कूर्ग, कर्नाटक

बर्‍याच दिवसांपासून कुठेतरी फिरायला जायचा विचार चालू होता. कैलास मानस यात्रा रद्द झाली. तेव्हा घेतलेली सुट्टीही रद्द करायला लागली होती. त्यामुळे सुट्टी मिळायचा काही प्रश्न नव्हता. रियाला घेऊन पहिलीच मोठी ट्रिप त्यामुळे फार फिरफिर न करता, मिनीटा-मिनीटांचे प्लॅन न करता आरामदायी सुट्टी घालवायची होती पण त्याचबरोबर नवीन ठिकाणीही जायचं होतं. पावसाळ्याचे दिवस असल्याने समुद्रकिनारे बाद, नुकत्याच झालेल्या पुरामुळे हिमालय किंवा उत्तर बाद. परदेशी जाण्याइतकं बजेट नसल्याने परदेशी स्थळंही बाद. पण अगदीच महाबळेश्वरही नको होतं. मग शेवटी जायला सोईचं, पाऊस असला तरी चालून जाईल असं कूर्ग नक्की केलं.

मग ह्ळूहळू माहिती जमवायला सुरुवात केली. कूर्ग म्हणजे कर्नाटकातला कोडगू जिल्हा. मडीकेरी, विराजपेठ आणि खुशालनगर असे तीन तालुके मिळून बनलेला. अंतराच्या दृष्टीने मंगलोर पासून जवळ पण बंगलोरवरून जाणं जास्त सोईचं पडतं. कारण पुणे बंगलोर मार्गावर विमानाचं तिकीट स्वस्त पडतं. शिवाय रेल्वे, ऐरावत/वॉल्वो ह्यांचे चांगले पर्यायसुद्धा उपलब्ध आहेत. बंगलोर एअरपोर्ट पासून ते बंगलोर एअरपोर्टला परत आणून सोडणारी भाड्याची गाडी करावी. लहान मुलं, वयस्कर मंडळी बरोबर असतील तर हे सोईच पडतं. सगळे तरूण असतील तर बसने कूर्गला जाऊन तिथे लागेल तसं वाहन भाड्याने घेता येऊ शकतं. बंगलोर ते कूर्ग गाडी करायचीच असेल तर जितके दिवस रहाणार तितके दिवस ड्रायव्हरला गाडी सकट तिथे थांबवणच बरं पडतं. एकतर आपल्या हातातलं वाहन राहातं, हवं तेव्हा हवं तिथे फिरता येतं,  दुसरं म्हणजे त्या ड्रायव्हरला परत रिकामं परत येण्याचे पूर्ण पैसे द्यावे लागतात.

एकंदरीत हातातला वेळ बघता आणि रिया बरोबर असल्याने बस किंवा रेल्वेचा विचार न करता आम्ही पुणे बंगलोर विमान प्रवास ठरवला आणि आमच्या एका नातेवाईकांच्या मदतीने बंगलोर ते बंगलोर गाडी ठरवली. बंगलोरहून गाडीवाले साधारण ७.५० ते ९ रूपये पर किलोमिटर घेतात आणि गाडीवाल्याला तिथे ठेऊन घ्यायचं असेल तर रहाण्या-खाण्यासाठी त्यांना २५० ते ३०० रुपये दरदिवशीचे द्यावे लागतात. ड्रायव्हरच्या रहाण्याची सोय प्रत्येक हॉटेलमध्ये वाजवी दरात केलेली असते.

