कूर्ग, कर्नाटक

बर्‍याच दिवसांपासून कुठेतरी फिरायला जायचा विचार चालू होता. कैलास मानस यात्रा रद्द झाली. तेव्हा घेतलेली सुट्टीही रद्द करायला लागली होती. त्यामुळे सुट्टी मिळायचा काही प्रश्न नव्हता. रियाला घेऊन पहिलीच मोठी ट्रिप त्यामुळे फार फिरफिर न करता, मिनीटा-मिनीटांचे प्लॅन न करता आरामदायी सुट्टी घालवायची होती पण त्याचबरोबर नवीन ठिकाणीही जायचं होतं. पावसाळ्याचे दिवस असल्याने समुद्रकिनारे बाद, नुकत्याच झालेल्या पुरामुळे हिमालय किंवा उत्तर बाद. परदेशी जाण्याइतकं बजेट नसल्याने परदेशी स्थळंही बाद. पण अगदीच महाबळेश्वरही नको होतं. मग शेवटी जायला सोईचं, पाऊस असला तरी चालून जाईल असं कूर्ग नक्की केलं.

मग ह्ळूहळू माहिती जमवायला सुरुवात केली. कूर्ग म्हणजे कर्नाटकातला कोडगू जिल्हा. मडीकेरी, विराजपेठ आणि खुशालनगर असे तीन तालुके मिळून बनलेला. अंतराच्या दृष्टीने मंगलोर पासून जवळ पण बंगलोरवरून जाणं जास्त सोईचं पडतं. कारण पुणे बंगलोर मार्गावर विमानाचं तिकीट स्वस्त पडतं. शिवाय रेल्वे, ऐरावत/वॉल्वो ह्यांचे चांगले पर्यायसुद्धा उपलब्ध आहेत. बंगलोर एअरपोर्ट पासून ते बंगलोर एअरपोर्टला परत आणून सोडणारी भाड्याची गाडी करावी. लहान मुलं, वयस्कर मंडळी बरोबर असतील तर हे सोईच पडतं. सगळे तरूण असतील तर बसने कूर्गला जाऊन तिथे लागेल तसं वाहन भाड्याने घेता येऊ शकतं. बंगलोर ते कूर्ग गाडी करायचीच असेल तर जितके दिवस रहाणार तितके दिवस ड्रायव्हरला गाडी सकट तिथे थांबवणच बरं पडतं. एकतर आपल्या हातातलं वाहन राहातं, हवं तेव्हा हवं तिथे फिरता येतं,  दुसरं म्हणजे त्या ड्रायव्हरला परत रिकामं परत येण्याचे पूर्ण पैसे द्यावे लागतात.

एकंदरीत हातातला वेळ बघता आणि रिया बरोबर असल्याने बस किंवा रेल्वेचा विचार न करता आम्ही पुणे बंगलोर विमान प्रवास ठरवला आणि आमच्या एका नातेवाईकांच्या मदतीने बंगलोर ते बंगलोर गाडी ठरवली. बंगलोरहून गाडीवाले साधारण ७.५० ते ९ रूपये पर किलोमिटर घेतात आणि गाडीवाल्याला तिथे ठेऊन घ्यायचं असेल तर रहाण्या-खाण्यासाठी त्यांना २५० ते ३०० रुपये दरदिवशीचे द्यावे लागतात. ड्रायव्हरच्या रहाण्याची सोय प्रत्येक हॉटेलमध्ये वाजवी दरात केलेली असते.

पुढचा महत्त्वाचा कार्यक्रम होता तो म्हणजे हॉटेल शोधणे!  रहाण्यासाठी साधारण तीन पर्याय असतात. हॉटेल, रिसॉर्ट आणि होम स्टे. होम स्टे म्हणजे कोकणात बापट, पोतनीस, आवळसकर वगैरे मंडळी जशी आपल्या घरांमध्ये रहायची आणि जेवायची सोय करतात तसाच प्रकार. साधरणपणे ही होम स्टे कॉफी प्लँटेशनमध्ये असतात. जेवणाची आणि रहाण्याची चांगली सोय वाजवी दरात होऊ शकते. रिसॉर्टमध्ये बरेच प्रकार आहेत. स्पा, गोल्फकोर्स, फॉरेस्ट वगैरे. ह्यातही बरीच पॅकेज उपलब्ध असतात. हॉटेलचे पर्याय सुद्धा भरपूर आहेत. कूर्ग म्हटलं की रहाण्यासाठी पाहिलं नाव येतं ते म्हणजे ऑरेंज काऊंटी, दुसरं म्हणजे क्लब महिंद्रा आणि मग टाटा कॉफी प्लँटेशन मधली होम स्टे. पैकी पहिलं जोरदार महाग आहे! त्यांचा मान्सुन डिस्काऊंट वगैरे धरूनही परदेशी प्रवास त्यापेक्षा स्वस्त पडेल. दुसरी दोन खूप लवकर भरून जातात. त्यामुळे नेटवर बरीच शोधाशोध करून आणि फोनाफोनी करून अँबेती ग्रीन्स नावाचं रिसॉर्ट बूक केलं. ते विराजपेटला आहे,  मडीकेरी पासून साधारण ३० किलोमिटर अंतरावर.  होम स्टेचे ऑप्शन्सही चांगले आणि खूप स्वस्त आहेत खरतर. पण ते खूप रिमोट असतात असं ऐकलं त्यामुळे मग रीसॉर्टमध्येच बुकिंग केलं.

पुणे बंगलोर विमानप्रवास छान झाला. बंगलोरचं नवीन एअरपोर्ट छान आहे. तिथल्या लोकांना ह्या एअरपोर्टचं खूप कौतूक आणि अप्रुप आहे. अगदी खरं सांगायचं तर आपल्याकडे मुंबईचं आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट अनेक वर्षांपासून असल्याने आपल्याला काही फार वाटतं नाही.

एअरपोर्टवरून निघाल्या-निघाल्याच रस्त्यावरच्या एका उडूपी हॉटेलमध्ये ब्रेकफास्टला थांबलो आणि साऊथींडीयन खाण्याचा श्रीगणेशा केल्या. गरम गरम इडल्या, मेदुवडे आणि चविष्ट सांबार पोटभर खाल्लं आणि कुर्गच्या दिशेने प्रयाण केलं.

बंगलोर-कूर्ग रस्ता मैसूरच्या जवळून जातो. शहरात शिरत नाही. आम्ही येताना मैसूर पॅलेस पहाण्याचं ठरवलेलं असल्याने जाताना थेट जायचं होतं. बंगलोर मैसूर रस्ताही आता मोठा केला आहे. मी मागे आठ-नऊ वर्षांपूर्वी गेलो होतो तेव्हा हा रस्ता जुन्या सिंहगड रोड सारखा होता. दोन्ही बाजूला दाट आणि  मोठी मोठी झाडं आणि त्याची नैसर्गिक सावली. आता मात्र चार लेनचा प्रशस्त रस्ता केला आहे. संपूर्ण रस्ताभर आजुबाजूला नारळाची मुबलक झाडं दिसतात. ट्रॅफिकही बर्‍यापैकी शिस्तशीर आहे. रिया झोपल्यावर आम्हीही तास दीड तास झोप काढून घेतली. तसही विमान लवकरचं असल्याने पहाटे उठलो होतो.  मैसूर फाटा मागे टाकल्यानंतर रस्त्याच्या आसपासची वस्ती विरळ झाली. आणि झाडी वाढायला लागली. मग एका नवीनच सुरु झालेल्या रेस्टॉरंटात जेवायला थांबलो. छान साऊथी थाळी होती. भाज्या नेहमीच्याच होत्या पण करण्याच्या वेगळ्या पद्धतींमुळे चवीत खूपच फरक होता. तिथे भुभू, माऊ, मासे, कोंबड्या, ससे वगैरे बरेच प्राणी असल्याने रिया एकदम खुष  होती. हा रस्ता थेट मडिकेरी पर्यंत जातो. पण आम्हांला विराजपेठ कडे जायचं असल्याने खुशालनगरहून डावीकडचा फाटा घ्यायचा होता. पण ड्रायव्हरचं म्हणणं की तो रस्ता चांगला नाहीये, आधीच्याच रस्त्याने जाऊ. म्हटलं तू म्हणशील तसं, आम्हांला काहीच माहीत नाही ह्या भागातली. हा अलीकडचा रस्ता नागरहोळे अभयारण्यातून जातो. त्यामुळे तो सकाळी सात ते संध्याकाळी ५ एव्हडाच वेळ उघडा असतो.
आम्ही वेळेत होतो त्यामुळे काही प्रश्न नव्हता. जंगलात शिरल्यावर ठिकठिकाणी प्राण्यांपासून काळजी घेण्याच्या तसेच जंगलाची नासाडी न करण्याच्या सुचना होत्या. अनेक ठिकाणी एलिफंट क्रॉसिंगच्या पाट्याही होत्या. आम्ही अगदी भर दुपारी जात असल्याने एकही प्राणी दिसला नाही. ड्रायव्हर म्हणाला की संध्याकाळी प्राणी दिसतात. जंगल खूप दाट होतं आणि टिपीकल ओला वास भरून राहिला होता. कूर्गच्या जवळ पोहोचल्यावर हिरवीगार भात शेतं, कॉफीच्या बाग, त्यातले मिरीचे वेल, आसपासची केळीची बनं, नारळी-सुपारीच्या बागा असं सगळं दृष्य दिसायला लागलं. सगळीकडे वेगवेगळ्या छटांमध्ये हिरवा रंग भरलेला होता. ब्रिटीशांनी ह्या भागात कॉफीच्या बागा लावायला सुरुवात केली. स्वातंत्र्यानंतर त्यांनी ह्या बागा इथल्या लोकांना विकून टाकल्या. इथलं हवामान, मुबलक पाऊस, जंगलांची सावली ह्यासगळ्यामुळे इथे कॉफीचं भरपूर उत्पादन होतं. कॉफीला पांढर्‍या फुलांचा बहर येतो, तेव्हा हा संपूर्ण परिसर ह्या फुलांनी भरून जातो, ते दृष्य अतिशय सुंदर दिसतं असं म्हणतात.  मधले मधले ब्रेक धरून साधारण ६ तासात रिसॉर्टला पोहोचलो. रिसॉर्ट गोल्फकोर्सच्या जवळ असल्याने खोलीतून छान दिसत होतं. शिवाय बाकीची सजावटही सुरेख होती. सगळा कर्मचारीवर्ग ही अगदी तत्पर होता. गरग गरम कूर्गी कॉफी देऊन त्यांनी आमचं स्वागत केलं.  फक्त जाणवलं एकच की आम्ही सोडून आणखी फक्त एकच गाडी आहे. त्यांना विचारलं तर ते म्हणाले उद्यापासून फुल आहे. आज काही गर्दी नाही. आधी जरा शंका आली पण नंतर काही जाणवलं नाही.


