभाष ह्यांनी स्वतःहून माघार घेतली कारण त्यांची गाला ते बुधी आणि बुधी ते गुंजी दरम्यान खूपच दमछाक झाली. खरतर एकोणसत्तराव्या वर्षी ते इथपर्यंत आले (आणि घरच्यांनी त्यांना येऊ दिलं) हेच खूप आहे. मेडिकल टेस्ट आटोपल्यावर घरी फोन करून पोटभर गप्पा मारल्या. रियाच्या शाळेचे वृत्तांत कळले. तिच्याशीही गप्पा मारल्या. विंबल्डनमध्ये शारापोव्हा हरल्याचं कळलं. बाकी सगळ्या बाया हरलेल्या असताना तिला खरं जिंकायची चांगली संधी होती. पण नेहमीप्रमाणे ढिसाळपणा नडला असं म्हणून तिला मनात शिव्याही घातल्या. नंतर रानडे मला म्हणे तू असं विंबल्डनबद्दल वगैरे इथून विचारूच कसं शकतोस फोनवर? म्हटलं मग मी इतका वेळ काय प्रेमाच्या गप्पा मारत होतं असं वाटलं की काय तुम्हांला. पणाआजच्या मोकळ्या दिवशी फारच होमसिक वाटत होतं खरं.

संध्याकाळी घोडेवाले आणि पोर्टच्या इनरलाईन परमिटचा काहीतरी घोळ चालू होता. त्यांच्याकडे परमिट नव्हतच आणि तिथे पोटनिवडणूका असल्याने डीएमने परमिट बनवत बसायला वेळ नाही असं सांगितलं. मग परत एलओनी आर्मी, आयटीबीपी आणि डीएम अशी त्रिस्थळी फोनाफोनी करून घोडेवाल्यांना पुढे नेण्याची परवानगी घेतली. तेव्हा सगळे घोडेवाले आणि पोर्टर कॅम्पवर आले होते. त्यांच्याशी बर्‍याच गप्पा झाल्या. गावतल्या प्रथा, खाणंपिणं, स्थानिक राजकारण अशी काहीबाही माहिती ते सांगत होते. त्यांना विचारलं मतदान केलं का? तर म्हणे हो मोदींना मत दिलं. म्हटलं मोदी इथून कुठे उभे होते? तर म्हणे खडा कोईभी रहे, काम तो मोदीही करेगा, हमारा वोट मोदीको ही! नंतर मग आसपास चक्कर मारून आलो.

संध्याकाळी ती शिध्याची खोकी येऊन पोहोचली. पण सातपैकी दोन गायब होती. मग सगळी खोकी उघडून त्यातलं काय सामान गायब आहे हे शोधून काढून ते किंवा त्याच्या जागी जे काय घेता येईल ते, जवळच्या दुकानांमधून घेऊन आलो आणि सगळी खोकी पुन्हा पॅक केली. हे काम फुडकमिटी करत होती. पण आम्हीही त्यांना मदत केली.

दुसर्‍या दिवशीचा प्रवास भारतातल्या शेवटच्या कॅम्पपर्यंत म्हणजे नाभिढांग पर्यंत होता. तिथून मध्यरात्री निघून सीमापार जायचं होतं. त्यामुळे तिथे मुख्य सामान उघडायला लागू नये अश्या हिशोबाने सामान भरून टाकलं आणि सगळे झोपून गेले.

क्रमशः

कैलास मानससरोवर यात्रा: भाग २ - दिल्ली ते सिरखा

वरील नकाशात यात्रेचा मार्ग दाखवलेला आहे. दिल्ली ते धारचुला बस प्रवास होता. हा प्रवास उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांमधून होणार होता. उत्तराखंडामधलं काठगोदाम हे सपाटीवरचं शेवटचं शहर. तिथून पुढे हिमालयाच्या रांगा आणि त्यामुळे घाट सुरु होतो. काठगोदामपर्यंत व्हॉल्वो बस जाते आणि मग पुढे धारचुलापर्यंत लहान बसने प्रवास होता. धारचुला ते नारायण आश्रम जीपने आणि मग तिथून चीनच्या सीमेपर्यंत चालत. ह्यात अल्मोडा आणि धारचुला हे बसमार्गावरचे मुक्कामी थांबे तर सिरखा, गाला, बुधी, गुंजी आणि नाभीढांग असे भारताच्या बाजूचे कॅम्प होते.

दिवस १ : दिल्ली ते अल्मोडा : ३४० किमी. मुक्कामी उंची : ५२५० फूट / १०० मिटर : आमच्या बसमध्ये सगळे यात्री न मावल्याने उरलेले आठ-दहा जण एका टेम्पो ट्रॅव्हलरमधून निघाले. आदल्या रात्री फारच कमी झोप आणि बर्‍यापैकी दमणूक झालेली असल्याने बस सुटल्या सुटल्या सगळे पेंगायला लागले. इतक्या सकाळी ट्रॅफिक कमी असल्याने पाऊण-एक तासात दिल्ली ओलांडून उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादला पोचलो. गाझियाबादला एका समितीतर्फे नाश्ता होता. रिवाजाप्रमाणे हार, टिळे, भेटवस्तू वगैरे प्रकार झाले. मग त्या समितीवाल्यांची ओळख करून देण्याचा कार्यक्रम बराच वेळ चालला. मी तेव्हाही पेंगत होतो. नंतर त्यांनी उत्तर प्रदेशातल्या यात्रींचा सत्कार केला. श्याम गाझियाबादचाच असल्याने ते सारखं त्याला 'आदरणीय श्याम गर्गजी' असं म्हणत होते. अठ्ठाविस वर्षीय पोरगेल्श्या श्यामला एव्हडं भरभक्कम नाव दिल्याने सगळे हसत होते. त्यात तो टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये होता आणि पोचायला उशीर झाला. त्यांनी बर्‍याचदा त्याच्या नावाचा पुकारा केला. पुढे यात्राभर सगळेजण श्यामला 'आदरणीय' म्हणत होते! ह्या नाश्त्यामध्ये आम्हांला छोल्यांचा पहिला 'डोस' दिला गेला. पुढे छोले आणि चणे इतके खाल्ले की आम्ही वर्षभर तरी ते खाणार नाही असं ठरवून टाकलं. त्यांनी दिलेल्या छोट्या जिलब्या मात्र मस्त होत्या. एकदम गरमा गरम आणि कुरकुरीत.

खाणं पोटात गेल्यावर लोकांना जरा तरतरी आली आणि बसमध्ये गप्पांचा फड रंगला. आदरणीय श्यामजींना निवडणूकीत 'लाँच' करण्यासाठी फ्लेक्सवर काय घोषणा लिहाव्या ह्यावर जोरदार चर्चा आणि हसाहशी झाली. केदार 'फ्लेक्सतज्ज्ञ' असल्याने त्याचा एकदम सक्रिय सहभाग होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूका हा नेहमीचा यशस्वी विषय होताच. शिवाय विविध राज्यांमधली मंडळी असल्याने आपापली राज्यसरकारे, स्थानिक राजकारण ह्याविषयी माहितीची देवाणघेवाण झाली. दिल्लीत सुरक्षेच्या दृष्टीने बसच्या खिडक्यांना पडदे लावायला तसेच खिडकीच्या काचा काळ्या करायला बंदी आहे. त्यामुळे खिडक्यांची फक्त वरची अर्धी काच काळी होती जेणेकरून ऊन लागणार नाही. पण ह्या अश्या काचेमुळे बाहेरचं फार काही स्पष्ट दिसत नव्हतं. बुरखा घातल्यावर कसं वाटत असेल ह्याची थोडीफार कल्पना ह्या खिडक्यांनी यावी! मधे एकेठिकाणी बस थांबली तेव्हा बघितलं तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतं, त्यात काम करणारे बायका/पुरूष, मधून वाहणार पाटाचं पाणी, कुठेतरी दुरवर चाललेला सायकलस्वार, एका बाजूला टोळकं करून गप्पा छाटत बसलेली लोकं असं अगदी टिपीकल दृष्य दिसलं.

उत्तर प्रदेश ओलांडून उत्तराखंडात प्रवेश करता करता एक गाव लागलं. तिथे रामसेवकजींच्या ओळखीतल्या एकांच्या आग्रहावरून चहासाठी बस थांबवली. खरतर जेवायची वेळ झाली होती आणि अर्ध्यातासात काठगोदाम येणारच होतं पण त्यांचा आग्रह मोडवेना. त्यांनी निघताना जवळच्या शेतातल्या लिचींनी भरलेली मोठी पिशवी आम्हा यात्रींसाठी दिली. त्याभागात लिचींच उत्पादन खूप होतं. रामसेवकजींच्या सांगण्यानुसार मोरादाबादची लिची ही भारतातली सगळ्यात उत्कृष्ठ समजली जाते पण तिथलं बहुतांश उत्पादन निर्यात होतं. मला बसमध्ये एका जागी बसून कंटाळा आला होता. मग मी लिची वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला. काही दक्षिण भारतीय लोकं म्हणे आम्ही कधी लिची खाल्लेली नाहीये त्यामुळे ही सोलायची आणि खायची कशी ते पण दाखव. म्हटलं आता फ्लाईट अटेंडंट सारखं आईलमध्ये उभं राहून प्रात्यक्षिक करून दाखवतो!

पुढे काठगोदाम आलं. व्हॉल्वोच्या पोटातल्या बॅगा मिनीबसच्या पोटात टाकल्या, आत जाऊन जागांवर रुमाल टाकले आणि मग जेवायला गेलो. ह्याबसमध्ये जागेची फारच टंचाई होती. पाय नक्की ठेवावे कुठे हा प्रश्न होता! त्यात माझी सिट मोडकी निघाली त्यामुळे ती 'ऑटो रिक्लाईन' होत होती! मला काहीच त्रास नव्हता पण मागे बसलेल्या हायमाच्या पायांची वाट लागत होती. मग तिने तिचा ट्रेकिंग पोल त्या सिटमध्ये अडकवून ते 'ऑटो रिक्लाईन' थांबवलं. काठगोदामच्या पुढे घाट सुरू झाला आणि हिमालयात आल्याची जाणिव झाली.

जरावेळ झोप झाल्यावर भिमतालच्या जवळ डॉ.यशोधर मठपाल ह्यांच्या लोकसंस्कृती संग्रहालयात पोचलो. सत्तरीच्या आसपासच्या यशोधरजींनी पुणे विद्यापिठातून Archaeology मध्ये डॉक्टरेट मिळवलेली आहे तसच ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आहे. त्याच्या संग्रहालयात उत्खननात मिळालेल्या जुन्या वस्तू, दगड, हस्तलिखिते वगैरे आहेत तसेच त्यांनी स्वतः काढलेली कमाऊं तसेच गढवाल प्रांतांमधली संस्कृती दाखवणारी चित्रे, मॉडेल वगैरे ठेवली आहेत. यशोधरजींनी त्याबद्दल बरीच माहिती सांगितली. तिथे फोटो काढायला परवानगी नव्हती. यशोधरजींचा मुलगा Environmental science मध्ये डॉक्टरेट आहे. आता संग्रहालयाचं काम वडिलांना वयानुसार झेपत नाही त्यामुळे तो ही तिकडे कायमच्या वास्तव्यासाठी येणार आहे. तिथे कैलास तसेच ॐ पर्वताची सुंदर चित्रं प्रदर्शनात तसेच विकायला ठेवली होती. परतल्यावर कोणाकोणाला भेट म्हणून देण्यासाठी ती छान होती. आम्ही त्यांची ऑर्डर नोंदवून ठेवली आणि ती आम्हांला परतीच्या प्रवासात काठगोदामला मिळाली. एकदा चोख व्यवस्था! यशोधरजी संग्रहालयासाठी कुठल्याही प्रकारची प्रवेश फी घेत नाहीत तसेच देणगीही स्विकारत नाही. त्यामुळे चित्रे घेतल्याने त्यातल्या त्यात तरी मदत केल्यासारखं वाटलं.

बरेच डोंगर ओलांडून गेल्यावर पुढे एका वैष्णोदेवी मंदिरात थांबलो. देऊळ छान होतं. नुकतच रंगवल्यासारखं चमकत होतं. सुर्यास्ताच्या थोडं आधी पोचलो त्यामुळे छान संधीप्रकाश पडला होता.

मंदिराच्या आसपास बाजार होता. तिथे बरीच फळं स्थानिक फळं होती. मी केदारला म्हटलं की कॉमन फंडमधून फळं घेऊया सगळ्यांसाठी. त्याने फुड कमिटीला विचारलं तर ते नको म्हणाले! कारण तेच जाणे! खरतर पैशांची कमतरता अजिबात नव्हती. मग आम्ही स्वतःच फळं घ्यायला निघालो तर एलओ चला चला करायला लागले. त्यामुळे ती फळ चाखायची राहूनच गेली.

मुक्कामाच्या ठिकाणापर्यंतचा म्हणजे अल्मोड्यापर्यंतचा पुढचा प्रवास मात्र खूपच कंटाळवाणा झाला. कुठून ह्या फंदात पडलो असंही वाटून गेलं. शेवटी केदारने गाड्या वगैरेंचे विषय काढून लोकांना बोलतं केलं. शिवाय त्याला लेह-लडाख ट्रीपची पण फारच आठवण येत होती.आठ-साडेआठला एकदाचं अल्मोडा आलं. गेस्ट हाऊस छान होतं. तीन जणांना मिळून एक खोली मिळणार होती. लगेज कमिटीच्या फनीकुमारांकडे खोलीवाटपाचं काम होतं. त्याचा अगदी हुकूमशाही खाक्या. मी सांगेन तश्याच खोल्या मिळतील वगैरे. तिथे लोकांची भांडणं झाली, कारण सहाजिकच प्रत्येकाला आपापल्या ओळखीच्यांबरोबर रहायचं होतं! मी, केदार आणि रघू अश्या तिघांना मिळून खोली मिळाली. जरा आवरून गरम गरम सुप प्यायल्यावर बरं वाटलं. रात्री जेवायच्या वेळी एलओंनी सांगितलं की उद्या पहाटे चार वाजता निघायचं आहे कारण उद्याचा प्रवास बराच मोठा म्हणजे सुमारे ११ तासांचा आहे आणि पुढच्या रस्त्यात पावसाची आणि दरडी कोसळायची शक्यता आहे! इतक्या पहाटे उठायचं असल्याने जेऊन सगळे गुडूप झोपून गेले.