पुढचा महत्त्वाचा कार्यक्रम होता तो म्हणजे हॉटेल शोधणे!  रहाण्यासाठी साधारण तीन पर्याय असतात. हॉटेल, रिसॉर्ट आणि होम स्टे. होम स्टे म्हणजे कोकणात बापट, पोतनीस, आवळसकर वगैरे मंडळी जशी आपल्या घरांमध्ये रहायची आणि जेवायची सोय करतात तसाच प्रकार. साधरणपणे ही होम स्टे कॉफी प्लँटेशनमध्ये असतात. जेवणाची आणि रहाण्याची चांगली सोय वाजवी दरात होऊ शकते. रिसॉर्टमध्ये बरेच प्रकार आहेत. स्पा, गोल्फकोर्स, फॉरेस्ट वगैरे. ह्यातही बरीच पॅकेज उपलब्ध असतात. हॉटेलचे पर्याय सुद्धा भरपूर आहेत. कूर्ग म्हटलं की रहाण्यासाठी पाहिलं नाव येतं ते म्हणजे ऑरेंज काऊंटी, दुसरं म्हणजे क्लब महिंद्रा आणि मग टाटा कॉफी प्लँटेशन मधली होम स्टे. पैकी पहिलं जोरदार महाग आहे! त्यांचा मान्सुन डिस्काऊंट वगैरे धरूनही परदेशी प्रवास त्यापेक्षा स्वस्त पडेल. दुसरी दोन खूप लवकर भरून जातात. त्यामुळे नेटवर बरीच शोधाशोध करून आणि फोनाफोनी करून अँबेती ग्रीन्स नावाचं रिसॉर्ट बूक केलं. ते विराजपेटला आहे,  मडीकेरी पासून साधारण ३० किलोमिटर अंतरावर.  होम स्टेचे ऑप्शन्सही चांगले आणि खूप स्वस्त आहेत खरतर. पण ते खूप रिमोट असतात असं ऐकलं त्यामुळे मग रीसॉर्टमध्येच बुकिंग केलं.

पुणे बंगलोर विमानप्रवास छान झाला. बंगलोरचं नवीन एअरपोर्ट छान आहे. तिथल्या लोकांना ह्या एअरपोर्टचं खूप कौतूक आणि अप्रुप आहे. अगदी खरं सांगायचं तर आपल्याकडे मुंबईचं आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट अनेक वर्षांपासून असल्याने आपल्याला काही फार वाटतं नाही.

एअरपोर्टवरून निघाल्या-निघाल्याच रस्त्यावरच्या एका उडूपी हॉटेलमध्ये ब्रेकफास्टला थांबलो आणि साऊथींडीयन खाण्याचा श्रीगणेशा केल्या. गरम गरम इडल्या, मेदुवडे आणि चविष्ट सांबार पोटभर खाल्लं आणि कुर्गच्या दिशेने प्रयाण केलं.