संध्याकाळी तिथेच आसपास टाईमपास केला. तिथला स्विमिंग पूलपण मस्त होता. पण हवा थंड असल्याने पाण्यात काही जावसं वाटलं नाही. रियाने मात्र पाण्यात हात पाय बुडवलेच.

ह्या ट्रीपला आधीपासून काही प्लॅन केलेला नव्हता. फक्त पटेल स्पॉट्स बघणे आणि अजून काही इंटरेस्टींग कळलं तर ते बघायचं एव्हडच ठरवलं होतं. हॉटेलच्या रिसेप्शनवर चौकशी करून दुसर्‍या दिवशी काय बघायचं ते ठरवलं आणि लवकरच झोपून गेलो.



दुसर्‍या दिवशीचा पहिला स्टॉप होता तालाकावेरी. हे म्हणजे कावेरी नदीचं उगमस्थान. विराजपेठ किंवा मडिकेरी दोन्ही ठिकाणांपासून साधारण ३० किलोमिटरवर आहे. रस्ता पूर्ण डोंगरातला वळणावळणांचा आहे. त्यामुळे अंतर कमी असूनही जायला साधारण सव्वा दिड तास लागला. नदीचं उगमस्थान असल्याने ते अगदी डोंगराच्या माथ्यावर आहे. तिथे सुंदर देऊळ बांधलेलं आहे. आणि जिथे पाण्याचा प्रवाह सुरु होतो तिथे एक कुंड आणि गोमुख आहे.
मंदिराचा परिसर एकदम स्वच्छ होता आणि वातावरणही एकदम प्रसन्न होते. डोंगरावर हवाही चांगलीच गार होती. कावेरी नदी इथे उगम पावल्यावर भुमिगत होते आणि ह्या डोंगराच्या पायथ्याही पुन्ही जमिनीच्यावर येते. तिथेच इतरही दोन नद्या तिला मिळून त्यांचा त्रिवेणी संगम आहे. शास्त्रज्ञांच्या मते खालचं पाणी आणि तालाकावेरीच्या कुंडातलं पाणी पाणी एकच आहे. म्हणून तालाकावेरीला कावेरी नदीचं उगमस्थान मानतात. इथून सह्याद्रीपर्वत रांगाचे मनोहारी दृष्य दिसते. इथे वर खूप धुकं आणि ढग होते. आणि आल्यापासून पहिल्यांदाच पाऊसही आमच्या भेटीला आला.

देवळात दर्शन घेऊन तसच आसपासच्या परिसरात फिरून आम्ही निघालो ते मडिकेरीकडे. मडिकेरी हे कूर्ग जिल्ह्याचं ठिकाण. खरतर पावसाळा हा इथे येण्याचा बेस्ट सिझन नव्हे. तरीही आमच्या सारखे अनेक लोकं १५ ऑगस्टच्या आसपास सुट्ट्या घेऊन आल्याने इथे बरीच टुरिस्टी गर्दी होती. आम्ही सकाळी हॉटेलमध्ये भरपेट ब्रेकफास्ट करून निघालेलो असल्याने भुकेची फारशी जाणीव झाली नव्हती. पण आता मात्र चांगली भुक लागली होती. मडिकेरी गावात एका साध्याशा रेस्टॉरंटात दाक्षिणात्य थाळी घेतली. अतिथय चविष्ट रस्सम आणि सांबार होतं. भाज्याही छान होत्या. रियाला तिथली खिरही फार आवडली. मडिकेरीच्या आसपासही बघायला तीन/चार ठिकाणं आहेत. पैकी पहिल्या ठिकाणी म्हणजे अ‍ॅबे फॉल्सला जायला निघालो.


मडिकेरीच्या आसपास कुठेही जायचं तरी घाटातली वाट. त्यामुळे लागणारा वेळ जास्त. अ‍ॅबे फॉल्सला गाडी लाऊन १५ एक मिनिटे चालत आता जावं लागतं. तिथेही पाऊस होताच. रिया माझ्याकडे कांगारू बॅगमध्ये, एका हातात छत्री, खांद्याला कॅमेर्‍याची बॅग आणि शिल्पाच्या हातात तिची पर्स आणि रियाची डायपर बॅग ! अशी आमची वरात धबधब्याच्या दिशेने निघाली. जाताना उतार होता. काही वाटलं नाही. पावसाळा असल्याने धबधब्याला प्रचंड पाणी होतं. त्याचा आवाज वर रस्त्यापासूनच येत होता. पाण्याचा प्रवाहात जाता येत नाही. प्रवाह ओलांडण्यासाठी लाकडी पुल आहे. त्या पुलावर उभ रहायला मस्त वाटतं होतं.  अंगावर धबधब्याच्या पाण्याचे तुषार उडत होते, थोडा थोडा पाऊस होता आणि थंड गार वारा!! तिथे उभं रहायला खूप छान वाटलं. प्रत्येक वेळी पाणी उडलं की रिया खदखदून हसत होती. तिला एकंदरीतच पाण्यात खेळायला फार आवडतं. पण ती फार थंडीत कुडकुडू नये म्हणून थोडे फार फोटो काढून आम्ही जरा वर येऊन थांबलो आणि मग वर परतलो. वर येताना छान व्यायाम झाला.

इथून खरं 'राजा सीट' नावाच्या जागी जायचा प्लॅन होता. कूर्गचा राजा म्हणे ह्या जागी बसून सुर्यास्त बघत असे. शिवाय तिथून डोंगरदर्‍यांची छान दृष्य दिसतात. पण पाऊस आणि ढग असल्याने सुर्यास्त दिसणार नव्हता. आणि डोंगर दर्‍या अ‍ॅबे फॉल्सला बघून झाल्या होत्या. त्यामुळे इथे न जाता आम्ही ओंकारेश्वर मंदिरात जायचे ठरविले. ते मंदिर पाचच्या पुढे उघडतं, त्याला थोडा वेळ होता. मग थेट मार्केट गाठल. कूर्गी कॉफी, मसाले, रस्सम, सांबार पावडर ह्यांची खदेरी करायची होती.

मनाजोगती खरेदी झाल्यावर तिथेच गरम-गरम कॉफी प्यायली. पावसाळी हवेत ती छान वाटली अगदी. रियानी त्या दुकानात पण दंगा करून घेतला. मार्केटमध्ये ह्या सगळ्या सामानाची भरपूर दुकानं आहेत. आम्ही ड्रायव्हरने सांगितलेल्या दुकानात गेलो. खरेदी आटोपेर्यंत ओंकारेश्वर मंदिर उघडायची वेळ झालेली होती. आम्हांला मंदिरात घेऊन जायचं ड्रायव्हरच्या फारसं मनात दिसत नव्हतं. पण आम्ही खनपटीला बसून त्याला घेऊनच गेलो. हे देऊळ एकदम वेगळं आहे. थोडंफार मशिदीसारखं बांधकाम आहे. मधे डोम, बाजूला मिनारासारखे चार खांब आणि मध्यभागी तळं. पावसाळी कुंद हवेत मंदिरातलं वातावरण खूपच प्रसन्न वाटत होतं.



मंदिर पाहून झाल्यावर थेट हॉटेल गाठलं आणि दुसर्‍या दिवशीचा प्लॅन ठरला.