दिवस २ : अल्मोडा ते धारचुला. २२० किमी. मुक्कामी उंची : २९८५ फूट / ९१० मिटर पहाटे सगळे अगदी वेळेवर तयार होऊन बसमध्ये पोचले. सकाळचा नाश्ता रस्त्यातल्या एका ठिकाणी मिळणार होता. सुर्योदयाच्या आसपास गोलू महाराज मंदिर आलं.

स्थानिक लोकांसाठी हे महत्त्वाचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे ड्रायव्हर, क्लिनर आत पुजा करायला गेले. ह्या मंदिरात लोक नवस बोलतात आणि इच्छा पूर्ण झाली की तिथे येऊन घंटा बांधतात. त्यामुळे मंदिरात हजारो घंटा आहेत. असा समज आहे की ही न्यायाची देवता आहे, इथे मागणी केली की न्याय मिळतोच. लोक त्यांच्या कोर्टातल्या केसेचे कागदही इथे येऊन बांधतात आणि मग आपल्या बाजूने निकाल लागल्यावर घंटा बांधतात.

इथे काही स्थानिक वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आले होते. त्यांनी यात्रींचे 'बाईट' घेतले. साधारण साडेआठच्या सुमारास नाश्यासाठी थांबलो. छोटसं पण छान रेस्टॉरंट होतं. मागे गॅलरी होती. सहज म्हणून मागे डोकावलो तर हे दृष्य दिसलं.

संपूर्ण प्रवासात साधारण अशीच व्यवस्था असायची. सगळ्यांना सकाळी उठवताना बेड टी, प्रवासाला निघता निघता गरम बोर्नविटा, मग थोडासा प्रवास झाला की नाश्ता, मग मार्गावर कुठेतरी जेवण, मुक्कामी पोचल्यावर वेगवेगळ्या चवीचं सरबत आणि पाणी आणि वेळेनुसार संध्याकाळचा चहा, खाणं आणि मग रात्रीचं जेवण. भारताच्या हद्दीत खायचे प्यायचे अजिबात हाल होत नाहीत. ते देतात ते अगदी पुरेसं असतं.

छान गरम पुरी भाजीचा नाश्ता आणि चहा घेऊन पुढे निघालो.डोंगर आणि झाडांच्या अधूनमधून नुकत्याच अजून फार वर न आलेल्या सुर्याचं दर्शन होत होतं. चालत्या बस मधून फोटो काढायचा प्रयत्न केला पण ते नीट येत होत नव्हते. मग नाद सोडून दिला आणि गाणी ऐकत बाहेर बघत बसलो. अधेमधे झोप काढणं, गप्पा मारणं सुरू होतं. दिदिहाट नावाच्या गावात जेवणाची व्यवस्था होती. बसमध्ये बसून सगळेच कंटाळले होते. त्यामुळे जेवणावर लगेच ताव मारला. हे गाव डोंगर दर्‍यांमध्येच असल्याने तिथेही समोर छान दृष्य होतं. फोटो काढावे म्हणून मी कॅमेरा बाहेर काढला आणि बघतो तर काय कॅमेर्‍याच्या लेन्सच्या काचेला मोठमोठे तडे गेलेले! माझं अक्षरशः धाबं दणाणलं. कॅमेरा पडला तर नव्हता हातातून, मग मघाशी चालत्या बसमध्ये फोटो काढायच्या नादात कुठे धडकला की काय काहीच आठवेना आणि सुचेना. हा असा फुटका कॅमेरा घेऊन पुढे जाण्यापेक्षा परतच जाऊया असाही विचार त्या क्षणभरात डोक्यात आला. मग जाऊन केदारला गाठलं. कॅमेरा दाखवला. तो म्हणाला फोटो काढून बघ येत आहेत का ते. हे खरतर माझ्या लक्षातच नाही आलं. फोटो काढले तर ते नीट येत होते. अगदी फोकसिंग वगैरेही व्यवस्थित होत होतं. तो म्हणाला राहू देत मग तसाच घेऊन जाऊ. कोण्या कॅनन वाल्याकडे जास्तीची लेन्स असेल तर घे लागेल तेव्हा.

बस अर्ध्यातासात मेरथीला पोचली. मेरथीला आयटीबीपीच्या सातव्या तुकडीचा कॅम्प आहे.

तिथे ब्रिफींग होतं. आमची बस थांबल्यावर बँडच्या पथकाने आमचं स्वागत केलं. त्या तुकडीतल्या जवानांनी आम्हांला मानवंदना दिली आणि तुकडीच्या प्रमुखाने एलओ, तसेच बॅचमधल्या सगळ्यांत मोठ्या आणि छोट्या यात्रीचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मग पुढे आमचा ग्रुप फोटो काढला. परताना तो फोटो आम्हांला प्रत्येकाला फ्रेम करून भेट म्हणून दिला. नंतर त्यांनी यात्रे संदर्भात अतिशय महत्त्वाच्या सुचना दिल्या. आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या ब्रिफींगमधलं हे सगळ्यांत उपयोगी ब्रिफींग होतं. बाकी समितीवाल्यांचं वगैरे एकवेळ ठिक आहे पण आयटीबीपी जवानांनी आम्हांला इतका मानसन्मान देण्याइतकं खरच काही फार मोठं आम्ही करत होतो का हा मला प्रश्न पडत होता आणि अवघडून जायला होत होतं. हा सगळा कार्यक्रम फार व्यवस्थित आखलेला होता आणि उत्साहाने आणि शिस्तबद्ध रितीने पार पडत होता पण त्या कॅमेर्‍याच्या झोलाने माझं कशातच अजिबात लक्ष नव्हतं!

मेरथीच्या पुढे घाट अजून अवघड होत गेला. दरम्यान श्याम आणि रानड्यांनी आमचं सामान वाहून नेणार्‍या ट्र्क वाल्याशी संधान बांधलं आणि ते बस सोडून ट्र्कमध्ये बसायला गेले. थोड्या काळाने खाली खोल दरीत कालीगंगा दिसायला लागली. उंच पहाड, खोलवर दर्‍या आणि अचानक आलेला दमदार पाऊस! आम्ही हिमालयाच्या कुशीत येऊन पोचलो होतो. रस्त्यात लहान लहान गाव लागत होती. घरं अगदी मोजकी पण त्यातलं एखादं भाजपाचं कार्यालय! निवडणूकीच्या प्रचारादरम्यान भाजपाने देश ढवळून काढला म्हणतात त्याचा पुरावाच म्हणायचा हा. बाहेर बघतानाच एकिकडे वर्ल्डकप फुटबॉल, विंबल्डन वगैरे त्या काळात चालू असलेल्या क्रिडास्पर्धांचे विषय चालू होते. त्या चर्चेत मी फार संयम ठेऊन अगदी गुडीगुडी मतं मांडली! एकंदरीत यात्रेच्या वातावरणाचा प्रभाव पडत होता तर! साडेचार-पाचच्या सुमारास धारचुला आलं. तुळशीबागेतली शोभेलं अश्या एका गल्लीत बस शिरली आणि तिथेच थोड्याश्या जागेत ती उभी राहिली. कुमाऊं मंडलचं गेस्ट हाऊस समोरच होतं. इथेही खोली वाटवापरून घोळ झाला. आतातर एलओ पण त्यात उतरले आणि म्हणे लिस्टमधल्या सिरीयल नंबरप्रमाणेच खोल्या मिळणार! कोणीही आपला कंपू करायचा नाही. इथे चार जणांना मिळून एक खोली होती. माझ्या खोलीत विनोद सुभाष काका, देबाशिष डे आणि खुद्द फनी कुमार असे तिघे आले. मीआणि केदारने आमच्या खोलीतल्यांना हलवून एकत्र यायचा प्रयत्न केला पण कोणीच ऐकायला तयार नाही. शेवटी म्हटलं जाऊ दे आज करू अ‍ॅडजेस्ट उद्या सिरखाला बघू. विनोद सुभाष काका आम्हांला चिडवत होते, म्हणे तुम्हा दोघांना कोणीतरी वेगळं करू शकलं अखेर!

फुटका कॅमेरा परत बाहेर काढला. जरा शांतपणे बघितल्यावर लक्षात आलं की लेन्सवर लावलेल्या फिल्टरला तडे गेलेले आहेत. त्या खालच्या लेन्सच्या काचेला काही झालेलं नाहीये. पण तो फिल्टर फिरवून निघेना. मग हळूहळू करत, आतल्या लेन्सला धक्का न लागू देता ती फिल्टरची काच तोडून काढली. सगळं स्वच्छ पुसून काढलं आणि फोटो काढून बघितले. अगदी नीट फोटो आल्यावर माझा जीव भांड्यात पडला.. इतका जोरात की अगदी आवाज आला असेल! अशी अपोआप आपल्या नकळत काच फुटली तर आमची आज्जी म्हणायची की आपल्यावर येणारं संकट त्या काचेवर निभावलं. त्याचीच आठवण झाली आणि समाधान मानून घेतलं.

एकदा हे कॅमेर्‍याचं निस्तरल्यावर आजूबाजूला पाहिलं. धारचुला गाव कालीगंगेच्या काठी आहे. त्यात आमचं गेस्ट हाऊस अगदी नदीकाठी होतं. खोलीमधूनही नदी दिसत होती. ती ओलांडली की पलिकडे नेपाळ. मधे एक पूल आहे. त्या पुलावरून कधीही पलिकडे जाता येतं. नेपाळला जाण्यासाठी विसाची गरज नसल्याने तपासणी वगैरे काही नसते. फक्त हा पुल संध्याकाळी सहाला बंद होतो.

तेव्हड्यात सुट्टे पैसे हवे असतील तर चला म्हणून रानडे बोलवायला आले. आमच्या बॅचबरोबर चौबळ साहेब येणार म्हटल्यावर आम्ही बँकेत जायच्या ऐवजी बँकच आमच्याकडे आली होती. बँकेतले कर्मचारी सुट्ट्या पैशांची सोय करण्यासाठी गेस्टहाऊसवर आले होते. चौबळ साहेबांच्या स्वागताला आणि भेटीला आलेला जथ्था हे दृष्य नंतर प्रत्येक मोठ्या ठिकाणी दिसलं.

धारचुला पासून माझ्या मोबाईलची रेंज गेली. केदारच्या फोनलाही रेंज मधेमधेच येत होती. त्यामुळे रात्री फोन बुथ शोधून आलो पण आम्ही जाईपर्यंत सगळी बंद झाली होती. घरी बोलण झालच नाही. रात्री जेवणाच्या वेळी एलओंनी जरा ओरडा-आरडा केला. म्हणे माझी नसलेली कामं पण मला करावी लागतात जसं की सगळे वेळेवर निघत आहेत की नाही बघणं वगैरे. आम्ही म्हटलं तुमच्या नसलेल्या कामांमध्ये तुम्ही कशाला लक्ष घालता मग उदा. खोलीवाटप! मग शेवटी त्यांनी दिल्लीमध्ये बनवलेली डिसिप्लीन कमिटी पुन्हा नव्याने बनवली आणि त्यांना ही हल्या-हल्या छाप कामं दिली. मी हळूच त्यातून माझी सुटका करून घेतली. पार्वते अधिकृतपणे त्या कमिटीचा अध्यक्ष झाला आणि लोकांवर दादागिरी करायचा त्याला परवाना मिळाला. नदीकाठच्या गच्चीवर बसून मस्त जेवण झालं. जेवणादरम्यान कुमाऊं मंडलच्या अधिकार्‍याने आसपासच्या परिसराची बरिच माहिती सांगितली.

जर आपल्याल हवा असेल तर पोर्टर आणि घोडा नारायण आश्रमहून पुढे मिळू शकतो. ह्यांचे पैसे आपल्याला अर्थातच वेगळे भरावे लागतात आणि नोंद धारचुलातच करावी लागले. पोर्टर आणि घोडा/घोडेवाला आपल्याबरोबर लिपुलेखपर्यंत येतात आणि मग परतीच्या वेळी पुन्हा न्यायला येतात. मी घोडा आणि पोर्टर दोन्ही करणार होतो. मला घोड्यावर बसायचं नव्हतं पण प्रवासा दरम्यान गरज पडली तर नंतर घोडा मिळत नाही. समजा पायच मुरगळला तर तेव्हा कुठे शोधत बसा असा विचार करून हे आधीच ठरलेलं होतं. आता इतके पैसे खर्च करणारच आहे तर घोडा आणि पोर्टरच्या बाबतीत काटकसर नको अशी घरून सक्त ताकिद मिळाली होती. केदारचं नक्की ठरत नव्हतं आणि त्यात बर्‍याच लोकांनी बरेच सल्ले देऊन त्याचा गोंधळ वाढवला. त्यानेही शेवटी दोन्हीचे पैसे भरून टाकले.