बंगलोर-कूर्ग रस्ता मैसूरच्या जवळून जातो. शहरात शिरत नाही. आम्ही येताना मैसूर पॅलेस पहाण्याचं ठरवलेलं असल्याने जाताना थेट जायचं होतं. बंगलोर मैसूर रस्ताही आता मोठा केला आहे. मी मागे आठ-नऊ वर्षांपूर्वी गेलो होतो तेव्हा हा रस्ता जुन्या सिंहगड रोड सारखा होता. दोन्ही बाजूला दाट आणि  मोठी मोठी झाडं आणि त्याची नैसर्गिक सावली. आता मात्र चार लेनचा प्रशस्त रस्ता केला आहे. संपूर्ण रस्ताभर आजुबाजूला नारळाची मुबलक झाडं दिसतात. ट्रॅफिकही बर्‍यापैकी शिस्तशीर आहे. रिया झोपल्यावर आम्हीही तास दीड तास झोप काढून घेतली. तसही विमान लवकरचं असल्याने पहाटे उठलो होतो.  मैसूर फाटा मागे टाकल्यानंतर रस्त्याच्या आसपासची वस्ती विरळ झाली. आणि झाडी वाढायला लागली. मग एका नवीनच सुरु झालेल्या रेस्टॉरंटात जेवायला थांबलो. छान साऊथी थाळी होती. भाज्या नेहमीच्याच होत्या पण करण्याच्या वेगळ्या पद्धतींमुळे चवीत खूपच फरक होता. तिथे भुभू, माऊ, मासे, कोंबड्या, ससे वगैरे बरेच प्राणी असल्याने रिया एकदम खुष  होती. हा रस्ता थेट मडिकेरी पर्यंत जातो. पण आम्हांला विराजपेठ कडे जायचं असल्याने खुशालनगरहून डावीकडचा फाटा घ्यायचा होता. पण ड्रायव्हरचं म्हणणं की तो रस्ता चांगला नाहीये, आधीच्याच रस्त्याने जाऊ. म्हटलं तू म्हणशील तसं, आम्हांला काहीच माहीत नाही ह्या भागातली. हा अलीकडचा रस्ता नागरहोळे अभयारण्यातून जातो. त्यामुळे तो सकाळी सात ते संध्याकाळी ५ एव्हडाच वेळ उघडा असतो.
आम्ही वेळेत होतो त्यामुळे काही प्रश्न नव्हता. जंगलात शिरल्यावर ठिकठिकाणी प्राण्यांपासून काळजी घेण्याच्या तसेच जंगलाची नासाडी न करण्याच्या सुचना होत्या. अनेक ठिकाणी एलिफंट क्रॉसिंगच्या पाट्याही होत्या. आम्ही अगदी भर दुपारी जात असल्याने एकही प्राणी दिसला नाही. ड्रायव्हर म्हणाला की संध्याकाळी प्राणी दिसतात. जंगल खूप दाट होतं आणि टिपीकल ओला वास भरून राहिला होता. कूर्गच्या जवळ पोहोचल्यावर हिरवीगार भात शेतं, कॉफीच्या बाग, त्यातले मिरीचे वेल, आसपासची केळीची बनं, नारळी-सुपारीच्या बागा असं सगळं दृष्य दिसायला लागलं. सगळीकडे वेगवेगळ्या छटांमध्ये हिरवा रंग भरलेला होता. ब्रिटीशांनी ह्या भागात कॉफीच्या बागा लावायला सुरुवात केली. स्वातंत्र्यानंतर त्यांनी ह्या बागा इथल्या लोकांना विकून टाकल्या. इथलं हवामान, मुबलक पाऊस, जंगलांची सावली ह्यासगळ्यामुळे इथे कॉफीचं भरपूर उत्पादन होतं. कॉफीला पांढर्‍या फुलांचा बहर येतो, तेव्हा हा संपूर्ण परिसर ह्या फुलांनी भरून जातो, ते दृष्य अतिशय सुंदर दिसतं असं म्हणतात.  मधले मधले ब्रेक धरून साधारण ६ तासात रिसॉर्टला पोहोचलो. रिसॉर्ट गोल्फकोर्सच्या जवळ असल्याने खोलीतून छान दिसत होतं. शिवाय बाकीची सजावटही सुरेख होती. सगळा कर्मचारीवर्ग ही अगदी तत्पर होता. गरग गरम कूर्गी कॉफी देऊन त्यांनी आमचं स्वागत केलं.  फक्त जाणवलं एकच की आम्ही सोडून आणखी फक्त एकच गाडी आहे. त्यांना विचारलं तर ते म्हणाले उद्यापासून फुल आहे. आज काही गर्दी नाही. आधी जरा शंका आली पण नंतर काही जाणवलं नाही.


संध्याकाळी तिथेच आसपास टाईमपास केला. तिथला स्विमिंग पूलपण मस्त होता. पण हवा थंड असल्याने पाण्यात काही जावसं वाटलं नाही. रियाने मात्र पाण्यात हात पाय बुडवलेच.

ह्या ट्रीपला आधीपासून काही प्लॅन केलेला नव्हता. फक्त पटेल स्पॉट्स बघणे आणि अजून काही इंटरेस्टींग कळलं तर ते बघायचं एव्हडच ठरवलं होतं. हॉटेलच्या रिसेप्शनवर चौकशी करून दुसर्‍या दिवशी काय बघायचं ते ठरवलं आणि लवकरच झोपून गेलो.