खरतर नागरहोळे नॅशनल फॉरेस्टमध्ये कर्नाटक आणि केरळच्या सिमेवर बस सफारी असते. ती पावसाळ्यातही सुरु असते. सकाळी लवकर म्हणजे आठ वाजता तिथे पोहोचल्यास ह्या सफारीतून जाऊन प्राणी बघता येतात. त्यामुळे तिथे जायचा फार मोह होत होता, पण एव्हड्या सकाळी जाणं शक्य झालं नसतं. कारण हॉटेलपासून म्हणजे विराजपेठ पासून हे  अंतर साधारण ३५-४० किलोमिटर आहे.  मग दुसरा पर्याय म्हणजे दुबारे नावाच्या ठिकाणी हत्ती प्रशिक्षण केंद्र आहे. तिथे कावेरी नदी बोटीने ओलांडून पलिकडे जावं लागतं. शिवाय आम्हांला कूर्गी जेवण जेवायचं होतं त्याचीही सोय आमच्या ड्रायव्हरनेबरीच फोनाफोनी करून केली.

दुबारेला पोचेपर्यंत उशीर झाला आणि तिथल्या गोष्टी बंद व्हायला सुरुवात झाली होती. मग तिथे फार वेळ न घालवता त्याच रस्त्यावर पुढे तिबेटन मॉनेस्ट्रीमध्ये गेलो. १९६२च्या युद्धाच्या वेळी बरीच तिबेटी लोकं ह्या भागात येऊन स्थाईक झाली. इथे तिबेटी धर्मशिक्षणसुद्धा मोठ्या प्रमाणावर चालते. मॉनेस्ट्री सुंदर आहे. त्यांचे ते भडक रंग आणि आणि झळाळत्या सोनेरी बुद्ध मुर्ती सुरेख दिसतात. तिथला परिसरही खूप मोठा आहे. तिथे वेळ घालवून निघेपर्यंत भुकेची जाणीव झाली.





आज कुर्गी जेवण जेवायला जायचं होतं. श्रावण महिना सुरु असल्याने मी नॉनव्हेज खाणार नव्हतो. जेवण एका कॉफीच्या बागेतल्या होम स्टेमध्ये होतं. त्यामुळे थोड्याच वेळात मुख्य रस्ता सोडून कॉफीच्या बागांमधून जाणार्‍या रस्त्याला गाडी वळली. अरूंद रस्ते, गर्द झाडी आणि अधून मधून पाऊस अश्या वातावरणात खरतरं थोडी भितीच वाटत होती. म्हटलं ह्या ड्रायव्हरला तरी माहित आहे की नाह धड! असं साधारण १५-२० मिनीटे गेल्यावर होम स्टे आलं.

जागा सुंदर होती आणि बरीच सुबत्ताही दिसत होती. भात शेती, नारळाची झाडं, कॉफीच्या बागा, गोठ्यात बरीच गाई-गुरं, कोंबड्या आणि डुकरं असा बराच पसारा होता. (कूर्गचं पोर्क खूप प्रसिद्ध आहे म्हणे!) आपल्याकडे कोकणात असतं तसं त्यांचं स्वतः रहायचं घरं जुन्या पद्धतीचं आणि पाहुण्यासाठी नवीन बांधलेलं अशी दोन घरं होती. जेवण तयारच होतं. शिल्पा नॉनव्हेज खाणार असल्याने तीन प्रकारची चिकन, २ भाज्या, पुट्टू म्हणून एक इडली सदृश्य पदार्थ, तांदळाच्या भाकर्‍या आणि पिठपोळ्या ह्यांच्या मधे जाणार्‍या रोट्या, भात, सांबार आणि रस्सम असा जोरदार मेन्यू होता. आम्ही पोर्क नको सांगितलं होतं. त्याने माश्याच्या दोन तुकड्याही आणून दिल्या होत्या. हे नदीतले मासे होते म्हणे आणि ते मुळातच चवीला थोडे तिखट असतात. शिल्पाला ते फारसे आवडले नसल्याचं म्हणाली. भरपेट जेवण झाल्यावर कॉफीच्या बागेत चक्कर मारून आलो. तिथे एक छोटसं कुत्र्याचं पिल्लू होतं. रिया त्याच्याही खूप खेळली. तिला तिथून निघायचच नव्हतं! त्यांनी निघताना बरोबर घरची केळी दिली आणि गरग गरम कॉफी केली! शिवाय रियासाठी अगदी मऊ मऊ स्पंज्यासारख्या दोन इडल्याही करून दिल्या. इथे घराल्या आज्जीने महाराष्ट्रीयन पद्धतीच्या उलटी दिसणारी साडी नेसली होती. त्या साडीची गोष्ट रंजक आहे. कावेरी नदीला एका ऋषींनी (नाव आठवत नाहीये त्यांचं!) लग्नाची मागणी घातली. तिने होकार दिला पण अट एकच घातली की तुम्ही जाल तिथे मला न्यायचं कुठेही एकटं जायचं नाही. तेव्हा ते हो म्हणाले. पण नंतर त्यांना ते त्रासाचं वाटू लागलं. म्हणून एकदा ते कावेरी नदीला कमंडलूत बंद करून कुठे तरी निघून गेले. तिला खूप राग आला. तिची समजूत काढायला तिच्या आसपासच्या मैत्रिणी गेल्या. त्यावर ती आणखीनच चिडली आणि कमंडलूतून उसळी मारून बाहेर येऊन वहायला लागली. तिच्या उसळीचा जोर इतका होता की त्या वार्‍याने त्या मैत्रिणींच्या साड्या फिरून उलट्या झाल्या!! म्हणून तिथे तश्यापद्धतीच्या साड्या नेसतात.
इतकं जेवण झाल्यावर गाडीत गुडूप झोपून गेलो आणि थेट हॉटेलला परतलो. संध्याकाळी तिथेच आसपास थोडा टाईमपास केला.

दुसर्‍या दिवशी परतीचा प्रवास होता. त्याआधी दुबारेला जायचं होतं. आज मात्र लवकर आवरून दुबारेला वेळेत पोचलो आणि तिकीटं काढून बोटीच्या रांगेत लागलो. बोट येईपर्यंत जोरदार पाऊस सुरु झाला. पलिकडे पोहोचेपर्यंत आंघोळीचे हत्ती बाहेर यायला लागले होते. त्यातल्या एका पिल्लापाशी गेलो. अगदी गोड पिल्लू होतं. हत्तीच्या अंगावर राठ केस असतात. रियाने उत्साहाने हत्तीला हात लावला पण ते केस टोचल्यावर तिने असा काही चेहेरा केला की हसून पुरेवाट! मग त्याने सोंड तिच्या डोक्यावर ठेवली. तेव्हा बाई जरा घाबरल्या. मग आम्ही आसपास जरा टाईमपास केला. ह्या सगळ्या उद्योगात पाऊस सुरुच होता. नदीचं पाणीही वाढतय की काय असं आम्हांला उगीच वाटायला लागलं. म्हणून उगीच रिस्क न घेता परतीच्या बोटीच्या इथे आलो. तिथे भलीमोठी लाईन. पण तीन/चार बोटी एकदम आल्याने पटकन पुढे सरकलो. इथेही अजिबात शिस्त नाही, प्रत्येकाला लाईन मोडून पुढे घुसायची घाई. त्या गडबडीत मी आणि रिया बोटीत चढलो, शिल्पा तिथेच राहिली आणि छत्री तिच्याकडे! सुदैवाने पाऊस जरा कमी झाला. इथून थेट मैसूरच्या रस्त्याला लागलो. आता मोठा रस्ता असल्याने प्रश्न नव्हता. मधे जेवण केलं आणि थेट मैसूर पॅलेस गाठला. आत जाऊन बघण्याइतका वेळ नसल्याने बाहेरचा परिसरच पाहिला. हा पॅलेस सुंदर आहे! आणि मुख्य म्हणजे ठेवलाही छान आहे.