उद्यापासून वजन काटेकोरपणे तपासलं जाणार होतं. लगेज काँट्रॅक्टर येऊन त्याने प्रत्येकाला फक्त २०(च) किलो सामान घेऊन बाकीचं इथेच ठेऊन द्यायला सांगितलं. बरोबर लहान सॅक ठेवणं चालणार होतच. मग पुन्हा सगळ्यांची सामानाशी झटापट सुरू झाली. दिल्ली सरकारने दिलेली सॅक मला बरोबर ठेवायची नव्हती कारण सगळ्यांच्या सॅक सारख्या होत्या. मग मी बर्‍याच प्रयत्नांनी त्यात सगळं सामान भरून ती ताडपत्रीच्या बॅगेत कोंबली आणि काळी बॅग वर घेतली. विनोद सुभाष काकांना सामानाचं जरा टेन्शन आलं होतं कारण कुठे उचलायची गरज पडली असती तर ते त्यांना झेपलं नसतं. त्यात फनी फंडे मारत होता. मग त्यांना सामान भरायला थोडी मदत केली आणि तुम्हांला काही लागलं तर आम्ही देऊ पण जड सामान घेऊ नका असं पटवलं. फनीचे फंडे सुरुच होते. आपल्या आठ दिवस मुक्कामाच्या जोरावर अटलांटातली थंडी ह्या विषयावर फंडे झाडायला सुरूवात केल्यावर मात्र मी त्याला गप्प केलं! रात्री सगळी सामसून झाल्यावर नदीचा लयबद्ध ध्रोंकार ऐकू येत होता. त्या नादात झोप कधी लागली कळलच नाही!

दिवस ३ : धारचुला ते सिरखा. अंतर: ५४ किमी बसने, ७ किमी ट्रेक, मुक्कामी उंची: ८४०० फूट / २५६० मिटर सकाळी आमचं आवरून नाश्ता होईपर्यंत सामानाचा ट्रक तसेच जीप तयारच होत्या. एका जीपमध्ये साधारण आठ जणं सोडत होते. दरम्यान थोडा वेळ असताना आम्ही पुल ओलांडून नेपाळला जाऊन आलो. पलिकडे बाजार आहे. तिथल्या बसस्टँडवरून काठमांडूला बस जाते. पण आम्हांला फक्त तो पुल ओलांडायचच काय ते आकर्षण होतं.

चौबळ साहेबांनी आमच्या कंपूकरता एक जीप पकडली. धारचुला गावातून बाहेर पडल्यावर आम्ही कालीगंगा सोडून आत वळलो आणि मग धौलीगंगा लागली. आमचा प्रवास धौलीगंगेच्या काठाने सुरू झाला. ड्रायव्हरकडून समजलं की गेल्यावर्षीच्या ढगफुटीच्या काळात ह्या परिसराचही खूप नुकसान झालं होतं, फक्त बातम्यांमध्ये जास्त प्रसिद्धी गढवाल भागाला मिळाली. इथलीही लहान गावं पूर्ण वाहून गेली, पुल कोसळले, एक पुल तर सैन्याने अक्षरशः दोन दिवसांत उभारला कारण त्या पुलाशिवाय पलिकडे मदत पोचवणं शक्यच नव्हतं. नदीच्या पात्रात दरडींबरोबर कोसळलेल्या अनेक मोठ-मोठ्या शिळा दिसत होत्या. आता धौलीगंगेवर जलविद्युतप्रकल्प उभारला आहे. रस्त्यात एक ट्रक बंद पडल्याने सुमारे तासभर खोळंबा झाला. आणखी थोडं वर गेल्यावर तवाघाट नावाचं गाव लागलं. तवाघाटला कालीगंगा आणि धौलीगंगेचा संगम आहे. पूर्वी इथे रस्ते नव्हते, त्यामुळे यात्रेदरम्यान चढाई इथूनच सुरू व्हायची. ह्या पहिल्या चढाईला 'थानेदार की चढाई' म्हणायचे. आम्ही जसजसे वर जात होतो तसतश्या दर्‍या अधिकाधिक खोल होत होत्या आणि खाली वाकून बघायला जरा भितीच वाटत होती.

सुमारे सव्वा-दिडतासाच्या प्रवासानंतर नारायण आश्रम आला. १९३६ साली नारायण स्वामींनी इथल्या दुर्गम भागातल्या लोकांना मदत करायच्या हेतून नारायण आश्रम बांधला. त्या काळात धारचुलापर्यंततरी गाडी येत असेल की नाही कोणास ठाऊक! आता ह्या आश्रमातर्फे शाळा, दवाखाने, ग्रंथालये वगैरे सुविधा आसपासच्या गावकर्‍यांना पुरवल्या जातात. आश्रमाचा परिसर अतिशय रम्य आणि मोठा आहे. देवीचं देऊळही प्रसन्न आहे.

इथे यात्रींच्या आणि त्यांच्या पोर्टरच्या भेटीचा रोमहर्षक कार्यक्रम पार पडला. घोडा सिरखा नंतर मिळेल म्हणाले कारण आधीच्या बॅचबरोबर वर गेलेले घोडे अजून परतच आले नाहीयेत. तसाही घोडा आज लगेच लागणार नव्हताच. छोट्या चणीचा कमानसिंग माझा पोर्टर होता. मितभाषी पण कामाला तत्पर कमानसिंग लगेच सामान उचलून घेऊन पण गेला.

नारायण आश्रमच्या समोरून चालायची वाट सुरू झाली. महादेवाचा जोरदार जयघोष करून सगळे सिरखाकडे मार्गस्थ झाले.

आजच्या ट्रेक साधारण सात किलोमिटरचा आणि अगदी सोपा होता. लहान लहान चढ उतारांवरून जाणार मार्ग होता. आधी सगळे जण एकत्र होते, पण मग हळूहळू आपल्या वेगाप्रमाणे पांगले. आम्ही सगळ्यात पुढे होतो. फनी आणि मित्तलजी माझ्यापुढे होते. पण ते फोटो काढायला थांबले आणि कमान म्हणाला की आता आपल्या पुढे कोणीच नाहीये. म्हटलं ठिक आहे, तसही सगळ्यात पुढे असून नसून काही फरक पडणार नव्हता. पाऊण तासाने सिरखा कॅम्पचं पहिलं दर्शन झालं. दिसत समोर असला तरी फिरून जायचं होतं. ह्या कॅम्प्सवर यात्रींसाठी मोठ्या डॉर्म असतात आणि एलओंसाठी स्वतंत्र बंगला असतो. ह्या फोटोत हिरवं छप्पर असलेला बंगला आहे तर मागे निळे यात्रींचे डॉर्म आहेत.

साधारण तासभराच्या चालीनंतर सिरखा गाव आलं सुद्धा. आमचा कॅम्प गाव ओलांडून पलिकडे होता. सिरखा गावातल्या लाकडी घरांवर अतिशय सुंदर कोरीव काम केलेलं होतं!

मी पुढे गेल्याने फनीला राग आला की काय कोण जाणे! तो अक्षरश: पळत आला मागून. कमान मला म्हणे 'साहब जाने दो उसे आगे, वो रनिंग रेस कर रहा है'. पाचेक मिनिटांत कॅम्पवर पोचलोच. कॅम्प अगदी दरीकाठी होता. पाणी सरबत घेऊन जरा बसलो तर केदारही आलाच. इथे सात सात जणांना मिळून एक डॉर्म मिळणार होती. सगळे यायच्या आधी आमच्या कंपू करता म्हणजे मी, केदार, बन्सलजी, सौम्या, श्याम, भीम आणि रानडे मिळून एक डॉर्म पकडली. पुढे सगळीकडे अशीच व्यवस्था राहिली. हळूहळू करत सगळे येऊन पोचले. खरतर आजचा ट्रेक अगदी छोटा होता. पण पहिलाच असल्याने सगळे एकमेकांशी उत्साहात ट्रेकबद्दल बोलत होते. कालपासून घरी बोलणं झालेलं नसल्याने मी जेवण झाल्यावर लगेच सिरखा गावातल्या फोनबुथवर जायला निघालो. केदारही बरोबर आला. रस्त्यात अनिरुध्द आणि श्रुती भेटले. पहिल्याच दिवशी श्रुतीचा बूट फाटला! पण त्या इतक्या लहान गावातही तिला चांगल्या दर्जाचे बुट मिळाले. तिथे आम्ही मघाशी पाहिलेल्या त्या लाकडी घरांमध्ये सगळ्या वस्तू मिळणारी दुकाने होती. फक्त तिथे फार जास्त माश्या होत्या! फोन करून कॅम्पवर येऊन बघतो तर सगळे ढारढूर! मग जितके जण जागे होते ते गप्पा मारत बसलो. थोड्यावेळाने बाहेरून चहा आल्याची हाक आली. आणि बाहेर जाऊन बघतो तर समोरची सगळी शिखरं मावळतीच्या सुर्याच्या प्रकाशात न्हाऊन निघाली होती! ती अन्नपूर्णा पर्वतरांग होती. अशी अचानक बर्फाच्छादित शिखर बघून फार मस्त वाटलं.

नंतर बराच वेळ आमचे एलओ त्यांचे रेल्वे मंत्रालयातले अनुभव सांगत बसले होते. एकंदरीत एलओंना दरबार भरवून गप्पा मारत बसायला फार आवडायचं.

ह्या कॅम्पपासून पुढे संध्याकाळचे फक्त दोन तास विज असते. कारण तिथे विज जोडणी नाहीये. जनरेटर चालवले जातात. त्यामुळे त्या दोन तासांमध्ये बॅटर्‍या चार्ज करायची धुम असायची. तसच तेव्हड्या वेळात रात्रीची जेवणं उरकायची असायची. आधी मोबाईलची रेंज गेली, मग गाडीरस्ता संपून पायवाट आली आणि आता दिवेही गेले. एकंदरीत शहरी वातावरणातून आम्ही हळूहळू निसर्गाच्या सानिध्यात जात होतो. जेवणं झाल्यावर एकदा दिवे बंद झाले की करण्यासारखं काहीच नसायचं आणि शिवाय दिवसभराच्या श्रमाने थकून सगळे झोपूनच जायचे. सिरखा मुक्कामाच्या दिवशी बहुतेक अमावस्या होती. त्यामुळे बाहेर अगदी गडद काळोख होता. रात्री पाऊस सुरू झाला आणि पत्र्यावर आवाज यायला लागल्यावर मला जाग आली. इतका जास्त अंधार होता की मला माझे डोळे उघडे आहेत की बंद हेच समजेना! तसच चाचपडत मोबाईल शोधला. नंतर बराच वेळ झोप लागली नाही. त्या अंधाराने आणि पावसाच्या आवाजाने थोडी भितीही वाटत होती आणि रियाची खूप आठवण येत होती. मी बराच वेळ मोबाईलवर तिचे फोटो बघत राहिलो. कधीतरी उशीरा झोप लागली पण चारला उठायचं होतं त्यामुळे बेड टी आलाच. कमान आणि बाकीचे पोर्टर साडेचारच्या सुमारास हजर झाले. आवरून आणि बोर्नव्हिटा घेऊन चालायला लागलो. आज 'गाला'पर्यंत सुमारे सोळा किलोमिटरचा ट्रेक होता. पहिले दोन अडीच किलोमिटर उतरंड, मग ४ किलोमिटर रींगलिंग टॉपची खडी चढाई आणि मग चढ उताराचा रस्ता असा साधारण मार्ग होता. कॅम्पमधून निघाल्या निघाल्याच हे दृष्य दिसलं आणि पुढे काय असणार आहे ह्याचा अंदाज आला! क्रमशः

कैलास मानससरोवर यात्रा: भाग १- पुनःश्च हरीॐ !

गेल्यावर्षीची कैलास मानससरोवर यात्रा उत्तराखंडातल्या ढगफुटीमुळे रद्द झाली. दिल्लीला जाऊन वैद्यकीय चाचण्या, विसा वगैरेचे सगळे सोपस्कार पार पडल्यानंतर परत फिरावं लागल्याने फारच निराशा झाली. शिवाय मिळालेली रजाही रद्द करावी लागली. (त्यात भर म्हणजे विंबल्डनमध्ये अँडी मरे आणि मरीयन बार्टोली ह्यांना एकाच वर्षी जिंकलेलं बघावं लागलं... प्रारब्ध कोणाला चुकत नसतं म्हणतात ते हेच !!) नंतर दुसर्‍या कुठल्या ट्रेकला किंवा ट्रीपला जावं का असा विचार केला होता पण कैलास मानस नसेल मला इतर कुठे एकट्याने जायची फार इच्छा नव्हती. शिवाय उत्तराखंडात इतकं सगळं घडलेलं असताना घरूनही हिमालयात ट्रेकला जायची परवानगी मिळण्याची फार शक्यता नव्हती. मग सगळं रद्द करून आम्ही ५/६ दिवसांची कूर्ग ट्रीप करून आलो.