दुसर्‍या दिवशीचा पहिला स्टॉप होता तालाकावेरी. हे म्हणजे कावेरी नदीचं उगमस्थान. विराजपेठ किंवा मडिकेरी दोन्ही ठिकाणांपासून साधारण ३० किलोमिटरवर आहे. रस्ता पूर्ण डोंगरातला वळणावळणांचा आहे. त्यामुळे अंतर कमी असूनही जायला साधारण सव्वा दिड तास लागला. नदीचं उगमस्थान असल्याने ते अगदी डोंगराच्या माथ्यावर आहे. तिथे सुंदर देऊळ बांधलेलं आहे. आणि जिथे पाण्याचा प्रवाह सुरु होतो तिथे एक कुंड आणि गोमुख आहे.
मंदिराचा परिसर एकदम स्वच्छ होता आणि वातावरणही एकदम प्रसन्न होते. डोंगरावर हवाही चांगलीच गार होती. कावेरी नदी इथे उगम पावल्यावर भुमिगत होते आणि ह्या डोंगराच्या पायथ्याही पुन्ही जमिनीच्यावर येते. तिथेच इतरही दोन नद्या तिला मिळून त्यांचा त्रिवेणी संगम आहे. शास्त्रज्ञांच्या मते खालचं पाणी आणि तालाकावेरीच्या कुंडातलं पाणी पाणी एकच आहे. म्हणून तालाकावेरीला कावेरी नदीचं उगमस्थान मानतात. इथून सह्याद्रीपर्वत रांगाचे मनोहारी दृष्य दिसते. इथे वर खूप धुकं आणि ढग होते. आणि आल्यापासून पहिल्यांदाच पाऊसही आमच्या भेटीला आला.

देवळात दर्शन घेऊन तसच आसपासच्या परिसरात फिरून आम्ही निघालो ते मडिकेरीकडे. मडिकेरी हे कूर्ग जिल्ह्याचं ठिकाण. खरतर पावसाळा हा इथे येण्याचा बेस्ट सिझन नव्हे. तरीही आमच्या सारखे अनेक लोकं १५ ऑगस्टच्या आसपास सुट्ट्या घेऊन आल्याने इथे बरीच टुरिस्टी गर्दी होती. आम्ही सकाळी हॉटेलमध्ये भरपेट ब्रेकफास्ट करून निघालेलो असल्याने भुकेची फारशी जाणीव झाली नव्हती. पण आता मात्र चांगली भुक लागली होती. मडिकेरी गावात एका साध्याशा रेस्टॉरंटात दाक्षिणात्य थाळी घेतली. अतिथय चविष्ट रस्सम आणि सांबार होतं. भाज्याही छान होत्या. रियाला तिथली खिरही फार आवडली. मडिकेरीच्या आसपासही बघायला तीन/चार ठिकाणं आहेत. पैकी पहिल्या ठिकाणी म्हणजे अ‍ॅबे फॉल्सला जायला निघालो.


मडिकेरीच्या आसपास कुठेही जायचं तरी घाटातली वाट. त्यामुळे लागणारा वेळ जास्त. अ‍ॅबे फॉल्सला गाडी लाऊन १५ एक मिनिटे चालत आता जावं लागतं. तिथेही पाऊस होताच. रिया माझ्याकडे कांगारू बॅगमध्ये, एका हातात छत्री, खांद्याला कॅमेर्‍याची बॅग आणि शिल्पाच्या हातात तिची पर्स आणि रियाची डायपर बॅग ! अशी आमची वरात धबधब्याच्या दिशेने निघाली. जाताना उतार होता. काही वाटलं नाही. पावसाळा असल्याने धबधब्याला प्रचंड पाणी होतं. त्याचा आवाज वर रस्त्यापासूनच येत होता. पाण्याचा प्रवाहात जाता येत नाही. प्रवाह ओलांडण्यासाठी लाकडी पुल आहे. त्या पुलावर उभ रहायला मस्त वाटतं होतं.  अंगावर धबधब्याच्या पाण्याचे तुषार उडत होते, थोडा थोडा पाऊस होता आणि थंड गार वारा!! तिथे उभं रहायला खूप छान वाटलं. प्रत्येक वेळी पाणी उडलं की रिया खदखदून हसत होती. तिला एकंदरीतच पाण्यात खेळायला फार आवडतं. पण ती फार थंडीत कुडकुडू नये म्हणून थोडे फार फोटो काढून आम्ही जरा वर येऊन थांबलो आणि मग वर परतलो. वर येताना छान व्यायाम झाला.