दर रविवारी संध्याकाळी दिव्यांची रोषणाई असते. ती मात्र गेल्यावेळी आणि ह्याही वेळी पहायची राहिली. तिथूनच एका दुकानातून मैसुरपाक विकत घेतले. आणि बंगलोरच्या दिशेने सुटलो. आमच्यापेक्षा ड्रायव्हरलाच जास्त टेन्शन आलं होतं त्याचं म्हणणं कुठे ट्रॅफीक जॅम होईल सांगता येत नाही त्यामुळे लवकरच निघू. रस्त्यात शोले चित्रपटातल्या रामगढचं शुटींग जिथे झालय ती जागा लागली. मग चहाची तल्लफ आली, तर रस्त्यात कामत लागलं. कामत म्हणजे काही प्रश्न नाही. लगेच गाडी थांबवायला सांगितली. तिथे फणसाच्या पानाच्या द्रोणात केलेल्या गरम गरम इडल्या मिळाल्या. अगदी चविष्ट लागल्या. ड्रायव्हर म्हणे आता मी कुठेही थांबणार नाही, नाहितर फ्लाईट चुकलं तर मला बोलू नका. म्हंटलं चल बाबा! बंगलोरचा नवीन रिंग रोड फारच सुंदर बांधलाय. अगदी अमेरिकेतल्या इंटरस्टेट हायवेवर गेल्यासारखं वाटलं. व्यवस्थित लेन्स, एंट्री एक्झीट लेन्स, टोल बुध अगदी मस्त! आणि मुख्य म्हणजे आपल्याइथल्या सारख्या उलट्या बाजूने ट्रक येण्याचा आचरटपणा कुठे दिसला नाही. वेळेत एअरपोर्टला पोचलो आणि सुखरूप पुण्याला परतलो.
रियाचा पहिलाच विमानप्रवास असल्याने काही त्रास होणार नाही ना अशी अशी काळजी वाटत होती. पण काही त्रास नाही झाला, शिवाय तिनेही कुठे कुरकुर केली नाही, आम्ही जिथे खाल्लं तिथेच तिचीही जेवणं केली पण सुदैवाने त्याचाही काही त्रास झाला नाही. खरतर पावसाळा हा काही कूर्गला जाण्याचा सिझन नाही. कधी कधी रस्ते वगैरे बंदही होतात तिथे. पण सुंदर हवा आणि गार हिरव्या रंगाच्या विविध छटांनी अगदी डोळे निवले. आता योग्य सिझनमध्ये कूर्गला जाऊन तिथल्या कॉफीचा बहर बघायची इच्छा आहे!

अटलांटातले "पटेल" स्पॉट्स

बरेच जण एखाद्या सप्ताहांतापुरते अटलांटाला चक्कर टाकतात आणि हातात असलेल्या पाऊण, एक किंवा दिड दिवसात इथलं काय बघता येईल असा त्यांना प्रश्न पडतो. जर अटलांटा शहराबाहेर जायचं नसेल आणि हातात दिड-दोन दिवस असतील तर शहरातले सगळे "पटेल पॉईंट्स" बघणे (आणि तिथे फोटो काढून ते फेसबूकवर डकवणे!) सहज शक्य आहे. अटलांटामध्ये अनेक कंपन्यांची मुख्यालयं आहेत. उदाहरणं द्यायची झाली तर कोकाकोला, सिएनएन, डेल्टा / एअरट्रॅन एअरलाईन्स / कॉक्स कम्युनिकेशन, अर्थलिंक, युनायटेड पार्सल सव्हिसेस (UPS), वॉफल हाऊस आणि चिकफिले ह्या रेस्तराँ चेन्स. ह्यातल्या काही मुख्यालयांमध्ये म्युझियम्स, टूर्स आहेत आणि ती डाऊनटाऊन परिसरात आहेत. १. वर्ल्ड ऑफ कोकाकोला : जगप्रसिद्ध कोकाकोला उत्पादनं तयार करणार्‍या कंपनीचं मुख्यालय अटलांटा डाऊनटाऊनमध्ये आहे. तसचं "वर्ल्ड ऑफ कोकाकोला" नावाचं त्यांचं म्युझियमसुद्धा ह्याच परिसरात आहे. सुरूवातीला कोक जेव्हा पहिल्यांदा विकायला सुरूवात झाली तेव्हापासूनची सगळी मोठमोठी बॅनर्स इथे लावलेली आहेत. तसेच अगदी सुरूवातीपासूनच्या कोकच्या बाटल्या बघायला मिळतात. जुन्या बाटल्यांचे आकार आत्ताच्या काचेच्या बाटल्यांपेक्षा बरेच वेगळे होते. कोकाकोलाच्या सिक्रेट फॉर्म्युलाबद्दल माहिती देणारी (?) फिल्म तिथे सुरुवातीलाच दाखवतात. इथे एक ४-डी शो आहे. कोक म्हणजे नक्की काय हे सांगणारा हा शो मनोरंजक आहे. पुढच्या एका विभागात जगभरात कोकाकोलासाठी बनवल्या गेलेल्या जाहिराती इथल्या थिएटरमध्ये सतत सुरू असतात. आपल्या इथली अमिर खान आणि ऐश्वर्या रायची जाहिरात इथे बघायला मिळते. इथे कोकच्या बाटल्यांचं उत्पादनसुध्दा थोड्याप्रमाणात होतं आणि त्याची असेंब्ली लाईन बघायला मिळते. मोठमोठ्या बॉयलरमध्ये भरलेल्या डिस्टील्ड वॉटर पासून कोकच्या सिलबंद बाटली पर्यंतचे मधले सगळे टप्पे इथे बघता येतात. आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे विविध देशांमधल्या कोकाकोला पेयांची चव ह्या टूरच्या शेवटच्या टप्प्यात चाखता येते. क्लासिक कोक पण हवं तेव्हढं पिता येतं. प्रत्येक खंडाचा वेगवेगळा भाग करून त्यात देशानुसार डिस्पेंसर आहेत. भारतामधून 'माझा' असेल असं वाटलं होतं, पण तिथे भारतातर्फे स्प्राईट आहे. दक्षिण अमेरिकन देशांमधली सगळी पेयं छान आहेत. बाहेर पडताना प्रत्येकाला तिथेच तयार झालेल्या (पहिल्या धारेच्या) कोकची एक बाटली भेट म्हणून देतात. पुढे एक मोठं गिफ्ट शॉप आहे. तिथे बर्‍याच प्रकारची सुव्हिनीयर्स मिळतात. जरा वेगळ्या प्रकारचं म्युझियम म्हणून वर्ल्ड ऑफ कोकाकोलाला नक्की भेट द्यावी. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी कोक कधी ना कधी प्यायलेलं असल्याने प्रत्येकाला थोडीफार उत्सुकता असतेच आणि प्रत्येक वयोगटातल्या लोकांचे मनोरंजन होईल ह्याची पुरेपुर काळजी इथे घेतलेली आहे. हल्लीच्या काळातल्या ख्रिसमसचं महत्त्वाचं आकर्षण असलेला "भेटवस्तू वाटणारा सांताक्लॉज" ही कल्पना पुढे रेटण्यात कोकाकोला कंपनीच्या जाहिरात विभागाचाही बराच हात आहे ही माहीती इथे मिळते. २. सिएनएन सेंटर : अमेरिकेतली २४ तास वृत्तसेवा पुरवणारी पहिली वाहिनी असलेल्या CNN चं मुख्यालय अटलांटा डाऊनटाऊन परिसरात आहे. ह्या वाहिनीवर प्रसारीत होणार्‍या दिवसभरातल्या राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय बातमीपत्रांमधली बरीच बातमीपत्र ह्या इमारतीतल्या स्टुडीयोंमधून प्रसारीत होतात. कोकाकोलाप्रमाणेच सिएनएन सेंटरमध्येही टुर्स असतात. इथे इमारतीच्या मध्यभागी भलेमोठे फूडकोर्ट आहे. डाऊनटाऊनमध्ये काम करणारी बरीच मंडळी लंचसाठी ह्या फूडकोर्टमध्ये येतात. ह्या फूडकोर्टच्या एका बाजूला गिफ्टशॉप तसेच माहिती केंद्र आहे. फूडकोर्टमध्ये भल्यामोठ्या स्क्रीनवर सिएनएन वाहिनीवरची वृत्तपत्रे प्रसारित होत असतात. सिएनएन सेंटरच्या टुरवर जाणार्‍या लोकांसाठी फूडकोर्टच्या मध्यातून एक भलामोठा सरकता जीना थेट पाचव्या मजल्यापर्यंत जातो. ह्या जीन्याची नोंद गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झालेली आहे. टुरदरम्यान CNN आणि CNN