'गेल्यावर्षी निवड झालेल्या यात्रींना यंदाच्या निवडीत प्राधान्य देऊ' असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं होतं पण तरीही ह्या वर्षी कैलास मानस यात्रेसाठी अर्ज करायचा का ते ठरत नव्हतं. ऑफिसमध्ये पुन्हा इतक्या मोठ्या रजेसाठी परवानगी घ्या, फिटनेससाठी तयारी करा, पुन्हा दिल्ली मग गुजराथी समाज, त्या मेडिकल टेस्ट्स सगळं खरच करावं का प्रश्न पडत होता. मागच्या वर्षीच्या लेखावर रैनाने प्रतिक्रिया दिली होती 'अशा यात्रा घडाव्या लागतात!' आणि त्याची प्रचिती ह्या वर्षी आली. गेल्यावर्षी ३१ डिसेंबरला परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर अर्ज उपलब्ध झाल्या झाल्या लगेच २ जानेवारीला मी तो भरून पोस्टातही टाकला होता. ह्यावर्षी मात्र 'करू सावकाश, काय घाई आहे' करत करत अखेर फेब्रुवारीत तो पाठवला. गेल्यावर्षी मी रोज एकदातरी परराष्ट्र मंत्रालयाची तसेच कुमाऊं मंडल विकास निगमची वेबसाईट, फेसबुकावरचा ग्रुप असं सगळं तपासून बघायचो की काही नवीन माहिती जाहीर झाली आहे का? ह्यावर्षी ह्यातलं काहीही एकदाही केलं नाही किंवा यात्रेबद्दलचं इंटरनेटवरचं कुठलं लिखाणही वाचलं नाही. यात्रींची लकी ड्रॉ पद्धतीने निवड साधारण ४/५ एप्रिलच्या सुमारास होते पण यंदा निवडणूका असल्याने सगळी यंत्रणा त्यात व्यग्र होती. २५ एप्रिलचा दिवस उलटून गेला तरी निवड जाहीर झाली नव्हती. मी ऑफिसमध्ये रजेबद्दलही काही सांगितलं नव्हतं आणि त्यात एका नवीन प्रोजेक्टसाठी पल्याड जायचं घाटत होतं. २७/२८ एप्रिलला फेसबुकावरच्या ग्रुपमध्ये परराष्ट्र खात्याने सांगितलं की यात्रींची निवड ३० तारखेला जाहीर होणार आहे. ३० तारखेला संध्याकाळी इमेलवर कळलं की माझी पाचव्या बॅचसाठी निवड झाली आहे. २४ जूनला दिल्लीला हजर रहायचं आहे आणि २८ जूनला प्रवास सुरू होणार आहे. मायबोलीकर केदारने गेल्यावर्षीप्रमाणे ह्यावर्षीही अर्ज भरला होता. मी त्याला लगेच फोन केला. तर तो नेहमीप्रमाणे सायकलवर होता! त्याला म्हटलं तुझे डिटेल्स दे मी बघतो तुझी बॅच. तर योगायोगाने त्यालाही ह्यावर्षी पाचवी बॅचच मिळाली होती! मग मी आधी घरी विचारलं. घरून गेल्यावर्षीप्रमाणेच जोरदार पाठींबा होता. दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळी ऑफिसमध्ये रजा मिळेल का असं विचारलं. पहिल्या अपेक्षित प्रतिक्रिया येऊन गेल्यानंतर मात्र परवानगी मिळाली. कारण वरिष्ठांना गेल्यावर्षी झालेला गोंधळ माहित होता आणि मला जायची किती इच्छा आहे हे ही माहित होतं. शिवाय माझ्याकडे भरपूर रजा शिल्लक असल्याने त्याबाबतही काही प्रश्न नव्हता. त्या नवीन प्रोजेक्टचं काय करायची हे बघायची जबाबदारी वरिष्ठांनी स्वतःवर घेतली आणि मी यात्रेच्या तयारीला लागलो.

नंतरचे चार आठवडे मात्र शब्दश: दिवस मोजले! ऑफिसमध्ये मी माझ्यावरच्या जबाबदार्‍या हळूहळू दुसर्‍याला देत होतो कारण माहिनाभराची म्हणजे मोठी सुट्टी होती. शिवाय त्या काळात पुण्यात अशक्य उन्हाळा होता.यात्रेबद्दल गेल्यावर्षी इतकं वाचलं होतं की आता काही म्हणजे काहीच शिल्लक नव्हतं! रोज सकाळी फिरायला जा, मग ऑफिसात जाऊन पाट्या टाका, संध्याकाळी घरी येऊन मालिका बघा, झोपा.. आणि दर शनिवारी सकाळी सिंहगड.. असा दिनक्रम सुरु झाला. गेल्यावर्षीच्या यात्रेची तयारी म्हणून सुरू केलेल्या शनिवार सकाळच्या सिंहगड वार्‍या वर्षभर सुरू राहिल्या आणि त्याचा मला यात्रेदरम्यान चांगलाच फायदा झाला. मी आणि माझा मित्र गौतम नेहमी असायचो, बाकी काही जणं अधे-मधे यायचे. मधल्या काळाल गौतम 'लग्नाळला' आणि त्याचं लग्न मे अखेरीस असल्याने त्याने मे महिन्यापासून सिंहगड वार्‍यांमधून ब्रेक घेतला. मग काय.. बायको असतेच हक्काची! शिल्पाला स्वतःला कैलास मानसला जायची खूप इच्छा आहे त्यामुळे तिने लगेच मला त्यातल्या त्यात मदत म्हणून सिंहगडावर कंपनी द्यायची तयारी दर्शवली. ती माझ्याबरोबर अर्ध्या ते पाऊण उंचीपर्यंत यायची आणि तिथे वाचत बसायची आणि मी पूर्ण वर जाऊन यायचो. असे तीन चार शनिवार केले. मधल्या एक-दोन शनिवारी केदारही आला होता. एकीकडे केदार बरोबर फोनाफोनी करून सामानाची जमवाजमव सुरू होती. यंदा दोघं एकत्र असल्याने काही काही गोष्टी आम्ही दोघांत मिळून घ्यायच्या ठरवल्या होत्या.

निघायच्या साधारण आठवडाभर आधी आईला कसलीतरी अ‍ॅलर्जी आली. एकंदरीत आईला डॉक्टरकडे अजिबात जायचं नसतं. पण ती अ‍ॅलर्जी कमी होत नव्हती आणि तरी ती औषध घेत नव्हती . मग मी जरा आरडाओरडा करून तिला आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे घेऊन गेलो. तिथे मला उगाच हौस आली आणि त्यांना माझं बिपी मोजायला सांगितलं. तर ते जास्त आलं!!! डॉक्टर म्हणाले गोळी वगैरे घेण्याइतक जास्त अजिबात नाहीये, काळजी करू नकोस, नीट आराम कर, येईल ते आपोआप खाली.. खरतर मी पंधरा दिवसांपूर्वीच रक्तदान केलं तेव्हा व्यवस्थित होतं.. विचार केला..झालं.. गेल्यावर्षी ढगफुटीमुळे आणि ह्यावर्षी आता मेडिकलमध्ये नापास झाल्याने यात्रा रद्द होणार! रात्रभर झोपच नाही लागली मला. आईला म्हटलं बघ तू मला ओरडायला लावलस आणि माझ बिपी वाढलं! दुसर्‍या दिवशी ऑफीसमधल्या डॉक्टरांकडे जाऊन परत मोजलं. आदल्या दिवशीपेक्षा कमी आलं पण तरी थोडं जास्त होतं! शेवटी घरून बोलणी बसली. म्हटलं जाऊ दे काय व्हायचं ते होईल.. अगदी झालोच रिजेक्ट तरी यंदा अजिबात सुट्टी रद्द करायची नाही.. तिकडेच दुसरा ट्रेक करायचा किंवा शिल्पा-रियाला बोलावून घेऊन ट्रीप करायची.

त्याच सुमारास पुण्यात ‘डीकॅथेलॉन’ची शोरूम उघडली. त्या दुकानातूनही बरीच खरेदी केली. खरतर चांगली सॅकपण घ्यायची होती. पण तिथेही आमची 'कन्या' रास आडवी आली. मेडिकलमध्ये नापास झालो तर सॅक पडून रहाणार आणि पैसे फुकट.. कशाला उगीच खर्च! मग शिल्पाच्या बहिणीकडून तिची ट्रेकींगची सॅक आणली आणि घरातली एक डफल बॅग घेतली. निघायच्या आदल्या दिवशी केदार आणि कुटुंबीयआमच्या घरी आले. घरच्यांची एकमेकांशी नीट ओळख झाली. प्रज्ञाला, केदारच्या बायकोला, जरा काळजी वाटत होती की एव्हडा लांबचा आणि अवघड प्रवास नीट होईल ना वगैरे. नंतर शिल्पा आणि माझी आई म्हणायला लागल्या, 'बापरे आम्हांला काही टेन्शन नाही आलय किंवा तुझी काळजीही नाही वाटत आहे.. आम्ही फारच पाषाणहृदयी आहोत की काय!'

अखेर सगळी कोंबाकोंबी करून सामान भरून झालं आणि आम्ही एअरपोर्टवर पोचलो. रियाला नक्की काय चाललय ते कळतच नव्हतं. एक महिना बाहेर जाण्यातला सगळ्यांत अवघड भाग रिया भेटणार नाही हाच होता! केदार एअरपोर्टला आधीच पोचला होता. मग सामान ओव्हरवेट, ह्या बॅगेतून त्या बॅगेत, थोडं केदारच्या हँडबॅगेत वगैरे सगळे नेहमीचे प्रकार होऊन अखेर आम्ही दिल्लीसाठी प्रस्थान ठेवलं.

२४ जून उजाडला तरी पुण्यातही पाऊस नव्हता, दिल्लीत तर अगदी लाही लाही होत होती. आम्ही दिल्लीला उतरलो तेव्हा साधारण ४३/४४ डि.से. तापमान होतं. त्यात आमची टॅक्सी भर दुपारी अडीच वाजता एका चौकात बंद पडली. टॅक्सीवाला म्हणे धक्का मारा जरा. म्हटलं मारतो आता काय! उन्हात गाडीला धक्का मारणे हे पहिले कष्टदायक काम केले! यात्रेचे पहिले तीन दिवस दिल्लीतच असतात. पहिले दोन दिवस वैद्यकीय तपासण्या आणि तिसर्‍या दिवशी परराष्ट्र मंत्रालयात यात्रेसंबंधी सुचना दिल्या जातात. शिवाय त्या दिवशी डॉलर घेणे, काही राहिलेली बारिक सारिक खरेदी वगैरे गोष्टीही करता येतात. दिल्लीत रहाण्याची (आणि खाण्याची) सोय दिल्ली सरकारतर्फे गुजराथी समाजात केली जाते. या यात्रेची जबाबदारी परराष्ट्र मंत्रालय, कुमाऊं मंडळ विकास निगम(केएमव्हीएन), इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) आणि दिल्ली सरकार ह्या सर्वांची असते. दिल्ली सरकारतर्फे तीर्थयात्रा विकास समिती, जातानाचे दिल्लीतले पहिले चार दिवस आणि आल्यानंतरचा एक दिवस व्यवस्था पहाते. तीर्थयात्रा विकास समितीचे प्रमुख श्री. उदय कौशिक ह्यांच ऑफिसही गुजराथी समाजात आहे. एकूणच प्रवास 'यात्रा' म्हणून होत असल्याने बरच धार्मिक वातावरण असतं आणि त्याची सुरुवात गुजराथी समाजातूनच होते. सकाळ संध्याकाळ पुजाअर्चा, आरती, प्रसाद, होमहवन शिवाय एकमेकांना बाकी सगळी अभिवादनं सोडून 'ॐ नमः शिवाय' म्हणणे अशा सगळ्या गोष्टी असतात. (कँटीनमध्ये आम्ही गेलो की तिथली पोरं आपापसात 'ॐ नमः शिवाय वाले आगए' असं म्हणायची!) गेल्यावर्षी माझी ह्या सगळ्या प्रकाराची रंगीत तालिम झालेली असल्याने मी सुरुवातीपासून अजिबात त्रास करून न घेता 'जो जो वांधिल तो ते करो' मोडमध्ये होतो. मुळात कुठल्याच बाजूला विरोध करायला जायचं नाही पण आपल्याला हवं ते, तसच आणि तेव्हडच करायचं हे ठरवून टाकलं होतं.

दुसर्‍या दिवशी दिल्ली हार्ट अँड लंग्ज इंस्टीट्यूटमध्ये वैद्यकीय तपासण्या झाल्या. तिथे हृदय आणि फुफ्फुसांसंबंधित बर्‍याच प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. अतिउंच प्रदेशात विरळ हवेचा त्रास होऊ शकतो आणि म्हणून ह्या तपासण्या होतात. साठ जणांच्या बॅचच्या ह्या सगळ्या तपासण्या होईपर्यंत दिवस जातो. त्यात ट्रेडमिल टेस्टच्या इथे एक मशिन बंद पडलेलं असल्याने फक्त एकाच मशिनवर सगळं चाललं होतं. त्यामुळे आमच्या तपासण्या संपेपर्यंत संध्याकाळचे साडेपाच झाले. ट्रेडमिल टेस्ट न खाता करायची असल्याने साडेपाचला दुपारचं जेवण जेवलो!