इथून खरं 'राजा सीट' नावाच्या जागी जायचा प्लॅन होता. कूर्गचा राजा म्हणे ह्या जागी बसून सुर्यास्त बघत असे. शिवाय तिथून डोंगरदर्‍यांची छान दृष्य दिसतात. पण पाऊस आणि ढग असल्याने सुर्यास्त दिसणार नव्हता. आणि डोंगर दर्‍या अ‍ॅबे फॉल्सला बघून झाल्या होत्या. त्यामुळे इथे न जाता आम्ही ओंकारेश्वर मंदिरात जायचे ठरविले. ते मंदिर पाचच्या पुढे उघडतं, त्याला थोडा वेळ होता. मग थेट मार्केट गाठल. कूर्गी कॉफी, मसाले, रस्सम, सांबार पावडर ह्यांची खदेरी करायची होती.

मनाजोगती खरेदी झाल्यावर तिथेच गरम-गरम कॉफी प्यायली. पावसाळी हवेत ती छान वाटली अगदी. रियानी त्या दुकानात पण दंगा करून घेतला. मार्केटमध्ये ह्या सगळ्या सामानाची भरपूर दुकानं आहेत. आम्ही ड्रायव्हरने सांगितलेल्या दुकानात गेलो. खरेदी आटोपेर्यंत ओंकारेश्वर मंदिर उघडायची वेळ झालेली होती. आम्हांला मंदिरात घेऊन जायचं ड्रायव्हरच्या फारसं मनात दिसत नव्हतं. पण आम्ही खनपटीला बसून त्याला घेऊनच गेलो. हे देऊळ एकदम वेगळं आहे. थोडंफार मशिदीसारखं बांधकाम आहे. मधे डोम, बाजूला मिनारासारखे चार खांब आणि मध्यभागी तळं. पावसाळी कुंद हवेत मंदिरातलं वातावरण खूपच प्रसन्न वाटत होतं.



मंदिर पाहून झाल्यावर थेट हॉटेल गाठलं आणि दुसर्‍या दिवशीचा प्लॅन ठरला.

खरतर नागरहोळे नॅशनल फॉरेस्टमध्ये कर्नाटक आणि केरळच्या सिमेवर बस सफारी असते. ती पावसाळ्यातही सुरु असते. सकाळी लवकर म्हणजे आठ वाजता तिथे पोहोचल्यास ह्या सफारीतून जाऊन प्राणी बघता येतात. त्यामुळे तिथे जायचा फार मोह होत होता, पण एव्हड्या सकाळी जाणं शक्य झालं नसतं. कारण हॉटेलपासून म्हणजे विराजपेठ पासून हे  अंतर साधारण ३५-४० किलोमिटर आहे.  मग दुसरा पर्याय म्हणजे दुबारे नावाच्या ठिकाणी हत्ती प्रशिक्षण केंद्र आहे. तिथे कावेरी नदी बोटीने ओलांडून पलिकडे जावं लागतं. शिवाय आम्हांला कूर्गी जेवण जेवायचं होतं त्याचीही सोय आमच्या ड्रायव्हरनेबरीच फोनाफोनी करून केली.

दुबारेला पोचेपर्यंत उशीर झाला आणि तिथल्या गोष्टी बंद व्हायला सुरुवात झाली होती. मग तिथे फार वेळ न घालवता त्याच रस्त्यावर पुढे तिबेटन मॉनेस्ट्रीमध्ये गेलो. १९६२च्या युद्धाच्या वेळी बरीच तिबेटी लोकं ह्या भागात येऊन स्थाईक झाली. इथे तिबेटी धर्मशिक्षणसुद्धा मोठ्या प्रमाणावर चालते. मॉनेस्ट्री सुंदर आहे. त्यांचे ते भडक रंग आणि आणि झळाळत्या सोनेरी बुद्ध मुर्ती सुरेख दिसतात. तिथला परिसरही खूप मोठा आहे. तिथे वेळ घालवून निघेपर्यंत भुकेची जाणीव झाली.





आज कुर्गी जेवण जेवायला जायचं होतं. श्रावण महिना सुरु असल्याने मी नॉनव्हेज खाणार नव्हतो. जेवण एका कॉफीच्या बागेतल्या होम स्टेमध्ये होतं. त्यामुळे थोड्याच वेळात मुख्य रस्ता सोडून कॉफीच्या बागांमधून जाणार्‍या रस्त्याला गाडी वळली. अरूंद रस्ते, गर्द झाडी आणि अधून मधून पाऊस अश्या वातावरणात खरतरं थोडी भितीच वाटत होती. म्हटलं ह्या ड्रायव्हरला तरी माहित आहे की नाह धड! असं साधारण १५-२० मिनीटे गेल्यावर होम स्टे आलं.