international, HLN (Head line news) तसेच CNN en Español ह्यांचे स्टुडीयो पहायला मिळतात. काही ठिकाणी सुरू असलेलं बातमीपत्र सादरीकरणही पहायला मिळतं. ह्या टुरदरम्यान ते बातमीपत्र प्रसारीत होणार्‍या स्टुडियोची संपूर्ण माहिती देतात. निवेदकाला बातम्या कुठे दिसतात, बातमीपत्र वाचन करत असताना त्याला सूचना कशा दिल्या जातात, हवामानाचा अंदाज दाखवणारे नकाशे कुठे आणि कसे असतात ह्या सगळ्या गोष्टी तिथे समजतात. टुरमधल्या एकाला बोलावून ते मॉक बातम्या द्यायला सांगतात. तो भाग मनोरंजक असतो! २००८ साली मार्च महिन्यात झालेल्या वादळात सिएनएन सेंटरच्या ह्या इमारतीचे खूप नुकसान झाले होते. त्याची माहिती तसेच फोटो टुर संपता संपता असलेल्या फोटो गॅलरीत मिळतात. अनेक महत्त्वाच्या घटनांचे सिएनएनवर दाखवले गेलेले फोटोही इथे पहायला मिळतात. ३. जॉर्जिया अक्वेरियम : अमेरीकेतलं प्रत्येक ठिकाणं हे कुठल्या का होईना क्रायटेरियाने "जगातलं सगळ्यांत मोठं" असतं! तश्याच प्रकारचं "इनडोर वॉटर कंटेट" ह्या क्रायटेरियानुसार जगातलं सगळ्यांत मोठं असलेलं बोटीच्या आकाराच्या इमारतीत वसलेलं जॉर्जिया अक्वेरियम अटलांटा डाऊन टाऊनमध्ये वर्ल्ड ऑफ कोकाकोलाच्या अगदी शेजारी आहे. लहान मुलं बरोबर असतील तर ह्या अक्वेरियम मध्ये जरूर जावं अन्यथा ते बर्‍यापैकी कंटाळवाणं आहे. बाकी ठिकाणी नसलेलं असं वेगळं काहीही इथे नाहीये. त्यामुळे सी-वर्ल्ड, शिकागोचं शेड अक्वेरियम वगैरे पाहिलेलं असल्यास इथे नाही गेलात तर फार काही फरक पडणार नाही. आत मधल्या बर्‍याच शोज ना वेगळे पैसे पडतात. बर्‍याच ठिकाणी भल्यामोठ्या काचेच्या भिंतीमागे बहुरंगी मासे दिसतात. ह्या भिंतींवर असलेल्या दिव्यांची रंगसंगती छान आहे. लहान मुलं हे पाहून खुष होतात. वर्ल्ड ऑफ कोकाकोला, सिएनएन सेंटर आणि अक्वेरियम ह्यांचा मिळून काँबो पास मिळतो. आणि सकाळी लवकर सुरुवात केली तर ह्या तीनही गोष्टी एका दिवसात बघणे शक्य आहे. ४. सेंटेनीयल ऑलिंपीक पार्क : अटलांटा शहराने १९९६च्या ऑलिंपीक स्पर्धेचं यजमानपद भूषवलं होतं. ह्या स्पर्धेनिमित्ताने अटलांटा डाऊनटाऊनमध्ये ही बाग उभारली गेली. ह्या बागेच्या मध्यभागी ऑलिंपीक रिंगच्या आकारात कारंजी आहेत आणि इथे लाईट अँड साऊंड शो होतो. चारही कोपर्‍यांत ऑलिंपीक टॉर्चच्या आकारातल्या मशाली आहेत. इथल्या पदपथांच्या विटांवर ऑलिंपीकसाठी देणगी देणार्‍यांची नावे आणि त्यांनी दिलेले संदेश कोरलेले आहेत. ह्या बागेत एका बाजूला कार्यक्रमांसाठी मंच आहे. तिथे दर शनिवारी वेगवेगळे कार्यक्रम सुरू असतात. इथे विश्व हिंदू परिषदेतर्फे दिवाळीच्या दरम्यान कार्यक्रम असतो. हिवाळ्यात एखाद्या दिवशी चांगली हवा असेल तर अनेक लोक इथल्या लॉनवर उन्हं खात बसलेली असतात किंवा चक्कर मारत असतात. ५. स्टोन माऊंटन : अटलांटा शहरापासून सुमारे २० मैल अंतरावर स्टोन माऊंटन नावाचा ग्रॅनाईटचा डोंगर आहे. ह्या डोंगराचे वैशिष्ट्य म्हणजे हा जमिनीवर ठेवलेल्या लंबगोलाकृती दगडासारखा दिसतो. म्हणजे आधीचे चढाव, डोंगराच्या सोंडा अशी नेहमीची रचना इथे दिसत नाही. एकदम डोंगर सुरू होतो. ह्या डोंगराची उंची साधारण १७०० फूट आहे. डोंगरमाथ्यावर जायला केबल कार घेता येते किंवा चालतही जाता येते. चालत साधारण २०-२५ मिनीटांत वरपर्यंत पोचता येतं. डोंगरावरून अटलांटा परिसराचं सुंदर दृष्य दिसतं. अटलांटा शहरात खूप झाडी आहे. त्यामुळे फॉलमध्ये गेलं की डोंगरमाथ्यावरून एकदम रंगीबेरंगी दिसतं. डोंगरावर तयार झालेल्या नैसर्गिक भिंतीवर सिव्हील वॉरमध्ये लढलेल्या तीन प्रमुख नेत्यांचं शिल्प कोरलेलं आहे. ह्याच भिंतीवर उन्हाळ्यात प्रत्येक सप्ताहांताला संध्याकाळी अंधार पडल्यानंतर अमेरिकेच्या आणि जॉर्जियाच्या इतिहासावर आधारीत लेझर शो केला जातो आणि फटाक्यांची रोषणाई केली जाते. तसंच ह्या डोंगराच्या परिसरात स्टोन माऊंटन अम्युझमेंट पार्क आहे. सगळीकडे असतात तशी साधारण ट्रेन राईड, बोट राईड, ग्लास ब्लोईंग, थ्रीडी सिनेमा, लहान मुलांना खेळण्यासाठी खेळ, टॅटूवाला, बुढ्ढी के बाल, फूडकोर्ट वगैरे गोष्टी इथे आहे. इथे एक वैशिष्ट्यपूर्ण डक राईड आहे. बस सारख्या वाहनात सगळ्यांना बसवतात ज्याला ते "डक" म्हणतात आणि पुढे हे डक पाण्यात शिरून होडीप्रमाणे तरंगायला लागतं! उन्हाळ्यात साधारण दुपारी इथे येऊन सगळ्या राईड करून, नंतर खादाडी करून आणि लेझर शो बघून परतणे असा एक दिवसाचा कार्यक्रम बरेच जण करतात. लेझर शो खूपच उंचावर होत असल्याने लॉनवर कुठेही बसून दिसू शकतो. त्यामुळे लोकं आपल्याबरोबर घडीच्या खूर्च्या, चटया, चादरी वगैर घेऊन निवांत बसलेले असतात. वेळ असेल आणि हवा चांगली असेल तर इथल्या एखाद्या पिकनीक एरियामध्ये निवांत ग्रील करत दिवसभराचं आऊटींग करता येतं. हिवाळ्यात लेझर शो जिथे बसून बघतात त्या लॉनवर कृत्रिम बर्फ आणून टाकतात आणि त्यावर स्नो-ट्युबिंग करता येतं. साधारण जानेवारी फेब्रुवारी महिन्यांत हे स्नो-माऊंटन उघडतं. ६. स्वामी नारायण मंदीर : आता ह्याला पटेल स्पॉट म्हंटलेलं चालेल की नाही ते माहित नाही पण हे मंदिर सुद्धा अटलांटामधला मोठा टुरिस्ट स्पॉट आहे! बसच्या बस भरून देशी तसेच विदेशी लोकं मंदिर पहायला येत असतात. अमेरिकेतल्या सगळ्या स्वामी नारायण मंदिरांमधलं सगळ्यांत मोठं हे आहे असं म्हणतात. मंदिराच्या बाहेरच्या बाजूचं आणि आतलं कोरीवकाम अतिशय सुंदर आहे. मंदिराच्या आतली दिव्यांची रचना आणि आरासही सुरेख असते. दिवाळीला ह्या मंदिरावर वेगवेगळ्या रंगाचे प्रकाशझोत सोडून रोषणाई करतात तसच फटाक्यांची आतिषबाजी होते. मंदिराच्या आत दिवाळीच्या दिवसांमध्ये पणत्या आणि साध्या, फुलांच्या आणि धान्यांच्या रांगोळ्यांची फार सुरेख आरास केलेली असते. हि सगळी ठिकाणं अटलांटा शहराच्या जवळपास आहेत. शहराबाहेरच्या, एक दिवसात, जाऊन येता येण्याजोग्या अजून काही ठिकाणांबद्दल पुढल्या भागात...