तपासण्या करताना रांगेत उभं राहून सहप्रवाश्यांची ओळख होत होती. ह्यावर्षीच्या बॅचचं सरासरी वय जास्त होतं. निम्मे लोक पन्नाशीच्या पुढचे होते. बॅचमध्ये डॉक्टरही एकच होत्या. यंदा गुजरातपेक्षा महाराष्ट्रातून आलेल्या यात्रींची संख्या जास्त होती. अर्थात त्यातले सगळे मराठी भाषिक नव्हते. दिल्ली, राजस्थान, हरीयाणा, उत्तरप्रदेश, बिहार, उत्तराखंड, आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि यंदा गोव्याचेही एक यात्री होते. महाराष्ट्रातल्या यात्रींपैकी प्रसाद रानडे मुंबईचे होते. एकदम टाईमपास माणूस.कामानिमित्त बारा गावांच पाणी प्यायलेला. पहिल्याच दिवशी माझ्याशी आणि केदारशी ह्यांच्या मस्त गप्पा झाल्या आणि आम्ही त्यांना आमच्या कंपूत हळूच ओढलं. (त्यांच्या एक दोन कमेंट्स ऐकून त्यांना लवकरच मायबोलीवर आणायचं हे ही आम्ही ठरवून टाकलं.) दिल्लीमध्ये सगळ्या ठिकाणी यात्रींचं फक्त पहिलं आणि मधलं नावच वाचलं जायचं, आडनाव वगळलं जायचं. त्यामुळे 'बाळकृष्ण विनायक' असं नाव बर्‍याचदा ऐकू आलं. हे फर्स्ट अँड मिडल नेम असलेला मनुष्य फक्त आणि फक्त मराठीच असला पाहिजे अशी मला खात्री होती. तर त्यांचं आडनाव होतं चौबळ. स्टेट बँकेतले उच्चपदस्थ चौबळ साहेबही मुंबईचेच. चौबळ साहेबांचं व्यक्तिमत्त्व एकदम भारदस्त होतं आणि एव्हडे उच्चपदस्थ असूनही ते एकदम साधे होते. अगदी सैन्यातून निवृत्त झालेले शोभतील असे कोल्हापुरचे मराठे काका होते. आमच्या बॅचमधले वयाने सगळ्यात मोठे ६९ वर्षांचे ठाण्याचे विनोद सुभाष काका होते. मुळचा पुण्याचा पण मुंबईत काम करणारा विशाल होता. त्याच्या हट्ट्याकट्ट्या शरीरयष्टीमुळे आम्ही त्याचं नाव नंतर 'भीम' ठेवलं. (त्याचे प्रश्न ऐकून केदारला वारंवार एका मायबोलीकराची आठवण यायची!). तळेगावचे ओक काका होते. पुण्याचे काटदरेक काका होते. दिल्लीत रहाणारा एका मोठ्या वृत्तपत्रात काम करणारा अँग्री (नॉट सो) यंग मॅन सौम्या होता. नंतर ह्याच्या आणि आमच्या अनेक विषयांवर खूप चर्चा झाल्या. पत्रकार असल्याने त्याच्याकडे सांगण्यासारख्या भरपूर गोष्टी असायच्या. आमच्या बॅचमधला सगळ्यात लहान यत्री २७ वर्षीय गाझियाबादवासी श्याम गर्ग होता. पोरगेलसा श्याम आणि भरभक्कम भीम अशी जोडी पहिल्या दिवसापासून जमली. दोघेही एकमेकांच्या खोड्या काढायची एकही संधी सोडायचे नाहीत. दोन-तीन गुज्जू जोड्या होत्या. गुजराथच्या मीनाबेन, गुप्ते बाई आणि मयुरीबेन, दिल्लीच्या निलम आणि अंजू, उत्तराखंडच्या नंदादेवी अशा एकट्या आलेल्या काकू होत्या. त्यातल्या मयुरीबेन डॉक्टर होत्या. त्यांनी डॉक्टरकीचं शिक्षण नक्की कुठल्या भाषेत घेतलं होतं कोण जाणे. त्यांना प्रश्न हिंदीत किंवा इंग्लिशमध्ये विचारला तरी त्या उत्तर गुजराथीतच द्यायच्या. थोडफार आपल्याला कळतं पण एकदा अगदीच काही न कळल्यावर मी त्यांना सांगितलं की बाई हिंदी किंवा इंग्लिशमध्ये बोला कृपया! दिल्लीचे चैनाराम, हैद्राबादचे बद्रीप्रसाद, आमच्या बॅचचे ऑफिशियल पंडीत रामनरेशजी, बंगलोरचा फनीकुमार, दिल्लीचा विपूल वगैरे काका लोकं होते. कृष्णा आणि श्यामला म्हणून एक कर्नाटकी जोडपं होतं. त्यांना म्हणे दिल्लीत येईपर्यंत माहितच नव्हतं की ह्या यात्रेत इतकं चालावं लागतं. त्यांनी दिल्लीत आल्यावर आणि मेडीकल पास झाल्यावर बुट, कपडे वगैरे खरेदी केली. जिथे तिथे आपले फोटो काढून घेणारा नुकतच लग्न झालेला कर्नाटकी बसवप्रभू होता. मुळचे पंजाबी पण बरीच वर्ष गोव्यात असलेले बन्सलजी होते. तमिळनाडूमधला व्यापारी पलानी होता. ह्या पलानीला केदार तमिळ भाषिक आहे असं वाटायचं आणि तो केदारशी तमिळमध्ये बोलायला सुरुवात करायचा. थोड्यावेळाने केदार त्याला 'मला कळत नाही रे तू काय म्हणतोस..' असं मराठीत सांगायचा! त्यांच्या गप्पा एकूण एकदम मजेशीर असायच्या. त्यात केदारला बन्सलजी तमिळ आहेत असं वाटलं आणि तो त्यांना 'ह्या पलानीला तुमच्या भाषेत नीट समाजावून सांगा' असं सांगायला लागला. बर्‍याच बहुभाषिक चर्चेनंतर कोण कुठलं आणि कुठली भाषा बोलतं ते स्पष्ट झालं! रघू आणि हायमा नावाचे अमेरिकावासी बंधू-भगिनी चौथ्यांदा यात्रेला निघाले होते. याआधी तीनदा ते नेपाळमार्गे जाऊन आले होते आणि आता त्यांना भारताच्या बाजूने जायचं होतं. शिवाय मध्यप्रदेशातून आलेले अजून एक बंधू-भगिनी होते. त्यांच्या दोघांच्या चेहेर्‍यावर कायम बध्दकोष्ठता झाल्यासारखे भाव असायचे. त्यातला तो माणूस नेहमी कुठल्या ना कुठल्या प्रकारची टोपी घालून फिरायचा. आम्ही त्याचं नाव टोपीवाला ठेऊन दिलं. टिपीकल हरीयाणवी व्यक्तिमत्त्वाचे मित्तलजी होते. बहूतेक त्यांना मी अजिबात आवडायचो नाही. ते माझ्याकडे कायम खाऊ का गिळू नजरेने बघत असायचे! त्यात पुढे माझ्या पोर्टरने त्यांची टोपी हरवली. बिहारी शेतकरी रामसेवकजी होते. साठीच्या पुढचे रामसेवकजी दुसर्‍यांदा यात्रेला निघाले होते. यंदाच्या हंगामातला १०२ क्विंटल मका विकला आणि ते पैसे घेऊन यात्रेला आलो असं सांगत होते. म्हणे मुलांना त्यांचे पैसे कमावता येईल इतकं शहाणं केलं आहे, त्यामुळे हे पैसे माझे मी खर्च करणार. उत्तरप्रदेशातून आलेला आचारी टेकचंद होता. माणसाकडे फक्त बघून, त्याच्या दिसण्यावरून कधीही मत बनवू नये ही जी शिकवण आपल्याला मिळते त्याचं मुर्तिमंत उदाहरण म्हणजे टेकचंद आणि रामसेवकजी! नेहमी झब्बा-पायजमा घालणारे, कुठलेही हायफाय बुट, सॅक, कॅमेरा, इतर आयुधं न वापरणारे, इतकच काय पण पोर्टर न घेता आपली सॅक आपण वागवणारे हे दोघे चालण्यात वाघ होते! संपुर्ण यात्रेत सगळ्यात पुढे, मेडिकली एकदम फिट आणि स्वभावाने अतिशय साधे. आमच्या बॅचमधली सगळ्यात 'महत्त्वाची' व्यक्ती म्हणजे कायम अतिसेवाभावी वर्तन करणारे उत्कलजी पटेल! सगळ्या बॅचची काळजी ह्यांच्या शिरावर आहे अशा थाटात त्यांचा कारभार सुरु असायचा. पण त्यात 'नारायणा'सारखी अगदी निष्पाप वृत्ती मात्र नव्हती. येता जाता काहीही झालं की जोरात 'नम: पार्वती पदे.. हरहर महादेव!!!!!!!!!!' असं ओरडायची ह्यांना सवय होती. पुढे केदारने ह्यांचं नाव 'पार्वते' ठेवलं. अशा विविधढंगी, विविधप्रांती बॅचची मोट बांधणार होते आमचे लायजनींग ऑफिसर श्री. राजेंद्र कटारीया. भारत सरकारचे प्रतिनिधी असणारे हे एलओ कर्नाटक केडरचे अस आय.ए.एस ऑफिसर आहेत आणि त्यांनी युपीए सरकारातल्या रेल्वेमंत्रालयात मंत्र्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून काम केलं आहे. प्रत्येक बॅचच्या 'एलओ'कडे डिप्लोमॅटचा पासापोर्ट असतो त्यांना total diplomatic immunity असते.

वैद्यकीय तपासण्यांदरम्यान एलओ सरांशी जुजबी बोलणं झालं. दुसर्‍या दिवशी आयटीबीपीच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी मिटींग घेऊन फायनान्स, फूड, लगेज वगैरे कमिट्या स्थापन केल्या. मला ऑफिसमध्ये 'हल्या हल्या' छाप काम करून इतका वैताग आलेला होता की मी कुठल्याच कमिटीत नाव दिलं नाही. पण उगीच 'यंग हो इसलिए' लगेज कमिटीत जायला नको म्हणून मी 'डिसिप्लीन' कमिटीत नाव दिलं. आयटीबीपी हॉस्पिटलमधली मिटींग

वैद्यकीय चाचण्यांचे निकाल जाहीर झाले आणि आमच्या बॅचमधल्या ९ जणांची निवड होऊ शकली नाही. पलानी, ओक काका आणि काटदरे काकांबद्दल वाईट वाटलं. काटदरे काकांना हिमालयातल्या बर्‍याच ट्रेक्सचा अनुभव होता. पण वैद्यकीय चाचण्यांच्या निकषांमध्ये ते बसू शकले नाहीत. खरतर मयुरीबेनचंही ब्लडप्रेशर जरा बॉर्डरवर होतं आणि आयटीबीपीचे डॉक्टर त्यांना परवानगी नाकारत होते. पण एलओ सरांनी त्यांना गुंजी पर्यंत सुट देण्याची विनंती केली कारण त्या आमच्या बॅचमधल्या एकमेव डॉक्टर होत्या. गुंजीला तशीही पुन्हा चाचणी होतेच. तिथे काही त्रास आहे असं वाटलं तर तिथून परत पाठवू अशा मांडवलीवर मयुरीबेनची निवड झाली. साठपैकी नऊ जणं गळल्यावर आम्ही ३८ पुरूष आणि १३ बायका असे ५१ यात्री झालो. एलओंना धरून आमची ५२ जणांची बॅच निश्चित झाली. आत्तापर्यंतच्या पाच बॅचपैकी आमची सगळ्यात लहान बॅच. आमच्या आधीच्या चौथ्या बॅचमधले साठही जण वैद्यकीय चाचण्या पास झाले होते.

वैद्यकीय तपासण्या आटोपून गुजराथी समाजात परतलो आणि मग आम्ही चौघा-पाच जणांनी लगेच चांदनी चौकाकडे मोर्चा वळवला. तसही संध्याकाळी तिथे करण्यासारखं काही नव्हतं आणि टेस्ट पास झाल्यामुळे सगळे उत्साहात होते. पुजेमधली हनुमान चालिसा ऐकली आणि निघालो. गेल्यावर्षी घाईघाईत चांदनी चौकात येऊन गेलो होतो. ह्यावर्षी वेळ होता आणि कंपनीही होती. दिल्ली मेट्रो खूपच सोईची आणि उत्तम आहे. दिल्लीतल्या चांदनी चौक, राजीव चौक ह्यांसारख्या ठिकाणी जागा ताब्यात घेऊन मेट्रोचं बांधकाम करता येऊ शकत असेल तर भारतात कुठेही काहीही बांधता येणं शक्य आहे, प्रश्न आहे तो फक्त राजकीय इच्छाशक्तीचा! पुण्यातल्या मेट्रोचं भिजत घोंगडं आणि मुंबई मेट्रो सुरू व्हायला झालेला उशीर पाहून तर हे फार प्रकर्षान जाणवलं. मी लालकिल्ला पाहिलेला नव्हता. त्यामुळे आधी लाल किल्ल्याकडे वळलो. प्रचंड उकडत होतं आणि तहान तहान होत होती पण तरी पार आतपर्यंत लांब चक्कर मारली. दिवाने-आम, दिवाने-खास, बाकी जुन्या इमारती, बादशाहाची बसायची जागा वगैरे बर्‍याच गोष्टी पाहिल्या. अशा ऐतिहासिक वास्तू पाहून खूप काही वाटतं पण नक्की काय ते सांगता येत नाही. साडेसात वाजता लाईट अँड साऊंड शो होता पण तेव्हडं थांबायचं त्राणच राहिलं नाही. लाल किल्ल्याच्या आतली प्रशस्त हिरवळ, मोकळी जागा आणि दार ओलांडून बाहेर पडल्यावर चांदनी चौकात इंच इंच लढवूया परिस्थिती. सिस गंज साहिब गुरुद्वारा, जामा मस्जिद, गौरी शंकर मंदिर, चर्च, जैन मंदिर अशी सगळी एकत्र नांदणारी प्रार्थनास्थळं. इमारतींच्या मधून-मधून जाणार्‍या 'गल्ली'ही म्हणता येणार नाही इतक्या लहान लहान बोळकांड्या. सर्व प्रकारच्या, किंमतीच्या, दर्जाच्या खाण्या-पिण्याची चंगळ. एका अगदी लहानश्या बोळकांडीतून आत शिरलो. दोन्ही बाजूला टपरी वजा दुकाने. खेटून दोन माणसं शेजारी उभी राहू शकतील इतकीच जाग. दुकानदाराने थोडं पुढे वाकून हात लांब केला की तो समोरच्या दुकानातलं सामान काढू शकेल इतपतच. पण ती दुकान होती कॅमेर्‍याची. म्हणाल तो ब्रँड, म्हणाल ती कॅमेर्‍यांची मॉडेल, म्हणाल त्या स्पेसिफिकेशनची लेन्स, म्हणाल त्या अ‍ॅक्सेसरीज तिथे उपलब्ध होत्या! केदारने नवीन लेन्स घेतली. आम्हांला जरा शंका आली. विचारलं लेन्स खराब झाली तर काय, त्या माणसाने डिलरशिपचं कार्ड काढून दिलं, म्हणाला कुठल्याही शोरूममध्ये जाऊन हे दाखवा, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आम्ही ऑथोराईज्ड डीलर्स आहोत. वर त्याने कोकही पाजलं! अजून एक अशीच गल्ली म्हणजे पराठेवाली गल्ली. दोन-दोनशे वर्ष जुनी दुकानं, आज पाचव्या सहाव्या पिढ्या ती चालवत आहेत. चिनूक्सच्या लेखाची आठवण झाली. त्यात उल्लेख असलेली ओल्ड फेमस जलेबीवाला, घंटेवाला, रबडी भंडार वगैरे दुकाने दिसली. घंटेवाल्याकडे कचोरी आणि पराठेवाल्या गल्लीत तुपात तळलेले पराठे खाल्ले. पुदिना आणि बेसन पराठे खूप आवडले. लस्सी प्यायली. (केदार उगीच जास्त गोड आहे वगैरे म्हणत होता, पण मी लक्षं दिलं नाही त्याच्याकडे.) शिवाय हल्दीराममध्ये जाऊन दहीभल्ले आणि पापडीचाट खाल्लं. मला खरतर ते चिनूक्सच्या लेखात लिहिलेलं 'खुर्चन' पण खायचं होतं. पण ते म्हणे फक्त सकाळीच मिळतं. 'अब इतने रात को कहां मिलेगा खुर्चन' असं अगदी दिल्ली ढंगात सांगून त्या दुकानदाराने आमची बोळवण केली. इतके वर्ष जुना हा परिसर, पिढ्यांन पिढ्या पहिलेला. अनेक घटना पचवलेला. एकंदरीत ह्या जागेत काहितरी वेगळं आहे.