जागा सुंदर होती आणि बरीच सुबत्ताही दिसत होती. भात शेती, नारळाची झाडं, कॉफीच्या बागा, गोठ्यात बरीच गाई-गुरं, कोंबड्या आणि डुकरं असा बराच पसारा होता. (कूर्गचं पोर्क खूप प्रसिद्ध आहे म्हणे!) आपल्याकडे कोकणात असतं तसं त्यांचं स्वतः रहायचं घरं जुन्या पद्धतीचं आणि पाहुण्यासाठी नवीन बांधलेलं अशी दोन घरं होती. जेवण तयारच होतं. शिल्पा नॉनव्हेज खाणार असल्याने तीन प्रकारची चिकन, २ भाज्या, पुट्टू म्हणून एक इडली सदृश्य पदार्थ, तांदळाच्या भाकर्‍या आणि पिठपोळ्या ह्यांच्या मधे जाणार्‍या रोट्या, भात, सांबार आणि रस्सम असा जोरदार मेन्यू होता. आम्ही पोर्क नको सांगितलं होतं. त्याने माश्याच्या दोन तुकड्याही आणून दिल्या होत्या. हे नदीतले मासे होते म्हणे आणि ते मुळातच चवीला थोडे तिखट असतात. शिल्पाला ते फारसे आवडले नसल्याचं म्हणाली. भरपेट जेवण झाल्यावर कॉफीच्या बागेत चक्कर मारून आलो. तिथे एक छोटसं कुत्र्याचं पिल्लू होतं. रिया त्याच्याही खूप खेळली. तिला तिथून निघायचच नव्हतं! त्यांनी निघताना बरोबर घरची केळी दिली आणि गरग गरम कॉफी केली! शिवाय रियासाठी अगदी मऊ मऊ स्पंज्यासारख्या दोन इडल्याही करून दिल्या. इथे घराल्या आज्जीने महाराष्ट्रीयन पद्धतीच्या उलटी दिसणारी साडी नेसली होती. त्या साडीची गोष्ट रंजक आहे. कावेरी नदीला एका ऋषींनी (नाव आठवत नाहीये त्यांचं!) लग्नाची मागणी घातली. तिने होकार दिला पण अट एकच घातली की तुम्ही जाल तिथे मला न्यायचं कुठेही एकटं जायचं नाही. तेव्हा ते हो म्हणाले. पण नंतर त्यांना ते त्रासाचं वाटू लागलं. म्हणून एकदा ते कावेरी नदीला कमंडलूत बंद करून कुठे तरी निघून गेले. तिला खूप राग आला. तिची समजूत काढायला तिच्या आसपासच्या मैत्रिणी गेल्या. त्यावर ती आणखीनच चिडली आणि कमंडलूतून उसळी मारून बाहेर येऊन वहायला लागली. तिच्या उसळीचा जोर इतका होता की त्या वार्‍याने त्या मैत्रिणींच्या साड्या फिरून उलट्या झाल्या!! म्हणून तिथे तश्यापद्धतीच्या साड्या नेसतात.
इतकं जेवण झाल्यावर गाडीत गुडूप झोपून गेलो आणि थेट हॉटेलला परतलो. संध्याकाळी तिथेच आसपास थोडा टाईमपास केला.