पश्चिमेतला स्वर्ग - योसेमिटी, क्रेटर लेक

अमेरीकेत आल्यापासून प्रत्येक लाँग विकेंडला भटकंती सुरुच असते. सेंट लुईस तसच अटलांटा ह्या दोन्ही ठिकाणांपासून एखाद-दोन दिवसांत बघता येतील अशी ठिकाणं पहाणं साध्या विकेंडना चालू असतं आणि लाँग विकेंडना मोठ्या ट्रिप. बरेच मित्र-मैत्रिणी अमेरीकेतल्या वेगवेगळ्या भागांमध्ये विखुरलेले असल्याने त्यांच्या भागातल्या नविन नविन ठिकांणाबद्दल कळत असतं आणि मग तिथे जायचे प्लॅन्स ठरतात. अमेरीकेत यायच्या आधी नायगारा आणि ग्रँड कॅनियन सोडून बाकी काही नैसर्गिक गोष्टी बघण्यासारख्या आहेत हे माहित नव्हतं. योसेमिटी आणि क्रेटर लेक ही नावं मी साधारण दिड-एक वर्षांनंतर एका मित्राचे फोटो बघताना ऐकली होती. दोन्ही ठिकाणांचे फोटो खूप मस्त होते आणि त्यामुळे ह्या दोन्ही ठिकाणी जायचच ! असं नक्की ठरवून टाकलं होतं. पण बाकीची यशस्वी ठिकाणं बघण्यात आणि योसेमिटी /क्रेटर लेकचं हवामान, विमानाच्या तिकीटांच्या किंमती आणि सुट्ट्या ह्या सगळ्यांचा ताळमेळ घालण्यात सुमारे ३ वर्ष गेली. यंदाच्या वर्षी मेमोरीयल डे विकेंडला जोडून दोन दिवसांची सुट्टी मिळाल्याने योसेमिटी आणि क्रेटर लेकची "मच अवेटेड" ट्रीप पार पडली. स्वस्त डील मिळाल्यावर विमानाची तिकीटं काढून टाकली. बॉसला सुट्टीसाठी पटवणं आणि तिथलं प्लॅनिंग हे नंतर करायला ठेवलं. प्लॅन आखायला घेतल्यावर मात्र "रात्र थोडी आणि सोंग फार" अशी स्थिती झाली ! ज्याला विचारू तो " हे नक्क्कोच अजिबात.. तेच्च्च पहा" टाईप मतं सांगत होता. शिवाय आमच्या बरोबर अजून एक मित्र आणि मैत्रिण येणार होते त्यांना त्यांचे मित्र-मैत्रिणी असेच सल्ले देत होते. त्यामुळे रोज रात्री आमचा फोन झाला की प्लॅन बदललेला असे !! शेवटी निघायच्या आदल्या रविवारी दोन दिवस योसेमिटी, दीड दिवस क्रेटर लेक आणि शेवटचा दीड दिवस सॅन फ्रँन्सिस्को असा प्लॅन नक्की केला आणि हॉटेल्स बूक करून टाकली. हवामानाचा अंदाज रोज पहात होतो. एकडून तिकडे किंवा तिकडून इकडे येणार्‍या हवेच्या झोतांमूळे कधी स्वच्छ सूर्यप्रकाश, कधी पाऊस तर कधी बर्फ असा रोज बदलता "अंदाज" दाखवला जात होता. पण आता विमानाची तिकिटं काढली आहेत त्यामुळे काय वाट्टेल ते झालं तरी जाऊच असं ठरवून हवामानाचे अंदाज बघणं बंद करून टाकलं. एकूण ट्रीपचा प्लॅन बघता धबधबे, लेक, समुद्र, खाडी ह्या सगळ्यांचं बर्‍याचदा दर्शन होणार होतं. :) बे-एरीया मधून योसेमिटीला जायला निघाल्यावर रस्त्यावर जवळच्या बागांमधून तोडून आणलेल्या ताज्या आणि अतिशय चविष्ठ चेरी आणि स्ट्रॉबेरीचे स्टॉल लागले. आम्ही लगेच गाडी तिकडे वळवून ताज्या फळांवर ताव मारला ! * <फोटो १>
* नंतर हे स्टॉल बर्‍याचदा दिसले. रस्त्यांवर दुतर्फा फळांच्या बागा दिसत होत्या. शाळेतल्या भूगोलाच्या पुस्तकात वाचलेला फळफळावळ पिकवणारा कॅलीफोर्निया पहायला मिळाला. एकदा तर आम्ही लंच न करता किलो-दोन किलो चेर्‍या आणि स्ट्रॉबेर्‍याच फस्त केल्या ! * <फोटो २ > * हायवे १२० वर घाट सुरु होण्याच्या आधी एक सुंदर लेक लागला. खूप मोठा होता आणि अधेमधे गाड्या थांबवून फोटो काढण्याकरता जागा पण होती. ह्या लेकचं नाव मात्र कळू शकलं नाही. * <फोटो ३> * योसेमिटी नॅशनल पार्क हे अमेरिकेतल्या जुन्या नॅशनल पार्क्सपैकी एक आहे. हे दरीत वसलेलं आहे. त्यामुळे सगळ्या बाजूंनी डोंगररांगा, दाट झाडी, डोंगरावरच्या बर्फाचे पाणी वितळल्यामुळे खळाळणारे धबधबे असं नयनरम्य दृष्य वसंतात आणि उन्हाळ्यात दिसतं. दरीत असल्यामुळे थंडीतही तिथे जाता येतं पण आजुबाजूला डोंगरांवर चढाई करण्याचे रस्ते तसचं उंचावरची प्रेक्षणीय स्थळं पहाता येतं नाहीत. * <फोटो ४> * पार्कमध्ये शिरता शिरता ब्रायडलवेल धबधबा लक्ष वेधून घेतो. ह्या धबधब्याच्या अगदी जवळ जाता येतं. पाणी बर्फाचं असल्याने भयंकर गार होतं तरीही कुडकूडत आम्ही तिथे जाऊन आलोच ! जवळजवळ पूर्ण भिजलो आणि एखादी चहाची टपरी जवळपास हवी होती अशी तीव्र जाणिव झाली. * <फोटो ५ > * पार्कमध्ये पुढे गेल्यावर एक झुलता पूल लागतो. त्याच्या आसपास खूप मोठं हिरवळ असलेलं मैदान आहे. अनेक लोक तिथे खेळत, वाचत, चित्र/फोटो काढत, ग्रील वरच्या गरमागरम पदार्थांवर ताव मारत किंवा नुसतेच उन्हं खात बसले होते. इथूनच योसेमिटी धबधब्याच्या वरच्या भागाचे दर्शन झाले. * <फोटो ६ > * आम्हीही जरावेळ टाईमपास करून मग पुढे निघालो. हा रस्ता पुढे पार्कच्या मुख्य भागात म्हणजे योसेमिटी वॅलीत जाऊन पोहोचतो. या पार्कमध्ये आत फिरण्यासाठी बस आहेत, जेणेकरून प्रत्येक ठिकाणी वाहनांची गर्दी होत नाही. मध्यभागी असलेल्या वाहनतळावर गाडी ठेऊन बसने आरामात फिरता येतं. आम्हीही गाडी तिथे ठेऊन योसेमिटी धबधब्यापाशी जाणारी बस पकडली. ह्या धबधब्याच्या वरच्या भागात जाता येतं किंवा खालचा अर्धाभाग पाहून परतता येतं. वरचा अर्धा भाग पार करणं खूप अवघड आहे असं तिथे लिहिलेलं होतं तसच सूर्यास्त होईपर्यंत आम्ही तिथून परतू शकलो नसतो त्यामुळे आम्ही खालच्याच सुमारे ३ मैलांच्या ट्रेलवर गेलो. * <फोटो ७> * तिथून परतेपर्यंत थंडी चांगलीच वाढली होती आणि अंधारही पडायला लागला होता. त्यामुळे मग गाडी घेऊन करी व्हिलेजमध्ये जिथे आम्ही एक तंबू भाड्याने घेतला होता, तिथे जायला निघालो. हा तंबू फारच सोईचा होता. आतमध्ये हिटर होता. तसच झोपायला पलंगही होते. बाहेर अस्वलांपासून अन्नपदार्थ लपवून ठेवण्यासाठी पेट्या पण होत्या. इथली अस्वलं खाण्याचा वास आला तर गाड्यांची दारंही तोडतात. त्यामुळे खाद्यपदार्थ तसेच वास येणार्‍या कुठल्याही गोष्टी ह्या पेटीच ठेवणं बंधनकारक आहे.
* <फोटो ८ >
* इथल्या बर्‍याच नॅशनल पार्क्समध्ये सरकारच्या नॅशनल पार्क सर्व्हिसेस तर्फेच खाण्यापिण्याची तसेच रहाण्याची सोय केलेली असते. त्यामुळे अतिशय चांगली सोय वाजवी दरात उपलब्ध असते. अश्याच रेस्टॉरंटमध्ये पोटपूजा करून आम्ही मिरर लेकच्या दिशेने प्रयाण केले. जाता जाता सहज तिथल्या ऑफिसमध्ये चौकशी केल्यावर कळले की गेले काही महिने बर्फामुळे बंद असलेला ग्लेशियर पॉईंटचा रस्ता त्या दिवशी दुपारी बारा वाजता उघडणार होता ! आम्ही आमच्या पुढच्या प्लॅनमध्ये लगेच बदल केले कारण ग्लेशियर पॉईंट अजिबात चुकवायचा नव्हता. मिरर लेक नावाप्रमाणेच आरसा आहे. नितळ पाण्यात आजुबाजूच्या दृष्याचे सुंदर प्रतिबिंब पडतं.