दिल्लीतल्या तिसर्‍या दिवशी परराष्ट्र मंत्रालयात जायचं होतं. परराष्ट्र मंत्रालयातले कैलास मानससरोवर यात्रेचे प्रमुख श्री. विजय, केएमव्हिएनचे अधिकारी, आमचे एलओ आणि आयटीबीपीचे अधिकारी तिथे उपस्थित होते. त्यांनी सगळ्यांनी बर्‍याच सुचना दिल्या. मुख्य म्हणजे चीनमध्ये जाऊन कुठल्याहीप्रकारे राजकीय बाबींवर भाष्य करणं टाळा तसच प्रवासात दिलेल्या सुचना कटाक्षाने पाळा हे सांगितलं. विसा काढण्यासाठी दिलेले आमचे पासपोर्ट परत मिळाले तसच भारतातल्या बाजूच्या व्यवस्थेसाठी केएमव्हिएन जे पैसे घेतं ते ही त्यांनी जमा केले. परराष्ट्र मंत्रालयात गेलोच होतो तर तिकडे परराष्ट्र मंत्र्याना भेटणं शक्य आहे का, त्यांच्या लोकांना भेटण्याच्या काही ठरविक वेळा असतात का? ह्याची चौकशी केली. पण परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज त्यांच्या पहिल्या परदेश दौर्‍यावर बांग्लादेशला गेल्याचं समजलं. पहिल्या बॅचला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी त्या स्वतः हजर होत्या. (सुषमाजी खरच भेटल्या असत्या तर सरकारने २०२४च्या ऑलिंपीक यजमानपदासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती त्यांना करायची असं मी ठरवून ठेवलं होतं. परत कधी संधी मिळाली तर बघू आता.. !) यात्रेच्या कालावधीतले एकूण आठ दिवस चीनमध्ये असतात. तिथल्या रहाण्या-खाण्याचा आणि प्रवासाचा खर्च म्हणून तब्बल ८०१ अमेरिकन डॉलर चीन सरकारला द्यावे लागतात. आठपैकी तीन दिवसांचं जेवण चीन सरकारतर्फे दिलं जातं. परिक्रमेचे पाच दिवस मात्र आपली आपल्याला सोय करावी लागते. तिथल्या कँपवर स्वंयपाकघर आणि भांडी असतात. त्यामुळे नेपाळी स्वैपाक्यांच्या मदतीने जेवण बनवता येतं. त्याचा शिधा मात्र भारतातून घेऊन जावा लागतो. ह्या सगळ्या खर्चासाठी, तसच कॅम्पवरच्या कर्मचार्‍यांना टीप देण्यासाठी प्रत्येक बॅच वर्गणी काढते. आमच्या बॅचनेही प्रत्येकी तीन हजार रूपये वर्गणी गोळा केली.

परराष्ट्र मंत्रालयातलं काम संपल्यावर पुढचं काम बँकेत जाऊन डॉलर घेणे हे होतं. चौबळ साहेबांनी जवळच्या एसबीआयच्या शाखेत आधीच सगळी व्यवस्था करून ठेवली होती. मी पुण्याहूनच डॉलर नेलेले असल्याने मला बँकेत जायची गरज नव्हती. त्याऐवजी मी माझ्या आता नॉएडात असणार्‍या एका मैत्रिणीला भेटायला निघालो. खरतर केदारकडेही डॉलर होते. पण तो फायनान्स कमिटीत असल्याने त्याला संपूर्ण बॅचच्या चीनमधल्या खर्चासाठी लागणारे डॉलर घ्यायचे होते. इतक्या लोकांचे पैसे घ्यायचे असल्याने बँकेत खूप वेळ गेला. दरम्यान केदारच्या कुठल्यातरी बोलण्याने टोपीवाल्याच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यांची जरा बाचाबाची झाली. नंतर टोपीवाला पूर्ण प्रवासभर केदारवर आणि मी केदारचा मित्र म्हणून माझ्यावरही खार खाऊन होता! फूड कमिटीतली मंडळी ठरवलेल्या यादीप्रमाणे चीनमध्ये लागणारा शिधा घेऊन आली. काही सामान/खाद्यपदार्थ गुजराथी समाजातर्फे दिलं जातं.

दिल्ली मेट्रो आता थेट नॉएडा पर्यंत जाते. हा मेट्रोप्रवास जरा मोठा म्हणजे साधारण पाऊण तासाचा होता. मधे एका स्टेशनला दिल्लीची हद्द ओलांडून मेट्रो उत्तर प्रदेशात शिरली. उत्तर प्रदेशात गेल्यावर बदल जाणवले. रिक्षांचे मिटर लगेच बंद, तोंडाला येईल ते भाडं, पाट्या लिहायची पद्धत वेगळी, अखिलेश सरकारच्या जाहिराती करणारे फलक वगैरे दिसायला लागले. माझी मैत्रिण आहे मराठी पण तिचा नवरा पंजाबी सरदार आहे. त्यामुळे त्यांच्या घरी सगळे शुद्ध हिंदीत बोलत होते. मी गेल्या गेल्याच सांगितलं की माझ्या बम्बैय्य हिंदीचा राग वगैरे मानू नका. सगळ्यांशी भरपूर गप्पा झाल्या. हे कुटूंब मुळचं पाकिस्तानातलं. फाळणीच्या वेळी भारतात आलं. त्यांचे त्यावेळचे काही अनुभव ऐकले. फारच कठिण परिस्थिती होती तेव्हा! निघताना तिने हळूच सांगितलं जाताना मोठ्यांना नमस्कार कर कृपया. म्हटलं तसही मराठी लोकांना उत्तर भारतीयांपेक्षा आदर-सत्कार, तेहजीब, पायलागू वगैरेची समज जरा कमीच. शिवाय आधीच सुनेचा मित्र आणि त्यात पायाही न पडता गेला म्हणून तुला बोलणी-बिलणी नको बसायला!

संध्याकाळी गुजराथी समजात दिल्ली सरकार तर्फे 'बिदाई'चा कार्यक्रम होता. प्रत्येक बॅचला दणक्यात सेंडऑफ दिला जातो. शिवाय दिल्ली सरकारतर्फे रकसॅक, रेनकोट, ट्रॅकसुट, टॉर्च, पुजेचे सामान, पाऊच वगैरे भेटवस्तूही दिल्या जातात. दिल्लीतल्या यात्रींना दिल्ली सरकारतर्फे यात्रेकरता मदत म्हणून तीस हजार रूपये रोख दिले जातात. इतरही बरीच राज्यसरकारे (उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, हिमाचल, उत्तराखंड, छत्तिसगढ, कर्नाटक, गोवा आणि तमिळनाडू सुद्धा!) अशी मदत देतात. महाराष्ट्र सरकार मात्र काही देत नाही. त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या यात्रींनी मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्र लिहून दिलं. बिदाईला दिल्ली सरकारातले सचिव आले होते. जोरदार भजनं, गाणी वगैरे झाली. यात्रींचा गळ्यात हार घालून, टिळे लावून सत्कार केला गेला. एकंदरीत उत्तर भारतात कैलास मानस सरोवर यात्रेचे खूप महत्त्व आहे. त्यामुळे सगळ्या यात्रींना खूप मानसन्मान मिळतो. सेवा केली जाते. पण आपल्याला मात्र फार अवघडल्यासारखं होऊन जातं. 'बिदाई'च्या कार्यक्रमादरम्यान प्रचंड उकडत होतं आणि भजनांचा फार जोरात आवाज होता. आम्ही बराच वेळ बाहेर बसलो होतो. जेवण मात्र छान होतं. तो कार्यक्रम सुरु असताना शिल्पाचा फोन आला. एकदम घाईघाईने बोलत होती. मी विचारलं की काय झालं ? म्हणे तू बिदाईत बिझी असशील ना! मी म्हटलं बिझी काय असायचंय? तुला काय वाटलं विदाई म्हणजे मी कोणाच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडतो आहे की काय. आधी ती ते इमॅजीन करून खूप हसली मग म्हणे त्या कैलासालाच सांग आता की मला सरळ बोलायची बुद्धी दे म्हणून!

जेवण झाल्यावर एक महत्त्वाचा कार्यक्रम पार पाडायचा होता तो म्हणजे सामान भरणे. यात्रींना वीस किलो सामान घेऊन जायला परवानगी असते. ते एक किंवा दोन बॅगांमध्ये भरून पावसापासून संरक्षण करण्यासाठी युरीया बॅग (प्लॅस्टीकच्या पोत्यात)मध्ये कोंबायचं असतं. हे सामान खेचरांवर बांधलं जातं आणि रोजच आपल्याला मिळेल ह्याची शाश्वती नसते. यात्री आपल्याबरोबर एक छोटी सॅक ठेवतात ज्यात पैसे, महत्त्वाच्या वस्तू, कागदपत्रे, औषधे, एक कपड्यांचा जोड, थोडा खाऊ, रेनकोट वगैरे अगदी गरजेचं सामान असतं. सगळं सामान प्लॅस्टीकच्या पिशव्यांमध्ये बांधून ठेवायला लागतं. म्हणजे अगदी पाणी आत गेलच तरी सामान ओलं होत नाही. मी आणि केदारने युरीया बॅगांऐवजी रविवारपेठेतून मोठ्या सिंथेटी़क कापडाच्या शिवलेल्या आणि चेन / हँडल असलेल्या बॅगा आणल्या होत्या. एक तर त्या चांगल्या दणकट होत्या, चेन असल्यामुळे त्यांची तोंडं आवळत बसायला लागत नव्हती आणि विचित्र रंगांच्या होत्या त्यामुळे सामानाच्या ढिगात पटकन ओळखू यायच्या. कुठल्या बॅगेत काय ठेवायचं आणि कुठलं सामान दिल्लीतच ठेऊन द्यायचं ह्यावर बरच विचार मंथन करून झाल्यावर अखेर बॅगा भरून झाल्या. पण वाईट गोष्ट म्हणजे माझी काळी सॅक त्या रविरवारपेठी बॅगेत मावेचना! मग बरीच फाईट मारून ती सॅक युरीया बॅगेत कोंबली आणि दिल्ली सरकारने दिलेली सॅक बरोबर ठेवायची म्हणून घेतली. हे लिहिलं तीन चार ओळीत असलं तर ह्या सगळ्या प्रक्रियेला तब्बल तीन तास लागले! दरम्यान जे लोकं गुजराथी समाजात उतरले नव्हते ते सगळेही त्या रात्रीच्या मुक्कामासाठी तिथेच आले कारण दुसर्‍या दिवशी पहाटे साडेचारला सामान द्यायचं होतं आणि सहाला निघायचं होतं. सहाव्या बॅचचे काही अतिउत्साही यात्री दोन दिवस आधीच दिल्लीत आले होते. त्यामुळे गुजराथी समाजाच्या त्या हॉलमध्ये 'जागा मिळेल तिथे पथार्‍या' अशी परिस्थिती होती. जेमतेम तीन तास झोप झाली असेल नसेल तो लोकं उठायला लागली. पूर्ण यात्रेतलं आमचं सुत्र म्हणजे जाग आली की प्रातर्विधी आणि शक्य असेल तर अंघोळ उरकून घ्यायची. नंतर हवं तर परत झोपता येतं. पण उशीर झाला की रांगा लागतात आणि टॉयलेट, बाथरूम घाण होतात! आंघोळ करता करता लोक बाथरूममध्ये नाचतात की काय अशी मला शंका यायची कारण एक जण जरी आधी जाऊन आला तरी बाथरूमचा कोपरा अन् कोपरा ओला झालेला असायचा! लगेज कमिटी सामान द्यायची सुचना देऊन गेली. दरम्यान उत्तराखंड परिवहनची वॉल्वो बसही खाली येऊन उभी राहिली. काठगोदाम पर्यंत वॉल्वो असते आणि तिथून पुढे धारचुलापर्यंत लहान बस असतात. सामानाचा ढिगः

अखेर बरीच बोंबाबोंब झाल्यानंतर सगळं सामान वॉल्वो बसच्या पोटात गेलं आणि आम्ही बसमध्ये जागा पकडल्या. दरम्यान बरेच समितीवाले पुन्हा हार, टिळे, भेटवस्तू घेऊन आले होते. मग ओवाळणं, नमस्कार, चमत्कार झाल्यावर पार्वतेने आपली 'हर हर महावेव'वाली पाहिली आरोळी ठोकली आणि आमची बस काठगोदाम/अल्मोड्याकडे मार्गस्थ झाली. क्रमशः