दुसर्‍या दिवशी परतीचा प्रवास होता. त्याआधी दुबारेला जायचं होतं. आज मात्र लवकर आवरून दुबारेला वेळेत पोचलो आणि तिकीटं काढून बोटीच्या रांगेत लागलो. बोट येईपर्यंत जोरदार पाऊस सुरु झाला. पलिकडे पोहोचेपर्यंत आंघोळीचे हत्ती बाहेर यायला लागले होते. त्यातल्या एका पिल्लापाशी गेलो. अगदी गोड पिल्लू होतं. हत्तीच्या अंगावर राठ केस असतात. रियाने उत्साहाने हत्तीला हात लावला पण ते केस टोचल्यावर तिने असा काही चेहेरा केला की हसून पुरेवाट! मग त्याने सोंड तिच्या डोक्यावर ठेवली. तेव्हा बाई जरा घाबरल्या. मग आम्ही आसपास जरा टाईमपास केला. ह्या सगळ्या उद्योगात पाऊस सुरुच होता. नदीचं पाणीही वाढतय की काय असं आम्हांला उगीच वाटायला लागलं. म्हणून उगीच रिस्क न घेता परतीच्या बोटीच्या इथे आलो. तिथे भलीमोठी लाईन. पण तीन/चार बोटी एकदम आल्याने पटकन पुढे सरकलो. इथेही अजिबात शिस्त नाही, प्रत्येकाला लाईन मोडून पुढे घुसायची घाई. त्या गडबडीत मी आणि रिया बोटीत चढलो, शिल्पा तिथेच राहिली आणि छत्री तिच्याकडे! सुदैवाने पाऊस जरा कमी झाला. इथून थेट मैसूरच्या रस्त्याला लागलो. आता मोठा रस्ता असल्याने प्रश्न नव्हता. मधे जेवण केलं आणि थेट मैसूर पॅलेस गाठला. आत जाऊन बघण्याइतका वेळ नसल्याने बाहेरचा परिसरच पाहिला. हा पॅलेस सुंदर आहे! आणि मुख्य म्हणजे ठेवलाही छान आहे.

दर रविवारी संध्याकाळी दिव्यांची रोषणाई असते. ती मात्र गेल्यावेळी आणि ह्याही वेळी पहायची राहिली. तिथूनच एका दुकानातून मैसुरपाक विकत घेतले. आणि बंगलोरच्या दिशेने सुटलो. आमच्यापेक्षा ड्रायव्हरलाच जास्त टेन्शन आलं होतं त्याचं म्हणणं कुठे ट्रॅफीक जॅम होईल सांगता येत नाही त्यामुळे लवकरच निघू. रस्त्यात शोले चित्रपटातल्या रामगढचं शुटींग जिथे झालय ती जागा लागली. मग चहाची तल्लफ आली, तर रस्त्यात कामत लागलं. कामत म्हणजे काही प्रश्न नाही. लगेच गाडी थांबवायला सांगितली. तिथे फणसाच्या पानाच्या द्रोणात केलेल्या गरम गरम इडल्या मिळाल्या. अगदी चविष्ट लागल्या. ड्रायव्हर म्हणे आता मी कुठेही थांबणार नाही, नाहितर फ्लाईट चुकलं तर मला बोलू नका. म्हंटलं चल बाबा! बंगलोरचा नवीन रिंग रोड फारच सुंदर बांधलाय. अगदी अमेरिकेतल्या इंटरस्टेट हायवेवर गेल्यासारखं वाटलं. व्यवस्थित लेन्स, एंट्री एक्झीट लेन्स, टोल बुध अगदी मस्त! आणि मुख्य म्हणजे आपल्याइथल्या सारख्या उलट्या बाजूने ट्रक येण्याचा आचरटपणा कुठे दिसला नाही. वेळेत एअरपोर्टला पोचलो आणि सुखरूप पुण्याला परतलो.
रियाचा पहिलाच विमानप्रवास असल्याने काही त्रास होणार नाही ना अशी अशी काळजी वाटत होती. पण काही त्रास नाही झाला, शिवाय तिनेही कुठे कुरकुर केली नाही, आम्ही जिथे खाल्लं तिथेच तिचीही जेवणं केली पण सुदैवाने त्याचाही काही त्रास झाला नाही. खरतर पावसाळा हा काही कूर्गला जाण्याचा सिझन नाही. कधी कधी रस्ते वगैरे बंदही होतात तिथे. पण सुंदर हवा आणि गार हिरव्या रंगाच्या विविध छटांनी अगदी डोळे निवले. आता योग्य सिझनमध्ये कूर्गला जाऊन तिथल्या कॉफीचा बहर बघायची इच्छा आहे!
0 Responses

Post a Comment