*<फोटो ९ > * मिरर लेक हून परत येईपर्यंत ग्लेशियर पॉईंट उघडायची वेळ झाली. लगोलग आम्ही गाडी तिकडे वळवली. ग्लेशियर पॉईंट हा डोंगरमाथ्यावर आहे आणि त्यामुळे तिथून योसेमिटी व्हॅलीचं सुंदर दृष्य दिसतं. जसजसे वर जात होतो तसा आजुबाजूला साठलेला बर्फ दिसायला लागला. रस्त्यावरून गाड्या जाता याव्या म्हणून रस्ता तेव्ह्डा साफ केलेला होता. मध्ये एकेठिकाणी खूप मोठा बोगदा आहे आणि ह्या बोगद्याच्या सुरुवातीला गाड्या थांबवून फोटो काढता येतात. आपण साधारण डोंगराच्या मध्यापर्यंत आलेलो असतो. ग्लेशियर पाँईटहून दिरणारं दृष्य हे योसेमिटीमधल्या सौंदर्याची परमावधी म्हणायला हरकत नाही ! आजुबाजूचे राकट पहाड, मुळात भली मोठी असलेल्या पण वरून नाजूक दिसणार्‍या झाडांनी भरलेली दरी, खळाळते धबधबे आणि अजिंक्य दिसणारा हाफ डोम असं हे सगळच फार सुंदर दिसतं ! आम्ही तर १० मिनीटे काही न बोलता नुसते बघतच बसलो.
* <फोटो १० > * वरून दिसणारा पार्कचा परिसर
* <फोटो ११> * ग्लेशियर पॉईंटहून हाफ-डोम ही सुरेख दिसतो. हा डोंगर एकाबाजूने सरळसोट उभा आहे तर दुसर्‍याबाजूने डोमच्या आकाराचा आहे. ह्यावर चढाईपण करता येते.
* <फोटो १२ > * हा एक पॅनोरमाचा प्रयत्न
* <फोटो १३> * हे सगळं दृष्य डोळ्यांत आणि कॅमेर्‍यात साठवून आम्ही मॉरीपोसाला जायला निघालो. मॉरीपोसाला पृथ्वीवरचे सगळ्यात मोठे सजिव अर्थात जायंट सेक्वा ट्री आहेत. तिथे उन्मळून पडलेल्या झाडाच्या मुळावरूनच आकाराची कल्पना येईल.
* <फोटो १४ > * हे ग्रिझली जायंट. ह्याची उंची सुमारे ६३ मिटर आणि घेर ८ मिटर आहे. ह्याच्या अतिभव्यतेपुढे काय बोलावं सुचतच नाही !
* <फोटो १५ >
* पुढे कॅलिफोर्निया जायंट लागतो. ह्याचं चित्रही भूगोलाच्या पुस्तकात पाहिलं असेल. ह्या झाडाच्या बुंध्याला भलं मोठं भोक पाडून पूर्वी ह्यातून गाड्या जात असत. आता हे भोक हळूहळू (म्हणजे फारच हळू) बुजतय. अश्याप्रकारचा प्रयत्न केलेलं हे एकमेव झाड आता जिवंत आहे.
* <फोटो १६ >
*
मागे यलोस्टोन नॅशनल पार्कला जाऊन आलेलो असल्याने योसेमिटी आणि येलोस्टोनची सारखी तुलना होतं होती. योसेमिटी नक्कीच जास्त सुंदर आहे पण मानवी वस्तीपासून जवळ असल्याने तसेच पर्यंटकांची खूप गर्दी असल्याने हे सौंदर्य हरवणार नाही ना अशी कुठेतरी भिती वाटून गेली ! योसेमिटी बघून झाल्यावर आम्ही बे-एरीयात परतून क्रेटर लेकच्या दिशेने प्रयाण केलं. क्रेटर लेक हा कॅलिफोर्नियाच्या उत्तरेला असलेया ऑरेगन राज्यात येतो. गेल्यावेळच्या ट्रीपमध्ये ऑरेगन कोस्ट मला फार म्हणजे फारच आवडला होता ! बे-एरीयाच्या हाईपपुढे ऑरेगन हे एखाद्या फेमस हिरॉईनच्या सुंदर पण दुर्लक्षित बहीणीसारखं वाटतं (ट्युलिपच्या ब्लॉगमधून साभार ! :) ) ऑरेगनच्या प्रेमामुळे आम्ही खरतर पोर्टलँडपर्यंत ड्राइव्ह मारायचा विचार करत होतो पण वेळेआभावी ते रद्द करावं लागलं. क्रेटर लेक हा भुकंपामुळे तयार झालेल्या प्रचंड मोठ्या खळग्यात साठलेल्या बर्फाच्या तसेच पावसाच्या पाण्याच्या साठ्यापासून तयार झाला आहे. ह्या लेकमध्ये ना कुठले झरे, नद्या येऊन मिळतात ना लेकमधून उगम पावतात. पाण्याचा स्त्रोत फक्त पाऊस किंवा बर्फ असल्याने पाणी अतिशय शुद्ध आणि स्वच्छ आहे. बे-एरीयातून जसजसे उत्तरेला जात होतो तसं आजूबाजूचं दृष्य बदलतं होतं. आधी फळांच्या बागा, मग वाळलेलं गवत असलेली जमीन, मधेच उजाड डोंगर. माऊंट शास्ता जवळ आल्यावर झाडांची उंची वाढायला लागली आणि जरा वेळानी पाऊसही आला. दरम्यान आम्ही ऑरेगनमध्ये प्रवेश केला होता. तिथे तर थंडीही जोरदार वाढली पण ऊन मात्र होतं. आत एका विजीटर सेंटरवर विचारलं तर तिथल्या काकूंनी अगदीच उसासे सोडले. म्हणे बघा जाऊन लेक पर्यंत नशिब असेल तर मिळेल बघायला. म्हंटलं बाई बर्‍या आहेत ना ! इथे ऊन पडलय आणि बर्फाचं काय घेऊन बसल्यात. मुख्य रस्ता सोडून आत वेळल्यावर आजुबाजूला साठलेला बर्फ दिसायला लागला.
* <फोटो १७> * हळूह्ळू तो वाढायला लागला. रस्ता अगदी बर्फातून कोरून काढला होता ! विजिटर सेंटरचं वळणं आलं. मात्र तिथे काही असेल असं वाटतं नव्हतं.
*
<फोटो १८>
* ते व्हिजिटर सेंटर पाहिल्यावर मात्र आम्ही अवाक झालो ! ह्या भागात इतका बर्फ पडतो की ती पूर्ण इमारत बर्फात गाडली जाते. ती वापरता यावी म्हणून अधेमधे त्याच्या खिडक्या आणि दारं खणून काढतात !
*
<फोटो 1९>
*
ह्या सेंटरपासून लेक पुढे साधारण ३ मैलांवर आहे. इथे फक्त २ महिने बर्फ नसतो. तेव्हड्यावेळात लेकच्या कडेने गाडी नेता येते तसच पाण्यापर्यंत जाता येतं. आम्ही व्ह्यू पॉईंटपाशी पोचलो तर तिथेही रस्त्याच्या बाजूला सुमारे १५ फुट उंचीचे बर्फाचे ढिगारे होते. त्यावर चढून गेल्यावर पाण्याचं पहिलं दर्शन झालं.
* <फोटो २०>
*
हळूहळू त्याच्या प्रचंड आकाराचा अंदाज येत गेला. लेकच्या एका कोपर्‍यात एक बेट आहे.
* <फोटो २१>
*
मध्येच एकदम ढगबाजूला झाले आणि प्रखर सुर्यप्रकाश पडला. पाणी गडद निळ्या रंगाचं दिसायला लागलं, जसं काही तिथे शाईची दौतच उपडी केली आहे !
* <फोटो २२>
* सगळ्या बाजूंनी बर्फाच्छादीत डोंगर आणि झाडं, शार निळं पाणी आणि चकाकणारा सूर्यप्रकाश अश्या त्या दृष्याचं वर्णन करणच शक्य नाही ! ते आम्ही अक्षरशः डोळे भरभरून बघितलं. जरा वेळाने फोटो काढले. हा एक पॅनोरमाचा प्रयत्न :
* <फोटो २३> * परत हळूहळू ढगांची छाया पडायला लागली. एका बाजूला थोडा सूर्यप्रकाश होता.
* <फोटो २४>
* तर दुसर्‍या बाजूने अचानक बर्फवृष्टी सुरु झाली. बर्फ हळूहळू सरकत होता आणि लेकचा तो तो भाग दिसेनासा होत होता.
* < फोटो २५ > * बर्फात उभं रहाणं अशक्य झाल्यावर आम्ही अखेर गाडीत बसलो आणि परतीच्या प्रवासाला निघालो ! ह्या दोन्ही ठिकाणी निसर्गाची अनेक रुपं आणि वर्णनातीत सौंदर्य पाहिलं. बर्‍याच दिवसांपासूनची योसेमिटी आणि क्रेटर लेक पहायची इच्छा पूर्ण झाली. आता अजून एक इछा होते आहे ती म्हणजे रिटायरमेंट घेतल्यानंतर यलोस्टोन, योसेमिटी किंवा क्रेटरलेक च्या विजिटर सेंटरवर "हाऊ मे आय हेल्प यू?" वाल्यांचं काम करायचं म्हणजे सगळ्या ऋतूंमध्ये ह्या गोष्टी पहाता येतील. बघूया हे पूर्ण होतय का... :) ---------------------------------------------------------------------------------------------------------------- माहितीसाठी काही लिंक्स : नॅशनल पार्क सर्व्हिसेसच्या वेबसाईट वर सगळी माहिती व्यवस्थित दिलेली आहे. रस्त्यांची सध्याची स्थिती, हवामान तसच सद्यस्थिती दाखवणारे कॅमेरे ह्याचा खूप उपयोग होतो.
१. योसेमिटी : http://www.nps.gov/yose/index.htm
२. क्रेटर लेक : http://www.nps.gov/crla/index.htm
ह्या शिवाय योसेमिटीचं प्लॅनिंग करण्यासाठी मला खालचा ब्लॉग खूप उपयोगी पडला. http://www.yosemitefun.com/images/yosemite_park.htm