तारकर्ली, देवबाग, सिंधुदूर्ग



तर त्याचं झालं असं की मध्यंतरी आम्ही रियाची बेबी डायरी भरत होतो. त्यात एक प्रश्न होता 'Baby's first beach trip'. तेव्हा आमच्या लक्षात आलं की रियाला अजून समुद्रावर नेलेलच नाहीये! कोकणात जायला कधीही आवडतच. शिवाय दिवाळी नंतर कोकणातलं हवामानही चांगलं असतं. डिसेंबरमध्ये सुट्टी मिळायलाही फार अडचण नसते, त्यामुळे मग डिसेंबरमध्ये कोकणवारी करायचं नक्की केलं. भावा बहिणींच्यात विषय काढल्यावर आधी सगळे उत्साहाने हो म्हणाले आणि नंतर तारखा/ठिकाण आणि कोण-कोण येणार ह्याच्यावरून सगळ्यांनी इतका घोळ घातला की ह्यांची ए.को. आडनाव बदलून टाकावी! आम्ही अजून पर्यंत सिंधुदूर्ग जिल्ह्यात गेलो नव्हतो. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातली बरीच ठिकाणं बघून झाली होती. कोकणवारी होईल, शिवाय नवीन ठिकाणही बघितलं जाईल असा विचार करून मग सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या तारकर्लीला जायचं नक्की केलं. तारकर्ली/ देवबाग हे हल्लीच्या काळातलं पर्यटकांचं एकदम फेव्हरीट ठिकाण आहे. शिवाय तिथल्या लोकांनी पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी म्हणून बरेच प्रयत्नही चालवलेले आहेत. ह्यामुळे पर्यटनाच्या हंगामात तारकर्लीला रहाण्याची सोय फार लवकर करावी लागते. नाहीतर बुकींग मिळत नाही. तारकर्ली/देवबाग परिसराची भौगोलीक रचना फार मस्त आहे. मालवणहून डावीकडे एक जमिनीचा एक सुळका आहे ज्याच्या एका बाजूला कर्ली नदी आणि दुसर्‍या बाजूला समुद्र आहे. ही नदी देवबाग जवळ समुद्राला मिळते त्यामुळे जसजसे पुढे जाऊ तसतसा हा सुळका निमुळता होत जातो. देवबागला तर रस्त्याच्या एका बाजूला चालत दोन मिनीटांवर समुद्र लागतो आणि दुसर्‍या बाजूला चालत दोन मिनीटांवर नदी लागते. मधे घरं आणि नारळी पोफळीच्या बागा / वाड्या आहेत. आता बर्‍याच स्थानिक लोकांनी त्यांच्या घरांच्या आवारात 'सि फेसिंग रीसॉर्ट' बांधली आहेत.   ह्या खालच्या फोटोत उजवीकडून नदी येते आहे तर डावीकडे समुद्र आहे. मधला जमिनीचा सु़ळका म्हणजे देवबाग आणि जसं आत जाऊ तसं तारकर्ली येतं आणि मग पुढे मालवण.

आमचं ठिकाण आणि तारखा नक्की व्हायला जवळ जवळ डिसेंबरचा दुसरा आठवडा उजाडला. मग इंटरनेटवर शोधाशोधी केली. तारकर्लीला एमटीडीसीचं रिसॉर्ट सुंदर आहे. अर्थातच त्याचं बुकींग मिळालं नाही. महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागातर्फे इथे केरळ किंवा काश्मिरला असते तशी हाऊस बोट कर्ली नदीत चालवली जाते. सोय खूप चांगली वाटली पण जरा महाग आहे. तिचं फक्त दोन दिवसांच बुकिंग मिळत होतं. मायबोलीवर एकांनी दिलेल्या रीसॉर्टला फोन केला तर त्यांच्या नवीन खोल्यांचं बांधकाम पुर्ण झालं तर ते तुम्हांला देऊ असं म्हणाले. दोनचारदा फोन झाल्यावर त्यांनीच तिथल्या अजगांवकर काकांचा फोन नंबर दिला. हे अजगांवकर तारकर्लीचे पण आता रहातात मुंबईला. ते पर्यटनाच्या हंगामात तारकर्लीला येऊन त्यांचं घर 'होम स्टे' म्हणून भाड्याने देतात. आम्हांला रिया बरोबर असल्याने होम स्टे जास्त सोईचं होतचं कारण लागलं तर तिचं जेवण तिथे बनवता आलं असतं. शिवाय घर समुद्रापासून दुरही अगदी दोन मिनीटांवर होतं. त्यांच्याकडे बुकींग करून टाकलं आणि प्रवासाच्या सोईच्या मागे लागलो.

पुणे तारकर्ली अंतर बरच आहे. जवळ जवळ सात-साडेतास तासांचा प्रवास आहे. पुण्याहून तारकर्लीला जायला साधारण तीन रस्ते आहेत. कोल्हापुर शहर पार केल्यावर कोकणात उतरण्यासाठी दोन घाट आहेत एक म्हणजे गगनबावड्याचा तर दुसरा म्हणजे फोंडा घाट. कोल्हापुर शहरात शिरायचं नसेल तर कर्नाटकातल्या संकेश्वरला जाऊन उजवीकडे वळून अंबोली घाटातून कोकणात उतरता येतं. गगनबावड्याचा परिसर सुंदर आहे पण रस्ता फारसा चांगला नाहीये असं बर्‍याच जणांनी सांगितलं, फोंड्याबद्द्ल कोणी काही बोललं नाही त्यामुळे आम्ही अंबोलीवरून जायचा निर्णय घेतला. ह्या रस्त्याने साधारण तीस/पस्तीस किलोमिटर अंतर जास्त पडतं. पण रस्ता अतिशय चांगला आहे. नीरज-निशांतचं ही आमच्या बरोबर यायचं ठरल्याने करोला घेऊन जायचं ठरवलं. मोठी गाडी आणि डिझेल मुळे खर्च कमी.  पहाटे लवकर उठून निघायचं होतं कारण रिया तशी उशिरा उठते त्यामुळे गाडीतला तिचा जास्तितजास्त वे़ळ झोपेत गेला असता.

ठरल्याप्रमाणे पहाटे साडेपाचला निघालो. सातारा रोडने प्रवास आणि विरंगुळा हॉटेलमध्ये थांबलो नाही असं होतच नाही. त्यामुळे प्रथेप्रमाणे तिथे भरपेट ब्रेकफास्ट केला आणि मग चांगला वेग घेतला. एकीकडे शिल्पाला गाडी लागून उलट्या सुरु झाल्या. मुंबई बंगलोर हायवे कर्नाटकात शिरल्यावर फारच सुरेख होतो. अगदी आखिव-रेखिव आणि शिस्तशिर ट्रॅफिक.. आपल्या इथल्यासारखा ट्रक उलट्याबाजूने आणण्यासारखा आचरटपणा दिसला नाही! उस तोडणीचा हंगाम असल्याने उसाने भरलेले अनेक ट्रॅक्टर डुलत डुलत जाताना दिसले. अरूंद रस्त्यावर त्यांना ओलांडून पुढे जायचं म्हणजे फार पेशन्सचं काम होतं. आंबोलीचा घाट सुंदर आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने धबधब्याला अजूनही भरपूर पाणी होतं. सावंतवाडीला पोचेपर्यंत दिड वाजला. सांवतवाडी मालवण फाट्याच्या खाली आहे. त्यामुळे मुंबई गोवा हायवेला लागून साधारण दहा किलोमिटर वर येऊन मग पिंगुली गावाच्या इथे मालवण फाटा लागतो. सावंतवाडी गावात न शिरता बायपास घेऊन हायवे पर्यंत पोचता येतं, आम्ही तेच केलं. तिथे एका हॉटेलमध्ये जेऊन पुढे निघालो. सावंतवाडी पासून तारकर्ली फार दुर नाहीये. पण लहान रस्ता असल्याने वेग मंदावला. सगळीकडे लाल माती, आजुबाजूला वाड्या, दाट झाडी असं दृष्य दिसत होतं. मालवणहून तारकर्लीकडे वळल्यावर रस्ता आणखीनच लहान झाला, एकच गाडी एकावेळी जाऊ शकेल एव्हडाच. पुलावरून जाणार्‍या दोन बकर्‍यांच्या त्या गोष्टीसारखी एक गाडी बाजुला थांबून समोरचीला वाट देत होती. समुद्राचं अस्तित्त्व आता जाणवत होतं पण अजून दिसत नव्हता. एका वळणावर अचानक समुद्राने दर्शन दिलं. सगळ्यांचा प्रवासाचा शीण आणि कंटाळा एकदम पळाला. नंतर पुढे दुसर्‍या बाजूची नदीवरची जेटी पण दिसली. तिकडे वॉटर स्पोर्ट्सला घेऊन जाणार्‍या बोटी दिसल्या. तारकर्लीचा समुद्र किनाराही दिसला. आम्हांला पुढे देवबाग पर्यंत जायचं होतं. मधे कॅथलीक लोकांची वस्ती लागली. तिथे नाताळानिमित्त रोषणाई केली होती आणि गाणी लावली होती. रस्त्यापाशी एका मंडपात येशुख्रिस्त, मेरी मदर आणि इतर संतांच्या मुर्ती ठेऊन गणपतीतल्यासारखी सजावट केली होती. हे पाहून गंमत वाटली!

आम्ही जातोय जातोय पण अजगावकरांचं घर काही येईना. म्हटलं आता संगमावर पोहोचू. संगमापासून अर्ध्या किलोमिटवर  अजगांवकर काका भेटले. त्यांच घर नदीच्या बाजूला दाट झाडीत होतं. आम्हांला वरच्या मजल्यावरची मोठी हॉल वजा खोली मिळाली. सामान टाकून, चहा घेऊन लगेच समुद्राकडे धावलो. सुर्यास्त पाहिला. रियाला पाण्यात खेळायला खूप आवडतं. तिला या आधी स्विमींग पूलमध्ये बर्‍याचदा नेलं आहे. पण समुद्राला मात्र ती घाबरली. कदाचित तिला आधी जरा खेळू देऊन मग पाण्यात न्यायला हवं होतं. तिने जोरदार भोकाड पसरलं आणि आम्हांलाही पाण्यात जाऊ देत नव्हती. पण थोड्यावेळाने नीरज, निशांत आणि तिने मातीत मनसोक्त राडा करून घेतला.

ह्या परिसरात बर्‍याच ठिकाणी घरगुती जेवणाची सोय होते. समुद्रावर येतानाच तिथल्या अश्या एका ठिकाणी जेवणाची ऑर्डर देऊन ठेवली होती. ट्रीपमधल्या पहिल्या माश्यावर ताव मारला. अतिशय चविष्ट सुरमई फ्राय आणि करी होती. पाण्याला घाबरल्याने किंवा झोप आल्याने किंवा एकंदरीत प्रवासाने कंटाळून रियाने संध्याकाळपासून जी रडारड सुरु केली होती ती थांबतच नव्हती. बाकीची ट्रीप रद्द करून उद्याच परत जावं की काय असं आम्हांला वाटायला लागलं. जेवायला गेलो तिथल्या काकूंनी मिठ मोहोर्‍या ओवळून टाका असं सांगितलं. म्हणाल्या तुम्ही शहरात काही करत नाही, पण इथे गावात असच असतं. शिवाय अजगांवकरांच्या घरात जायच्या यायच्या रस्त्यात चिंचेचं झाड आहे, त्यामुळे खोलीत गेलात की कराच हे! सुमारे बारा वाजेपर्यंत कुरकुर करून मग ती झोपली. शिवाय दोन मेंब्र उलट्यांनी गळपटलेली असल्याने दुसर्‍या दिवशी सकाळचा काही प्लॅन ठरवला नव्हता.

दुसर्‍या दिवशी सकाळी समोरच्या एका होमस्टे कम रीसॉर्टमध्ये ब्रेकफास्ट सांगून ठेवला होता. निवांत जाऊन तिथे घावन, चटणी खाल्ली. त्याच्याबरोबर त्यांनी रस म्हणजे नारळाचं दुध पण केलं होतं. मलातरी ते आवडलं. छान गोडसर होतं. बाकी कोणाला ते दुध फार नाही आवडलं. खरं आम्ही लगेच डॉल्फिन पॉईंट बघायला जाणार होतो पण ऊन वाढलेलं असल्याने सगळ्यांनी ठरवलं की दुपारी जाऊ. रियालाही झोप आली होती. मग तिला रूमवर झोपवून मी आणि शिल्पा, नीरज निशांतला घेऊन समुद्रावर गेलो. समुद्र किनार्‍यावरून संगमापर्यंत चालत गेलो. देवबागच्या किनार्‍यावर पांढरी वाळू आहे. भेळेच्या गाड्या वगैरे प्रकार नसल्याने किनारा स्वच्छ आहे एकदम! कालच्यापेक्षा आज गर्दी वाढलेली होती पण तिथे मस्त वाटत होतं.

तिथे एकेठिकाणी एक भली मोठी रबरी ट्युब दिसली. पुढे गेल्यावर बघितलं तर अजून एका ठिकाणी दिसली. जरा चौकशी केली तर कळलं की किनार्‍याची धुप होऊ नये म्हणून त्या लावल्या आहेत. दत्ता सामंत मुळचे देवबागचे. त्यांनी मागे तारकर्ली देवबागच्या समुद्रकिनार्‍याबद्दल बर्‍याचदा आवाज उठवला होत्या. किनार्‍याची धुप थांबवायला हवी नाहितर ही दोन गावं पाण्यात जातील ह्यासाठी उपाय योजण्याची मागणी केली होती. अखेर युती सरकार आल्यावर त्यांनी ह्यात लक्ष्य घातलं आणि मग संगमापाशी भल्यामोठ्या मोठ्या रबरी ट्युब टाकून बुडत्या किनार्‍याला आधार दिला. शिवाय वाड्यांमधून किनार्‍यावर उतरतो त्या ठिकाणी दगडांचे बंघारे घातले जेणेकरून तिथली वाळू घसरून जाणार नाही. एकंदरीत ह्या परिसरात युती सरकारबद्दल आणि तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राण्यांबद्दल बराच आदर दिसला. त्यांच्यामुळे ह्या भागाचा विकास झाला असे उल्लेख बर्‍याच जणांनी केले. समोर दिसणार्‍या एका किनार्‍यावर डोंगराचा उतार आणि नारळाच्या झाडांमुळे मगरीच्या तोंडासरखा आकार तयार झाला आहे. त्याला क्रॉकोडाईल पॉईंट म्हणतात.