हेलन, जॉर्जिया

स्प्रिंग किंवा फॉलमधल्या एखाद्या शनिवारी जेव्हा मस्त हवा असेल, म्हणजे फार ऊन नाही, थंडी नाही, पाऊस नाही, कधी स्वच्छ सूर्यप्रकाश, मध्येच ढगांची सावली, तेव्हा हेलन बाईंची भेट घ्यायला जरूर जावं. हेलन, जॉर्जिया, हे अटलांटाच्या उत्तरेला साधारण ८० मैलांवर वसलेलं टुमदार गाव आहे. ब्लू रिज पर्वतरांगांनी वेढलेल्या ह्या गावाच्या मध्यातून चॅटॅहुची नदी वाहते. आसपास चॅटॅहुची नॅशनल फॉरेस्टची दाट झाडी आहे.
हायवे ४०० सोडून आत वळलं की साधारण वीस-पंचवीस मिनिटांनी आपण हेलनमध्ये शिरतो आणि शिरल्याशिरल्या जर्मन धाटणीची उतरत्या छपरांची घरं दिसायला लागतात. हे गाव जर्मन किंवा बव्हेरीयन पद्धतीने वसवलेलं आहे. पर्यटन हाच मुख्य व्यवसाय असल्याने आता तशा पध्दतीची घर बांधणं बंधनकारक आहे.



गावात शिरल्यानंतर मुख्य रस्ता वळून चॅटॅहुचीवर बांधलेल्या पुलावरून जातो. हेच ह्या गावाचं डाऊनटाऊन. नदीच्या दोन्ही बाजूला खाण्याच्या तसेच पिण्याच्या मुबलक जागा आहेत. नदीचे दोन्ही काठ व्यवस्थित बांधून त्यावर ही उपहारगृहे तसेच पब्स वसवले आहेत. हाच रस्ता पुढे वळून चॅटॅहुची नॅशनल फॉरेस्टच्या दिशेने जातो.

जरूर पहाव्या/कराव्या अशा गोष्टी :
१. ह्या परिसरात चॅटॅहुची नदीचा प्रवाह खूप संथ आणि उथळ आहे. त्यामुळे इथे वॉटर ट्यूबिंग करता येतं. वॉटर ट्यूबिंगमध्ये आपल्याला रबराच्या मोठ्या टायरसारख्या ट्यूबमध्ये बसवून नदीच्या प्रवाहात सोडून देतात.
प्रवाहाबरोबर तरंगत तरंगत आपण खाली येतो. एका ट्यूबमध्ये आपण एकटे किंवा आणखी एका कोणाबरोबर बसू शकतो. उपलब्ध वेळेनुसार एक किंवा दोन तासांच्या टूर्स घेता येतात. मध्येमध्ये दगडांवर पाणी जरा खळाळतं असतं, त्यामुळे ह्या ट्यूबमध्ये बसून तरंगायला मजा येते. पाण्याच्या खळाळाचा अंदाज न आल्यास मध्येच छान डुबकीही मारली जाते. उन्हाळ्यात हवा गरम असते आणि नदीचं छान पाणी थंडगार असतं त्यामुळे हे वॉटर ट्यूबिंग करताकरता नदीत मस्त डुंबता येतं. फॉल किंवा स्प्रिंगमध्ये पाणी फारच थंड असतं त्यामुळे एकदा मी थंडी वाजून जोरदार कुडकुडलो होतो !
पाणी खोल नसल्याने पोहता येत नसेल तरी चालू शकतं आणि लहान मुलांनाही बरोबर घेऊन जाता येऊ शकतं.
एकंदरीत नक्की करावा असा प्रकार आहे.



२. अ‍ॅनारूबी धबधबा : चॅटॅहुची नॅशनल फॉरेस्टमध्ये हा धबधबा आहे. मुख्य रस्त्यापासून व्यवस्थित दिशादर्शक पाट्या आहेत. पार्किंगपासून साधारण अर्धा मैल वर चढून जावे लागते. बाकी कुठले मोठे धबधबे पाहिले असतील तर हा फार काही भारी वाटत नाही. पण ्ग्रूप बरोबर असेल तर चढून जायला मजा येते.



३. ऑक्टोबरफेस्ट (Oktoberfest) : जर्मनीमधल्या म्युनिखच्या धर्तीवर इथे सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर माहिन्यांमध्ये Oktoberfest असतो. बियर फॅन्सनी ह्यावेळी नक्की जावे. इथल्या पब्समध्ये ह्या दरम्यान एकदम उत्साही वातावरण असतं.
४. फॉल कलर्स : इथे आणि आसपास बरच जंगल असल्याने फॉल कलर्स छान दिसतात. इथूनच पुढे ब्लूरिज पार्क वेवर जाता येतं.
५. डाऊनटाऊनमध्ये भटकंती : मुख्य रस्त्यावर नदीच्या आसपास डाऊनटाऊन आहे. डाऊनटाऊन म्हंटल्यावर जे डोळ्यासमोर येतं तसं हे डाऊनटाऊन अजिबात नाहिये. हा भाग निवांतपणे वेळ घालवायला छान आहे. नदीवरच्या पुलाच्या थोडं पुढून खाली नदीपर्यंत उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. ट्यूबिंग करणार नसाल तर इथे उतरून नदीला नुसतं ’पायलागू’ करू शकता. स्मित टिपीकल अमेरिकन खेड्यांमध्ये असतात तशी आर्ट अँड क्राफ्ट, काचेच्या / क्रीस्टलच्या वस्तू मिळणारी दुकानं, टॅटू काढून देणारे, टीशर्ट, मॅगनेट, शॉट ग्लास, पोस्टकार्ड मिळणारी दुकानं, लोकल कॉफी शॉप्स, आईस्क्रीम पार्लर्स ह्या परिसरात खूप आहेत. मधल्या एका चौकात एक छोटसं पण छान कारंजं आहे. तिथे कधीकधी लोकल बॅंड गाणी म्हणत, गिटार वाजवत असतात. कधीकधी एक जण पक्ष्यांचे खेळ दाखवत असतो. तिथे बसायला बाकसुद्धा आहेत. ज्यांना खरेदी करायची हौस आहे त्यांना दुकानांमध्ये पाठवून आपण (आईस्क्रीम खात किंवा कॉफी घेत) निवांत बाकावर बसून राहावं !



खानपान सेवा :
१. डाऊनटाऊनमध्ये नदीच्या आसपास खूप खाण्याच्या जागा आणि पब्स आहेत. गावाच्या थोडं बाहेर नेहेमीच्या चेनसुद्धा आहेत. पण इथल्या लोकल रेस्टॉरंट्समध्ये नक्की जाऊन बघावं. आम्हांला इथलं इंटरनॅशनल कॅफे नावाचं रेस्टॉरंट खूप आवडतं. नदीच्या काठी बसून निवांत जेवता येतं. मात्र ह्या रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी लोकांचे जरा हाल होतात. हेच ते इंटरनॅशनल कॅफे.



२. फॉलमध्ये अ‍ॅनारूबी फॉल्सच्या रस्त्यावर छोट्याछोट्या ठेल्यांवर उकडलेल्या शेंगा, कणसं, लेमनेड वगैरे मिळतं. जरा थंड हवा असेल तर गरमगरम दाणे मस्त वाटतात ! त्यात केजन फ्लेवरचे म्हणजे जरासे तिखट मिळतात, ते भारी लागतात. पण मात्र लेमनेड खूप आंबट असतं !
३. डाऊनटाऊनमध्ये एक चॉकोलेट फज शॉप आहे. तिथे वेगवेगळ्या प्रकारची फज मिळतात. ती तयारही तिथेच केली जातात. ते पाहायला मिळालं तर मजा वाटते. तिथे कॅरॅमल तसेच चॉकोलेटमध्ये घोळवलेली सफरचंदंसुद्धा मिळतात. मला आधी पाहून खाविशी वाटली नाहीत पण जरासं आंबट सफरचंद आणि वरचं कॅरॅमल किंवा चॉकोलेट ह्यांची एकत्र चव मस्त लागते. फज तिथेच खावं, घरी आणायच्या भानगडीत पडू नये. ते एकतर पडून राहतं आणि थोडे दिवसांनी कडक होतं.



४. फनेल केक : ही हेलनची खासियत. साधारण आपल्या जिलबीसारखा प्रकार. पीठ फनेलमधून (म्हणून फनेल केक) गरम तेलात सोडतात. तळून झालं की वर पिठीसाखर पेरतात. गरम गरम खायला छान लागतो !
ह्यात फ्लेवर्सपण असतात, पण आम्हांला साधाच आवडला.



सकाळी आरामात ९.३० - १० ला निघालं तरी वरच्या सगळ्या गोष्टी करून संध्याकाळी ७-८पर्यंत घरी परतता येतं. दिवस हेलनबाईंबरोबर मजेत जातो.