समुद्रात कितीही खेळलं तरी कमीच वाटतं त्यामुळे जवळ जवळ साडेबारा एकला लाटांवर खेळणं थांबवून परतलो. पाण्यात खेळून सडकून भुक लागली. मस्त तळलेले बांगडे आणि करीवर हात मारला आणि एक डुलकी काढली. आज जेवायला गेलो त्या रीसॉर्टमधली जेवायची जागा अगदी समुद्रावर नारळाच्या झाडीमध्ये होती. सुग्रास जेवण आणि मस्त नजारा मिळाला. साडेचारच्या बोटीचं बुकींगही करून टाकलं.
तारकर्ली/देवबाग/मालवण परिसरात स्थानिकांच्या प्रयत्नांनी वॉटर स्पोर्ट्सची सोय करण्यात आली आहे. नंतर त्याला सरकारी पाठवळही लाभलं. स्थानिक तरूणांना प्रशिक्षण देऊन आज स्नॉर्कलिंग, स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग, जेट स्की, बनाना बोट वगैरे खेळ चालवले जातात. शिवाय इथल्या समुद्रात खूप डॉल्फिन मासे दिसतात. लहान माश्यांना खायला ते किनार्‍याजवळ येतात. त्यामुळे डॉल्फीन बघण्यासाठी बोट राईडही असतात. इथल्या बोटी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. नव्या पद्धतीच्या मोटरबोट न आणता लाकडी जुन्या पद्धतीचा बोटी त्याच ठेऊन त्यांना इंजिन आणि छप्पर बसवलं आहे.  त्यामुळे सोयही होते आणि जुन्या पद्धतीच्या बोटी जपल्याही आहेत.
कुठे काही स्थानिक प्राणी-बिणी पहायला गेलं की ते आम्हांला कधीच दिसत नाहीत. (नाही म्हणायला यल्लोस्टोन मध्ये एक अस्वल दिसलं होतं!) त्यामुळे इथेही डॉल्फीन दिसले नाहीतच. त्या दिवशी सकाळी खूप दिसले होते म्हणे. शेवटी त्यांचा नाद सोडून परत फिरलो. पण बोट राईड मस्त होती. मागे मी एकट्याने समुद्रात जेट स्की, बोट राईड्स वगैरे खूप केल्या आहेत. पण आता रिया बरोबर असली की जरा लाटा आल्या, पाणी वाढलं, बोट हलली की भिती वाटते. मागे कुर्ग जवळच्या डुबारेच्या कावेरी नदीतही अशी भिती वाटली होती!
येताना बोटीच्या मार्गात सीगल आयलंड लागलं. तिथे उतरून फोटो काढले. शिवाय समोर भोगवे बीच पण दिसतो. बोटवाल्यांना थोडे पैसे दिले की ते तिथे घेऊन जातात. तो अगदी 'कहो ना प्यार है' सिनेमात दाखवतात तसा बीच आहे म्हणे! पण आम्हांला वॉटरस्पोर्ट करायचे होते त्यामुळे तिकडे गेलो नाही. २००४ च्या त्सुनामीच्या वेळी तारकर्ली नदी आणि समुद्राच्या संगमापाशी वाळू साठून एक बेट तयार झालं आहे. तसं लहानसं आहे. सगळे वॉटरस्पोर्ट ह्या बेटावरून चालवले जातात. कारण जेट स्की वगैरे साठी लागणारं फार उथळ नसलेलं पण समुद्रापेक्षा शांत पाणी इथे आहे. पॅरासेलिंगसाठी मात्र समुद्राच्या आत घेऊन जातात. नीरज, निशांत, शिल्पा, श्वेता पॅरासेलिंगला गेले आणि मी, रिया आणि बाबा त्सुनामी आयलंडवर थांबलो. रियाला खेळायला वाळू मिळाल्यावर ती एकदम खूष! आम्ही मागे अमेरिकेत पॅरासेलिंग केलेलं आहे. शिल्पाच्या म्हणण्याप्रमाणे तिथला आणि इथल्या अनुभवात काही फारसा फरक नव्हता. ते अगदी नीट योग्य ती काळजी घेऊन हे करतात. ही खूपच चांगली गोष्ट आहे. पॅरासेलिंग आटोपेपर्यंत अंधार पडला आणि हवा अचानक थंड झाली. शिवाय समुद्राची गाज, चहुकडे पाणी, झाडांच्या सावल्या असं एकदम गुढ वातावरण तयार झालं.
रिया कालच्या संध्याकाळ सारखी आज रडारड करत नव्हती. छान खेळली, जेवली, झोपली. आज माश्यांच्या ऐवजी अंडाकरी खाल्ली.दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर निघून मालवणला सिंधुदूर्ग किल्ल्यावर जायचं ठरवलं शिवाय मालवण गावात थोडंफार फिरायचं होतं. सकाळी लवकर निघा म्हणजे उन कडक व्हायच्या आत सिंधुदूर्ग बघून होईल असं सगळ्यांनी सांगितलं.   पण एकंदरीत ह्या काळात कोकणातलं हवामान फार छान होतं. जराही दमटपणा नाही, त्यामुळे घाम नाही. रात्रीतर पंखा बंद करावा लागायचं इतकं गार व्हायचं. आम्ही जेवायला गेलो होतो तिथले काका म्हणाले कोकणी भाषेत सध्या 'उत्तर वारे' चालू आहेत. त्यामुळे हवा गार आहे. फेब्रुवारी/मार्च पासून 'दक्षिण वारे' सुरु होतील की मग हवा गरम, दमट व्हायला सुरुवात होईल.


सकाळी चविष्ट पोह्यांचा नाष्ता करून मावलणच्या जेटीकडे निघालो. आता रस्ता माहितीचा होता त्यामुळे मालवण एकदम पटकन आलं. सकाळी जेटीवर फार गर्दीही नव्हती. मुरूड जंजिर्‍याच्या तुलनेत हा किल्ला खूप मोठा दिसत होता. किल्ल्याच्या मागच्या बाजुला स्नॉर्कलिंग करतात.

बोटीने किल्ल्यावर सोडतात आणि फिरण्यासाठी साधारण सव्वातास वेळ देतात. आम्ही आसपासचा परिसर पाहिला, बरेच फोटो काढले. खरतर किल्ल्याची डागडुजी करायला हवी आहे. त्याकाळतलं एव्हडं भक्कम आणि सुनियोजीत बांधकाम बघुन थक्क व्हायला होतं. प्रवेशद्वारापाशी शिवाजी महाराजांच्या बोटांचे ठसे आहेत म्हणे. ते इतके लहान आहेत की ते खरच त्यांचे आहेत का असा प्रश्न पडतो. निघेपर्यंत उन वाढायला लागलं. शिवाय ओहोटी सुरु झाल्याने बोटी पाणी जास्त असलेल्या खडकापाशी लागायला सुरुवात झाली. आल्यावर मालवणच्या बाजारात गेलो. तिथे सोमवारचा बाजार भरला होता. कोलंबीचं आणि माईनमुळ्याचं लोणचं, मालवणी मसाला, खाजा, शेवखंडाचे लाडू असं काहीबाही खरेदी केलं.

 मालवण गावात जयंत साळगावकरांनी बांधलेलं गणपतीचं देऊळ आहे. ते पहायला गेलो. देऊळ छोटसं पण छान आहे. तिथे मुर्ती पाहून एकदम प्रसन्न वाटलं! ह्याशिवाय मालवणमध्ये रॉक गार्डन आणि कुठलासा लेक आहे. आम्हांला हे दोन्ही बघण्याचा फारसा उत्साहं नव्हतं. कारण चंदिगडचं सगळ्यांत मोठं रॉक गार्डन बघितलेलं आहे आणि समुद्राच्या ठिकाणी येऊन लेक काय बघायचा!











शिवाय इतकं फिरून होईपर्यंत सडकून भूक लागली. हॉटेल अतिथी बांबू बद्दल बरच ऐकलं होतं त्यामुळे शोधत शोधत तिथे गेलो. पापलेट आणि कोलंबी वर तुटून पडलो. अतिशय चविष्ट जेवण होतं आणि पुण्यापेक्षा बरच स्वस्तही! खरतर मला 'कालवं' पण खाऊन पहायचं होतं पण त्याचा फोटो पाहून ते खावसं वाटेना! पुढच्या वेळी थेट तयार डीशच मागवायची आहे. इथली सोलकढीपण एकदम मस्त होती.

परतीच्या रस्त्यात काजूच्या कारखान्याची पाटी पाहून थांबलो. आतमध्ये काजू खाण्यायोग्य करण्याचं काम सुरु होतं. आधी काजूच्या बिया भल्यामोठ्या ओव्हनमध्ये भाजल्या जातात. नंतर त्यांच्यावरचं आवरण दगडाने फोडून काढून त्या परत एकदा भाजल्या जातात. मग त्या सोलण्यासाठी पाठवतात. त्यांची सालं काढताना काही काजू तुटतात. मग असे तुटलेले काजू वेगळे करून चांगले काजू पॅकींगला किंवा मग खारवायला, मसाला लावायला पाठवले जातात.

काजूचं फळ असतं त्याचं सरबत किंवा फेणी बनवली जाते. तिथे काजूंची विक्रीही सुरु होतीच. घरच्यासाठी आणि देण्यासाठी काजूंची खरेदी करून आम्ही देवबागला परतलो.





संध्याकाळ मोकळी होती त्यामुळे अर्थातच समुद्र! दुसर्‍या दिवशी आम्ही निघणार असल्याने समुद्रावर जाऊन परत भिजलो. किनार्‍यावर दुरपर्यंत चक्कर मारून आलो.

आज सकाळच्या माश्यांनी इतकं समाधान झालं होतं की परत रात्री मासे खायची इच्छाच झाली नाही! साध आमटी भाताचं जेवण केलं. इथे जाणवलेली एक गोष्ट म्हणजे लोकं अगदी सहजपणे आलेल्या गिर्‍हाईकांना जात विचारतात आणि त्याचं कारण म्हणजे त्यांना त्याप्रमाणे जेवण बनवायचं असतं. आम्हांला ते जरा कमी तिखट जेवण द्यायचे कारण 'घाटी' (म्हणजे कोल्हापुर वगैरे घाटमाथ्यावरच्या) लोकांइतकं तिखट जेवण तुम्हांला चालणार नाही म्हणे. खेड्यांमध्ये समोरच्याच्या जातीचे, धर्माचे उल्लेख सर्रास करतात पण  आपल्याला मात्र अवघडायला होतं!
परत येताना आम्ही अंबोलीच्या ऐवजी फोंडा घाटातून यायचं नक्की केलं. अंतर कमी होतं आणि तिथे आलेल्या एकांनी रस्ता वाईट नाहीये असं सांगितलं. आज आम्ही मालवणला पोहोचेपर्यंत तिथला मासळीबाजार संपलेला होता. त्यामुळे परतीच्या प्रवासात तो पहायचा होता. दुसर्‍या दिवशी सकाळी अगदी लवकर निघून सातच्या सुमारास मालवण जेटीजवळच्या मासळी बाजारात गेलो. टोपल्याच्या टोपल्या भरून माश्यांचा लिलाव सुरु होता. मासे ताजे असले की त्यांचा वास येत नाही.  मोठेच्या मोठे अख्खे सुरमई त्यांच्या आकाराप्रमाणे साडेसातशे ते हजार रूपयांना विकले जात होते! बर्‍याच प्रकारचे लहान मोठे मासे पहायला मिळाले.


परतीच्या प्रवासात आमच्या आणखी दोन मेंब्रांना उलट्या झाल्या. त्यामुळे फक्त मी आणि नीरजचं उलट्यांपासून बचावलो. फोंड्याचा रस्ताही चांगला आहे. फक्त राधानगरी ते कोल्हापुर अतिशय बेशिस्त ट्रॅफिक आहे. कोकणातून देशावर आल्याआल्या गोडवा संपून बेशिस्तपणा, अरेरावीची भाषा सगळं सुरु झालं!

तारकर्ली, देवबागसाठी चार दिवस आम्हांला पुरे झाले पण अजून एखाद दिवस चालला असता असं वाटलं. तिथला निवांतपणा, लोकांचं आदरातिथ्य आणि समुद्र हे सोडून परतावसं वाटतच नव्हतं.आता पुढचं डेस्टिनेशन गोवा ठरलय !!

-----------------------------------

ट्रीपच्या प्लॅनिंगच्या दृष्टीने काही लिंक्स :
एम टी डी सी  रिसॉर्ट : http://www.maharashtratourism.gov.in/mtdc/HTML/MaharashtraTourism/MTDC_Resort/Tarkarli/Tarkarli.html

एम टी डी सी हाऊसबोट www.maharashtratourism.gov.in/mtdc/HTML/MaharashtraTourism/Default.aspक्ष/strpage/MaharashtraTourism/Attractions/BoatHouse.html&ei=PObbUtDgK8mPrQfG24D4BA&usg=AFQjCNFezyP54taawlpioCSrrdL89X1dnA&bvm=bv.59568121,d.bmk

हेरंब न्याहरी निवास फोन नंबर (श्री. केळुस्कर)  : ९४०४९३२००१

श्री. अजगांवकर ह्यांचा फोन नंबर : ९८३३९२७४९१